सोमवार, 25 नोव्हेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. आंतरराष्ट्रीय
Written By
Last Modified: मंगळवार, 20 जुलै 2021 (23:12 IST)

चीनमधल्या मुली सुंदर दिसण्यासाठी 'हा' धोका का पत्करत आहेत?

वायी यिप
आपल्या इतर मित्रांप्रमाणेच 23 वर्षीय रक्सिन मोबाईलवर सोशल मीडिया फीड स्क्रोल करते, तेव्हा ती मित्रांपेक्षा दुसऱ्या गोष्टींचा शोध घेत असते.
 
तिला कॉस्मेटिक सजर्रीविषयीची ताजी माहिती जाणून घ्यायची इच्छा असते. प्रत्येक वेळी ती याविषयीची नवीन माहिती जाणून घ्यायचा प्रयत्न करते.
 
रक्सिन 'डबल आयलिड' म्हणजेच पापण्या दाट करण्यासाठी सर्जरी करण्याचा विचार करत आहे. या सर्जरीत डॉक्टर पापण्यांच्या वरती एक क्रीज बनवतात. सामान्यपणे ज्या लोकांना त्यांचे डोळे मोठे दाखवायचे असतात, ते ही शस्त्रक्रिया करतात.
चीनच्या गुआंगचो भागात राहणारी रक्सिन यासाठी दररोज गेंगमेई अॅपवर लॉग-इन करतात. यासाठी त्यांना चांगला डॉक्टर मिळावा, अशी त्यांची इच्छा आहे.
 
"शहरात अनेक दवाखाने आहेत, पण सगळ्यात चांगल्या दवाखान्यातच शस्त्रक्रिया करावी, अशी माझी इच्छा आहे. कारण यामागे माझ्या चेहऱ्याचा प्रश्न आहे," असं रिक्सन यांनी बीबीसीला सांगितलं.
 
गेंगमेई या चिनी शब्दाचा अर्थ होतो 'खूप सुंदर'.
 
चीनमध्ये असे अनेक सोशल मीडिया प्लॅटफॉर्म आहेत. गेंगमेई त्यापैकी एक. जिथं यूझर्स लिपोसक्शनसारखी प्लॅस्टिक सर्जरी (एक प्रकारची चरबी-काढून टाकण्याची प्रक्रिया) किंवा नाकाला धारदार बनवण्यासंबंधीची माहिती शेअर करतात.
 
इथं यूझर्स त्यांना हवी असलेली माहिती फिल्टर्सच्या माध्यमातून शोधू शकतात.
2013मध्ये सुरू झाल्यानंतर गेंगमईच्या यूझर्सची संख्या 10 लाखांहून 3.6 कोटी झाली आहे. यात निम्म्याहून अधिक महिला आहेत. या महिलांचं वय 20 वर्षाहून अधिक आहे.
 
याप्रकारेच सो-यंग हा एक कॉस्मेटिक सर्जरी प्लॅटफॉर्म आहे. 2018मध्ये याचे महिन्याला 14 लाख युजर्स होते. हा आकडा आता 84 लाखापर्यंत पोहोचला आहे.
 
या अॅप्सचे फॉलोअर्स, यूझर्स आणि सबस्क्रायबर्सची संख्या पाहिल्यास त्यांची लोकप्रियता लक्षात येते. याचा दुसरा अर्थ असा होतो की, चीनमध्ये कॉस्मेटिक सर्जरी वेगानं लोकप्रिय होत आहे.
 
सध्याची आकडेवारी पाहिल्यास अमेरिकेनंतर चीन हा जगातला दुसरा देश आहे, जिथं सर्वाधिक कॉस्मेटिक सर्जरी होत आहेत.
 
डेलॉईटच्या एका रिपोर्टनुसार, गेल्या 4 वर्षांत चीनमधील कॉस्मेटिक सर्जरीचा व्यवसाय 3 टक्क्यांनी वाढला आहे. 2019मध्ये 177 अरब डॉलर होता. ज्यात दरवर्षी 28.7 टक्के वाढ झाली आहे. जागतिक पातळीवर हा दर 8.2 टक्के होता.
द ग्लोबल टाईम्सनुसार, लोकांमध्ये कॉस्मेटिक सर्जरीविषयीची लोकप्रियता अशीच कायम राहिल्यास या दशकाच्या मध्यापर्यंत चीन कॉस्मेटिक सर्जरीच्या बाबतीत जगातला सर्वांत मोठं मार्केट बनू शकतो.
 
कॉस्मेटिक सर्जरीमधील काही गोष्टी अधिक लोकप्रिय आहेत. काही बातम्यांनुसार, डबल आयलीड, व्ही-शेप जॉ लाईन, तीक्ष्ण कान बनवणं, अनेक जणांना आवडतं.
 
याशिवाय वेगवेगळ्या वेळी वेगवेगळ्या प्रकारच्या शस्त्रक्रियेला पसंती मिळते.
 
जेन झेड यानी यांचा जन्म 1996 साली झाला. त्यांना कॉस्मेटिक सर्जरी करण्यात काहीही अडचण वाटत नाही.
 
फॅशन व्यवसायात काम करणाऱ्या रक्सिन सांगतात की, आमची मित्रमंडळी एखाद्या सामान्य गोष्टीसारखंच याहीबाबत चर्चा करत असतो. नुसतीच चर्चा नाही तर जाहीरपणे कॉस्मेटिक सर्जरी करण्याविषयी मत मांडतो.
 
कठोर नियमांची गरज
पण असं नाही की चीनमध्ये होणाऱ्या कॉस्मेटिक सर्जरीमध्ये केवळ चांगल्याच बाबी आहेत. कॉस्मेटिक सर्जरीच्या व्यवसायात ही जी वाढ झाली आहे, त्यात काही नुकसानही आहे.
 
ग्लोबल टाईम्सच्या एका रिपोर्टनुसार, 2019मध्ये देशात 60 हजारांहून अधिक बिना-परवानाधारक प्लॅस्टिक सर्जरी करणारे दवाखाने होते.
 
हे बिना-परवानाधारक दवाखाने दरवर्षी 40 हजारांहून अधिक वैद्यकीय दुर्घटनांसाठी जबाबदार होते, असंही या रिपोर्टमध्ये म्हटलं.
 
यांत एक हाय-प्रोफाईल प्रकरणही समोर आलं होतं. ज्यात अभिनेत्री गाओ लियूनं आपल्या कॉस्मेटिक सर्जरीच्या प्रक्रियेला फोटोंच्या माध्यमातून ऑनलाईन शेयर केलं होतं. यात त्यांच्या नाकाची घडण बिघडली होती.
या चुकीला दुरुस्त करण्यासाठी अजून एक सर्जरी करावी लागेल, पण आधीच्या सर्जरीसाठीच आपण 4 लाख यूआन खर्च केल्याचं त्यांनी सांगितलं होतं.
 
त्यांनी ही माहिती शेयर केल्यानंतर त्यांच्या डॉक्टरांना निलंबित करण्यात आलं होतं आणि दवाखान्याला 49 हजार युआन इतका दंड ठोठावण्यात आला. पण, ही दंडाची रक्कम पुरेशी नाही, असं इंटरनेट यूझर्सचं म्हणणं होतं.
 
एका यूझरनं लिहिलं, "एखाद्याला अपंग करण्याची ही शिक्षा आहे."
 
त्यांनी या इंडस्ट्रीसाठी कठोर नियम बनवण्याची मागणी केली होती.
 
गेल्या महिन्यात चीनच्या राष्ट्रीय आरोग्य आयोगानं बिना-परवानाधारक कॉस्मेटिक सर्जरी पुरवठादारांना ओळखण्यासाठी एका मोहिमेची घोषणा केली होती. यात ग्राहकांच्या तक्रारी लवकरात लवकर निपटवण्याचा मुद्दा सामील करण्यात आला होता.
 
जोखीम का घ्यावी?
चीनमध्ये बहुसंख्य लोक हे देखणेपणाला खूप महत्त्व देतात. यासाठी मग सुंदर बनण्यासाठी कॉस्मेटिक सर्जरीचा वापर करण्याला प्रोत्साहन मिळत आहे.
 
हाँगकाँग विश्वविद्यालयातील जेंडर स्टडीजच्या प्राध्यापक डॉ. ब्रेंडा एलेग्रे म्हणतात, "देखणेपणाचे जे आदर्श असतात त्यानुसार स्वत:त बदल करण्याची मागणी वाढते. हे केवळ रोमान्ससाठी नसतं, तर नोकरीचा विचार करूनही असं केलं जातं."
 
चीनमध्ये जे लोक नोकरीसाठी अर्ज करतात, त्यात त्यांना त्याचा फोटोही द्यावा लागतो. काही नोकऱ्यांमध्ये तर जाहीरपणे शारीरिक बाबींविषयी नियम-अटी लिहिलेल्या असतात. विशेषत: महिलांसाठी.
2018मध्ये ह्यूमन राईट्स वॉचनं चीनच्या सेक्सिस्ट पद्धतीच्या नोकरीच्या जाहिरांतीवर एक रिपोर्ट प्रकाशित केला होता.
 
ज्यात एक उदाहरण देऊन सांगितलं होतं की, कशाप्रकारे एका जाहिरातीत कपडे विकण्यासाठी 'सुंदर' अशा महिला सहाय्यकासाठीचे अर्ज मागवण्यात आले होते. दुसऱ्या एका ठिकाणी 'फॅशनेबल आणि सुंदर' ट्रेन कंडक्टरसाठी अर्ज मागवण्यात आले होते.
 
याशिवाय आजकालच्या जमान्यात इंटरनेट वगैरे गोष्टींवरही तुमचा लुक्स खूप महत्त्वाचा मानला जातो.
 
जाणकारांच्या मते, आजच्या जमान्यात अपियरन्स खूपच महत्त्वाचा झाला आहे. याआधी याला इतकं महत्त्व नव्हतं.
 
गेंगमेईचे उपाध्यक्ष वांग जून यांनी बीबीसीला सांगितलं, "सौंदर्य हे काही प्रमाणात करियरसाठी अधिकच्या संधी उपलब्ध करून देऊ शकतं. उदाहरणार्थ लाईव्ह स्ट्रीमिंग किंवा ऑनलाईन व्हीडिओ संदर्भातली कामे."
 
आपण आपल्या प्लॅटफॉर्मवर केवळ परवानाधारक डॉक्टरांसोबतच काम करतो, असाही गेंगमेईचा दावा आहे.
 
सौंदर्यापासून कुरुपतेकडे
चीनचं टॅब्लॉईड कल्चरही यासाठी जबाबदार असू शकतं. बातम्यांमध्ये नेहमीच प्रसिद्ध व्यक्तींची त्यांच्या दिसण्यावरून टीका केली जाते.
 
यावर्षीच्या सुरुवातीला शांघायमध्ये एका आर्ट गॅलरीचं आयोजन करण्यात आलं होतं. यात महिलांच्या फोटोंना 'सर्वांत सुंदर पासून सर्वाधिक कुरुप' अशा क्रमाने ठेवण्यात आलं होतं.
 
कॉस्मेटिक सर्जरीसंबंधी एका पुस्तकावर काम करत असलेल्या बीजिंगच्या फोटोग्राफर लू यू फॅन यांनी बीबीसीला सांगितलं, "मोठं झाल्यानंतर लोक त्यांच्या लूक्सविषयी अधिक क्लियर होतात. माझे नातेवाईक मला सांगायचे की मी कोणत्या अभिनेत्रीसारखे दिसते. खरं तर ती काही सुंदर अभिनेत्री नव्हती, तर ती एक विनोदी कलाकार होती."
 
त्या पुढे सांगतात, "जेव्हा मी माध्यमिक शाळेत होते, तेव्हा वर्गातील सगळ्यात कुरुप मुलगी कोण, असंही आमच्या वर्गातील मुलं ठरवायचे. मी वर्गातील पाचव्या क्रमांकाची कुरूप मुलगी आहे, असं त्यांनी मला सांगितलं होतं."
फॅन ज्या प्रकल्पासाठी काम करत आहेत, त्यासाठी त्यांनी 30 कॉस्मेटिक सर्जरी करणाऱ्या दवाखान्यांचा दौरा केला आहे. त्यातल्या प्रत्येक दवाखान्यात मी माझ्या चेहऱ्यात काय सुधारणा करू शकते, असं मला तिथं सांगण्यात आल्याचं फॅन सांगतात.
 
रक्सिन जी सर्जरी करण्याचा विचार करत आहे, ती त्यांच्यासाठी स्वस्त आहे. यासाठी 300 ते 1200 डॉलर दरम्यान खर्च येतो.
 
पण, हा केवळ पहिला टप्पा आहे.
 
त्या सांगतात, "हे ठीक राहिलं तर मी अजून सर्जरी करण्याचा विचार करेल. कुणाला सुंदर दिसायला आवडत नाही?"