गुरूवार, 28 नोव्हेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. आयटी
  3. आयटीच्या जगात
Written By
Last Modified: सोमवार, 30 ऑक्टोबर 2017 (10:33 IST)

अ‍ॅमेझॉनचे बेझोस काही तासांसाठी सर्वाधिक श्रीमंत ठरले

अ‍ॅमेझॉनचे संस्थापक जेफ बेझोस यांना नुकताच जगातील सर्वांत श्रीमंत व्यक्ती होण्याचा मान मिळाला आहे. शुक्रवारी अमेरिकेच्या शेअर बाजारात अ‍ॅमेझॉनच्या शेअर्सनी १३.५ टक्क्यांपर्यंत उसळी घेतली. त्यामुळे बेझोस यांची संपत्ती ९० अब्ज डॉलरच्या घरात गेली. तर जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती असणाऱ्या बिल गेट्स यांची संपत्ती ८९ अब्ज डॉलरच्या घरात आहे. या आधीही जुलैमध्ये जेफ बेझोस हे काही तासांसाठी जगातील सर्वाधिक श्रीमंत व्यक्ती ठरले होते. त्यांच्या कंपनीचे समभाग अचानक उसळल्यामुळे त्यांना सर्वात श्रीमंत व्यक्ती होण्याचा मान मिळाला होता. ‘फोर्ब्स’ नियतकालिकाने ही माहिती जाहीर केली होती.
 

अ‍ॅमेझॉनच्या समभागांनी उसळी घेतल्यानंतर कंपनीच्या एका समभागाची किंमत १,०८३.३१ डॉलर झाली होती. बेझोस हे मायक्रोसॉफ्टचे संस्थापक बिल गेट्स यांना मागे टाकून पहिल्या क्रमांकावर पोहोचले होते. मात्र, त्यानंतर अ‍ॅमेझॉनचे समभाग पुन्हा १ टक्क्याने घसरून १,०४६ डॉलरवर आले होते. त्यामुळे बोझेस हे पुन्हा दुस-या स्थानी जाऊन बिल गेट्स पहिल्या क्रमांकावर आले होते. आताही अशाचप्रकारे काही काळासाठी जेफ बेझोस यांना जगातील सर्वांत श्रीमंत व्यक्ती होण्याचा मान मिळाला.