शनिवार, 23 नोव्हेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. आयटी
  3. आयटीच्या जगात
Written By
Last Modified: शुक्रवार, 7 सप्टेंबर 2018 (13:25 IST)

लोकहो, यांना अनफॉलो करा ट्विटर देणार सल्ला

ट्विटर या सोशल मीडिया संकेतस्थळाच्या वापरकर्त्यांना याच्या सूचना आतापर्यंत कोणाला फॉलो करायचे मिळत असत. मात्र आता पहिल्यांदाच ट्विटरने नवीन सुविधेची चाचणी सुरू केली आहे. याअंतर्गत कोणाला अनफॉलो करायचे, याचा सल्ला वापरकर्त्यांना देण्यात येणार आहे.
 
काही ट्विटर वापरकर्त्यांनी अशा प्रकारची सूचना मिळत असल्याचे सांगितले आहे. यामध्ये त्यांना त्यांच्या न्यूज फीडमध्ये जे काही होत आहे त्याला नियंत्रित करण्याची सूचना देण्यात आली होती.
 
काय घडत आहे हे जाणून घेण्यासाठी तुम्हाला प्रत्येक व्यक्तीला फॉलो करण्याची गरज नाही. ज्या व्यक्ती तुमच्यासाठी ट्विटर उत्तम बनवितात त्यांचेच अनुसरण करण्याची निश्चिती करून घ्या, असे एका सूचनेकध्ये म्हटले होते. तर अनुसरण करण्याची गरज नसलेल्या काही खात्यांची समीक्षा करून तुम्ही आपली टाइम लाइन सुधारू शकता, असे अन्य एका सूचनेमध्ये म्हटले होते.
 
वापरकर्त्यांच्या एका छोट्या गटात ही चाचणी करण्यात आल्याचे  ट्विटरने मान्य केले आहे. आम्हाला माहीत आहे लोकांना सुसंबद्ध टाइम लाइन हवी असते. ज्यांच्याशी ते वारंवार संवाद साधत नाहीत अशा लोकांना अनफॉलो करून हे साध्य करता येऊ शकते. आम्ही मर्यादित पातळीवर ही चाचणी घेतली आणि फॉलो करण्याची लोकांना इच्छा आहे का, हे जाणून घेतले, असे ट्विटरच्या एका प्रवक्त्याने सांगितले.