बुधवार, 25 डिसेंबर 2024
  1. मनोरंजन
  2. बॉलीवूड
  3. लता मंगेशकर
Written By
Last Modified: सोमवार, 7 फेब्रुवारी 2022 (09:12 IST)

लता मंगेशकर आणि आशा भोसले : स्पर्धेच्या काट्यांनी भरलेला बहिणींच्या नात्याचा प्रवास

अमृता कदम
"सांगलीला आमच्या घराच्या अगदी जवळ शाळा होती, तिथं माझं नाव घातलं होतं. तेव्हा त्याला बिगरी म्हणायचे. पहिल्या दिवशी मी शाळेत गेले. फळ्यावर श्रीगणेशाय नमः लिहिलं. मी पण ते लिहून घेतलं. तुला दहापैकी अकरा गुण, असं मास्तर म्हणाले. मला खूप आनंद झाला, मी घरी गेले. माईला सांगितलं.
 
दुसऱ्या दिवशी मी दहा महिन्यांच्या आशाला कडेवर घेऊन शाळेत गेले. मास्तर म्हणाले, असं नाही...इथं लहान मुलांना घेऊन यायचं नाही. मग मी आशाला उचललं आणि रागानं घरी आले. मास्तर ओरडल्याचं सांगितलं आणि मी आता शाळेत जाणारच नाही असंही सांगून टाकलं. खरंतर तो वेडेपणा होता. पण मी शाळेत कधीही गेले नाही."
 
आपण शाळेत कधीच का गेलो नाही याचा लता दिदींनी मुलाखतीत सांगितलेला किस्सा.
 
माझ्यामुळे तुला शाळा सोडावी लागली, म्हणत आशा भोसलेंनीही ही आठवण एका व्हीडिओत सांगितली होती. जी दीदी शाळेत गेली नाही, तिला नंतर सहा डॉक्टरेट देऊन सन्मानित करण्यात आल्याचंही आशा भोसलेंनी म्हटलं.
 
आपल्या दीदीच्या बरोबर शाळेत गेलेल्या आशा भोसले, नंतर मोठ्या बहिणीच्या पावलावर पाऊल टाकत चित्रपटसृष्टीतही आल्या.
 
अतिशय खडतर परिस्थितीतून स्वतःचा नावलौकिक निर्माण करणाऱ्या मंगेशकर कुटुंबातील या दोन्ही बहिणींचा वैयक्तिक आयुष्यातला आणि करिअरमधला प्रवास कसा होता, हे जाणून घेण्याचा केलेला प्रयत्न.
 
दोघींच्या करियरची लहान वयात झालेली सुरूवात
वयाच्या तेराव्या वर्षी 1942 साली लता मंगेशकरांनी 'किती हसाल' या चित्रपटात 'नाचू या गडे' हे गाणं गायलं होतं.
 
लता दीदींप्रमाणे आशाताईंच्या करियरची सुरुवातही लहान वयातच झाली. 1943 साली 'माझा बाळ' चित्रपटात त्यांनी पार्श्वगायन केलं.
 
'चुनरिया' या चित्रपटातील सावन आया हे गाणं गात आशा भोसले यांनी हिंदी चित्रपटसृष्टीत पदार्पण केलं. हिंदीमधलं आपलं पहिलं सोलो गाणं हे 1949 साली प्रदर्शित झालेल्या 'रात की रानी' या चित्रपटासाठी गायलं.
 
आशा भोसले यांनी जेव्हा पार्श्वगायनाला सुरूवात केली, त्यावेळी दबदबा होता गीता दत्त, शमशाद बेगम आणि स्वतः लता मंगेशकर या नावाचा. या दिग्गजांमध्ये स्वतःचं स्थान निर्माण करणं हेच आशा भोसले यांच्यासमोरचं मोठं आव्हान होतं.
 
सुरुवातीला आशा भोसले यांना बिग बॅनर किंवा नावाजलेलया संगीतकारांसोबत काम करण्याची संधी तितकीशी मिळाली नाही.
 
1956 साली संगीतकार ओ.पी. नय्यर यांनी आशा भोसलेंना 'सीआयडी' चित्रपटासाठी पार्श्वगायनाची संधी दिली. त्यानंतर आशा भोसलेंचा यशस्वी प्रवास सुरू झाला. 1957 साली प्रदर्शित झालेल्या 'नया दौर' चित्रपटातील 'मांग के साथ तुम्हारा', 'उडे जब जब जुल्फें तेरी' ही गाणीही हिट झाली. पुढच्याच वर्षी आलेल्या 'हावडा ब्रिज'मधील 'आईये मेहेरबाँ' हे गाणंही तितकंच अवीट ठरलं.
 
लता दीदी- आशा भोसलेंचा समांतर प्रवास
लता मंगेशकर जेव्हा हिंदी चित्रपटसृष्टीतलं एक मोठं नाव बनल्या होत्या, त्याचवेळी आशा भोसलेही स्वतःची शैली विकसित करत होत्या. एकाच क्षेत्रात असलेल्या दोन सख्ख्या बहिणी, त्यामुळे तुलनाही होत होती.
 
लता दिदी आणि आशा भोसलेंमध्ये स्पर्धा आहे, अशीही चर्चा व्हायची. तेव्हापासून ते आतापर्यंत हा लोकांमध्ये नेहमीच चर्चेचा विषय होता-आहे.
 
ज्येष्ठ पत्रकार दिलीप ठाकूर सांगतात की, "दोघींनीही 'मेरे मेहबूब में क्या नहीं, काय नहीं', 'मन क्यूं बहका रे बहका आधी रात को' यांसारखी काही गाणी एकत्र गायली आहेत. आशा भोसले जेव्हा गायल्या लागल्या तोपर्यंत लता दिदींनी स्वतःचं स्थान निर्माण केलं होतं. शिवाय दोघींचंही स्वतंत्र व्यक्तिमत्त्वं होतं, त्यानुरूप शैली होती. दोघींनीही सर्व प्रकारची गाणी गायली होती."
 
"आशा भोसलेंनी सुरुवातीला कॅब्रे किंवा सहनायिकांसाठी पार्श्वगायन केलं. आशाताईंनी लवकर लग्न केलं होतं, त्यांच्यावर कुटुंबाची जबाबदारी होती. त्यामुळे कदाचित त्यांनी सुरुवातीला मिळतील ती गाणी गायली. पण नंतर त्यांनीही स्वतःचा दबदबा निर्माण केला. हे जास्त महत्त्वाचं असतं."
 
या दोघींची शैली वेगवेगळी होती, त्यामुळेच या दोघीं एकाच काळात वैविध्यानं गात राहिल्या. बीबीसीच्या भारतीय भाषांच्या टीव्ही एडिटर वंदना यांनी हे सांगताना एक उदाहरण दिलं.
 
त्यांनी म्हटलं, की 1971 साली प्रदर्शित झालेल्या कटी पतंग चित्रपटाला राहुल देव बर्मन यांनी संगीत दिलं होतं. या चित्रपटातली गाणी अविस्मरणीय आहेत. कटी पतंगमध्ये लता मंगेशकरांनी 'ना कोई उमंग है' सारखं गाणं गायलं होतं, तर आशा भोसलेंनी 'मेरा नाम है शबनम' सारखं क्लबमधलं गाणं. दोन्ही गाण्यांची जातकुळी वेगळी होती.
 
मी ते करू शकले असते. 'मेरा नाम है शबनम' हे गाणं मी गाऊ शकले नसते. ते आशालाच जमू शकतं, असं आपल्या एका इंटरव्ह्यूमध्ये लता मंगेशकर यांनी म्हटल्याचंही वंदना यांनी सांगितलं.
 
दोघींनी स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली तरीही दोन्ही बहिणींना आयुष्यभर तुलना, प्रतिस्पर्धा आणि वैयक्तिक आयुष्यातील चढ-उतारांशी संबंधित प्रश्नांना सामोरं जावं लागलं.
 
'माझं गाणं माझ्यासारखं असायला हवं'
लता मंगेशकरांसोबत कधी स्पर्धा होती का असा प्रश्न बीबीसीने 2015 साली आशा भोसलेंना एका मुलाखतीत विचारला होता.
 
त्यावेळी आशा भोसलेंनी म्हटलं होतं की, लता दीदींची गाण्याची शैली माझ्यापेक्षा खूप वेगळी होती. आम्ही इतरही अनेक गोष्टींमध्ये एकमेकींपेक्षा खूप वेगळ्या आहोत. आम्ही एकमेकींच्या जवळ आहोत, पण आमच्यात कधीही स्पर्धा नव्हती. आमचं एकमेकींवर प्रेम आहे आणि मला त्यांच्यासोबत गायला नेहमी आवडतं.
 
काही वर्षांपूर्वी कोलकाता दूरदर्शनला ज्येष्ठ संगीत दिग्दर्शक सलील चौधरी यांनी आशा भोसलेंचा इंटरव्ह्यू घेतला होता. त्यांनीही लता दीदींसोबतच्या सांगीतिक प्रवासाबद्दल आशा भोसलेंना विचारलं होतं.
 
आशा भोसलेंनी म्हटलं होतं, की लहानपणी बरेचदा असं धाकटी बहीण थोरल्या बहिणीची नक्कल करते असं दिसतं. मी पण दीदी जसं गायचा प्रयत्न करायचे. पण नंतर माझ्या लक्षात आलं की, लता मंगेशकर हे एवढं मोठं नाव आहे. तिच्यासारखं गाणाऱ्याला कोण गाणं देणार? त्याची स्वतःची काय ओळख असले? लता नाही, पण 'लतासारखं' गाणारी आहे. हा 'सारखं' शब्द मला खटकायचा. माझं गाणं माझ्यासारखं असायला हवं. त्यामुळे मी दीदी कसं गायची हे डोक्यातून काढलं.
 
"लहानपणी मी कॅरमन मरांडा यांचं गाणं ऐकलं होतं. ते ऐकल्यावर मला वाटलं की, हे आपल्या शास्त्रीय संगीतापेक्षा वेगळं आहे. मी ती स्टाइल आजमावून पाहिली एका गाण्यात. त्याचवेळी आपली वेगळी शैली असायलं हवी हा विचार पक्का झाला आणि हळूहळू माझीही शैली तयार झाली."
 
एबीपी माझाच्या कार्यक्रमात बोलतानाही आशा भोसले यांनी म्हटलं होतं की, आमच्या नात्यात कधीही संघर्ष आला नव्हता, तो लोकांनी आणला. त्यांनी सतत तो तराजू वापरला...ही चांगली गाते की ती चांगली गाते. पण असं नाहीये. लता दीदींची एक वेगळी स्टाइल आहे, माझी वेगळी स्टाइल आहे, बाळची वेगळी स्टाइल आहे.
 
लता मंगेशकरांनीही आपल्या पुस्तकात लिहिलं आहे, "आमच्या नात्यात कटुता आहे आणि प्रतिस्पर्धा आहे, यात तथ्यं नाहीये. आम्हाला काही अडचण असेल तर आम्ही बोलतो एकमेकींशी"
 
'या' कारणामुळे काही काळ थांबला होता संवाद
माझ्या आणि दीदीमध्ये प्रतिस्पर्धा नव्हती, असं आशा भोसलेंनी मुलाखतींमधून सांगितलं असलं तरी काही काळ आशाताई आणि मंगेशकर कुटुंबातला संवाद थांबला होता. अर्थात, याचं कारण हे व्यावसायिक नव्हतं.
 
लता दीदींनी एका मुलाखतीत स्वतः या बद्दल सांगितलं होतं. नसरीन मुन्नी कबीर यांनी लिहिलेल्या पुस्तकातही याचा उल्लेख आहे.
 
लता दीदींनी या पुस्तकात म्हटलं आहे, "आशानं आम्हाला कोणाला न सांगता लग्न केलं. ती तेव्हा लहान होती. याचा धक्का आमच्या आईला म्हणजेच माईला बसला होता. आम्ही आशाला काही बोललो नाही. पण गणपतराव भोसलेंनी आशाला आमच्याशी बोलायचं नाही असं सांगितलं होतं. तिला आम्हाला भेटायचीही मनाई केली होती. ही परिस्थिती काही वर्षं होती."
 
"गणपतराव आशाला अनेक संगीत दिग्दर्शकांकडे घेऊन जायचे. आशा आपल्याला भरपूर पैसे कमावून देईल असं त्यांना वाटायचं. आशानं अनेक वर्षं हे सहन केलं. 1960 साली आशाने आपल्या पतीला सोडलं. आशा जेव्हा आमच्याकडे आली, तेव्हा गरोदर होती. तिचं तिसरं बाळंतपण होतं. आशा आल्यावर आम्ही पेडर रोडवर राहायला गेलो. आशानेही शेजारी फ्लॅट घेतला," असंही लता मंगेशकर यांनी सांगितलं होतं.
 
दीदीनं चष्म्यातून दिलेली दाद
लता आणि आशा यांनी एकत्र काही गाणीही गायली आहेत. पहिल्यांदा त्या दोघींनी 1954 साली एकत्र गाणं गायलं...गाणं होतं बरखा बहार.
 
1963 साली प्रदर्शित झालेल्या 'मेरे महबूब' या चित्रपटातील मेरे महबूब में क्या नहीं हे गाणं असो किंवा शोख चंचल अंदाज़ लिए ए काश किसी दीवाने को मुझसे भी मोहब्बत हो जाए हे गाणं असो. दोघी बहिणींच्या स्वरांची जादू दिसून येत होती.
 
1984 साली प्रदर्शित झालेल्या 'उत्सव' चित्रपटातील मन क्यूँ बहका रे बहका आधी रात को हे या दोघी बहिणींनी गायलेलं शेवटचं गाणं.
 
या गाण्याच्या रेकॉर्डिंगचा किस्सा 'इंडियन आय़डॉल' कार्यक्रमाच्या मंचावर आशा भोसले यांनी सांगितला होता.
 
"मेहबूब स्टुडिओत आम्ही होतो. दिदी शेजारी उभी होती. दिदीसोबत ड्युएट गायचं असलं की पूर्ण तयारीनिशी जायचे. आपल्याला शंभर टक्के जरी देता आलं नाही, तरी नव्याण्णव टक्के द्यायचं असं वाटायचं. आमचं रेकॉर्डिंग सुरु झालं.
 
दीदीने पहिली ओळ घेतली...मन क्यूँ बहका रे बहका आधी रात को. मला वाटलं, की दीदीने तर ओळ घेतली; आता मी काय करू? मग मी माझी पुढची ओळ घेतली...बेला महका रे महका आधी रात को. तिने चष्मा थोडासा खाली करून माझ्याकडं पाहिलं आणि मान हलवून दाद दिली. आम्ही दोघींनी एकत्र गायलेलं हे शेवटचं गाणं होतं. माझ्यासाठी ते खूप खास आहे."
 
'साज' चित्रपट लता मंगेशकर-आशा भोसलेंच्या आयुष्यावर?
लता मंगेशकर आणि आशा भोसलेंनी आपापली स्वतंत्र ओळख बनवली असली, एकत्र गाणी गायली असली तरी कोणत्या ना कोणत्या निमित्ताने त्यांच्यातील स्पर्धेचा मुद्दा चर्चेत यायचा.
 
ज्येष्ठ दिग्दर्शिका सई परांजपे यांच्या 'साज' चित्रपटाच्यावेळेसही अशीच चर्चा सुरू झाली होती. गायिका असलेल्या दोन बहिणींवर बेतलेला हा चित्रपट होता.
 
मात्र स्वतः सई परांजपे यांनी हा चित्रपट लता-आशा यांची कथा नसल्याचं म्हटलं. 'सय' या पुस्तकात सई परांजपे यांनी यांनी या चित्रपटाच्या कथेबद्दल लिहलं आहे.
 
त्यांनी लिहिलं आहे, "लता आशाच्या परिस्थितीचं मला नेहमीच अप्रूप वाटे. एकमेकींवर असीम माया करणाऱ्या या बहिणी पार्श्वसंगीतासारख्या स्पर्धक क्षेत्रात एकमेकींसमोर उभ्या ठाकल्या की मामला कसा हाताळत असतील? माझ्या मनातला संभ्रम मी पडद्यावर आणायचं ठरवलं. इतरही काही साम्यंस्थळं मी राखली. सिनेमामधल्या बन्सी-मानसीचे वडील नाट्यसृष्टीमधले नावाजलेले संगीतनट दाखवले. पण चित्रपटातील प्रत्येक घटना, दृश्यं, पात्रप्रपंच, संवाद, प्रेमसंबंध हा सर्वस्वी माझ्या कल्पनेचा आविष्कार आहे. आशा-लताच्या जीवनाशी त्याचा सुतराम संबंध नाही.
 
मानसी-बन्सीचे एकाच संगीतकाराबरोबकर भावूक संबंध जुळतात. एका दुर्धर आजारामुळे मानसी जगाचा निर्माण होत. पुढे बन्सी आणि तिची मुलगी कुहू या दोघींचे एकाच उमद्या तरुण संगीतकारासोबत प्रेमसंबंध जुळू पाहतात. पण त्याच्या अपघाती मृत्यूनंतर बन्सीवर मानसिक आघात होऊन तिचं गाणं थांबतं. हा तपशील लक्षात घेता ही आशा-लताची गोष्ट आहे, असं कसं म्हणता येईल? पण माझा सिनेमा स्वतंत्र आहे, असा कितीही कंठशोष केला; तरी शिक्का बसायचा तो बसलाच. दोन बहिणी आणि दोघी पार्श्वगायिका, एवढंच लोकांना पुरेसं होतं."
 
एकूणच या दोन्ही बहिणींच्या आयुष्याकडे लोकांनी आपापल्या चष्म्यातून पाहिलं आणि त्यांच्या नात्याचे अर्थ लावण्याचा प्रयत्न केला. एकमेकींबद्दल असलेलं प्रेम, आदर, कधीकाळी आलेला तणाव आणि स्पर्धा यांबद्दल वेगवेगळ्या तऱ्हेनं लिहिलं बोललं गेलं. पण या सगळ्याच्या पलीकडे जाऊन पाहिलं तर एकच गोष्ट शाश्वत दिसते- या दोघींच्याही स्वरांनी आपल्या आयुष्यात पेरलेला आनंद...