गुरूवार, 23 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. लोकप्रिय
Written By
Last Modified: शनिवार, 6 मे 2023 (11:47 IST)

पाकिस्तानमधली हिंदू कुटुंबाची 'बॉम्बे बेकरी', इथल्या केकची रेसिपी आजही आहे सिक्रेट

bombay baker
रियाज़ सोहैल
 पाकिस्तानच्या सिंध प्रांतात असलेल्या हैदराबाद शहरात एक लाल रंगाची मोठी इमारत आहे. या इमारतीत सतत वर्दळ सुरू असते, लांबच लांब रांग लागलेली दिसते.
 
इमारतीचा लाकडी चौकटीचा दरवाजा उघडल्यावर रांग पुढंपुढं सरकू लागते. त्या इमारतीच्या आत आसलेल्या दुसऱ्या एका खोलीत पैसे देण्यासाठी रांग लागलीय. तर एका खोलीत टोकन देऊन केकची खरेदी केली जातीय.
 
इथे प्रत्येकाला केक मिळवण्याची घाई लागली आहे. केकचे डबे हातात पडताच लोकांच्या चेहऱ्यावर एखादा मोठा विजय मिळवल्याची भावना दिसून येते.
 
या लाल इमारतीवर 'बॉम्बे बेकरी' असं लिहिलंय. शिवाय त्याच्यावर 1911 हा स्थापना वर्ष देखील कोरलंय. या बेकरीची आणि या घराची गोष्ट जवळपास सव्वाशे वर्ष जुनी आहे.
 
बंगल्यातच सुरू झाली बॉम्बे बेकरी
सिंध प्रांतातील हैदराबाद मध्ये असणाऱ्या या बेकरीची स्थापना केली ती फलाज राय गंगाराम थडानी यांनी. 1911 साली बंगल्यात सुरू झालेल्या या बेकरीमध्ये राहण्याचीही व्यवस्था होती. फलाज राय त्यांच्या तीन मुलांसह, श्याम दास, किशनचंद आणि गोपी चंद यांच्यासोबत इथे राहायचे.
 
बॉम्बे बेकरीमध्ये शुद्ध सामग्री आणि चॉकलेटचा वापर करून ब्रेड, बिस्किटं आणि केक बनवले जायचे.
 
1948 मध्ये फलाज राय यांचं निधन झालं. त्यानंतर त्यांचा मुलगा किशन चंद यांनी केक आणि बिस्किटांची चव वाढवण्यासाठी त्यात थोडेफार बदल केले. पण 1960 मध्ये किशन चंद यांचा मृत्यू झाला. पुढे त्यांचा मुलगा कुमार आणि त्यांच्या भावाने या व्यवसाय सांभाळायला सुरुवात केली. जून 2010 मध्ये कुमार याांचं हैदराबादमध्ये निधन झालं.
 
'डॉन' या इंग्रजी वृत्तपत्राने कुमार थडानी यांच्या मृत्यूची बातमी दिली होती. त्यात लिहिलं होतं की, कुमार यांच्या आजोबांनी म्हणजेच बेकरीचे संस्थापक फलाज राय यांनी एका स्विस महिलेशी लग्न केलं होतं. ही महिला घरीच बेकरीचं सामान बनवायची. त्यांच्या लोकप्रियतेनंतर त्यांनी बेकरीचा व्यवसाय सुरू केला.
 
कुल्होराच्या शासकांनी हैदराबादला आपली राजधानी म्हणून घोषित केल्यानंतर थडानी कुटुंबाने खुदा आबाद दादू ही जुनी राजधानी सोडून हैद्राबाद या नव्या राजधानीच्या दिशेने कूच केली. हैदराबाद मधील गड्डू मल यांच्याशी त्यांचे जिव्हाळ्याचे संबंध होते. गड्डू यांच्या नावे एक बंदरही आहे.
 
केक बनवण्याची पाककृती
मागच्या सव्वाशे वर्षांपासून बॉम्बे बेकरीत केक तयार केले जातायत. आणि विशेष म्हणजे हे केक पारंपरिक पद्धतीने तयार होतात. यात कोणतंही मशीन न वापरता, हाताने तयार केलेले लुसलुशीत केक असतात. फक्त बदाम बारीक करण्यासाठी मशीन वापरलं जातं, पण इतर मिश्रण एकजीव करण्यासाठी हातांचाच वापर होतो.
 
कुमार थडानी अंतमुर्ख व्यक्ती होते आणि त्यांच्या संपूर्ण हयातीत त्यांनी फक्त एकदाच मुलाखत दिली होती.
 
रेडिओ पाकिस्तानच्या हैदराबाद शाखेतील माजी स्टेशन मॅनेजर नसीर मिर्झा यांनी त्यांची मुलाखत घेतली होती. यात कुमार यांनी चॉकलेट, कॉफी आणि मॅकरॉन केकच्या पाककृतीविषयी सांगितलं होतं. ही पाककृती त्यांच्या वडिलांची देण होती. पण त्यांच्या मृत्यूनंतर त्यांनी इंग्रजी पुस्तकांमध्ये छापून आलेल्या केक आणि बिस्किटांच्या पाककृतींचा आधार घेतला. आणि त्यांच्या या प्रयत्नांना ग्राहकांकडून चांगला प्रतिसादही मिळाला.
 
कुमार थडानी यांचे मित्र वकील एम. प्रकाश सांगतात की, आता त्यांची चौथी पिढी या व्यवसायात आहे. बॉम्बे बेकरीचा केक संपूर्ण पाकिस्तानात प्रसिद्ध असला तरी तो हैद्राबादची देण आहे.
 
सिंधचे प्रसिद्ध साहित्यिक आणि संशोधक मदद अली सिंधी सांगतात, "ही बेकरी सुरू झाली त्यावेळी मेवामिठाईचा नवा ट्रेंड सुरू होता. बॉम्बे बेकरीने नवनवीन फ्लेवर्स आणले आणि विविध प्रकारचे केक बनवले. त्यांच्याकडे ब्रेड आणि पेस्ट्रीही असायच्या."
 
ते सांगतात, या पदार्थांच्या पाककृती त्याकाळी सांगितल्या जात नव्हत्या. कारण घरातीलच एखाद्या वयस्क स्त्रीकडे याची पाककृती असायची.
 
इथे दिवसातून फक्त तीन वेळाच मिळतात केक
बेकरीच्या सुरुवातीच्या दिवसांमध्ये फक्त 20 केक बनवले जायचे. पण आता यात वाढ झाली असून हजार, दोन हजार केक सहज बनवले जातात. पण इथे केक खरेदी करण्याच्या देखील वेळा ठरलेल्या आहेत.
 
बेकरी सकाळी 8 वाजता उघडते, पण ग्राहकांनी त्याआधीच बेकरीच्या दारात रांग लावायला सुरुवात केलेली असते. पण एवढं करूनही प्रत्येकाच्या नशिबात केक असतोच असं नाही. सुरुवातीच्या काळात दुपारी 2 वाजता चॉकलेट आणि कॉफी केक मिळायचे. आणि संध्याकाळी 7 वाजता क्रीम आणि मॅक्रोन केक मिळायचे.
 
बेकरी व्यवस्थापनाच्या म्हणण्यानुसार, एकावेळी एकच फ्लेवर मिळतो आणि दुसऱ्या फ्लेवरसाठी पुन्हा यावं लागतं अशा ग्राहकांच्या तक्रारी आल्या होत्या. त्यानंतर यावर उपाय म्हणून चारही फ्लेवर एकाचवेळी तयार करून विकण्यात येऊ लागले.
 
आजकाल सकाळी 8, दुपारी 3 आणि संध्याकाळी 6 या तीन वेगवेगळ्या वेळेत हे केक उपलब्ध असतात. पण बेकरी मात्र 13 तास सुरू असते.
 
कुमार थडानी यांचा मुलगा सोनू उर्फ सलमान शेख देखील वडीलांप्रमाणेच मीडिया आणि प्रसिद्धीपासून दूर असतात. कुमार थडानी यांनी आपल्या मुलाला दत्तक घेतलं होतं, पुढे जाऊन सोनू मुस्लिम झाले.
 
बीबीसी उर्दूच्या विनंतीला मान देत सलमान शेख यांनी मुलाखत दिली पण औपचारिक मुलाखतीसाठी ते तयार झाले नाहीत.
 
हल्लीच झालेल्या जनगणनेनुसार, एकट्या हैदराबाद विभागाची लोकसंख्या 1.25 कोटी इतकी आहे. लोकसंख्या वाढल्यामुळे बॉम्बे बेकरीच्या केकचीही मागणी वाढली आहे.
 
कुमार थडानी यांचे मित्र एम. प्रकाश सांगतात, "कुमार नेहमीच म्हणायचे की, दर्जा आणि विश्वासात अंतर येऊ नये म्हणून माझ्या कुटुंबाने जे मला शिकवलं आहे तेच मी लोकांना तयार करून देतोय."
 
त्यांच्या म्हणण्यानुसार, "त्यांना पैशांचा लोभ कधीच नव्हता. कराची, लाहोर, इस्लामाबादमध्ये तुमच्या बेकरीची शाखा सुरू करा म्हणून लोक ऑफर घेऊन यायचे, पण कुमार यांनी त्यात कधीच रस दाखवला नाही. ते म्हणायचे मर्यादित असलो तरी चालेल पण दर्जाशी तडजोड होता कामा नये."
 
कुमार यांच्यानंतर त्यांच्या कुटुंबानेही त्यांचं हेच धोरण सुरू ठेवलं. त्यांनी केकच्या संख्येत वाढ केली मात्र तीही मर्यादित प्रमाणात. कारण केक मशीनने नाही तर हाताने तयार केले जात. कामगारांची संख्या वाढवायची झाली तर त्याला ही जागा लागेल, त्यामुळे थोडंच काम करून देखील ते खूश आहेत.
 
बेकरीत येणारे जुने ग्राहक
आजही काही असे लोक आहेत जे त्यांच्या लहानपणी या बेकरीत यायचे. आज हे लोक वृध्द झालेत, मात्र बेकरीत येणं त्यांनी चुकवलेलं नाही. त्यांना दुसऱ्या कोणत्या बेकरीत जायचंच नाही.
 
हैदराबादच्या सिव्हिल हॉस्पिटलचे माजी वैद्यकीय अधीक्षक डॉ. हदीबख्श जतोई बेकरीबाहेर भेटले. त्यांच्या हातात दोन केकचे डब्बे होते.
 
मागच्या 60-65 वर्षांपासून ते या बेकरीतून केक घेऊन जात आहेत.
 
ते सांगतात की, त्यांनी त्यांच्या लहानपणी याच बेकरीतील पहिला केक खाल्ला होता. आणि आजही ते इथलेच केक खातात. इतकी वर्ष सरली मात्र चवीत काहीच बदल झाला नसल्याचं ते सांगतात.
 
डॉ. हदीबख्श जतोई यांच्यासोबत आलेले आझम लेघारी यांनी सत्तरी गाठलीय. ते सांगतात, मी लहानपणापासून इथले केक खातोय.
 
ते सांगतात, "माझी सून ऑस्ट्रेलियातील सिडनीत राहते. ती इथे आली होती तेव्हा तिने या बेकरीतील बिस्कीटं खाल्ली होती, तिला ती इतकी आवडली की तिने जाताना सोबत पाच किलो बिस्कीटं नेली. शिवाय तिकडे जाऊन पुन्हा बिस्कीट मागवली."
 
"वाढदिवस असो वा सणसमारंभ.. केक बॉम्बे बेकरीतूनच नेले जातात."
 
केक घेण्यासाठी रांगेत उभे असलेले अम्मार बिन मलिक कराचीहून आले होते. ते सांगतात, मी लहान असताना इथलाच केक हवाय म्हणून हट्ट करायचो, आज माझी मुलंही इथलाच केक हवाय म्हणून हट्ट करतात.
 
"ईद असो, शब-ए-बारात असो, वाढदिवस असो किंवा इतर कोणताही सण असो... केक बॉम्बे बेकरीतूनच न्यावे लागतात."
 
ते सांगतात की, मुलं हट्ट करतात म्हणूनच नाही तर या बेकरीतील केकची चव न्यारीच आहे. कराची मध्ये इतरही बेकरी आहेत, पण जास्तीचे पैसे मोजूनही चव म्हणावी तशी मिळत नाही.
 
बिलाल अकबर यांच्या हातात केकचे दोन डब्बे होते. त्यांनी सांगितलं की, त्यांनी बॉम्बे बेकरीबद्दल बरंच ऐकलं होतं. ते कराचीहून फैसलाबादला प्रवास करत होते, मग वाट वाकडी करून इथले केक न्यायला आले.
 
मोहम्मद इम्रान जवळपास अर्धा तास रांगेत उभे होते, शेवटी ते केक काउंटरवर पोहोचले. ते सांगतात, जेव्हापासून मला कळू लागलंय तेव्हापासून मी इथलेच केक खातोय. दुसऱ्या कोणत्या बेकरीत जाऊच वाटत नाही.
 
बॉम्बे बेकरीमध्ये चॉकलेट व्यतिरिक्त कॉफी, लेमन केक, मॅकरॉन्स, फ्रूट केक आणि बिस्किट तयार केली जातात. त्या केकवर कोणतंही डिझाईन बनवलेलं नसतं. ग्राहकांनी मागणी केली तरी त्यावर डिझाईन बनवून देत नाहीत. केकचे डब्बे देखील साधे आहेत. या सफेद रंगाच्या डब्ब्यांवर लाल आणि हिरव्या रंगात 'शॉप इन बंगलो' असं लिहिलेलं आहे.
 
केकचा डब्बा उघडल्या उघडल्या त्यातून केकमध्ये असलेल्या लोण्याचा खमंग वास दरवळतो.
 
बॉम्बे बेकरीच्या मालकांचं औदार्य
भारताच्या फाळणीपूर्वी बहुतेक हिंदू लोक हैदराबादमधील सिंध प्रांतात व्यवसाय करायचे. फाळणीनंतर अनेक कुटुंबं भारतात स्थलांतरित झाली. पण बॉम्बे बेकरी आजही तिथे तग धरून आहे.
 
पाकिस्तानच्या निर्मितीनंतर अवघ्या एका वर्षात बेकरीचे संस्थापक फलाज राय यांचं निधन झालं.
 
फलाज राय यांचे नातू आणि बॉम्बे बेकरीचे मालक कुमार थडानी यांनी ब्रॉडकास्टर नसीर मिर्झा यांना दिलेल्या मुलाखतीत सांगितलं होतं की, सिंधमध्ये ज्या प्रमाणात रक्तपात आणि दंगली घडत होत्या, त्याप्रमाणात हैद्राबादमध्ये फार काही दंगली घडल्या नव्हत्या. या भागात एकही खून पडला नव्हता, त्यामुळे आम्ही आमचं घरदार सोडलं नाही.
 
कुमार थडानी यांनी हिंदू धर्मातील धार्मिक पुस्तकांसोबत गुरु ग्रंथ, कुराण यांचा अभ्यास केलाय. ते स्वतःला गुरू नानक आणि सिंधचे सूफी कवी शाह अब्दुल लतीफ भट्टाई यांचे शिष्य म्हणवून घ्यायचे.
 
पाकिस्तानातील बॉम्बे बेकरीची ओळख इथल्या केकमुळे आहे. पण हैदराबादच्या लोकांसाठी बॉम्बे बेकरीची ओळख तिच्या मालकाच्या औदार्यामुळे आहे.
 
कुमार थडानी यांच्या बेकरीत केक विकत घेणाऱ्यांशिवाय गरजूंचीही रांग लागायची. त्यांनी लोकांना वैयक्तिक मदत केलीच, पण रुग्णालयांपासून स्मशानभूमीपर्यंतही त्यांचं दातृत्व पसरलं होतं. रेडिओ पाकिस्तानमधील संगीत वाचवण्यासाठी त्यांनी मदत देऊ केली होती.
 
आपल्या मुलाखतीत ते म्हणाले होते की, जेव्हा आम्हाला कोणती अडचण येते तेव्हा आम्हाला समजतं की, आमच्या दातृत्वात घट होत चाललीय. आम्ही जास्तीच दान दिलं तर आमच्या अडचणी देखील कमी होतात.
 
बॉम्बे बेकरीला राष्ट्रीय वारसा म्हणून घोषित करण्याची शिफारस
पूर्वी बॉम्बे बेकरीची इमारत सफेद रंगाची आणि उंचीला कमी होती. आज ही इमारत उंच असून तिला लाल रंग दिलाय. 1980 च्या दशकात हैदराबादमध्ये झालेल्या भाषिक गोंधळानंतर इमारतीची उंची वाढविण्यात आली.
 
या इमारतीत प्रवेश करण्यासाठी एकच दरवाजा होता. दरवाजे वाढवण्यासाठी दोन खिडक्यांचं दरवाजात रूपांतर झालं. केक ठेवण्यासाठी सागवानी लाकडाचे शोकेस आहेत. याचे दरवाजेही जुने आहेत, त्यातील काही बदलण्यात आलेत.
 
पूर्वी ग्राहकांची एकच रांग असायची, पण आता चार रांगा असतात ज्यात महिला ग्राहकांना प्राधान्य दिलं जातं.
 
काऊंटर असलेल्या खोलीच्या बाजूला केक भाजायची भट्टी असून बाजूलाच एका संगमरवरी टेबलावर सुमारे डझनभर लोक मोठ्या चाकूने केकवर लोणी लावताना दिसतात.
 
या इमारतीत भट्टीसोबतच दिवाणखाना आहे. बेकरीपासून निवासस्थानापर्यंत एकच व्हरांडा आहे. 1.25 एकर परिसरात एक मोठं लॉन आणि शेजघराच्या समोर एक छोटी बाग आहे.
 
सिंध सरकारच्या पुरातत्व विभागाने बॉम्बे बेकरीला राष्ट्रीय वारसा म्हणून घोषित करण्याची शिफारस केली आहे. राज्याचे सांस्कृतिक आणि दुर्मिळ वारसा मंत्री सरदार अली शाह म्हणतात की, बेकरीने पूर्ण केलेली 100 वर्ष, तिची इमारत, परंपरा आणि दर्जा यामुळे हा निर्णय घेण्यात आलाय.
Published By -Smita Joshi