गुरूवार, 23 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. आयटी जगत
  3. आयटीच्या जगात
Written By
Last Modified: शनिवार, 11 नोव्हेंबर 2023 (09:33 IST)

जुना मोबाईल विकताना डेटा चोरी होऊ नये म्हणून काय कराल? वाचा

अश्फाक
"एक चांगली ऑफर येत आहे... मी जुना फोन देऊन नवा फोन विकत घेऊ शकतो का? माझा जुना फोन चांगल्या किमतीत कोण विकत घेईल?" तुम्हाला कोणी अशा प्रकारचा प्रश्न केला तर त्यावर तुम्ही विविध प्रकारचे पर्याय सुचवू शकता.
 
पण खरं तर एक हातोडी घेऊन त्या जुन्या फोनचा चुराडा करणं, किंवा एक खोल खड्डा खोदून त्यात तो फोन पुरणं हाच सर्वोत्तम उपाय ठरू शकतो. हे माझं मत नाही, तर सायबर सिक्युरिटी क्षेत्रातील तज्ज्ञांचं तसं मत आहे.
 
"तंत्रज्ञान हे अनेकदा उपयोगी ठरू शकतं. पण कधीकधी ते अत्यंत धोकादायकही ठरू शकतं."
 
नॉर्वेमधील नोबेल पुरस्कार विजेते इतिहासकार ख्रिश्चन लांके याचं तंत्रज्ञानाच्या बाबतीत असं आकलन आहे.
 
भारताच्या सेल्युलर आणि इलेक्ट्रॉनिक्स असोसिएशनच्या ताज्या आकडेवारीनुसार भारतात फक्त 2020 या एका वर्षामध्येच 2 कोटींपेक्षाही जास्त जुन्या मोबाईल फोनची विक्री झाली. तर जवळपास 10 कोटी मोबाईल हे देशभरातील लोकांच्या घरांमधील कपाटांमध्ये किंवा इतर ठिकाणी पडून आहेत.
 
तसंच 2025 पर्यंत जुन्या मोबाईल फोनच्या बाजारपेठेत सुमारे 25 कोटी फोन उपलब्ध असतील, असा अंदाजही सेल्युलर आणि इलेक्ट्रॉनिक्स असोसिएशननं वर्तवला आहे.
 
मी जुना फोन विकू शकतो का?
तुम्हाला तुमचे फोन क्रमांक, बँकेचा तपशील, पासवर्ड, फोटो, व्हीडिओ, चॅट, इंटरनेट ब्राऊजिंग हिस्ट्री याची काही काळजी नसेल, तर तुम्ही जुन्या फोनची आहे त्या स्थितीत विक्री करू शकता. तसं नसेल तर तुम्हाला काही गोष्टी लक्षात घेणं गरजेचं आहे.
 
"एखाद्या स्मार्टफोनमधील डेटा परत मिळवणं ही दहा वर्षांपूर्वी अतिशय कठीण गोष्ट होती. पण आजच्या काळात तशी परिस्थिती नाही.
 
अगदी प्रचंड सुरक्षित अॅपलचा फोन असो किंवा अँड्रॉइड फोन असो, डेटा रिकव्हरी ही आता सहजपणे शक्य आहे.
 
विशेष म्हणजे कोणीही ते करू शकतं. त्यासाठी महिन्याला 50 डॉलर शुल्क असलेले खास अॅप उपलब्ध आहेत. त्याच्या मदतीनं डेटा परत मिळवता येऊ शकतो," असं तंत्रज्ञान तज्ज्ञ शिव भराणी यांनी सांगितलं.
 
"समजा आपल्याकडे एखादं 16 जीबी मेमरी असलेलं एखादं मेमरी कार्ड आहे आणि ते फोटो - व्हीडिओंनी पूर्णपणे भरलेलं असेल.
 
तो डेटा एका ठिकाणी स्टोअर असतो. जर तुम्ही इरेज केले तर मेमरी कार्डवरील डेटा निघून जाईल. पण तरीही तो परत मिळवता येऊ शकतो.
 
जुना डेटा डिलिट करण्याबरोबरच तुम्हाला त्याच जागेवर दुसरा अनावश्यक डेटा (जंक फाईल्स किंवा इतर मोठ्या फाईल्स) पुन्हा भराव्या लागतील. आता जुन्या डेटाची जागा नवीन डेटानं घेतलेली असले.
 
असं करून तुम्ही हवा तो डेटा सुरक्षितपणे इरेज करू शकतात, असं शिव भरणी म्हणाले.
 
'डेटा नष्ट होत नाही'
"नुकतेच मला विक्रीसाठी 10-15 जुने टॅबलेट मिळाले होते. त्यापैकी कशावरचाही डेटा इरेज केलेला नव्हता. " असं मला मोहम्मद निसार यांनी सांगितलं.
 
छोट्या दुकानदारांच्या मनात प्रामुख्यानं एकच विचार असतो. तो म्हणजे लवकरात लवकर जुने स्मार्टफोन विकून त्यातून पैसे कमावण्याचा. त्यातील डेटा योग्य पद्धतीनं इरेज झाला आहे किंवा नाही, याच्याशी त्यांना काही देणं-घेणं नसतं, असं मत मोहम्मद निसार यांनी व्यक्त केलं. निसार हे गेल्या 12 वर्षांपासून फोन दुरुस्ती आणि जुन्या फोनच्या विक्रीच्या व्यवसायाशी संलग्न आहेत.
 
"जुन्या मोबाईल फोनमधून वाईट उद्देशानं डेटा चोरी केल्याचे फारसे प्रकार समोर आलेले नाहीत. दरम्यान जेव्हा अपघात किंवा आगीच्या घटनांमध्ये फोनचं नुकसान होतं, तेव्हाही त्याचा डेटा सहजपणे मिळवता येऊ शकतो," असं निसार म्हणाले.
 
"जर तुम्हाला तुमच्या जुन्या स्मार्टफोन किंवा गॅझेटवर काही महत्त्वाचा डेटा नाही, याची 100% खात्री असेल तर तुम्ही त्याची विक्री करू शकता," असंही त्यांनी म्हटलं.
 
'बिझनेस स्ट्रॅटेजी'
"उत्सवांच्या काळामध्ये एक्सचेंज ऑफरद्वारे तुम्हाला नवीन मोबाईल फोन मिळेल अशी जाहिरात करणं ही एक युक्ती असते. तुमचे जुने फोन कमी किमतीत खरेदी करण्यामागे त्यांची दोन कारणं असतात. एक म्हणजे, त्याचं नुतनीकरण करून पुन्हा विक्री करणं.
 
तर केवळ त्यातील चांगले पार्ट्स इतर ठिकाणी वापरण्यासाठी मिळवणं हाही त्यामागचा दुसरा उद्देश असतो. या दोन्हीतून त्यांना चांगला नफा मिळतो. म्हणून नवीन फोन देत असल्याचं सांगत ते यातून अधिक फायदा मिळवू शकता. ही एक बिझनेस स्ट्रॅटेजी असते," असं शिव भरणी म्हणाले.
 
"जुने मोबाईल खरेदी आणि विक्री करणाऱ्या आणि जुन्याच्या बदल्यात नवीन मोबाईल देणाऱ्या, अनेक कंपन्या आहेत.
 
जुने मोबाईल घेणारी कंपनी आपल्याकडून फोन घेताना डेटा पूर्णपणे इरेज केला असल्याबाबतची सहमती घेत असतात.
 
जुने फोन खरेदी करणाऱ्या कंपन्या तपासणी करण्यासाठी थेट एका अॅप्लिकेशनचा वापर करत असतात. त्याद्वारे तुम्ही वापरलेल्या फोनवरील संपूर्ण डेटा डिलिट होतो. तसंच त्या मोबाईलची कार्यक्षमता किती आहे, हेही तपासलं जातं आणि फोन कसा काम करत आहे, त्यानुसार त्याची किंमत ठरवली जाते."
 
त्याचप्रकारे, "नुकतेच बाजारात आलेल्या नव्या मॉडेल्सच्या मोबाईलला जुन्या फोनच्या बाजारात फार चांगली किंमत मिळत नाही. जुना फोन चांगल्या स्थितीत असेल, तर तुम्ही त्याची विक्री करून त्यातून काही पैसे मिळवू शकता. कारण काही ठिकाणी नव्या मॉडेलपेक्षा जुन्या मॉडेलला जास्त मागणी असते," असं शिव म्हणाले.
 
'खरेदी-विक्रीवर लक्ष असणे गरजेचे'
"जुना मोबाईल फोन चांगल्या पद्धतीने काम करत आहे की नाही याबरोबरच आधीच्या मालकाने त्याचा वापर योग्य प्रकारे केला आहे किंवा नाही, हेसुद्धा पाहायला हवं.
 
म्हणजेच त्या फोनचा वापर एखाद्या गुन्हेगारी कृत्यासाठी तर झालेला नाही, याची खात्री करणं. त्यासाठी तुम्हाला विश्वासार्ह लोकांकडून किंवा स्टोरमधूनच मोबाईल खरेदी करण्याची सवय असायला हवी.
 
कोणत्याही व्यक्ती किंवा स्टोरमधून जुना मोबाईल फोन खरेदी करताना IMEI क्रमांक, मोबाईल खरेदीची पावती अशा महत्त्वाच्या गोष्टी तपासणे गरजेचे ठरते.
 
तसंच बॅटरी, डिस्प्ले सर्वकाही योग्य प्रकारे काम करत आहे की नाही, तसंच अनावश्यक काही अॅप तर नाही, हेही तपासायला हवं.
 
कधी कधी जुने स्मार्टफोन महिलांना विक्री केलेले असल्यास त्याच्या समोरच्या कॅमेऱ्याद्वारे महिलांचे शोषण करण्याचा प्रयत्न केला जाऊ शकतो.
 
अॅडिशनल सेटिंग्ज, सर्व्हिस प्रोव्हायडर याद्वारे आपल्या मोबाईलमध्ये विविध अॅप्स टाकून डेटा चोरी करण्याचा प्रयत्न केला जाऊ शकतो. त्यामुळं एखाद्या अनोळखी व्यक्तीबरोबर फोनच्या खरेदी किंवा विक्रीचा व्यवहार करताना सल्ला किंवा चांगली खात्री करून घेणं गरजेचं आहे," असं शिव भरणी म्हणाले