1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. लोकप्रिय
Written By
Last Modified: शनिवार, 17 डिसेंबर 2022 (08:30 IST)

तुमच्याकडे कालनिर्णय कॅलेंडर आहे? मग, हा खुलासा एकदा वाचाच

मुंबई – राज्यात गेल्या काही दिवसांपासून महापुरुषांच्या अवमानावरून वादंग सुरू असल्याने विरोधक चांगलेच आक्रमक झाले आहेत. राज्य सरकारमधील मंडळीच हा अवमान करत असल्याने त्याविरोधात विरोधकांनी उद्या (दि. १७) महामोर्चाचं आयोजनदेखील केलं आहे. असं असतानाच आता कालनिर्णयच्या दिनदर्शिकेत छत्रपती संभाजी महाराजांच्या राज्याभिषेक दिनाचा उल्लेख राहून गेल्याचे समोर आले आहे. मात्र, ही चूक लक्षात येताच कालनिर्णयने तात्काळ खुलासा करत दिलगिरी व्यक्त केली आहे.
 
कालनिर्णय २०२३च्या आवृत्तीमध्ये १६ जानेवारी रोजी असणाऱ्या धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज राज्याभिषेक दिनाचा उल्लेख करण्याचे राहून गेले आहे. या पुढील कालनिर्णयच्या उर्वरित सर्व प्रतींमध्ये तसेच या पुढील सर्व आवृत्त्यांमध्ये हा उल्लेख केला जाईल, असे कालनिर्णयने त्यांच्या ट्विटर हँडलवरून खुलासा करताना म्हणले आहे. धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांच्याविषयी आम्हाला अतीव आदर आहे. छत्रपती संभाजी महाराजप्रेमींच्या भावना अनवधानाने दुखावल्या गेल्या असल्यास आम्ही मनापासून दिलगीर आहोत, असा खुलासा कालनिर्णयने केला आहे. तसेच कालनिर्णयने ही चूक पुन्हा न करण्याची हमीही दिली आहे. कालनिर्णयच्या या खुलाश्याला अनेकांनी लाईक्स केलं आहे. तसेच अनेक कमेंट्सही केल्या आहेत. अनेकांनी काही सूचनाही केल्या आहेत.
 
अॅपमध्ये बदल करण्याचा सल्ला
छपाई झालेल्या कॅलेंडरमध्ये सुधारणा करता येणार नसली तरी प्ले स्टोअर अॅपमध्ये तुमचं कॅलेंडर आहे; कमीत कमी त्यात तुम्ही बदल करू शकता, असा सल्ला काहींनी दिला आहे. तर काहींनी कालनिर्णय घेणं बंद करत असल्याचं सांगत मोबाईलमधून अॅप डिलीट करत असल्याचं म्हटलं आहे. तर काहींना ही जाणीवपूर्वक केलेली चूकदेखील वाटते आहे.

Edited By- Ratnadeep Ranshoor