पिंकी ३-४ वर्षांची असतानाची गोष्ट. जेवण करून सर्वजण गप्पा मारत बसले होते. पिंकी अंगणात खेळत होती. तिला अचानक एक साप दिसला. आठ दिवसांपूर्वीच तिने कात टाकणारा साप पाहिला होता. ती धावतच घरात गेली. ती अशी धावत आल्याचे बघून आईने विचारले-‘का गं, काय झालं?’ पिंकीला ‘कात’ हा शब्द काही वेळेवर आठवला नाही. मात्र खायच्या विड्यात टाकतात एवढे आठवले व ती म्हणाली - ‘ आई, बाहेर अंगणात साप चुना टाकतोय’ एक क्षण कुणाला काही कळले नाही. नंतर मात्र सर्वजण खो खो हसत सुटले.