ब्रिटनचे पंतप्रधान बोरीस जॉन्सन यांना अविश्वास प्रस्तावाला सामोरं जावं लागणार?
ब्रिटनचे पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांना अविश्वास प्रस्तावाला सामोरं जावं लागू शकतं अशा चर्चा सुरू असतानाच सोमवारी सर्व खासदार वेस्टमिन्स्टरला येत आहेत.
हुजूर पक्षाच्या काही खासदारांनी बीबीसीशी बोलताना म्हटलं की, या आठवड्यात मतदान होऊ शकतं. कारण लॉकडाऊनमधील पार्टीच्या मुद्द्यावरून पंतप्रधानांकडे सातत्यानं राजीनाम्याची मागणी केली जात आहे.
रविवारी (5 जून) पंतप्रधानांना विश्वासमत जिंकण्यासाठी जाहीर पाठिंबा देणाऱ्या मंत्र्यांना बोलावलं जाईल.
वाणिज्य मंत्री पॉल स्कली यांनी चॅनल फोरशी बोलताना म्हटलं की, "जरी अविश्वासाचा ठराव आला तरी जॉन्सन त्याचा आत्मविश्वासाने सामना करतील आणि विरोधकांना हरवतील."
ट्रान्सपोर्ट सेक्रेटरी ग्रँट शाप्स यांनीही बीबीसीशी बोलताना म्हटलं की, आपल्या स्वतःच्याच खासदारांमध्ये पंतप्रधान विश्वास मत गमावणार नाहीत.
मध्यावधी विश्रांतीसाठी खासदार त्यांच्या मतदारसंघात परतल्यापासून दहा दिवसांमध्येच आपलं पंतप्रधानपद वाचवण्यासाठी जॉन्सन यांना संघर्ष करावा लागू शकतो अशा चर्चांना सुरुवात झाली.
अविश्वास प्रस्ताव मांडला जाण्यासाठी हुजूर पक्षाच्या 54 खासदारांनी सर ग्रॅहम ब्रँडी यांच्याकडे तशी मागणी करणारं पत्र देणं गरजेचं असतं.
आतापर्यंत 28 खासदारांनी जाहीरपणे पंतप्रधान बोरीस जॉन्सन यांनी पायउतार व्हावं अशी मागणी केली आहे. पण काही खासदारांनी बीबीसीशी खाजगीत बोलताना म्हटलं की, येत्या काही आठवड्यात अविश्वास प्रस्तावासंबंधीची मागणी वाढू शकते.
वाणिज्य मंत्री पॉल स्कली यांनी म्हटलं की, "जरी अविश्वासाचा ठराव आला तरी जॉन्सन त्याचा आत्मविश्वासाने सामना करतील आणि विरोधकांना हरवतील. पण जे काही होईल, आपल्याला पुन्हा एकदा प्रशासनाकडे लक्ष द्यायला हवं. लोकांकडून आपल्या ज्या अपेक्षा आहेत, त्या गोष्टींवर काम करायला हवा...दोन वर्षांपूर्वी काय झालं याकडे मागे वळून पाहायला नको."