बुधवार, 25 डिसेंबर 2024
  1. मनोरंजन
  2. बॉलीवूड
  3. लता मंगेशकर
Written By
Last Modified: रविवार, 6 फेब्रुवारी 2022 (13:46 IST)

लता मंगेशकरः 'ए मेरे वतन के लोगों...' मुळे जवाहरलाल नेहरू रडले तेव्हा...

वंदना
1943-44 दरम्यानची गोष्ट आहे. कोल्हापुरात एका चित्रपटाचं चित्रीकरण सुरू होतं आणि त्या वेळच्या विख्यात गायिका नूरजहाँ गाणं रेकॉर्ड करायला तिथे आल्या होत्या. त्याच चित्रपटात एक लहान मुलगी भूमिका करत होती.
 
चित्रपटाचे निर्माते नूरजहाँ यांच्याशी त्या मुलीची ओळख करवून देताना म्हणाले, "ही लता आहे आणि तीसुद्धा गाते."
 
नूरजहाँ झटकन म्हणाल्या, "बरं, काहीतरी म्हणून दाखव." यावर लता यांनी शास्त्रीय संगीताची चाल असलेलं एक गाणं म्हटलं. नूरजहाँ ऐकत राहिल्या आणि लता गात राहिल्या.
 
मुलीचं गाणं ऐकून खूश झालेल्या नूरजहाँ म्हणाल्या, "छान गातेस, फक्त रियाज करत राहा, खूप मोठी होशील."
 
उपजीविकेसाठी चित्रपटांमध्ये छोट्या-मोठ्या भूमिका करणारी ही मुलगी खरोखरच खूप मोठी झाली आणि गानकोकिळा लता मंगेशकर म्हणून ओळखली जाऊ लागली.
 
गीतकार-दिग्दर्शक गुलझार यांनी सांगितलेली एक गोष्ट इथे आठवते. लता फक्त गायिका नाहीत, तर त्या भारतीयांच्या दैनंदिन जगण्याचा एक भाग झालेल्या आहेत, असं गुलझार म्हणाले होते.
 
'संगीतकार आनंदघन'
लता मंगेशकर यांच्या गायनाव्यतिरिक्त इतर पैलूंविषयी लोकांना खूपच कमी माहिती आहे. 'आनंदघन' या संगीतकाराशी असलेलं त्यांचं घनिष्ठ नातं फारशा कोणाला माहीत नसेल.
 
आनंदघन यांनी साठच्या दशकात चार मराठी चित्रपटांना संगीत दिलं होतं. स्वतः लता मंगेशकर यांनीच 'आनंदघन' हे नाव घेऊन संगीतकाराची कामगिरी बजावली.
 
1950 साली 'राम राम पाहुणे' या चित्रपटाला त्यांनी स्वतःच्या खऱ्या नावानेही संगीत दिलं होतं. परंतु, संगीतकार म्हणून त्यांनी पुढे काम केलं नाही.
 
'साधी माणसं' या चित्रपटासाठी त्यांना सर्वोत्तम संगीतकाराचा सन्मानसुद्धा मिळाला. पण त्या वेळी लता मंगेशकर स्वतःच्या खुर्चीवर शांत बसून होत्या. संगीतकार आनंदघन म्हणजे दुसरं तिसरं कोणी नसून खुद्द लता मंगेशकरच आहेत, असं कोणीतरी म्हणालं.
ऋषिकेश मुखर्जी यांनी 'आनंद' या चित्रपटाचं संगीत देण्यासाठी लता मंगेशर यांना निमंत्रित केलं होतं, पण लता यांनी त्यासाठी नकार दिला, हेही फारशा कोणाला माहीत नसेल.
 
विष देण्यात आल्याची शंका
नसरीन मुन्नी कबीर यांनी लता मंगेशकर यांची मुलाखत घेऊन एक पुस्तक लिहिलं होतं.
 
या पुस्तकात एका गाण्याच्या रेकॉर्डिंगचा उल्लेख करून लता म्हणतात, "1962 साली मी महिनाभर आजारी होते. माझ्या पोटाचा एक्स-रे काढण्यात आला, तेव्हा मला संथ परिणाम करत जाणारं विष देण्यात आल्याचं लक्षात आलं. आमच्या घरात एकच नोकर होता, तोच स्वयंपाक करायचा. त्या दिवशी तो नोकर काही न सांगताच घरून निघून गेला. त्याने पैसेही घेतले नाहीत."
"कोणीतरी त्याला जाणीवपूर्वक आमच्या घरी पाठवलं होतं, हे तेव्हा आम्हाला कळलं. तो कोण होता, ते आम्हाला माहीत नव्हतं. त्या वेळी मी तीन महिने अंथरुणाला खिळून होते. या काळात मजरूब साहेबांनी मला मदत केली. ते रोज संध्याकाळी घरी यायचे. तीन महिने हे असंच सुरू होतं. मी जे खायचे तेच तेही खात असत."
 
संगीतविश्वात लता मंगेशकर यांची कामगिरी अत्युच्च स्थानी जाणारी ठरली असली, तरी त्यांचा तिथवर जाण्याचा प्रवास संघर्षमय, तिरस्काराला तोंड देणारा आणि अडचणींनी भरलेला राहिला आहे.
 
प्रवासाची सुरुवात अभिनयाने
लहानपणीच वडिलांचं निधन झाल्यामुळे लता मंगेशकर यांना कुटुंबाच्या उदरनिर्वाहाकरता लहान-मोठ्या भूमिका कराव्या लागत होत्या.
 
परंतु त्यांना मेक-अप, अभिनय यातलं काहीच अजिबात आवडत नव्हतं. त्यांना केवळ गायिका व्हायचं होतं.
या दरम्यान, संगीत दिग्दर्शक उस्ताद गुलाम हैदर त्यांच्या आयुष्यात आले. त्यांनी लात यांची आवाज ऐकला आणि त्यांना घेऊन ते इतर संगीतकारांकडे गेले.
 
लता जेमतेम 19 वर्षांच्या असताना त्यांचा आवाज पातळ असल्याचं सांगून त्यांना नकार देण्यात आला.
 
परंतु ग़ुलाम हैदर स्वतःच्या मतावर ठाम होते. त्यांनी 'मजबूर' या चित्रपटामध्ये मुनव्वर सुलताना यांच्याकरता पार्श्वगायिका म्हणून लता यांना संधी दिली.
 
'तू एके दिवशी खूप मोठी कलावंत होशील आणि आता तुला नाकारणारे लोक त्या वेळी तुझ्या मागे लागतील', असं गुलाम हैदर यांनी आपल्याला सांगितल्याचं लता म्हणतात.
 
नूरजहाँ आणि गुलाम हैदर दोघेही फाळणीनंतर पाकिस्तानात निघून गेले, परंतु त्यांनी लता यांच्याबद्दल केलेली भाकितं खरी ठरली.
 
किशोर कुमार यांची विचित्र भेट
'मजबूर' या चित्रपटातील लता मंगेशकरांचं गाणं ऐकून लता यांनी कमाल अमरोही यांच्या 'महल' चित्रपटासाठी पार्श्वगायिका म्हणून काम मिळालं. त्यात त्यांनी 'आएगा आने वाला' हे गाणं म्हटलं. त्यानंतर लता यांच्याकडे चित्रपटांची रीघ लागली.
 
आपल्या कारकीर्दीच्या आरंभकाळातील एक गंमतीशीर किस्सा लता मंगेशकरांनी काही वर्षांपूर्वी बीबीसीला सांगितला होता,
 
तो असा- "चाळीसच्या दशकामध्ये मी चित्रपटांसाठी गायला सुरुवात केली होती. त्या काळी मी घरून लोकल ट्रेन पकडून मालाडला जायचे, तिथे उतरून मग स्टुडिओपर्यंत पायी प्रवास करावालागत असे. वाटेत किशोरदासुद्धा भेटायचे. पण मी त्यांना आणि ते मला ओळखत नव्हतो. किशोरदा माझ्याकडे बघत राहायचे. कधी हसायचे. कधी हातात काठी घेऊन फिरवत राहायचे. त्यांचं हे वागणं मला विचित्र वाटायचं.
त्या वेळी मी खेमचंद प्रकाश यांच्या एका चित्रपटासाठी गाणं म्हणत होते. एके दिवशी किशोरदा माझ्या मागोमाग स्टुडिओत आले. हा मुलगा माझा पाठलाग करतोय, अशी तक्रार मी खेमचंदजींकडे केली.
 
तेव्हा ते म्हणाले, 'अरे, हा तर आपल्या अशोक कुमारचा धाकटा भाऊ आहे.' मग त्यांनी माझी नि किशोरदांची ओळख करवून दिली. त्या चित्रपटासाठी आम्ही दोघांनी पहिल्यांदा एकत्र गाणं म्हटलं."
 
मोहम्मद रफी यांना विरोध
त्यानंतरच्या काळात लता मंगेशकरांनी अनेक मोठमोठ्या संगीतकारांसोबत आणि किशोर, रफी, मुकेश, हेमंत कुमार यांच्यासारख्या गायकांसोबत गाणी म्हटली. अगदी लहान वयात त्यांनी स्वतःच्या बळावर चित्रपट उद्योगात स्वतःचं स्थान निर्माण केलं.
 
त्यांनी महत्त्वाच्या मुद्द्यांवर ठामपणे भूमिकाही घेतल्या. त्यासाठी दिग्गजांचा विरोध पत्करायचीही त्यांची तयारी होती.
 
रॉयल्टीच्या मुद्द्यावरून त्यांनी त्यांच्या काळातील मोठे गायक मोहम्मद रफी, शो-मॅन राज कपूर व एचएमव्ही कंपनी इथपर्यंत सर्वांशी दोन हात केले.
 
लता मंगेशकर यांनी साठच्या दशकातच चित्रपटांमधील त्यांच्या गाण्यांसाठी रॉयल्टी घ्यायला सुरुवात केली होती. परंतु, सर्व गायकांना रॉयल्टी मिळावी, अशी त्यांची इच्छा होती. त्यांनी मुकेश व तलत महमूद यांच्या सोबत एक संघटना स्थापन केली.
 
गायकांना गाण्यांची रॉयल्टी मिळावी, अशी मागणी त्यांनी एचएमव्ही या रेकॉर्डिंग कंपनीकडे आणि निर्मात्यांकडे केली. परंतु त्यांच्या मागणीचा अव्हेर झाला. तेव्हा त्यांनी एचएमव्ही या कंपनीसाठी गाणी गाणं बंद केलं.
 
मोहम्मद रफी रॉयल्टीच्या विरोधात होते. या संदर्भात चर्चेसाठी सर्व जण भेटले तेव्हा परिस्थिती आणखी बिघडली.
 
बीबीसीसोबतच्या मुलाखतीत लता मंगेशकर म्हणाल्या होत्या, "रफी साहेब चिडले. 'मला काय समजावताय, ही महाराणी बसलीय तिच्याशी बोला', असं ते माझ्याकडे बघून म्हणाले. तेव्हा मीसुद्धा चिडून म्हणाले, 'तुम्ही बरोबर बोलताय. मी महाराणीच आहे.' मग ते म्हणाले, 'मी तुझ्यासोबत गाणी म्हणणार नाही.' त्यावर मीही प्रत्युत्तर दिलं, 'तुम्ही तसदी घेऊ नका. मीच आता तुमच्यासोबत गाणार नाही.'" हा वाद तीन वर्षं सुरू होता.
 
याच मुद्द्यावरून लता मंगेशकर यांनी राज कपूर यांच्यासोबत काम करण्यालाही नकार दिला. सत्तरच्या दशकात राज कपूर पुन्हा त्यांच्या या आवडत्या गायिकेकडे परत गेले आणि 'बॉबी'साठी लता यांनी गाणी म्हटली.
 
फिल्मफेअरशी वाद
कोणत्या प्रकारची गाणी आपल्याला गायची आहेत, याबाबतही लता मंगेशकर यांनी स्वतःच्या इच्छेनुसार निवड केली. त्या काळी एखाद्या गायिकेला अशी निवडीची संधी मिळणं ही खूपच मोठी गोष्ट होती.
 
लता मंगेशकर यांना त्यांच्या गायनाच्या कारकीर्दीमध्ये अनेक पुरस्कार मिळाले. परंतु, 1958सालापर्यंत त्यांना सर्वोत्तम गायनासाठी एकही पुरस्कार मिळाला नव्हता, ही एक रोचक बाब आहे.
 
शंकर जयकिशन यांना 1957 साली सर्वोत्तम संगीतकाराचा पुरस्कार मिळणार होता. त्या वेळी पुरस्कार सोहळ्यात लता यांनी गाणं गावं, अशी विनंती त्यांनी केली.
 
त्यानंतर काय घडलं याची कहाणी लता यांनी नसरीन मुन्नी कबीर यांना सांगितली होती. त्या म्हणतात, "मी फिल्मफेअरच्या कार्यक्रमात गाणं म्हणणार नाही, असं मी जयकिशनजींना सांगितलं. तुम्हाला पुरस्कार मिळतोय, मला नाही. ते लोक सर्वोत्तम गायक वा गीतकार यांना पुरस्कार देत नाहीयेत. त्यामुळे गायकांविनाच सुरावट वाजवावी असं तुमच्या वाद्यचमूला सांगा. पार्श्वगायन करणारे आणि गीतकार यांनासुद्धा पुरस्कार जाहीर केले जात नाहीत, तोवर मी फिल्मफेअरसाठी गाणार नाही, अशी भूमिका मी घेतली."
 
त्यानंतर, 1959 मध्ये पहिल्यांदा सर्वोत्तम गायनासाठीचा पुरस्कार देण्यात आला. 1967 सालापर्यंत गायक व गायिका यांच्यासाठी एकाच पुरस्काराची तरतूद होती.
 
1959 साली या संमिश्र पुरस्काराच्या मानकरी लता मंगेशकरच होत्या. 'मधुमती' चित्रपटातील 'आजा रे परदेसी' या गाण्यासाठी त्यांना पुरस्कार मिळाला.
 
लता यांची वैशिष्ट्यं
लता मंगेशकर यांच्या गाण्यातील वैशिष्ट्यांबद्दल बोलणं अवघड आहे. गाण्यातील भावना व नजाकत आवाजातून समोर आणण्यात त्यांचा हातखंडा आहे.
उदाहरणार्थ, 'बंदिनी' या चित्रपटात 'मोरा गोरा अंग लइलो..' हे अल्लड धाटणीचं गाणं लता मंगेशकरांकडे आलं, तर गंभीर गाणी आशा भोसले यांच्याकडे गेली.
 
या.. जोगी जबसे तू आया मेरे द्वारे, हो मेरे रंग गए सांझ सकारे
 
तू तो अंखियां से जाने जी की बतियाँ
 
तोसे मिलना ही जुल्म भया रे
 
ही गाणी लता यांच्या आवाजात ऐकताना आपल्याला प्रेमात बुडालेल्या कल्याणीच्या (हे पात्र नूतन यांनी साकारलं होतं) हृदयाची धडधडसुद्धा जाणवते.
तसंच 'रझिया सुलतान' या चित्रपटातील 'ए दिले नादां' हे गाणं ऐकताना लता यांचा आवाज आणि मधली शांतता आपलं काळीज चिरत जाते.
 
किंवा 'अनुराधा' या चित्रपटातलं 'कुछ दिल ने कहा, कुछ भी नहीं...' हे गाणं घ्या. जगण्यात एकटेपणा सहन करत स्वतःशी बोलणारी उदास मुलगी आनंदी असल्याचा मुखवटा लावून फिरत असल्याचं हे गाणं ऐकताना समोर साकारत जातं. लता मंगेशकरांनी आपल्या मनाच्या तळाला स्पर्श करेल अशा आवाजात हे गाणं म्हटलं आहे.
 
'अनामिका' या चित्रपटातील 'बाहों में चले आओ' हे गाणं एक प्रेयसी रात्रीच्या काळोखात संथपणे गात असते. रात्री मिठीत घेणाऱ्या प्रेयसीच्या भावनांना त्या गाण्यातून स्वर मिळाला आहे.
 
साठ व सत्तर वर्षांच्या असतानाही लता मंगेशकर यांनी माधुरी दीक्षित, काजोल, जुही चावला, प्रिती झिंटा यांच्यासारख्या अभिनेत्रींसाठी गाणी म्हटली.
 
गाण्यांतील शब्दांविषयी चोखंदळ
लता मंगेशकरांच्या आवाजात 'ऐ मेरे वतन के लोगों' हे गाणं ऐकल्यावर जवाहरलाल नेहरू यांच्या डोळ्यांमध्ये अश्रू उभे राहिले होते, हा किस्सा प्रसिद्ध आहे. गाणं झाल्यावर दिग्दर्शक महबूब खान लता यांना नेहरूंकडे घेऊन गेले. 'तू तर मला रडवलंसच' असं नेहरू त्या वेळी म्हणाले.
 
'इंतकाम' या चित्रपटातील 'आ जाने जा, तेरा ये हुस्न जवाँ' हे कॅबरेमधलं गाणं अगदी दुसऱ्या टोकावरचं होतं. या गाण्यात हेलन यांचं नृत्य आहे.
 
अशा प्रकारची क्लब वा कॅबरेमधील गाणी म्हणण्याबाबत लता मंगेशकर कायमच अनिच्छुक असायच्या. 'आ जाने जा' हे बहुधा त्यांच्या आवाजातील मोजक्या कॅबरेगीतांपैकी एक असेल.
 
'संगम'मधील 'बुढ्ढा मिल गया' या गाण्यावरूनसुद्धा लता मंगेशकरांचा हसरत जयपुरींशी वाद झाला होता. या गाण्यातील बोल असभ्य आहेत, असं लता यांना वाटत होतं, पण अखेरीस राज कपूर यांच्या सांगण्यावरून त्या गायला तयार झाल्या.
 
लता मंगेशकरांची बहीण आशा भोसले यांनी गझल, कॅबरे, शास्त्रीय संगीत, अशी सर्व तऱ्हेची गाणी म्हटली आहेत आणि अनेक जण आशा यांना अधिक वैविध्यपूर्ण गायिका मानतात. हा वाद कायमच होत आला आहे.
 
लता मंगेशकर यांच्याबद्दल वेगळं मत
विख्यात चित्रकार एम. एफ. हुसैन यांचंही यावर काहीएक मत होतं. अनेक चित्रपटांचं दिग्दर्शन केलेले हुसैन बीबीसीसोबतच्या एका मुलाखतीत म्हणाले होते की, लता मंगेशकर या लोकप्रिय गायिका आहेत, पण महान गायिका नाहीत.
शिवाय, गायनाच्या विश्वात लता मंगेशकर यांचा दबदबा इतका होता की त्यांच्या समोर इतर गायिकांना पुढे यायला संधीही मिळाली नाही, असाही एक आरोप केला जातो. पण लता मंगेशकरांनी हा आरोप कायमच नाकारला आहे.
 
हे सर्व असलं तरी लता मंगेशकर यांच्या गाण्याचे लाखो चाहते आहेत आणि ते भारताच्या सीमेपार इतर देशांमध्येही पसरलेले आहेत.
 
लता मंगेशकरांचं खाजगी आयुष्य
'लता मंगेशकर- इन हर ओन व्हॉइस' या नसरीन मुन्नी कबीर लिखित पुस्तकात लता यांच्या लग्नाविषयीही प्रश्न विचारण्यात आलेले आहेत.
त्यावर लता म्हणतात, "माझ्या वडिलांनी माझी जन्मपत्रिका पाहिली होती आणि मी प्रचंड प्रसिद्ध होईन, संपूर्ण कुटुंबाची काळजी घेईन व लग्न करणार नाही, असं ते म्हणाले होते. जन्म, मृत्यू आणि लग्न यावर आपलं नियंत्रण नसतं. मी लग्न केलं असतं तर माझं जीवन वेगळं राहिलं असतं. पण मला कधी एकटं वाटत नाही. मी सतत कुटुंबासोबत राहिले आहे."
 
बालपण
मंगेशकर कुटुंबाचा पूर्वीपासूनच संगीताशी संबंध राहिला आहे. त्यांचे वडील दीनानाथ मंगेशकर स्वतः गाणं गात आणि ते एक नाट्यकंपनी चालवायचे, तसंच अनेक विद्यार्थ्यांना ते संगीत शिकवत असत.
परंतु, आपल्याच घरात इतकी सांगितिक प्रतिभा आहे, याची कल्पना त्यांना आली नव्हती. लता मंगेशकर यांचा जन्म 28 सप्टेंबर 1929 रोजी इंदूरला झाला.
 
बीबीसीसोबतच्या मुलाखतीत लता मंगेशकर म्हणतात, "एकदा माझे वडील त्यांच्या एका शिष्याला संगीत शिकवत होते. त्यांना संध्याकाळी कुठेतरी जावं लागणार होतं, तर तू अभ्यास करून घे मी येतो, असं त्यांनी त्या शिष्याला सांगितलं. मी बाल्कनीत बसलेल्या त्या शिष्याचं गाणं ऐकत होते. मग मी त्याच्या जवळ जाऊन तो चुकीच्या पद्धतीने बंदीश गात असल्याचं सांगितलं. मी त्याला बंदीश गाऊन दाखवली. इतक्याच वडील तिथे आले आणि मी तिथून पळाले. तेव्हा मी चार-पाच वर्षांचीच होते आणि मीसुद्धा गाते हे वडिलांना माहीत नव्हतं."
 
तो शिष्य गेल्यानंतर वडील आईला म्हणाले, "आपल्याच घरात गायिका आहे आणि आपण बाहेरच्यांना शिकवत बसलोय. वडिलांनी दुसऱ्या दिवशी सकाळी सहा वाजता मला उठवलं आणि हातात तानपुरा दिला."
 
लता मंगेशकर नऊ वर्षांच्या होत्या तेव्हा त्यांनी त्यांच्या वडिलांसोबत मंचावरून गाणं म्हटलं होतं. त्या वेळी त्यांनी राग खंबामती गायला होता.
 
आपल्या मुलीने चित्रपटांमध्ये वगैरे गाणं म्हणावं, अशी दीनानाथांची इच्छा नव्हती. परंतु, 1942 मध्ये एका मित्राच्या विनंतीवरून पंडीत दीनानाथ मंगेशकर यांनी त्यांना यासाठी परवानगी दिली आणि मार्च 1942 मध्ये लता यांनी एका मराठी चित्रपटासाठी गाणं म्हटलं.
 
या गाण्याचं रेकॉर्डिंग झालं, पण चित्रपट पूर्ण झाला नाही, आणि महिन्याभराने दीनानाथांचा मृत्यू झाला.
 
त्यानंतर घर चालवायची जबाबदारी लता यांच्या खांद्यावर आली. त्यांना अभिनेत्री नंदा यांचे वडील व दिग्दर्शक मास्टर विनायक यांची मदत मिळाली.
मास्टर विनायक यांनी लता यांना चित्रपटांमध्ये अभिनयाची संधी दिली आणि उस्ताद अमान अली खान यांच्याकडे संगीत शिकता येईल अशीही तजवीज केली. त्यातून पुढे लता मंगेशकरांना मराठी चित्रपटांमध्ये गायचीही संधी मिळाली. मग त्यांच्या समोर इतर वाटा खुल्या झाल्या.
 
संगीताबद्दलची त्यांची जवळीक सर्वच लोकांच्या प्रशंसेला पात्र ठरली.
 
'लता- एक सूर गाथा' या पुस्तकात लेखक यतिंग्र मिश्र लिहितात, "हिंदी चित्रपटसृष्टीतील एक विख्यात संगीतकार अनिल विश्वास एके दिवशी सुरिंदर कौर यांचं गाणं रेकॉर्ड करत होते. अनिलदा अतिशय प्रेमाने म्हणाले, 'लतिके! इकडे ये, तू कोरसमध्ये गा. असं केल्यावर गाणं आणखी चांगलं होईल.' त्या वेळी 'दादा कोणत्या मनस्थितीमध्ये आनंदाने हे सांगत होते कोणास ठाऊक. ते खरोखरच स्वतःच्या मनातलं बोलतायंत असं मलाही वाटलं. त्या वेळी मुख्य पात्रांसाठी गाणी म्हणताना मला जितका आनंद होत असे तितकाच मला कोरसमध्ये 'गातानाही आला' असं लता म्हणतात." लता मंगेशकर यांनी मुख्य गायिका म्हणून काम केल्यानंतरच्या काळातील ही गोष्ट आहे.
 
एकदा पंडित जसराज लता मंगेशकरांबाबत म्हणाले होते, "आम्ही एका शिष्याला बोलावतो, त्याला शिकवायचा प्रयत्न करतो, आणि इकडे लताजी तर संपूर्ण जगाकडून अशा शिकत आल्या आहेत, याबद्दल मला कमाल वाटते. चार पिढ्यांची गुरू होणं, ही काही छोटी गोष्ट नाही."
 
चित्रपटांमधील त्यांच्या योगदानासंदर्भात बोलताना लता मंगेशकरांचेच शब्द आठवतात. 2013 साली भारतीय चित्रपटसृष्टीला 100 वर्षं पूर्ण झाली, तेव्हा लता मंगेशकर म्हणाल्या होत्या, "चित्रपट उद्योगाची शंभर वर्षं पूर्ण झाली असतील, तर त्यात माझीही 71 वर्षं आहेत.