बुधवार, 25 डिसेंबर 2024
  1. मनोरंजन
  2. बॉलीवूड
  3. लता मंगेशकर
Written By
Last Modified: रविवार, 6 फेब्रुवारी 2022 (16:35 IST)

लता मंगेशकर : लतादीदींना कोणती गाणी कठीण वाटली होती?

प्राजक्ता पोळ
1942-43 साली त्यांनी मराठी सिनेमासाठी पहिलं गाणं गायलं. 1945 मध्ये लतादीदींनी मुंबईत येऊन नशिब आजमवायला सुरवात केली.
 
त्याचदरम्यान 1945-46 साली त्यांनी हिंदी सिनेमासाठी पहिलं गाणं गायलं. 1942 ते 2022 पर्यंत लतादीदींच्या प्रवासाला अनेकांनी जवळून पाहिलं.
 
जेष्ठ सिनेपत्रकार दिलीप ठाकूर यांनी सांगितलेले लतादीदींचे काही खास आणि दुर्मिळ किस्से ...
 
ही गाणी लतादीदींना कठीण वाटली होती
लतादीदींनी असंख्य संगीतकारांबरोबर काम केलं आहे. तीन-चार पिढ्यांना लक्षात राहतील अशी काही त्यांची गाणी आहेत.
 
उदाहरणार्थ 'वो कौन थी?' सिनेमामधली हे गाणं...
 
'लग जा गले कि फिर ये हंसी रात हो ना हो,
 
शायद फिर इस जनम मुलाकात हो ना हो
 
लग जा गले से'
 
'नैना बरसे रिमझिम रिमझिम
 
पिया तोरे आवन की आस'
 
ही गाणी आजही तितक्याच आवडीने ऐकली जातात. पण या गाण्यांचे संगीतकार 'मदन मोहन' यांची गाणी लतादीदींना गायला कठीण वाटायची. मदन मोहन यांचं उर्दू भाषेवर प्रभुत्व होतं.
 
त्यांनी लावलेल्या गाण्यांची चालीमध्ये उर्दू संगीताचा बाज असायचा. मदन मोहनांचं मूळ हे गझल होतं. त्या गझलमधून गाण्याच्या चाली या कठीण असायच्या.
'जो हमने दास्तां अपनी सुनाई, आप क्यों रोए
 
तबाही तो हमारे दिल पे आयी, आप क्यों रोए'
 
हे मदनमोहनजी आणि लतादीदींचं संयोजन आहे.
 
त्या गाण्यांना लावलेल्या चालीमधले बारकावे समजून मदनमोहन यांची गाणी गाणं हे कठीण असायचं.
 
त्यामुळे मदन मोहन यांची गाणी जरी ऐकायला छान वाटत असली. तरी गाताना ती लतादीदींना खूप कठीण वाटायची, असं त्यांनी पूर्वीच्या काही मुलाखतींमध्ये सांगितलं आहे.
 
'निर्मात्या' लतादीदी...
लता मंगेशकरांनी चार सिनेमांची निर्मिती केली होती. त्यात मराठी सिनेमांचाही समावेश होता. वादळ (1953), झंझार (1953), कांचन गंगा (1955) आणि 'लेकीन (1990) या चार सिनेमांची लतादीदींनी निर्मिती केली.
 
पूर्वीच्या सिनेमांचे मुहूर्त असणं म्हणजे एक मोठा 'इव्हेंट' असायचा. स्टुडिओत एक भला मोठा सेट लावला जायचा. त्यावर एखादा सीन चित्रित केला जायचा आणि मग छान कार्यक्रम असायचा.
 
अनेक पाहुण्यांना आमंत्रित केलं जायचं. लतादीदींनी परेलच्या राजकमल कलामंदिर स्टुडिओत 'लेकीन' सिनेमाचा मुहूर्त ठेवला होता.
 
या सिनेमात अभिनेता विनोद खन्ना, अभिनेत्री डिंपल कपाडिया आणि हेमा मालिनी यांनी काम केलं होतं. गुलजार यांनी त्या सिनेमाचं दिग्दर्शन केलं होतं. या सिनेमातील गाण्यांना हृदयनाथ मंगेशकर आणि गुलजार यांनी संगीत दिलं होतं.
 
या सिनेमाच्या मूहूर्ताला लतादीदींनी सुनिल गावसकरला आमंत्रित केलं होतं. लतादीदींचं क्रिकेट प्रेम हे जगजाहीर आहे. त्यावेळी सुनिल गावसकर यांची लोकप्रियता प्रचंड होती.
 
अतिशय भव्य सिनेमाच्या मूहूर्ताचा कार्यक्रम पार पडला होता. हा सिनेमा बॉक्स ऑफिसवर साधारण चालला. पण यातली गाणी लोकप्रिय झाली.
 
'यारा सिली सिली बिरहा की रात का जलना,
 
यारा सिली सिली, यारा सिली सिली'
 
या गाण्यासाठी लतादीदींना उत्कृष्ट गायिकेसाठी राष्ट्रीय पुरस्कार मिळाला. त्याचबरोबर गुलजार यांना उत्कृष्ट गीतकार म्हणून 'फिल्म फेअर' पुरस्काराने गौरविण्यात आलं. 'लेकीन' या सिनेमानंतर लतादीदींना चित्रपट निर्मितीचा प्रयोग केला नाही.
 
लतादीदी जेव्हा मोर्चात सहभागी झाल्या होत्या
1986 साली 10 ऑक्टोबर ते 10 नोव्हेंबर असा एक महिना सिनेसृष्टीतील कलाकारांनी संप केला होता. व्हीडिओ चोरीवर नियंत्रण आणि मनोरंजन कर कमी करावा यासाठी महिनाभर सर्व चित्रीकरण, रेकॉर्डिंग, रिलीज बंद ठेवण्यात आल्या होत्या. सर्व कलाकारांचे गिरगाव, पेडर रोड या ठिकाणाहून मोर्चे निघत होते.
 
तेव्हा अनेक दिग्गज कलाकार या संपात सहभागी झाले होते. त्यावेळी पेडर रोडवरून जाणाऱ्या मोर्चात लतादीदी, दिलीपकुमार आणि व्ही. शांताराम हे एकत्र सहभागी झाले होते. काळ्या फिती लावून राजभवनवर मोर्चे निघत असताना लता दीदी त्या मोर्चात स्वतः आल्या होत्या. त्यांचे तसे फोटोही आहेत.