सोमवार, 25 नोव्हेंबर 2024
  1. मनोरंजन
  2. बॉलीवूड
  3. लता मंगेशकर
Written By
Last Modified: बुधवार, 28 सप्टेंबर 2022 (10:10 IST)

लता मंगेशकरांबद्दल बडे गुलाम अली खाँ यांनी म्हटलेलं- 'कम्बख्त कभी बेसुरी ही नहीं हुई'

lata mangeshkar
लता मंगेशकर यांचा आज (28 सप्टेंबर) जन्मदिन.जवाहरलाल नेहरू कधीच सार्वजनिकरित्या रडत नसत आणि दुसऱ्या माणसासमोर रडणं त्यांना आवडायचं नाही, असं सांगितलं जातं. परंतु, 27 जानेवारी 1963रोजी लता मंगेशकर यांनी कवी प्रदीप यांनी लिहिलेलं 'ए मेरे वतन के लोगों' हे गाणं गायलं तेव्हा पंडित नेहरूंना स्वतःचे अश्रू आवरता आले नाहीत.
 
गाऊन झाल्यावर लता मंचामागे कॉफी पीत होत्या, तेव्हा दिग्दर्शक महबूब खान यांनी त्यांना पंडितजी बोलावत असल्याचं सांगितलं.
 
महबूब लता यांना नेहरूंसमोर घेऊन गेले नि म्हणाले, "ही आमची लता. तुम्हाला हिचं गाणं कसं वाटलं?"
यावर नेहरू म्हणाले, "खूपच सुंदर. या मुलीने माझ्या डोळ्यांमध्ये अश्रू उभे केले." असं म्हणून त्यांनी लता मंगेशकर यांची गळाभेट घेतली.
लगोलग या गाण्याची मास्टर टेप 'विविध भारती'च्या केंद्रावर पाठवण्यात आली आणि विक्रमी वेळेत त्याची रेकॉर्ड बाजारात विक्रीसाठी आली.
 
काहीच दिवसांमध्ये हे गाणं राष्ट्रीय पातळीवर प्रचंड लोकप्रिय झालं.
नेहरू 1964 साली मुंबईत आले, तेव्हा लता मंगेशकरांनी ब्रेबॉर्न स्टेडियममध्ये 'आरझू' या चित्रपटातील 'अजी रुढ कर कहाँ जाईएगा' हे गाणं त्यांच्या समोर म्हटलं होतं.
 
त्या वेळी नेहरूंनी त्यांना पुन्हा एकदा 'ए मेरे वतन के लोगों' हे गाणं म्हणण्याची विनंती चिठ्ठी पाठवून केली. त्यानुसार लता यांनी तेव्हा परत 'ए मेरे वतन के लोगों' गाणं म्हटलं.
 
'बरसात' चित्रपटानंतर कारकीर्द बहरली
1949 साली 'अंदाज' चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर लोकप्रिय गाण्यांच्या यादीतील पहिले पाच क्रमांक कायमच लता मंगेशकरांच्या नावावर जमा व्हायचे.
 
परंतु, राज कपूर आणि नर्गिस यांच्या भूमिका असणारा 'बरसात' या चित्रपटानंतर आपली कारकीर्द खऱ्या अर्थाने बहरली, असं लता यांनी 80 व्या वर्षी दिलेल्या एका मुलाखतीत मान्य केलं होतं.
 
मदन मोहन यांनी लता मंगेशकरांबाबत एक अतिशय खरी गोष्ट लिहिली होती, "1956 साली मेट्रो-मर्फीच्या वतीने आम्हा संगीतकारांना टॅलेन्ट-हन्टसाठी भारतभरात पाठवलं गेलं होतं.
 
त्या वेळी लता मंगेशकर यांच्या आसपासही फिरकू शकेल अशा प्रतिभेचं कोणी आम्हाला सापडलं नाही. लता आपल्या युगात जन्मल्या हे आमचं सुदैव होतं."
 
बडे गुलाम अली खाँ यांची टिप्पणी
1948 साली 'महल' चित्रपट प्रदर्शित झाला, तेव्हा गीता राय यांचा अपवाद वगळता शमशाद बेगम, जोहराबाई अंबालावाली, पारूल घोष व अमीरबाई कर्नाटकी अशा सर्व प्रतिस्पर्धी गायिका लता मंगेशकरांच्या वाटेतून आपसूकच बाजूला होत गेल्या.
1950 साली त्यांनी 'आएगा आने वाला'हे गाणं गायलं तेव्हा वास्तविक ऑल इंडिया रेडिओवर चित्रपट संगीत लावण्यावर बंदी होती. त्या काळी रेडिओ सिलोन हे केंद्रसुद्धा नव्हतं.
 
भारतीयांनी पहिल्यांदा रेडिओ गोवा या केंद्रावरून लता मंगेशकरांचा आवाज ऐकला. त्या वेळी गोवा पोर्तुगीजांच्या ताब्यात होता. भारतीय लष्कराने 1961 साली ते स्वतंत्र केलं.
 
विख्यात शास्त्रीय गायक पंडित जसराज यांनी एक रोचक किस्सा सांगितला होता: एकदा बडे गुलाम अली खाँ यांना भेटण्यासाठी जसराज अमृतसरला गेले.
 
तिथे ते बोलत असताना ट्रान्झिस्टरवर लता यांचं 'ये जिंदकी उसी की है जो किसी का हो गया' हे गाणं वाजायला लागलं. तर, खाँ साहेब बोलता-बोलता अचानक गप्प झाले आणि गाणं संपल्यावर म्हणाले, 'कमबख्त कभी बेसुरी होती ही नहीं.' या टिप्पणीत पित्याची ममता आणि एका कलाकाराला वाटणारा हेवासुद्धा होता, असं जसराज म्हणतात.
पाच वर्षांच्या होत्या तेव्हाच वडिलांनी प्रतिभा जोखली
 
लता मंगेशकरांच्या गाण्याची सुरुवात त्या पाच वर्षांच्या असतानाच झाली. नसरीन मुन्नी कबीर यांच्या 'लता इन हर ओन व्हॉइस' या पुस्तकात लता स्वतः म्हणतात, "मी माझे वडील दीनानाथ मंगेशकर यांना गाताना पाहायचे, पण त्यांच्यासोबत गाण्याचं धाडस माझ्यात नव्हतं. एकदा ते त्यांच्या एका शिष्याला पुरिया धनश्री हा राग शिकवत होते. काही कारणामुळे ते थोडा वेळ खोलीबाहेर गेले. मी बाहेरच खेळत होते. बाबांचा शिष्य गात असल्याचं मी ऐकलं. मला वाटलं, तो मुलगा योग्य रितीने गात नाहीये. मी त्याच्यापाशी जाऊन त्याला कसं गायचं ते स्वतः गाऊन दाखवलं.
 
"बाबा परत आले तेव्हा त्यांनी दाराच्या उंबऱ्यावरून मला गाताना पाहिलं. मग त्यांनी माझ्या आईला बोलावून सांगितलं, 'आपल्याच घरात एक चांगली गायिका आहे याचा आपल्याला पत्ताच नव्हता'.
दुसऱ्या दिवशी सकाळी सहा वाजता बाबांनी मला उठवलं आणि तानपुरा घ्यायला सांगितलं. आजपासून तू गाणं शिकायचं, असं ते मला म्हणाले. पुरिया धनश्री याच रागापासून सुरुवात झाली. त्या वेळी मी पाच वर्षांची होते."
 
गुलाम हैदर आणि अनिल बिस्वास यांच्याकडून मार्गदर्शन
लता मंगेशकरांनी अनेक संगीतकारांसोबत काम केलं असलं, तरी गुलाम हैदर यांच्यासाठी त्यांच्या मनात विशेष जागा होती.
 
'बीट'वर येणाऱ्या शब्दांवर थोडं अधिक वजन द्यायचं, त्याने गाणं उंचावतं, अशी शिकवण हैदर यांनी लता मंगेशकरांना दिली होती.
 
अनिल बिस्वास यांनी त्यांना श्वासावर कसं नियंत्रण ठेवायचं ते शिकवलं.
हरीश भिमानी यांनी 'लता दीदी अजीब दास्ताँ है ये' या पुस्तकात लिहिलं आहे की, "ऐकणाऱ्याला खटकणार नाही अशा रितीने गाणं म्हणताना कोणत्या ठिकाणी श्वास घ्यायचा, याबाबतीत अनिलदा अतिशय जागरूक होते. दोन शब्दांदरम्यान श्वास घेताना शांतपणे चेहरा मायक्रोफोनपासून दूर न्यायचा, श्वास घ्यायचा आणि लगेच चेहरा पूर्ववत करून गाणं सुरू ठेवायचं, ही पद्धत अनिल बिस्वास यांनी लता यांना शिकवली. माइकसोबतचा हा खेळ पार पाडत असताना शेवटच्या शब्दाचं अखेरचं अक्षर आणि नवीन शब्दाचं पहिलं अक्षर जरा अधिक जोराने गावे लागतात."
 
उच्चार सुधारण्यासाठी दिलीप कुमार यांची मदत
लता मंगेशकर यांनी सुरेलपणासोबतच ऊर्दू भाषेतील उच्चार उत्तम रितीने करूनही लोकांचं लक्ष वेधून घेतलं. याचं श्रेय दिलीप कुमार यांना द्यायला हवं.
 
हरीश भिमानी यांनी 'लता दीदी अजीब दास्ताँ है ये' या पुस्तकात लिहिल्यानुसार, "एके दिवशी अनिल बिस्वास आणि लता मुंबईच्या लोकल ट्रेनने गोरेगावला जात होते. अचानक वांद्रा स्थानकावर त्या ट्रेनमध्ये दिलीप कुमार चढले."
"अनिल बिस्वास यांनी नवीन गायिकेची दिलीप कुमार यांच्याशी ओळख करून दिली, तेव्हा ते म्हणाले, 'मराठी लोकांच्या तोंडातून आमटीभाताचा वास येतो. त्यांना ऊर्दूची चव काय कळणार?'
 
"लता मंगेशकरांनी ही गोष्ट आव्हान म्हणून स्वीकारली. यानंतर शफी साहेबांनी त्यांच्यासाठी एका मौलवी प्रशिक्षकाची तजवीज केली. त्यांचं नाव महबूब होतं. लता यांनी त्यांच्याकडून ऊर्दू भाषेतील खाचाखोचा समजून घेतल्या."
 
यानंतर थोड्या वेळाने 'लाहोर' या चित्रपटाचं चित्रीकरण सुरू होतं, तिथे जद्दनबाई आणि त्यांची मुलगी नर्गिससुद्धा उपस्थित होत्या. लता यांनी स्टुडिओत 'दीपक बगैर कैसे परवाने जल रहे हैं' या गाण्याचं रेकॉर्डिंग सुरू केलं.
 
रेकॉर्डिंगनंतर जद्दनबाई यांनी लता मंगेशकरांना बोलावलं नि त्या म्हणाल्या, "माशाअल्लाह, क्या 'बगैर' कहाँ है! बेटा, असा उच्चार सर्वांनाच करता येतोच असं नाही."
 
महबूब खाँ यांना फोनवर 'रसिक बलमा' गाणं ऐकवलं
लता यांच्या आवाजाची आणखी एक खासियत आहे. त्यांचा आवाज चिरतरुण राहिला. 1961 साली प्रदर्शित झालेल्या 'जंगली' या चित्रपटात सायरा बानो यांच्यासाठी त्यांनी 'कश्मीर की कली हँ' हे गाणं म्हटलं, तेव्हा त्यांच्या आवाजात मादकता व नाजूकपणा होता.
 
हेच गुण बारा वर्षांनी आलेल्या 'अनामिका' या चित्रपटांत जया भादुरीसाठी म्हटलेल्या 'बाहों में चले आओ' या गाण्यातही दिसून आले.
 
महबूब खाँ ऑस्कर पारितोषिक सोहळ्यात सहभागी होण्यासाठी 1958 साली लॉस अँजेलीसला गेले होते. त्या वेळी समारंभ झाल्यावर दोन दिवसांनी त्यांना हृदयविकाराचा झटका आला.
 
त्या वेळी, "लता यांनी त्यांना मुंबईहून फोन केला. तब्येतीची चौकशी झाल्यावर महबूब साहेबांनी त्यांना सांगितलं, 'तुमची गाणी ऐकायची खूप इच्छा होते, पण इतक्या अवघड परिस्थितीत रेकॉर्ड कुठून आणू?' हे ऐकल्यावर त्यांना कोणतं गाणं ऐकायचंय, असं लता यांनी विचारलं आणि मग महबूब साहेबांच्या मागणीखातर त्यांनी फोनवरून 'रसिक बलमा' हे गाणं गुणगुणलं होतं.
 
आठवड्याभराने लता यांनी पुन्हा एकदा ते गाणं महबूब यांना ऐकवून दाखलं.
 
महबूब साहेबांची तब्येत सुधारण्यामध्ये या गाण्याचं योगदान किती होतं, हे ईश्वरच सांगू शकेल, पण त्या प्रसंगानंतर लता यांच्यासाठी हे गाणं खास झालं," असं राजू भारतन यांनी लता मंगेशकरांच्या चरित्रात लिहिलं आहे.
 
नूरजहाँ आणि लता यांची वाघा सीमेवर झालेली भेट
आधी भारतात राहणाऱ्या आणि मग पाकिस्तानला गेलेल्या नूरजहाँ यांच्याशी लता मंगेशकरांची घनिष्ठ मैत्री होती.
 
एकदा लता मंगेशकर 1952 साली अमृतसरला गेल्या, तेव्हा दोनच तासांच्या अंतरावर- लाहोरमध्ये राहणाऱ्या नूरजहाँ यांना भेटायची त्यांना इच्छा झाली.
 
लगेचच लाहोरला फोन लावण्यात आला आणि दोघींनी दोन तास फोनवर गप्पा मारल्या आणि मग भारत-पाकिस्तान सीमेवर एकमेकींची भेट घ्यायचं ठरलं.
विख्यात संगीतकार सी. रामचंद्र यांनी त्यांच्या आत्मचरित्रात लिहिलं आहे की, "मी माझ्या संपर्कातील लोकांच्या मदतीने या भेटीची तजवीज केली. वाघा सीमेवर, लष्करी भाषेत ज्याला 'नो मॅन्स लँड' म्हटलं जातं, तिथे त्या दोघींची भेट झाली."
 
"नूरजहाँने लताला पाहिलं आणि ती धावत पुढे आली. एकमेकांपासून दुरावलेल्या दोस्तांप्रमाणे दोघींनी एकमेकींची गळाभेट घेतली, दोघींच्याही डोळ्यांमधून अश्रू वाहत होते. हे दृश्य पाहणारे आम्ही सर्व लोकही स्वतःचे अश्रू थांबवू शकलो नाही. इतकंच नव्हे तर दोन्ही बाजूंचे सैनिकही रडायला लागले."
 
"नूरजहाँने लाहोरहून लतासाठी बिर्याणी आणि मिठाई आणली होती. नूरजहाँ यांचे पतीही त्यांच्यासोबत होते. लतासोबत तिच्या बहिणी- मीना व उषा आणि त्यांची मैत्रीण मंगला होत्या. संगीताला दुसरं काही बंधन नसतं, हे या घटनेवरून दिसतं."
 
मोहम्मद रफी यांच्याशी वाद
लता मंगेशकरांनी अनेक गायकांसोबत गाणी म्हटली, पण मोहम्मद रफींसोबतच्या त्यांच्या गाण्यांना विशेष लोकप्रियता लाभली.
 
रफी यांच्याबाबत बोलताना लता यांनी एक रोचक किस्सा सांगितला होता, "एकदा मी आणि रफी साहेब स्टेजवर गात होतो. 'ऐसे हँस हँस के ना देखा करो तुम सब की तरफ लोग ऐसी ही अदाओं पर फिदा होते हैं' अशी गाण्यातली एक ओळ होती. रफी साहेबांनी ती वाचली अशी- 'लोग ऐसे ही फिदाओ पे अदा हैं.' ते ऐकल्यावर श्रोत्यांमध्ये हशा पिकला.
 
रफीसाहेबसुद्धा हसायला लागले आणि मग मलाही हसू अनावर झालं. त्यामुळे आम्हाला ते गाणं पूर्णच करता आलं नाही. शेवटी आयोजकांना पडदा टाकावा लागला.
साठच्या दशकात गाण्यांच्या रॉयल्टीवरून लता मंगेशकर आणि रफी साहेब यांच्या मतभेद झाले. त्या संघर्षात मुकेश, तलत महमूद, किशोर कुमार व मन्ना डे लता यांच्या सोबत होते, तर आशा भोसले मोहम्मद रफी यांना पाठिंबा देत होत्या.
 
चार वर्षं लता व रफी यांनी एकमेकांवर 'बहिष्कार' टाकला होता. मग सचिन देव बर्मन यांनी दोघांमध्ये समेट घडवला.
 
सचिन देव बर्मन यांनी देऊ केलेलं पान
सचिन देव बर्मन यांनाही लता मंगेशकरांचा आवाज प्रिय होता. त्यांचं गाणं आवडलं की ते लता यांची पाठ थोपटत आणि पान देऊ करत. सचिनदा पानाचे शौकिन होते.
 
त्यांच्यासोबत कायम पानसुपारीचा डबा असायचा, पण ते कोणालाही स्वतःकडील पान द्यायचे नाही. त्यांनी कोणाला पान देऊ केलं, तर त्यांना त्या व्यक्तीचं खूप कौतुक वाटलंय असा त्याचा अर्थ होत असे. परंतु, एकदा सचिन देव बर्मन आणि लता मंगेशकर यांच्यात भांडण झालं.
'मिस इंडिया' या चित्रपटात लता यांनी एक गाणं म्हटलं होतं. लता यांनी हे गाणं 'सॉफ्ट मूड'मध्ये गावं, असं सचिनदांना वाटत होतं. लता यांनी गाणं म्हणण्याचं आश्वासन दिलं, पण सध्या त्या व्यस्त असल्यामुळे थोडे दिवस जातील.
 
काही दिवसांनी सचिनदांनी रेकॉर्डिंगची तारीख ठरवण्यासाठी आपला माणूस लता मंगेशकरांकडे पाठवला. तर, लता व्यस्त आहेत असं सांगण्याऐवजी त्यांनी गाणं म्हणायला नकार दिला आहे, असं या निरोप्याने सचिनदांना सांगितलं. सचिनदा नाराज झाले आणि लता यांच्या सोबत कधीच काम करणार नाही असं म्हणाले.
लता यांनीही त्यांना फोन करून सांगितलं, "तुम्ही अशी घोषणा करायची काहीही गरज नाही. मीच तुमच्यासोबत काम करणार नाही."
 
अनेक वर्षांनी दोघांमधला गैरसमज दूर झाला आणि लता यांनी पुन्हा 'बंदिनी' या चित्रपटात सचिनदांनी संगीत दिलेलं 'मोरा गोरा अंग लै ले' हे गाणं गायलं.
 
क्रिकेटची आवड
लता मंगेशकर यांना क्रिकेट अतिशय आवडत असे. त्यांनी पहिल्यांदा 1946 साली ब्रेबॉर्न स्टेडियमवर भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया हा कसोटी सामना पाहिला. इंग्लंडमध्ये ओव्हल मैदानावर इंग्लंड विरुद्ध पाकिस्तान असा कसोटी सामनाही त्यांनी पाहिला होता.
क्रिकेटमधील महान खेळाडू डॉन ब्रॅडमन यांनी स्वाक्षरी केलेलं एक चित्र लता यांना भेट दिलं होतं.
 
लता मंगेशकर यांच्याकडे कारचा मोठा संग्रह होता. राखाडी रंगाची हिलमन ही त्यांनी विकत घेतलेली पहिली कार होती. प्रत्येक गाण्याचे त्यांना दोनशे ते पाचशे रुपये मिळत होते, त्या काळात त्यांनी कार आठ हजार रुपये खर्च केले.
 
1964 साली 'संगम' या चित्रपटापासून त्यांना प्रत्येक गाण्याचे दोन हजार रुपये मिळू लागले. मग त्यांनी हिलमन कार विकून निळ्या रंगाची 'शेवरले' कार घेतली.
लता यांनी यश चोप्रांच्या 'वीर झारा' या चित्रपटासाठी गाणी म्हटली तेव्हा चोप्रा आपल्यासाठी भावासारखे आहेत असं सांगून लता मंगेशकरांनी काहीही मोबदला घेतला नाही.
 
मग, चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर यश चोप्रा यांनी भेट म्हणून लता यांच्याकडे मर्सिडिझ कार पाठवली. आयुष्याच्या अखेरच्या दिवसांमध्ये लता याच कारमधून प्रवास करत असत.
 
हिरे आणि गुप्तहेरकथांची आवड
लता मंगेशकरांना हिरे आणि पाचूची अतिशय आवड होती. 1948 साली त्यांनी स्वकमाईतून 700 रुपयांची हिऱ्याची अंगठी करवून घेतली होती. ही अंगठी त्या डाव्या हातातील मधल्या बोटात घालत असत.
 
त्यांना सोन्याची फारशी आवड नव्हती. त्या सोन्याचे पैंजण मात्र घालत असत. विख्यात संगीतकार नरेंद्र शर्मा यांनी त्यांना हा सल्ला दिला होता. लता मंगेशकरांना गुप्तहेरकथआ वाचायचीही अतिशय आवड होती. त्यांच्याकडे शेरलॉक होम्सच्या सर्व पुस्तकांचा संग्रह होता.
 
लता मंगेशकर यांना गोड पदार्थांपैकी जिलबी सर्वाधिक आवडत असे. एके काळी त्यांना इंदूरमधील गुलाबजाम आणि दहीवडा प्रिय होता.
 
गोव्यातील फिश करी आणि झिंगे हेसुद्धा त्यांचे आवडते खाद्यपदार्थ होते. त्या स्वतः रव्याचा उत्तम हलवा करत असत.
 
त्यांच्या हातचं मटण ज्यांनी खाल्लं त्यांना ती चव कधीही विसरता आली नाही. लता मंगेशकरांना समोसेही आवडत असत, पण त्यात बटाटा चालत नसे, तर खिमा घातलेला समोसा त्यांना आवडत होता.
 
लता मंगेशकरांना पाणीपुरी आवडत होती, हेही अनेकांना पटणार नाही. लिंबाचं लोणचं आणि ज्वारीची भाकरी, हा त्यांच्या आवडीचा आहार होता.
 
2001 मध्ये भारतरत्न
आज भारतात लता मंगेशकर यांना एक पूजनीय व्यक्तिमत्वाचा दर्जा मिळाला आहे. अनेक लोक त्यांचा आवाज ईश्वराची देणगी मानतात.
 
लता यांना 1989 साली चित्रपट क्षेत्रातील सर्वोच्च दादासाहेब फाळके पुरस्कार मिळाला आणि 2001 साली त्यांना भारतरत्न या सर्वोच्च नागरी किताबाने सन्मानित करण्यात आलं.
विख्यात गीतकार मजरूह सुल्तानपुरी यांनी लता मंगेशकरांना सर्वांत मोठी मानवंदना दिली होती. त्यांनी 'लता मंगेशकर' याच शीर्षकाची एक कविता लिहिली होती, त्यात ते म्हणतात:
जहाँ रंग न ख़ुशबू है कोई
तेरे होठों से महक जाते हैं अफ़कार मेरे
मेरे लव्ज़ों को जो छू लेती है आवाज़ तेरी
सरहदें तोड़ कर उड़ जाते हैं अशआर मेरे.