शुक्रवार, 8 नोव्हेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. आंतरराष्ट्रीय
Written By
Last Modified: शुक्रवार, 27 ऑक्टोबर 2023 (15:08 IST)

कॅनडातल्या या 3 शहरांमध्ये कायमचं स्थायिक होण्याचा प्रयत्न का केला जातो?

study in canada from india
कॅनडातील व्हँकुव्हर, कॅलगरी आणि टोरंटो या शहरांना ग्लोबल लिव्हेबिलिटी इंडेक्स 2023 च्या शीर्ष 10 शहरांमध्ये स्थान देण्यात आलंय.या निर्देशांकांतर्गत शहरांमधील राहणीमानाचे मूल्यांकन केले जाते. या यादीतील शहरांमध्ये आरोग्य सेवा, संस्कृती, पर्यावरण, शिक्षण आणि पायाभूत सुविधा अतिशय दर्जेदार असतात.
 
कॅनडातील या तीन शहरातील लोकांचं जीवनमान कसं आहे? ग्लोबल लिव्हेबिलिटी इंडेक्स 2023 च्या शीर्ष 10 शहरांमधील राहणीमान कसं असतं? हे जाणून घेण्यासाठी आम्ही या शहरात राहणाऱ्या लोकांशी चर्चा केली.
 
युरोपियन आणि स्कॅन्डिनेव्हियन देशांमधील शहरं बहुतेक वेळा शीर्षस्थानी असतात. इथे लहान मुलांची देखभाल दर्जेदार पद्धतीची असते. पण या शर्यतीत सामील होण्यासाठी कॅनडा शांतपणे पुढे जातोय.
 
कॅनडाच्या तीन शहरांनी पहिल्या दहामध्ये आपलं स्थान निश्चित केलंय यावरून ते सिद्ध होतंय. यात व्हँकुव्हर पाचव्या, कॅलगरी सातव्या आणि टोरंटो नवव्या क्रमांकावर आहे. आरोग्य सेवा आणि शिक्षणाच्या बाबतीत ही शहरे अव्वल आहेत.
व्हँकुव्हरच्या रहिवासी समंथा फॉक सांगतात, आमचे प्रगतीशील राजकारण आणि आरोग्यसेवा मिळून कॅनडा हा देश राहण्यासाठी एक उत्तम ठिकाण बनलं आहे
 
त्या सांगतात, "मी अशा देशात राहण्याची कल्पना करू शकत नाही जिथे मला डॉक्टरांना भेटण्याची, माझ्या मुलांना रुग्णालयात नेण्याची किंवा कर्करोगामुळे दिवाळखोर होण्याची भीती वाटेल."
 
कॅनडाने सार्वजनिक वाहतूक प्रणालींमध्ये मोठ्या प्रमाणात गुंतवणूक केली आहे , ज्यामुळे मोठ्या शहरांमध्ये प्रवास करणं सुलभ झालं आहे.
 
मॉन्ट्रियल, कॅलगरी आणि टोरंटो येथे राहणाऱ्या फॉक यांना त्यांनी वयाची चोविशी गाठेपर्यंत चालक परवाना मिळाला नव्हता. त्यांच्या मैत्रिणीला वयाच्या 53 व्या वर्षी चालक परवाना मिळाला. शहराची सार्वजनिक वाहतूक व्यवस्था इतकी चांगली आहे की, त्यांना शहरात कुठेही फिरायला गाडीची गरज भासलीच नाही. त्यामुळेच त्यांनी चालक परवाना काढला नव्हता.
 
फॉक सांगतात, कॅनडातील इतर शहरांप्रमाणेच या यादीत असलेली तीन शहर निसर्गाच्या सानिध्यात आहेत.
 
व्हँकुव्हर
तिन्ही शहरांची आपली आपली वैशिष्टय आहेत. सर्वात आधी, देशाच्या पश्चिम किनाऱ्यावर वसलेल्या व्हँकुव्हर शहराबद्दल जाणून घेऊ.
 
व्हँकुव्हर हे कॅनडातील राहण्यायोग्य शहर म्हणून घोषित करण्यात आलं आहे. संस्कृती आणि पर्यावरणाशी संबंधित उप-निर्देशांकात या शहराला चांगले गुण मिळाले आहेत. या बाबतीत हे शहर जगातील पहिल्या दहा शहरांमध्ये आहे. केवळ ऑकलंडला व्हँकुव्हरपेक्षा चांगले गुण मिळाले आहेत.
 
इथले नागरिक आपल्या भावना व्यक्त करताना सांगतात की, त्यांचे त्यांच्या शहराच्या नैसर्गिक सौंदर्याशी भावनिक संबंध आहेत.
 
फॉक सांगतात, "व्हँकुव्हरमध्ये समुद्र आणि पर्वतांचा एक अनोखा मिलाफ आहे, आणि त्यामुळेच ते आकर्षक ठिकाण आहे."
 
फॉक या शहरात कम्युनिकेशन फर्म चालवतात. त्या पुढे सांगतात, "मी या शहरात वीस वर्षांपासून राहते आहे. आणि आजही मला ते तितकंच सुंदर वाटतं."
 
समंथा सांगतात, 405 हेक्टरवर पसरलेलं स्टॅनले पार्क शहराच्या मध्यभागी असून त्यात 100 वर्ष जुनी झाडं आहेत. 700-800 वर्ष जुनं देवदारचं झाड देखील आहे, याला द होलो ट्री नावाने ओळखलं जातं.
 
भटकंतीसाठी इथे 2.9 किलोमीटर लांबीचा ग्रॉस ग्राइंड ट्रेल आहे. तर ज्यांना शांत ठिकाणं आवडतात त्यांच्यासाठी इथे उत्तम रेस्टॉरंट्स देखील आहेत.
 
व्हँकुव्हरच्या दुसऱ्या एक रहिवासी जेन स्टोलर सांगतात, "फॅन्सी रेस्टॉरंट्स आणि फूड ट्रक्स व्यतिरिक्त इथे शेतकऱ्यांचे बाजार देखील भरतात. चवदार पदार्थांची इथे कमतरता नाही."
 
त्यांनी खासकरून व्हँकुव्हर सुशी रेस्टॉरंट्सचा उल्लेख केला. जपानच्या बाहेर चांगले आणि दर्जेदार सुशी केवळ इथेच मिळतात असा त्यांचा दावा आहे.
 
स्टॉलर सांगतात की, व्हँकुव्हरचे लोक मोकळ्या स्वभावाचे आहे. त्यांना कला, तंत्रज्ञान किंवा हरित मोहिमेच्या विषयावर एकत्र यायला आवडतं.
 
कॅलगरी
 
हे शहर अल्बर्टाच्या पश्चिम प्रांतात रॉकी पर्वताच्या कुशीत विसावलं आहे. इथे अत्याधुनिक सोयी सुविधा असूनही हे एक छोटं शहर वाटतं असं इथले नागरिक सांगतात. कॅनडातील इतर शहरांच्या तुलनेत इथे राहण्याचा खर्चही कमी आहे.
 
पेशाने ट्रॅव्हल ब्लॉगर असलेली लोरा पोप सांगते, "कॅलगरी हे कॅनडातील सर्वात मोठ्या शहरांपैकी एक असलं तरी या शहराने आपलं सौंदर्य अबाधित राखलंय. इथले शेजारी मनमिळावू आहेत. ग्राहकांवर आधारित शेतकरी बाजार आहेत."
 
ती सांगते, "एवढं सगळं असून देखील इथे ट्रेंडी खाण्याची ठिकाणं आहेत. इथे सांस्कृतिक उत्सव भरतात, शिवाय नाइटलाइफ देखील आहे."
 
हे शहर विविधतेतही पुढे आहे. त्याबाबतीत ते कॅनडामध्ये तिसऱ्या क्रमांकावर आहे. या शहरात 240 जातींचे लोक राहतात आणि 165 भाषा बोलल्या जातात.
 
इथे तेल आणि वायूचे कारखाने आहेत. पांढरपेशे व्यावसायिक या शहरात राहतात. आणि तरी देखील या शहरात राहण्याखाण्याचा खर्च अगदीच कमी आहे.
 
कम्युनिकेशन क्षेत्रात काम करणाऱ्या जेसी पी. कायाबो सांगतात, 'कॅल्गेरियन लोकांकडे पैसा आहे आणि त्यांना तो खर्च करायला आवडतो."
 
इथे जुलैच्या पहिल्या शुक्रवारपासून सलग दहा दिवस कॅलगरी स्टॅम्पेड उत्सव साजरा केला जातो. यात सहभागी होणारे लोक पाश्चात्य पोशाख घालतात आणि जबरदस्त पार्टी करतात. या उत्सवासाठी जगभरातून लोक येतात.
 
इथे राहणाऱ्या शॅनन ह्यूजेस सांगतात, "शहरातील सर्वात सुंदर पर्वतीय दृश्य पाहायचं असेल तर मेजर टॉम्स रेस्टॉरंटमध्ये जायला हवं."
 
कॅनडाच्या इतर भागांप्रमाणे, या शहरालाही नैसर्गिक सानिध्य लाभल्यामुळे या शहरात जीवनमान चांगलं आहे.
 
कॅलगरीमध्ये उत्तर अमेरिकेतील सर्वात मोठं आणि सर्वात विस्तृत सायकल ट्रॅक आहे. चालण्यासाठी आणि सायकलिंगसाठी 1,000 किलोमीटरहून अधिक पक्के मार्ग आहेत.
 
पोप सांगतात, "या मार्गांवर सायकल चालवताना मी शहरातील अनेक लपलेली ठिकाणं शोधून काढली आहेत. इथली विलोभनीय दृश्य पाहून माझी दररोज बाहेर पडण्याची इच्छा देखील पूर्ण होते."
 
हिवाळ्यात हा प्रदेश बर्फाने झाकलेला असतो. या दिवसांमध्ये लोक स्कीइंग, स्केटिंग, ट्यूबिंग आणि स्नोशूइंगचा आनंद घेतात.
 
या शहराने 1988 मध्ये हिवाळी ऑलिम्पिकचं आयोजन केलं होतं. त्यानंतर बांधलेल्या सुविधा अजूनही कायम आहेत.
 
इथला हिवाळा मोठा आणि कडक असतो. जर तुम्ही उष्ण भागातून या शहरात येण्याचा विचार करत असाल तर हिवाळ्यासाठी चांगले कपडे खरेदी करायला विसरू नका.
 
टोरंटो
हे कॅनडातील सर्वात मोठं शहर आहे. या शहरात आल्यावर आधुनिक शहराची अनुभूती येते. या शहरात 1500 हून अधिक उद्यानं आहेत.
 
येथील पायाभूत सुविधा मानवी पैलू लक्षात घेऊन विकसित केल्या आहेत. जेणेकरून लोकांचं जीवनमान सुरळीत चालू राहील.
 
इथले लोक अंडरग्राउंड 'पाथ नेटवर्क'चा वापर करतात. हिवाळ्यात रस्त्यांवर बर्फ साचल्यावर हे भूमिगत रस्ते कामी येतात.
 
इथे राहणारी ब्लॉगर होआंग आन ले सांगते, "माझ्या ऑफिसपासून विमानतळापर्यंत, रात्रीच्या जेवणासाठी बाहेर जाण्यापासून ते खरेदीपर्यंत, अगदी डॉक्टरकडे जाण्यासाठी आम्ही या भूमिगत रस्त्यांचा वापर करतो. हिवाळ्यात अगदी कोट न घालता तुम्ही बाहेर पडू शकता."
 
इथे राहणारी कायरा मार्कसेल सांगते, "शहरात कुठेही सायकली भाड्याने मिळतात.
 
हे शहर त्याच्या विविधतेसाठीही ओळखलं जातं. टोरंटोमध्ये राहणारे 51 टक्के लोक कॅनडाबाहेर जन्मलेले आहेत. सॉफ्टवेअर कंपनी होस्टअवेचे संस्थापक मार्कस रॅडर सांगतात, "हे पश्चिमेकडील एकमेव मोठं शहर आहे जिथे गहूवर्णीय लोक बहुसंख्य आहेत."
 
ते म्हणतात, "इथे विविध संस्कृती आणि भाषा अनुभवता येते. कॅनडा बहुसांस्कृतिकतेचा पुरस्कार करतो. आणि लोकांवर कोणत्याही प्रकारचा दबाव टाकला जात नाही."
 
ही सांस्कृतिक विविधता जसं की विविध सण, विविध खाद्यपदार्थ, नव्या कल्पना, जगण्याच्या पद्धती समुदायाला समृद्ध करते.
 
कॅच कॉर्नर अॅपचे सीईओ जोनाथन अझुरी म्हणतात, "लोकांच्या कामाच्या आणि वैयक्तिक जीवनाशी संबंधित त्यांच्या सांस्कृतिक सवयींबद्दल जाणून घेणं मजेदार असतं."
 
ते सांगतात, "यामुळे तुम्हाला शहर न सोडता आंतरराष्ट्रीय कामाचा अनुभव घेता येतो."
 
हे शहर आपल्या औद्योगिकतेसाठी ओळखलं जातं. इथे गुगल आणि फेसबुक सारख्या बड्या कंपन्यांची ऑफिसेस आहेत. याशिवाय अनेक नवीन स्टार्टअप्स कंपन्या आहेत. न्यूयॉर्क आणि सिलिकॉन व्हॅली नंतर, हे उत्तर अमेरिकेतील सर्वात मोठं तंत्रज्ञान केंद्र आहे.
 
या शहरातील सांस्कृतिक विविधता आणि तांत्रिक समृद्धतेमुळे लोकांना चांगल्या संधी उपलब्ध होतात.
 























Published By- Priya Dixit