1. मनोरंजन
  2. बॉलीवूड
  3. लता मंगेशकर
Written By
Last Modified: रविवार, 6 फेब्रुवारी 2022 (19:38 IST)

लता दीदींनी जेव्हा म्हटलं होतं, की मी सचिनची दृष्ट काढायला आलीये...

- द्वारकानाथ संझगिरी
लतादीदींनी पृथ्वीवरचं आपलं अवतारकार्य संपवलं आणि स्वर्गाच्या पॅव्हेलियनमध्ये निघून गेल्या. आय़ुष्याच्या खेळीत प्रत्येक जण कधीना कधी बाद होतोच होतो.
 
इथं क्रिकेटच्या खेळीप्रमाणे नाबाद राहता येत नाही. मग फलंदाज सर फ्रँक वॉरेल असो किंवा डॉन ब्रॅडमन..एवढंच वाटलं की परमेश्वराने लतादीदींच्या आयुष्याच्या स्कोअर बुकात शंभर धावा आधीच लिहून ठेवायला हव्या होत्या. नव्वदीत तर त्यांनी प्रवेश केला होता. आणि गरज फक्त आठ धावांची होती. परमेश्वाराने अन्यायच केला हा!
 
खरंतर लतादीदी चिरंजीव आहेत. एका परीने त्या कायम नाबादच राहणार. त्या फक्त त्यांच्या शरीरात राहिल्या नाहीत इतकंच. पण, आवाजाचं काय? जोपर्यंत चंद्र-सूर्य आहेत, जोपर्यंत हिमालय आहे, जोपर्यंत जगात संगीत आहे तोपर्यंत हा आवाज नाबादच राहणार.
 
आणि तो आवाज सतत आपल्या कानात गुंजत सुद्धा राहणार. त्यांनी स्वत:च म्हटलंय, 'रहे ना रहे हम, मेहका करेंगे, बनके कली, बनके समा!'
 
संगीत हा लतादीदींचा श्वास होता. पण, त्यांना इतर अनेक विषयांत प्रचंड रुची होती. विशेषत मराठी साहित्य, काव्य, शिवाजीमहाराज, स्वातंत्र्यवीर सावरकर आणि सर्वात महत्वाचं म्हणजे क्रिकेट. त्या गानसम्राज्ञी झाल्या नसत्या तर त्यांना क्रिकेटसम्राट व्हायला आवडलं असतं, इतकं त्यांचं क्रिकेटवर प्रेम होतं. आणि हे प्रेम अनेकदा, अनेक गोष्टीतून व्यक्त होत होतं.
 
एकेकाळी मुंबईतले कसोटी सामने त्या अजिबात सोडत नसतं. मला राजू भारतन यांची एक फिल्म आजही आठवते. 1973च्या इंग्लंड विरुद्धच्या सीरिजवर आधारित फिल्म होती.
 
मुंबईत सलीम दुराणींना प्रेक्षकांनी सांगितलं, 'वी वाँट सिक्सर!' आणि सलीम दुराणींनी पुढचा मागचा विचार न करता डेरेक अंडरवूडला पुढे सरसावत षटकार ठोकला. त्यानंतर टीव्हीवर चेहरा झळकला तो चेहऱ्यावर एक बालिश स्मित पसरलेल्या लतादीदींचा.
 
लतादीदींच्या हास्यात एक लहान मूल लपलेलं होतं. आणि त्या अशावेळी आनंदाने खुद्कन हसायच्या. क्रिकेटच्या मैदानावर असे अनुभव त्यांनी खूपच घेतलेत. 1960 आणि 1970 च्या दशकांमध्ये लतादीदींचं रेकॉर्डिंग शनिवार-रविवार सोडल्यास रोज असायचं. त्या बिझी होत्या. तरी सुद्धा क्रिकेटसाठी मात्र नेहमीच वेळ काढत.
 
क्रिकेट आणि फिल्म्स या दोन्ही क्षेत्राला वलय असल्यामुळे असेल. पण, या दोन्ही क्षेत्रातल्या लोकांना एकमेकांविषयी प्रचंड आदर आणि प्रेम होतं.
 
दिलीप कुमारने जेव्हा पहिली गाडी घेतली तेव्हा ती गाडी घेऊन तो पहिल्यांदा ब्रेबॉर्न स्टेडिअमवर मॅच पाहायला गेला. प्राणसारखा नट सुरुवातीच्या काळामध्ये सीसीआयमध्ये विशिष्ट जागा बसायला मिळावी म्हणून पहाटे पाच वाजता रांगेत उभा राहायचा. लतादीदींचं प्रेमही त्याच टोकाचं होतं. पण, त्यांना मला वाटत नाही कधी रांगेत उभं रहावं लागलं असेल.
 
मला मिहिर बोस या इंग्लंडमधल्या दोस्ताने लिहिलेल्या पुस्तकातला किस्सा आठवतो. राजसिंग डुंगरपूर हे क्रिकेटवेडे प्रिन्स जेव्हा मुंबईत आले तेव्हा मुंबईत पावसाळा सुरू होता. त्यामुळे त्यांना क्रिकेट खेळायला मिळायचं नाही.
 
त्यांची आणि ह्रदयनाथ मंगेशकरांची मैत्री झाली. त्यावेळी लतादीदींचं मंगेशकर कुटुंब वाळकेश्वरला राहायचं. राजसिंग डुंगरपूर मंगेशकरांकडे क्रिकेट खेळायला जायचे. अख्खं मंगेशकर कुटुंबच क्रिकेटचं प्रेमात होतं.
 
लतादीदींना स्वत:ला लंडन शहर खूप आवडायचं. त्या सर्वच दृष्टीने मोठ्या झाल्यावर लंडनला त्यांनी घर घेतलं. कुठं घेतलं असेल? थेट लॉर्ड्सच्या समोर. म्हणजेच क्रिकेटच्या पंढरीसमोर! क्रिकेटच्या मोसमात त्या तिथे येत, रहात. समोर लॉर्ड्सला मॅच पहात. आणि मुंबईत त्या काळात जी गोष्ट करता येत नसे, ती करत. छान फेरफटका मारत. आणि भारतीय संघ तिथे गेला की तो लतादीदींना तिथे भेटत असे.
 
माझा लंडनमधला मित्र मधु अभ्यंकर . आज तो हयात नाही. पण, लतादीदी आल्यावर तो नेहमी तिथे जायचा. मला त्यांनी सांगितलेला एक किस्सा आठवतोय. लतादीदींच्या घरात एक मोठा पलंग होता. आणि असा सुंदर पलंग आपल्याकडे आहे याचा त्यांना अभिमान होता.
 
याचं कारण काय असावं? तर लहानपणी ज्यावेळी त्यांची परिस्थिती गरिबीची होती त्यावेळी पाचही भावंड एका बिछान्यावर झोपत. ते कुठेतरी त्यांच्या मनात होतं. आणि त्यातून या मोठ्या पलंगाची कल्पना त्यांच्या मनात रुजली असावी.
 
लतादीदींची आई, माई मंगेशकर यांनाही लंडन खूप आवडायचं. एकदा त्यांनी लतादीदींकडे इच्छा व्यक्त केली की लंडनच्या राणीला भेटायचंय. मला वाटतं तेव्हा इंडियन हायकमिशन तर्फे लता मंगेशकर यांची भेट अरेंज करण्यात आली. इंग्लंडमध्ये राणीसमोर जाताना गुडघ्यात वाकायची पद्धत आहे. त्याला ते जनिफ्लेक्टिंग म्हणतात. त्यांनी ते इतकं परफेक्ट केलं जणू ती इंग्लंडमध्ये जन्माला आली होती.
 
'सचिनची दृष्ट काढायला आलीये'
लतादीदींच्या बाबतीत सगळेच खेळाडू त्यांना प्रिय. पण, विशेष घरोबा सुनील गावस्कर आणि सचिन तेंडुलकर यांचा. क्रिकेटच्या बाबतीत माझा आणि लतादीदींचा संबंध 2005 मध्ये आला. सचिन तेंडुलकरने सुनील गावस्कर यांचा 35 शतकांचा विक्रम मोडला होता.
 
माझ्या डोक्यात आलं की, सचिन तेंडुलकरचा एक मोठा सत्कार व्हायला हवा. मग तो सत्कार कुणाच्या हस्ते करायचा? आणि पहिलं नाव डोळ्यासमोर आलं ते भारतरत्न लता मंगेशकर यांचं.
 
अगदी सर्वच बाबतीत ते त्या प्रसंगासाठी अत्यंत योग्य नाव होतं. त्याची ज्येष्ठता, त्यांचं भारतरत्न असणं आणि त्याचं क्रिकेटवर प्रेम! मी ह्रदयनाथ मंगेशकरांना फोन लावला. त्यांनी लतादीदींना विचारलं आणि लतादीदी हो म्हणाल्यावर आमचा आनंद शब्दात मावेना. तो कार्यक्रम दणक्यात झाला.
 
या कार्यक्रमाला ज्यावेळी दीदी आल्या तेव्हा त्यांची तब्येत फारशी बरी नव्हती. म्हणजे एक सतत काळजी लागून राहिली होती की, त्या येऊ शकतील की नाही. कारण, त्यांनी तब्येत कधी बरी असायची कधी नाही. पण, आदल्या दिवशी फोन आला की, उद्या नक्की येतेय. आणि आमचा जीव भांड्यात पडला. त्या ठरल्याप्रमाणे आल्या. जवळपास तीन-साडेतीन तासात तो कार्यक्रम पार पडला.
 
त्यात एक छोटसं स्किट, भाषणं, सत्कार आणि मग लतादीदींचं भाषण असा कार्यक्रम होता. लतादीदी समोर बसल्या नाहीत. त्या म्हणाल्या मी विंगेत बसते. आणि तीन तास त्या विंगेत बसून होत्या. आणि कार्यक्रमाचा आनंद लुटत होत्या.
 
ज्यावेळी शेवटचा कार्यक्रम होता, लतादीदींच्या हस्ते सचिनचा सत्कार, दीदींचं भाषण आणि सचिनचं त्याला उत्तर. लतादीदी बोलायला उभ्या राहिल्या.
 
भाषण सुरू झाल्यावर जाणवलं देवी सरस्वती त्यांच्या मुखातून बोलतेय. मी शिवाजीपार्कचा माणूस. त्यामुळे जगातले मोठमोठे वक्ते ऐकले आहेत. पण, मी इतकं सुंदर भाषण क्वचित ऐकलंय.
 
संपूर्ण भाषणात त्यांनी सचिन तेंडुलकरचा उल्लेख आदरार्थी केला. सचिन त्यांच्यापेक्षा वयाने कितीतरी लहान.
 
त्या म्हणाल्या सुद्धा, "सचिन मला 'आई' म्हणतात. आणि म्हणून आईच्या नात्याने मी त्यांची दृष्ट काढायला आलेय."
 
पण, आईच्या नात्याने मुलाबद्दल बोलताना सुद्धा त्या एकेरीवर कधी आल्या नाहीत. त्यांचं हे बेअरिंग मला असामान्य वाटलं. त्यांची सचिनची दृष्ट काढण्यामागची भावना काय होती ते ही तुम्हाला सांगतो.
 
त्यावेळी सचिन फारसा फॉर्ममध्ये नव्हता. सचिनवर त्याच्या फॉर्मबद्दल टीका होत होती. त्यात त्याला शारीरिक जखमांनी वेढलेलं होतं. मग ते पायातलं छोटंसं फ्रॉक्टर असो, टेनिस एल्बो असो.
 
त्यांनी बोलता बोलता सचिनला राणा सांगाची उपमा दिली, राजपूत राजा ज्याने अंगावर 80 वार झेलले. आणि दीदी म्हणाल्या की, "तुम्ही आमचे राणा सांगा आहाl." विचार करा की, जी स्त्री कधीही शाळेत गेली नाही. त्या स्त्रिला इतिहास, साहित्य विषयाचा अभ्यास कसा असेल?
 
त्या असं म्हणाल्या सुद्धा की, "जसं राणा सांगा जगले तसं तुम्ही जगत आहात." आणि जसं आईने आपल्या मुलाबद्दल बोलावं तसं त्या प्रेक्षकांना म्हणाल्या की तुम्ही सचिनवर टीका करू नका. तो असा खेळला, वाईट खेळला असं म्हण नका. त्याला समजून घ्या.
 
मातृप्रेमाचा झरा कसा असतो, या झऱ्याचं पाणी कसं अमृतासारखं असतं, हे त्या दिवशी लतादीदींनी दाखवून दिलं. ते अमृतच आम्ही सर्वांनी ग्रहण केलं.
 
त्यांच्या भाषणाला सचिनने उत्तरही खूप सुंदर दिलं. सचिन असं म्हणाला की, "तंत्रज्ञानात बदल होत गेले. पूलच्या टेप होत्या, टेपरेकॉर्डर आला. टू-इन-वन आला, आयपॉड आला. पण, तंत्रज्ञान बदललं तरी एक आवाज कॉमन राहिला, जो आम्ही ऐकत होतो. अख्ख्या प्रवासात एकच आवाज कॉमन होता, तो लतादीदींचा. आणि तो तितकाच गोड लागला."
 
त्या कार्यक्रमानंतर दुसऱ्या दिवशी लतादीदींचा मला फोन आला. मी फोन उचलला. आणि समोरून एक आवाज आला. मी लता बोलतेय. संपूर्ण शरीर माझं क्षणात शहारलं. अंगावर रोमांच उठले. जणू सरस्वतीच किंवा देवीच माझ्याशी बोलतेय. मी लतादीदींना म्हटलं, तुमचा एक आवाज आहे की तो समोरून आल्यानंतर कोण बोलतंय सांगण्याची गरजच नाही.
 
त्यांनीच तर एकदा म्हटलंय, 'मेरी आवाजही मेरी पेहचान है।. आणि मग दीदींशी त्यांच्या गाण्या आणि कार्यक्रमाबद्दल पंधरा-वीस मनिटं गप्पा मारल्या. माझ्या आयुष्यातल्या त्या सर्वात श्रवणीय गप्पा होत्या. त्या कार्यक्रमात एका व्यक्तीचे आभार मानणं राहून गेलं.
 
मी दीदींना म्हटलं, "अमुक एका व्यक्तीचं नाव घेणं राहून गेलं. आमच्या हातून चूक झाली." दीदी म्हणाल्या, तुम्ही काही चुकलात असं मला वाटत नाही. मी कार्यक्रमाला का आले ते सांगते. मला बाळने (ह्रदयनाथ मंगेशकर) सांगितलं, तुला कार्यक्रमाला दोन कारणांसाठी जायला पाहिजे.
 
एक सचिन तेंडुलकर आणि दुसरा द्वारकानाथ संझगिरी. आणि मी तुम्हा दोघांसाठी आले. भरून पावणं म्हणतात ना, त्याचा अनुभव मी त्या दिवशी घेतला. तो फोन, तसंच त्या फोनवर बोलत राहावं, तो ठेवूच नये असं तेव्हा वाटत होतं.
 
त्यानंतर काही वर्षांनी राहुल द्रविड यांचे वडील मला असं म्हणाले की, जसा लतादीदींनी सचिन तेंडुलकरचा सत्कार केला तसा राहुलचा सत्कार दीदींच्या हस्ते करता येईल का? राहुलच्यया वडिलांची इच्छा होती की, दीदींच्या हस्ते राहुलचा सत्कार व्हावा. कारण, शेवटी राहलची कामगिरीची वरच्या दर्जाची होती. त्यांचं आणखी असं म्हणणं होतं की कुटुंब जरी मराठी असलं तरी ते इंदूर आण बेंगळुरूला राहिलेले.
 
त्यामुळे मराठी माणसाला त्यांच्या कुटुंबाची फारशी ओळख नव्हती. विशेषत: राहुलची आई ही वयाच्या 57व्या वर्षी फाईन आर्ट्समध्ये डॉक्टरेट झालेली होती. ती उत्तम चित्र काढायची, म्युरल काढायची. हे कुठेतरी लोकांसमोर यावं आणि राहुलचा उत्तम सत्कार व्हावा असं त्यांना वाटत होतं.
 
मी पु्न्हा एकदा ह्रदयनाथ मंगेशकरांना फोन केला. ह्रदयनाथ म्हणाले, दीदी इथेच बसलीय. आणि अक्षरश: पुढच्याच क्षणी ते म्हणाले, दीदी हो म्हणालीय. पुन्हा एकदा माझं अंग शहारलं. दीदींचा एकंदर क्रिकेटवरचा आदर त्यांच्या बोलण्यातून झळकत होता. कुठलाही फायदा, कसलाही विचार न करता त्या हो म्हणाल्या.
 
यातून क्रिकेटवरचं त्यांच प्रेम खूप जाणवलं. तो फोन ठेवल्यानंतर मी राहुलच्या वडिलांना फोन कला. ते सुद्धा मोहरून गेले. मला म्हणाले, राहुलला सांग. मी राहुलला फोन केला. आणि मला धक्काच बसला. राहुल म्हणला, अरे सध्या नको. मी अजून खेळतोय. रिटायमेंट नंतर आपण करूया.
 
"सचिनचा सत्कार केला तेव्हा तो खेळतच होता. लतादीदी हो म्हणतायत तर करूया," असं मी त्याला म्हणालो सुद्धा. पण, राहुलला तेव्हा काय वाटलं माहीत नाही. वडिलांना प्रचंड वाईट वाटलं. आम्हालाही वाईट वाटलं. असा क्षण निघून गेल्यावर पुन्हा येत नाही. आज कदाचित राहुललाही राहून राहून वाटत असेल की हा इतका सुंदर फुलटॉस, त्याच्यावर उत्तुंग षटकार ठोकता आला असता. तो आपण फुकट घालवला.
 
आता लतादीदी परत येणार नाहीत. आणि तो सत्कारही परत होणार नाही, क्रिकेटपटूंचा असा सत्कार होणार नाही.
 
'लता दीदी क्रिकेट खेळत असल्या तर...'
लतादीदींच्या गाण्यावर प्रेम करणारे अनेक क्रिकेटपटू होते. क्रिकेट इतकंच किंवा अंमळ जास्तच प्रेम लतादीदींवर करणारा माझा एक मित्र म्हणजे वासू परांजपे. एखाद्याने किती प्रेम करावं याचं उदाहरण सांगतो.
 
माझ्या अमेरिकन मित्राने लतादीदी आणि त्यांच्या दुर्मिळ द्वंद्व गीतांची एक कॅसेट मला बनवून दिली. मला ती प्रचंड आवडली. म्हणून मी ती वासूला दिली. काही दिवसांनी मी ती वासूला विचारलं, "ती तू ऐकलीस का? कशी वाटली?" तो म्हणाला, चांगली आहे.
 
पण, मित्राला एक सांग, पुढच्या वेळी अशी कॅसेज बनवशील तेव्हा एकट्या लताची बनव. इतर गर्दी नको. म्हणजे इतर गायकांना तो गर्दी मानत होता! आम्ही गप्पा मारायचो तेव्हा क्रिकेट आणि लता मंगेशकर या विषयांवरच जास्त गप्पा मारायचो.
 
एकदा वासूला मी म्हटलं लतादीदी या जिनियसच आहेत. कुठल्याही क्षेत्रात त्या असत्या तरी त्या मोठ्याच झाल्या असत्या.
 
तो म्हणाला, "हो रे! क्रिकेट नसतं आणि लतादीदी नसत्या तर मी आयुष्यात काय केलं असतं? माझं आयुष्य शुष्क झालं असतं." मी त्याला असं म्हटलं की, समजा लतादीदी क्रिकेट खेळत असल्या तर ब्रॉडमनसारखे विक्रम त्यांनी केले असते. कसोटीमध्ये सर डोनाल्ड ब्रॅडमन यांचं अॅव्हरेज 99.94 आहे. शेवटच्या कसोटीत त्यांनी चार धावा जरी केल्या असत्या तरी त्याची सरासरी शतकी झाली असती. म्हणून मी वासूला विचारलं, "दीदी क्रिकेट खेळत असल्या तर त्यांची सरासरी काय असती?"
 
वासूने क्षणभर विचार केला आणि म्हणाला, "शंभर असली असती." मी वासूला म्हटलं, तुझ्या लाडक्या ब्रॅडमनपेक्षा किंचित जास्त? तर वासू म्हणाला, हो. कारण, लतादीदी सुरात कधी चुकत नाहीत. त्यामुळे शंभरच असली असती.
 
देवाने वासूसारखाच विचार केला असता तर खूप बरं झालं असतं. पण देवाने एक गोष्ट तर नक्की केली. की, मधाला सुद्धा हेवा वाटावा, असा गोड, स्वर्गीय आवाज मानवाला ऐकवला. तो आवाज एक कीर्तीमान ठरला. त्या पलीकडे जाणं कुठल्याही मानवाला जमेल असं वाटत नाही. सरस्वतीला त्यासाठी पुन्हा पृथ्वीवर जन्म घ्यावा लागेल. आणि आणखी एक गोष्ट झाली आहे. हा आवाज, कधीही पुसला जाणार नाही. आवाजाच्या माध्यमातून लतादीदी सदैव आपल्याबरोबरच राहणार आहेत.
 
ज्येष्ठ गायक हेमंत कुमार एकदा म्हणाले होते, "लतादीदींच्या स्वरांविना माझं आयुष्य अगदी शुष्क होऊन गेलं असतं."
 
तसंच लतादीदींनी आपल्या सगळ्यांच्या आयुष्यात त्यांच्या सुरांतून ओलावा आणला. आणि आज सुरांचा हा अमोल ठेवा आपल्यासाठी ठेवूनच त्यांनी एक्झिट घेतली आहे.