शुक्रवार, 8 नोव्हेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. आंतरराष्ट्रीय
Written By
Last Modified: शनिवार, 23 सप्टेंबर 2023 (18:30 IST)

जस्टिन ट्रुडो यांच्या राजकारणात कॅनडातले शीख इतके महत्त्वाचे का आहेत? वाचा

2015 मध्ये जेव्हा जस्टिन ट्रुडो पहिल्यांदा कॅनडाचे पंतप्रधान झाले तेव्हा त्यांनी गंमतीने म्हटले होते की, भारताच्या मोदी सरकारपेक्षा त्यांच्या मंत्रिमंडळात जास्त शीख मंत्री आहेत.
 
ट्रुडो यांनी त्यावेळी चार शिखांचा मंत्रिमंडळात समावेश केला होता. कॅनडाच्या राजकीय इतिहासात हे प्रथमच घडले होते.
 
पंतप्रधान जस्टिन ट्रुडो यांनी संसदेत केलेल्या वक्तव्यानंतर सध्या कॅनडाचे भारतासोबतचे संबंध गंभीर संकटात सापडले आहेत.
 
जस्टिन ट्रुडो यांनी सोमवारी संसदेत खलिस्तान समर्थक हरदीपसिंग निज्जरच्या हत्येमागे भारत सरकार असल्याचा संशय व्यक्त केला, त्यानंतर दोन्ही देशांनी एकमेकांच्या उच्च राजनैतिक अधिकाऱ्यांची हकालपट्टी केली.
 
खलिस्तानमुळे भारताच्या कॅनडासोबतच्या संबंधांमध्ये यापूर्वीही चढ-उतार आले आहेत, पण तणावाचा उल्लेख याआधी संसदेत कधी झाला नव्हता.
 
निज्जर प्रकरणी कॅनडाच्या भूमिकेला अमेरिकेचा पाठिंबा
22 सप्टेंबर 2023
मोदी आणि ट्रुडो यांचे संबंध कसे आहेत,भारत-कॅनडा वादाला वैयक्तिक किनार आहे का?
20 सप्टेंबर 2023
हरदीपसिंग निज्जर : भारताचा मोस्ट वाँटेड ज्याला परदेशात गोळ्या घातल्या
20 सप्टेंबर 2023
तथापि, जेव्हा-जेव्हा कॅनडातील शीखांमध्ये ट्रुडो यांच्या लोकप्रियतेबद्दल बोलले जाते तेव्हा त्यांच्या खलिस्तान समर्थकांबद्दलच्या मवाळ भूमिकेबद्दलही प्रश्न उपस्थित केले जातात.
 
भारत सरकार दीर्घकाळापासून कॅनडाला खलिस्तानी फुटीरतावाद्यांवर कारवाई करण्यास सांगत आहे.
 
व्होट बँकेचे राजकारण लक्षात घेऊन ट्रूडो सरकार खलिस्तानबाबत मवाळ असल्याचे भारताचे मत आहे. परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांनी असा दावा केला आहे.
 
जस्टिन ट्रुडोचा आतापर्यंतचा प्रवास आणि त्यात कॅनेडियन शीखांच्या विशेष भूमिकेवर एक नजर.
 
ट्रुडोंसाठी शीख महत्त्वाचे का आहेत?
जस्टिन ट्रुडो वयाच्या अवघ्या 44 व्या वर्षी पहिल्यांदा कॅनडाचे पंतप्रधान झाले. 2019 मध्ये ते पुन्हा या खुर्चीवर विराजमान झाले पण तोपर्यंत त्यांची लोकप्रियता खूपच कमी झाली होती.
 
2019 मध्ये कोरोनाची साथ आली. ट्रुडोंच्या लिबरल पक्षाला विश्वास होता की या साथीच्या रोगाचा सामना करण्याची त्यांची क्षमता पाहता, त्यांना हाऊस ऑफ कॉमन्समध्ये (कॅनडाच्या संसदेचे कनिष्ठ सभागृह) सहज बहुमत मिळेल.
 
2019 मध्ये मुदतपूर्व निवडणुका झाल्या. ट्रुडो यांच्या लिबरल पक्षाच्या 20 जागा कमी झाल्या.
 
मात्र या निवडणुकीत जगमीत सिंग यांच्या नेतृत्वाखालील न्यू डेमोक्रॅटिक पक्षाला 24 जागा मिळाल्या होत्या.
 
वॉशिंग्टन पोस्टच्या वृत्तानुसार, जगमीत सिंग त्यांच्या पक्षाचे नेते बनण्यापूर्वी खलिस्तानी रॅलीत सहभागी होत असत.
 
ट्रिब्यून इंडियाने एका बातमीत या परिस्थितीचा उल्लेख करताना विश्लेषकांनी दिलेल्या माहितीच्या आधारे लिहिले आहे की, "ट्रूडो यांना पंतप्रधानपदी राहण्यासाठी जगमीत सिंग यांचा पाठिंबा खूप महत्त्वाचा ठरला होता. कदाचित हे देखील एक मोठे कारण असेल ज्यामुळे ट्रुडो शिखांना नाराज करण्याची कोणतीच जोखीम पत्करू शकत नव्हते."
 
"ट्रुडो चालवत असलेल्या सरकारकडे बहुमत नाही पण जगमीत सिंग यांचा पाठिंबा आहे. राजकारणात राहाण्यासाठी ट्रूडो यांना जगमीत सिंग यांची गरज आहे. जगमीत सिंग यांना आता ट्रूडोंचा विश्वासू सहकारी म्हणून पाहिले जाते, जो प्रत्येक कठीण प्रसंगी त्यांच्यासोबत उभा राहतो. "
 
कॅनडाच्या लोकसंख्येच्या 2.1 टक्के शिख आहेत. गेल्या 20 वर्षात कॅनडातील शिखांची लोकसंख्या दुप्पट झाली आहे. त्यापैकी बहुतेक लोक भारतातील पंजाबमधून शिक्षण, करिअर, नोकरी इत्यादी कारणांसाठी तिथे आले आहेत.
 
आता प्रश्न असा आहे की कॅनडाच्या राजकारणात अल्पसंख्याक शिखांना इतके महत्त्व का आहे?
 
ट्रिब्यून इंडियाच्या एका अहवालात, तज्ञांनी म्हटले आहे की, "शिखांचे एक वैशिष्ट्य म्हणजे ते एक समुदाय म्हणून एकत्र आहेत, त्यांच्याकडे संघटनात्मक कौशल्ये आहेत, ते मेहनती आहेत आणि संपूर्ण देशभरातील गुरुद्वारांच्या जबरदस्त नेटवर्किंगद्वारे आवश्यक निधी जमवतात. निधी ही एक अशी गोष्ट आहे जी शीख आणि गुरूद्वारा यांच्यामार्फत कोणत्याही कॅनेडीयन राजकीय नेत्यासाठी मदत व्यवस्था तयार करतं."
 
व्हँकुव्हर, टोरांटो, कॅल्गरीसह संपूर्ण कॅनडामध्ये गुरुद्वारांचे मोठे जाळे आहे.
 
डफल्स टॉड यांनी काही वर्षांपूर्वी व्हँकुव्हर सनमध्ये एक लेख लिहिला होता. त्यानुसार, "व्हँकुव्हर, टोरांटो आणि कॅल्गरी येथील प्रमुख गुरुद्वारांमध्ये विजय मिळवणारा शिखांचा गट अनेकदा काही लिबरल आणि एनडीपी निवडणुकीच्या उमेदवारांना पाठिंबा देण्यासाठी पैसे आणि आपले वजन वापरतो."
 
वॉशिंग्टन पोस्टने भारत आणि कॅनडामधील संबंधांमधील तणावासंदर्भात एक लेख प्रकाशित केला आहे, ज्यामध्ये कॅलगरी विद्यापीठाच्या धर्म विभागात शिकवणारे हरजीत सिंग ग्रेवाल यांनी शीख कॅनडाला का प्राधान्य देतात यामागील कारण स्पष्ट केले आहे.
 
ते म्हणतात, "1947 मध्ये भारत आणि पाकिस्तानच्या फाळणीनंतर आलेल्या अस्थिरतेमुळे पंजाबच्या शिखांना स्थलांतर करण्यास भाग पाडले. शीख ब्रिटन, ऑस्ट्रेलिया आणि अमेरिकेतही स्थायिक झाले असले तरी, त्यांच्यापैकी मोठ्या संख्येने कॅनडा गाठले कारण येथे कोणत्याही नैतिक-सामाजिक मूल्यांमध्ये विशेष फरक जाणवला नाही."
 
आज कॅनेडियन समाज आणि राजकारणात शिखांची महत्त्वाची भूमिका आहे. न्यू डेमोक्रॅटिक पक्षाचे (एनडीपी) अध्यक्ष जगमीत सिंग हे शीख आहेत.
 
भारतातील शिखांना मिळणाऱ्या वागणुकीवर ते अनेकदा उघडपणे बोलत असतात. वॉशिंग्टन पोस्टच्या वृत्तानुसार, त्यांच्या वक्तव्यामुळेच जगमीत सिंग यांना 2013 मध्ये भारताचा व्हिसा देण्यात आला नव्हता.
 
'नेता बनण्यासाठीच जन्माला आले'
जस्टिन ट्रुडो फक्त चार महिन्यांचे असताना अमेरिकेचे तत्कालीन राष्ट्राध्यक्ष रिचर्ड निक्सन यांनी भाकित केले होते की, हे मूल एके दिवशी आपल्या वडिलांच्या पावलावर पाऊल टाकेल.
 
1972 साली रिचर्ड निक्सन कॅनडाच्या अधिकृत दौऱ्यावर होते. त्यावेळी सार्वजनिक भोजनाच्या दरम्यान त्यांनी आपल्या कॅनेडियन समकक्षांना सांगितले, "आज रात्री आपण औपचारिकता वगळू. मी कॅनडाचे भावी पंतप्रधान जस्टिन पियरे ट्रूडो यांना मी हा प्याला समर्पित करतो."
 
सीबीसीच्या अहवालानुसार, पियरे ट्रूडो यांनी त्यावेळी म्हटले होते की, "मला आशा बाळगतो की त्यांच्याकडे (जस्टिन ट्रुडो) अध्यक्षासारखे कौशल्य आणि आकर्षण असेल."
 
जस्टिन ट्रुडो यांचे वडील पियरे ट्रूडो यांचा 1980 पर्यंत कॅनडाच्या राजकारणावर दबदबा होता.
 
पियरे ट्रुडो हे 1968 ते 1979 आणि पुन्हा 1980 ते 1984 दरम्यान कॅनडाचे पंतप्रधान होते.
 
जस्टिनचे बालपण राजकारणापासून दूर गेले
जस्टिन ट्रुडो यांचे बहुतांश बालपण राजकारणापासून दूर राहिले. त्यांनी मॅकगिल विद्यापीठ आणि नंतर ब्रिटिश कोलंबिया विद्यापीठात शिक्षण घेतले आणि नंतर ते शिक्षक झाले.
 
1998 मध्ये, जस्टिन ट्रुडोंचा धाकटा भाऊ मायकेलचा ब्रिटिश कोलंबियामध्ये झालेल्या हिमस्खलनात मृत्यू झाला. या आपत्तीनंतरच्या त्यांच्या भूमिकेने लोकांचे लक्ष वेधून घेतले. खरंतर, ते हिमस्खलन सुरक्षेचे प्रवक्ते बनले.
 
दोन वर्षांनंतर, जेव्हा त्यांच्या वडिलांचे वयाच्या 80 व्या वर्षी निधन झाले, तेव्हा ट्रूडो यांनी राष्ट्रीय दूरदर्शनवर भाषण दिले. त्यांच्या भाषणाचे खूप कौतुक झाले आणि त्याचवेळी अनेकांना ते पंतप्रधान बनण्याच्या शक्यतेची झलकही दिसली.
 
ट्रूडो यांनी 2004 मध्ये सोफी ग्रीजोरशी लग्न केले. दोघांना तीन मुलं आहेत. मात्र, यावर्षी ट्रुडो आणि त्यांच्या पत्नीने वेगळे होण्याची घोषणा केली.
 
राजकीय वाटचालीला सुरुवात
वडिलांच्या निधनानंतर जस्टिन ट्रुडो राजकारणात सक्रिय झाले. 2008 मध्ये ते पहिल्यांदा खासदार म्हणून निवडून आले.
 
अगदी सुरुवातीपासूनच लिबरल पक्षाला जस्टिन ट्रुडो यांच्यात नेतृत्वगुण दिसले. 2011 मध्ये ट्रूडो पुन्हा खासदार म्हणून निवडून आले.
 
लिबरल पक्षाचे नेतृत्व करण्याची त्यांची इच्छा अनेक वेळा अपूर्ण राहिल्यानंतर, ट्रुडो यांनी 2012 मध्ये पक्ष नेतृत्वासाठी निवडणूक लढवण्याचा त्यांचा हेतू स्पष्ट केला.
 
निवडणुकीच्या प्रचारादरम्यान, त्यांचे विरोधक ट्रुडो यांच्यावर अनुभवाच्या कमतरतेमुळे टीका करत राहिले. सार्वत्रिक निवडणुकीपूर्वीही त्यांना अशाच टीकेला सामोरे जावे लागले होते. पण ट्रुडो यांनी सार्वत्रिक निवडणुका मोठ्या फरकाने जिंकल्या.
 
भारत सरकारसोबत तणावाचे संबंध
नरेंद्र मोदी पंतप्रधान असताना 2018 मध्ये जस्टिन ट्रूडो पहिल्यांदा सात दिवसांच्या भारत दौऱ्यावर आले होते तेव्हा बराच वाद झाला होता.
 
आंतरराष्ट्रीय प्रसारमाध्यमांनी त्यावेळी त्यांच्या वृत्तांत म्हटले होते की, ट्रुडोंचे स्वागत करण्यात भारताने उदासीनता दाखवली.
 
कॅनडाच्या शीख फुटीरतावाद्यांशी असलेल्या सहानुभूतीमुळे भारताने हे कृत्य केल्याचे प्रसारमाध्यमांच्या वार्तांकनात म्हटले गेले होते.
 
जस्टिन ट्रूडो यांनी या दौऱ्यात अमृतसरच्या सुवर्ण मंदिरालाही भेट दिली होती.
 
2018 मध्ये जस्टिन ट्रूडो यांच्या मंत्रिमंडळात तीन शीख मंत्री होते. या मंत्र्यांमध्ये संरक्षण मंत्री हरजीत सज्जन यांचाही समावेश होता.
 
सज्जन यांनी आपल्या पंतप्रधानांच्या विधानाचे समर्थन केले असून भारतासह कोणत्याही देशाचा हस्तक्षेप कॅनडात खपवून घेतला जाणार नाही, असे म्हटले आहे.
 
2017 मध्ये पंजाबचे तत्कालीन मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंग यांनी सज्जनला खलिस्तान समर्थक म्हटले होते. मात्र, सज्जन यांनी सिंग यांचा दावा फेटाळून लावला होता.
 
ओंटारियो विधानसभेने भारतातील 1984 च्या शीखविरोधी दंगलीचा निषेध करणारा ठराव संमत केला तेव्हा भारतही नाराज होता.
 
कॅनडातील खलिस्तान समर्थकांची कायम स्वतंत्र पंजाबसाठी सार्वमत घेण्याची योजना राहिली आहे.
 
भूतकाळातही ट्रूडोंना वादाची पार्श्वभूमी
जस्टिन ट्रुडो 2015 मध्ये 'वास्तविक बदल' सारख्या अनेक प्रगतीशील आश्वासनांच्या आधारे जिंकून कॅनडाचे पंतप्रधान झाले.
 
दोन डझनहून अधिक स्वतंत्र कॅनेडियन शिक्षणतज्ञांचा असा विश्वास होता की त्यांच्या पहिल्या कार्यकाळात ट्रुडो यांनी 92 टक्के आश्वासने अंशतः किंवा पूर्णपणे पूर्ण केली.
 
जस्टिन ट्रुडो यांच्या दुसऱ्या कार्यकाळाची सुरुवात एका राजकीय घटनेने झाली. त्यांनी डोनाल्ड ट्रम्प यांची खिल्ली उडवली आणि ही घटना कॅमेऱ्यात रेकॉर्ड झाली. प्रत्युत्तरात ट्रम्प यांनी ट्रुडो यांना 'ढोंगी' संबोधले.
 
काही महिन्यांनंतर, जेव्हा प्रसारमाध्यमांनी त्यांना अमेरिकेचे तत्कालीन अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि त्या वेळी अमेरिकेत सुरू असलेल्या निषेधांविषयी प्रश्न विचारला तेव्हा ट्रूडो 20 सेकंदांपेक्षा जास्त काळ शांत राहिले. हा व्हीडिओ प्रचंड व्हायरल झाला.
 
गेल्या वर्षी बाली येथे झालेल्या G-20 शिखर परिषदेदरम्यान चीनचे अध्यक्ष शी जिनपिंग आणि जस्टिन ट्रूडो यांचा एक व्हीडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता, ज्यामध्ये दोन्ही नेत्यांमध्ये बाचाबाची झाली होती.
 
त्याच्या भाषणाचे इंग्रजीत भाषांतर करणाऱी व्यक्ती म्हणाली, "आमच्यात जी काही चर्चा झाली ती वर्तमानपत्रात उघड झाली, ते योग्य नाही... आणि संवादाची ही योग्य पद्धत नव्हती.
 
जर तुम्ही खरे असाल, तर आपण एकमेकांशी आदराने संवाद साधला पाहिजे, अन्यथा परिणाम काय होईल हे सांगणं कठीण आहे. ”
 
यानंतर कॅनडाचे पंतप्रधान ट्रुडो यांनी ‘कॅनडात आमचा स्वतंत्र आणि मुक्त संवादावर विश्वास आहे आणि आम्ही ते भविष्यातही करत राहू’, अशी निवांतपणे प्रतिक्रिया देताना दिसले.
 
कोरोना साथीचा कालखंड ही ट्रुडो यांची सर्वात मोठी परीक्षा होती. कॅनडासाठी 18 महिने खूप कठीण होते.
 
जेव्हा त्यांनी लवकर निवडणुका घेतल्या तेव्हा असे मानलं जात होतं की कॅनडा भूतकाळाच्या पलीकडे गेला आहे. मात्र या निवडणुकीचे निकाल लिबरल पक्षाला धक्का देणारं ठरलं त्यांना जगमीत सिंग यांचा पाठिंबा मिळाला नाही तर ट्रुडो यांचे राजकीय भवितव्य धोक्यात येऊ शकतं, असं त्यांच्या लक्षात आलं.