1. लाईफस्टाईल
  2. आरोग्य
  3. आरोग्य लेख
Written By

टॉवेल किती दिवसांनी धुवावा? अस्वच्छ टॉवेल वापरल्याने कोणते आजार होऊ शकतात?

साधारणपणे वापरत असलेल्या कपड्यांतून दुर्गंध येत असेल, ते मळले असतील किंवा त्यांच्यावर घाणीचे डाग पडले असतील, तर ते आपण तात्काळ धुवायला टाकतो.
 
पण, टॉवेलच्या बाबतीत असं नेहमीच होत नाही. बरेच लोक अनेक दिवस टॉवेल धुत नाहीत. टॉवेल धुण्याबाबत एकतर लोक विसरतात अथवा आपलं कळत नकळत त्याकडे दुर्लक्ष होतं.
 
वापरलेला टॉवेल केवळ वाळवायचा आणि दुसऱ्या दिवशी तो तसाच वापरायला घ्यायचा, असंही अनेकजण करतात.
 
पण टॉवेलच्या बाबतीत असं करणं योग्य आहे का? तो किती दिवसांनी धुवायला हवा. आपण अस्वच्छ टॉवेल वापरल्यास आपण आजारी पडू का, या प्रश्नांची उत्तरे आपण या लेखातून मिळवण्याचा प्रयत्न करू.
 
ब्रिटनमध्ये नुकतेच 2200 तरुणींमध्ये एक सर्वेक्षण करण्यात आलं. यामध्ये बहुतांश तरुणींना टॉवेल वापराबाबत योग्य ज्ञान नसल्याचं दिसून आलं.
 
44 टक्के तरुणींनी सांगितलं की ते त्यांचा टॉवेल तब्बल तीन ते चार महिन्यांतून केवळ एकदा धुतात.
 
घरगुती स्वच्छता तज्ज्ञ डॉ. सॅली ब्लूमफिल्ड यांनी यासंदर्भात बीबीसीशी चर्चा केली.
 
ते म्हणतात, “या सर्वेक्षणातून आलेल्या निष्कर्षांचं मला आश्चर्य वाटतं. टॉवेल धुतलं नाही तर त्यावर साठलेलं मळ आणि घामामुळे त्याचं कापड कठीण होत जातं, अशा टॉवेलचा वापर करण्यास त्रास होतो.”
 
वरील सर्व्हेमध्ये 25 टक्के महिलांनी सांगितलं की, त्या आपला टॉवेल आठवड्यातून एकदा धुतात. तर 20 टक्के महिला आपला टॉवेल वापरता क्षणी धुवायला टाकत होत्या.
 
टॉवेलची स्वच्छता
अर्थात, आठवड्यातून एक वेळ टॉवेल धुणाऱ्या लोकांची संख्या मोठी आहे.
 
या आकडेवारीबाबत बोलताना ब्लूमफिल्ड म्हणाले, “टॉवेल आपल्याला वरून स्वच्छ दिसत असलं तरी, लाखो जीवजंतूंचं (bacteria-germs) ते घर असू शकतं. वेळी टॉवेल स्वच्छ केला नाही, तर परिणामी या माध्यमातून आरोग्याच्या गंभीर समस्या निर्माण होऊ शकतात. या समस्या त्या व्यक्तीसाठीच नव्हे, तर त्याच्यासोबत राहणाऱ्या व्यक्तीसाठीही त्रासदायक ठरू शकतात.”
 
“टॉवेल रोजच्या रोज न धुतल्यास त्यांच्यावरील जीवजंतूंची संख्या दिवसेंदिवस वाढत जाते. अशा स्थितीत फक्त एका वेळच्या धुण्याने हे जंतू नष्ट होऊ शकत नाहीत.”
 
“आंघोळीनंतर आपण शरीराच्या विविध भागात टॉवेलने पुसतो. पण प्रत्येक भागातील जंतू हे आरोग्यासाठी धोकादायक असतातच, असं नाही. पण तुम्हाला एखादं इन्फेक्शन असेल, जखम असेल, तर तुमच्यासमोरचा धोका वाढू शकतो.”
 
“कधी कधी तुमच्या शरीरावरील काही विशिष्ट जीवजंतूंचा तुम्हाला त्रास होत नाही. मात्र इतरांशी त्याचा संपर्क आल्यास ते आजारी पडण्याची शक्यता असते. त्यामुळे, आपल्या टॉवेलची स्वच्छता आपणच राखली पाहिजे. किंबहुना त्याची आपण सवयच करून घ्यायला हवी.”
 
“जीवजंतू हे एकाकडून दुसऱ्याकडे प्रसारित होत असतात. त्यामुळे दोन व्यक्तींनी एक टॉवेल कधीच वापरू नये. शिवाय, तुम्ही एकटे राहत असाल, तरी 15 दिवसांपेक्षा जास्त दिवस टॉवेल वापरू नये.
 
ब्रिटिश नॅशनल हेल्थ सर्व्हिस (NHS) येथे कार्यरत असलेल्या त्वचारोगतज्ज्ञ क्रिस्टिना म्हणतात, “मी माझ्याकडे येणाऱ्या प्रत्येक रुग्णाला टॉवेल धुण्याच्या सवयीबाबत जरुर विचारते. एखाद्या व्यक्तीच्या चेहऱ्यावर मुरूम असतील, केसांच्या मुळाच्या भागात सूज असेल, तर मी त्यांना आठवड्यातून किमान दोनवेळा टॉवेल धुण्याबाबत सल्ला देते.”
 
घरातील स्वच्छतेच्या अभावामुळेच अशा समस्या निर्माण होतात. आपला टॉवेल स्वच्छ केला तरी या समस्या काही प्रमाणात कमी होऊ शकतात.
 
व्यायाम करणाऱ्यांनी काय करावं?
व्यायामात करणाऱ्या व्यक्तींच्या जिम किटमध्ये नेहमी टॉवेल ठेवलेलं असतं. व्यायामारदरम्यान आलेला घाम पुसण्यासाठी टॉवेलचा वापर करण्यात येतो. यामध्ये हाता-पायांसह चेहऱ्यावरही तोच टॉवेल वापरला जातो.
 
ब्लूमफिल्ड यांच्या मते, व्यायाम करणाऱ्या व्यक्तींनी आपला टॉवेल रोजच्या रोज धुतला पाहिजे.
 
ते म्हणतात, “घाम पुसल्यानंतर टॉवेलवर मोठ्या प्रमाणात बॅक्टेरिया जमा होतात. त्यामुळे टॉवेल रोज धुणं अतिशय महत्त्वाचं आहे. शिवाय, जर चेहऱ्याचा आणि शरीराच्या इतर भागात वापरण्यासाठी स्वतंत्र
 
असे दोन टॉवेल वापरता आले, तर अतिशय उत्तम. कारण काही जीवजंतूंना आपल्या चेहऱ्यापर्यंत पोहोचू न देणं हेच आपल्या भल्याचं असतं.”
 
शिवाय, टॉवेल धुतल्यानंतर ते वाळवण्यासाठी सूर्यप्रकाशात घातला पाहिजे. त्यामुळे टॉवेलवरील जीवजंतू लवकर नष्ट होण्यास मदत होते.”