शुक्रवार, 3 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: शनिवार, 6 जुलै 2024 (09:13 IST)

ऋषी सुनक यांनी पराभवानंतर का मागितली माफी?

rishi sunak
युनायटेड किंग्डममध्ये मजूर पक्षाने (लेबर पार्टी) बहुमताचा आकडा पार केला आहे. त्याचवेळी विद्यमान पंतप्रधान ऋषी सुनक यांच्या हुजूर पक्षाचा (कॉन्झर्व्हेटिव्ह पार्टी) पराभव झाला आहे. युनायटेड किंग्डममध्ये 14 वर्षांनंतर पुन्हा एकदा लेबर पार्टी म्हणजेच मजूर पक्षाची सत्ता येत आहे.
 
युनायटेड किंग्डममध्ये झालेल्या निवडणुकानंतर मजूर पक्षाच्या झालेल्या पराभवानंतर पंतप्रधान ऋषी सुनक यांनी 10 डाऊनिंग स्ट्रीच्या बाहेर राष्ट्राला संबोधित केलं.
 
गेल्या काही दशकातील पक्षाची सर्वात खराब कामगिरी झाल्याबद्दल त्यांनी देशाची माफी मागितली.
 
ते म्हणाले, “मी पराभवाची जबाबदारी स्वीकारतो.”
 
सुनक यांनी गेल्या 14 वर्षांच्या काळात हुजूर पक्षाच्या कामगिरीचा आढावा घेतला आणि म्हटलं की, ब्रिटन 2010 च्या तुलनेत अधिक समृद्ध आणि निष्पक्ष आहे.
सुनक यांनी त्यांचे प्रतिस्पर्धी आणि ब्रिटनचे आगामी पंतप्रधान किएर स्टार्मर यांची स्तुती केली. ते म्हणाले की स्टार्मर यांच्या यशात संपूर्ण देश सहभागी असेल.
निकालानंतर सुनक यांनी समर्थकांची माफी मागितली आणि या निकालापासून शिकण्याची आवश्यकता आहे असं ते म्हणाले.
सुनक म्हणाले की, “आज या कठीण काळात मी रिचमंड नॉर्थहेलर्टन या क्षेत्रातील लोकांचे आभार मानतो. त्यांनी आम्हाला नियमितपणे सेवा करण्याची संधी दिली. मी जेव्हा दहा वर्षांपूर्वी येथे आलो, तेव्हा तुम्ही सर्वांनी माझ्यावर आणि माझ्या कुटुंबियांवर खूप प्रेम केलं आणि आम्ही इथलेच असल्याची जाणीव करून दिली. मी पुढेही खासदार म्हणून सेवा करण्यासाठी उत्सुक आहे. ही माझ्यासाठी सौभाग्याची बाब आहे. मी माझ्या एजंटचा आणि टीमचा आभारी आहे. मी माझ्या विरोधकांचं अतिशय उत्साहात आणि सकारात्मक पद्धतीने प्रचार केल्याबद्दल अभिनंदन करतो
 
“मी किएर स्टार्मर यांचं फोन करून अभिनंदन केलं. आज सत्तेचं शांततापूर्वक हस्तांतरण होईल. सर्व पक्षांमध्ये सद्भाव बघायला मिळाला. म्हणूनच आपण सर्वांनी आपल्या देशाचं स्थैर्य याबद्दल आश्वस्त असायला हवं.”
 
“ब्रिटिश जनतेने आज रात्री आपला निर्णय स्पष्टपणे दिला आहे. बऱ्याच गोष्टी बघायच्या आहेत आणि मी या पराभवाची संपूर्ण जबाबदारी घेतो. आमच्या पक्षाच्या ज्या उमेदवारांचा भरपूर प्रयत्न करून आणि स्थानिक पातळीवर काम करून आणि आपल्या समुदायाबद्दल कटिबद्ध असूनसुद्धा पराभव झाला, त्यांची मी माफी मागतो.”
 
“आता मी लंडनला जाईन. पंतप्रधानपद सोडण्याआधी आज रात्री आलेल्या निकालाबाबत सविस्तर चर्चा करू. येणाऱ्या आठवड्यात, महिन्यात आणि वर्षांत जास्तीत जास्त वेळ व्यतित करण्यासाठी मी उत्सुक आहे. धन्यवाद.”
मजूर पक्षाचे नेते सर किएर स्टार्मर ब्रिटनचे नवीन पंतप्रधान होऊ शकतात. लेबर पार्टीने बहुमताचा 326चा आकडा पार केला आहे. लेबर पार्टीला आत्तापर्यांत 410 जागा मिळाल्या असून कॉन्झर्व्हेटिव्ह पार्टीला 119 जागा जिंकता आल्या आहेत.
 
किएर स्टार्मर यांनी सोशल मीडियावर मतदारांचे आभार मानले आहेत. किएर स्टार्मर हे ब्रिटनचे नवे पंतप्रधान बनणार हे निश्चित आहे. 2020मध्ये जेरेमी कॉर्बिन यांच्या जागी स्टार्मर यांची मजूर पक्षाच्या नेतेपदी निवड झाली होती.
 
एक्झिट पोलच्या अंदाजानुसार कॉन्झर्व्हेटिव्ह पक्षाला जर 131 किंवा त्यापेक्षा कमी जागा मिळाल्या तर या पक्षाचा तो आजवरचा सगळ्यात मोठा पराभव ठरेल.
 
बीबीसी, आयटीव्ही आणि स्कायच्या एक्झिट पोलनुसार सर किएर स्टार्मर यांचा पक्ष 326 चा बहुमताचा आकडा गाठून 'डाउनिंग स्ट्रीट'कडे वाटचाल करत आहे. सध्या सत्तेत असलेल्या हुजूर पक्षाला 131 जागा मिळतील असं दिसत आहे.
 
आपल्या मतदारसंघात विजयी झाल्यानंतरच्या पहिल्या भाषणात त्यांनी म्हटलं की, "आता आमच्यावर काम करण्याची जबाबदारी आहे."
 
'रिफॉर्म यूके' या पक्षाने हुजूर पक्षाच्या मतांमध्ये मोठं विभाजन केलं आहे. रिफॉर्म यूकेचे उमेदवार अनेक जागांवर दुसऱ्या स्थानावर आहेत. या पक्षाचा पहिला खासदार निवडून आला आहे. या पक्षाचे नेते निगेल फॅरेज हेही पहिल्यांदाच निवडून आले आहेत.
हुजूर पक्षाची मते कमी झाल्यामुळे लिबरल डेमोक्रॅटिक पक्षाला फायदा होताना दिसत आहे. त्यांना 61 जागा मिळण्याचा अंदाज आहे. त्यांच्यासाठी हा निकाल 2010 नंतरचा सर्वोत्तम असेल.
 
स्कॉटलंडमध्ये लेबरचे वर्चस्व परत आल्याने स्कॉटिश नॅशनल पार्टी 38 जागा गमावण्याची शक्यता आहे. इंग्लंड आणि वेल्सच्या ग्रीन पार्टीला आपल्या खासदारांची संख्या दुप्पट करून दोनवर पोहोचण्याची संधी आहे. इतरांना 19 जागा मिळण्याचा अंदाज आहे.
 
कोण आहेत किएर स्टार्मर?
एप्रिल 2020 मध्ये मजूर पक्षाचे नवीन नेते म्हणून सर किएर स्टार्मर यांची निवड झाली होती. स्टार्मर 61 वर्षांचे आहेत याआधी जेरेमी कॉर्बिन ब्रिटनमध्ये विरोधी लेबर पार्टीचे नेतृत्व करत होते. व्यवसायाने वकील असलेले स्टार्मर 2015 मध्ये पहिल्यांदा खासदार झाले होते.
लेबर पार्टीच्या नेत्याच्या निवडणुकीत, स्टार्मर पहिल्या फेरीतील मतमोजणीत 50 टक्क्यांहून अधिक मतांनी पुढे होते.
लेबर पार्टीचे नेते बनल्यावर स्टार्मर म्हणाले होते की, "या महान पक्षाला नवीन आशा आणि आत्मविश्वासाने एका नव्या युगात घेऊन जाण्याचा त्यांचा उद्देश आहे."
 
पक्षाने जारी केलेल्या व्हिडिओ संदेशात ते म्हणाले की, "मी निवडून आलो ही माझ्यासाठी अभिमानाची आणि सन्मानाची बाब आहे आणि मला आशा आहे की, वेळ आल्यावर मजूर पक्ष सरकार स्थापन करून पुन्हा एकदा देशाची सेवा करण्यास सक्षम असेल. "
 
लेबर पार्टीच्या मोठ्या विजयानंतर किएर स्टार्मर काय म्हणाले?
ब्रिटनच्या निवडणुकीत लेबर पार्टी विजयाकडे वाटचाल करत आहे. या विजयानंतर लेबर पार्टीचे नेते किएर स्टार्मर म्हणाले की ज्या मतदारांनी त्यांना मतं दिली नाहीत त्यांच्यासाठीही ते काम करणार आहेत.
 
किएर स्टार्मर म्हणाले की, "मी प्रत्येक व्यक्तीसाठी काम करणार आहे."
मतदारांना उद्देशून स्टार्मर म्हणाले की, "मी तुमचा आवाज बनेन, मी रोज तुमच्यासाठी लढत राहीन. मी बदल करण्यासाठी सुसज्ज आहे."
किएर स्टार्मर पुढे म्हणाले की, "आता बदलाला सुरुवात झाली आहे. हे आपली लोकशाही आहे. हा तुमचा समुदाय आहे, तुमचं भविष्य आहे. तुम्ही मतदान केलं आहे आता निकाल देण्याची जबाबदारी आमची आहे."
 
विरोधी पक्षाचे नेते होण्याआधी किएर स्टार्मर यांनी पाच वर्ष वकिली केलेली आहे. २००८ ते २०१३ याकाळात इंग्लंड आणि वेल्समध्ये त्यांनी वकील म्हणून काम केलं आहे.
 
मागच्या चार वर्षांपासून 61 वर्षांचे कीर स्टार्मर हे इंग्लंडच्या संसदत विरोधी पक्षाचे नेते आहेत. राजकीयदृष्ट्या डाव्या विचारसरणीच्या मजूर पक्षाला मध्यवर्ती विचारसरणीकडे नेण्याचं श्रेय त्यांना जातं.
 
'सॉरी' निकालातून शिकण्याची गरज' पराभवानंतर ऋषी सुनक यांची पहिली प्रतिक्रिया
ब्रिटनचे पंतप्रधान आणि कॉन्झर्व्हेटिव्ह पक्षाचे नेते ऋषी सुनक यांनी आपला पराभव स्वीकारला आहे. त्यांनी मजूर पक्षाचे नेते कीर स्टार्मर यांचं अभिनंदन केलं आहे.
 
ऋषी सुनक म्हणाले की, “ब्रिटिश जनतेने दिलेला निर्णय आम्हाला मान्य आहे. यातून खूप काही शिकण्याची गरज आहे. मी पराभवाची जबाबदारी घेतो."
 
ऋषी सुनक यांनी यॉर्कशायरमधील रिचमंडची जागा कायम ठेवली आहे. आपली जागा जिंकल्यानंतर ते आपल्या भाषणात म्हणाले, ''मजूर पक्षाने निवडणूक जिंकली आहे. मी किएर स्टार्मर यांचे त्यांच्या विजयाबद्दल अभिनंदन केले आहे.
2019 च्या निवडणुकीत, 650 जागांच्या संसदेत सुनक यांच्या पक्षाने 364 जागा जिंकल्या होत्या आणि बोरिस जॉन्सन पंतप्रधान झाले.
 
गेल्या वेळेच्या तुलनेत त्यांना 47 जागा जास्त मिळाल्या होत्या. मात्र यावेळी परिस्थिती पूर्णपणे उलट आहे.
ब्रिटनमध्ये 14 वर्षांनंतर लेबर पार्टी पुन्हा सत्तेत येत आहे.
हा विजय लेबर पार्टीचा सगळ्यात मोठा विजय ठरेल का?
एक्झिट पोल्सचे अंदाज खरे ठरले तर लेबर पार्टीचे 410 खासदार निवडून येतील. टोनी ब्लेअर यांच्या नेतृत्वात 1997 मध्ये लेबर पक्षाने मिळवलेल्या ऐतिहासिक विजयाच्या जवळ जाणारा हा निकाल ठरेल.
 
20 वर्षांपूर्वी लेबर पार्टीला इंग्लंच्या इतिहासातला सगळ्यात मोठा जनादेश मिळाला होता. लेबर पार्टीचे तत्कालीन नेते टोनी ब्लेअर यांच्या नेतृत्वाखाली निवडणुकीला सामोरे गेलेल्या लेबर पार्टीचे एकूण 419 खासदार निवडून आले होते आणि काँजर्वेटिव्ह पक्षाला त्यावेळी 165 जागांपर्यंत मर्यादित राहावं लागलं होतं.
 
एक्झिट पोलच्या अंदाजानुसार यंदा लेबर पार्टीला 410 जागा मिळतील असा अंदाज आहे, 1997 पेक्षा हा आकडा फक्त 9 ने कमी असेल. जर प्रत्यक्ष निकालात लेबर पार्टीने एक्झिट पोल्सच्या अंदाजापेक्षा जास्त जागा मिळवल्या आणि 419चा आकडा ओलांडला तर लेबर पार्टीच्या इतिहासातला हा सगळ्यात मोठा विजय ठरेल. कीर स्टार्मर हे टोनी ब्लेअर यांचा विक्रम मोडीत काढतील.
या निवडणुकीत लिबरल डेमोक्रॅटिक पक्ष हा तिसऱ्या स्थानी राहण्याची शक्यता आहे, या पक्षाला 61 जागा मिळतील असा अंदाज वर्तवला गेला.
Published By- Priya Dixit