बुधवार, 28 फेब्रुवारी 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. लोकप्रिय
Written By
Last Modified: सोमवार, 12 डिसेंबर 2022 (16:00 IST)

नवरदेवानं नवरीला गाढव दिलं भेट, सोशल मीडियावर तुफान चर्चा

“मला माहित होतं की, वारिशाला गाढवाचे शिंगरू आवडतात. त्यामुळे तिला मी गाढव भेट दिला.”असं म्हणणं आहे अजलान शाह यांचं. अजलानचं नाव सध्या पाकिस्तानमधील सोशल मीडिया वर्तुळात बरीच चर्चा सुरू आहे.
अजलान शाहने इन्स्टाग्रामवर एक पोस्ट शेअर करत म्हटलंय की, 'मी माझ्या पत्नीला लग्नात गाढवाचं शिंगरू गिफ्ट केलंय.'गाढवाच्या शिंगरूचं गिफ्ट देतानाचा लग्नातील व्हीडिओही अजलाननं शेअर केलाय.
 
गिफ्ट देताना अजलान असं म्हणताना दिसतो की, “प्रश्न असा आहे की, गिफ्ट म्हणून गाढवच का? तर त्याचं उत्तर असं आहे की, एकतर ते तुम्हाला आवडतं आणि दुसरं म्हणजे हा प्राणी सर्वांत मेहनती व प्रेमळ आहे.”
यावेळी नववधू वारिशा म्हणते की, “मी तुला केवळ गाढव राहू देणार नाही.”
 
अजलान म्हणतो की, “मला प्राणी आवडतात. लोक काहीही म्हणो, गाढव माझं स्पिरिट अॅनिमल आहे. माझं गाढवावर प्रेम आहे. त्यामुळे गाढवच माझ्याकडून वारिशासाठी गिफ्ट.”
 
त्यानंतर हसून म्हणतो की, “प्लीज याची टर उडवू नका.”
 
अजलान शाह हेही सांगायला विसरले नाहीत की, “या शिंगरूला त्याच्या आईपासून वेगळं केलं नाहीय. त्याची आई सुद्धा त्याच्या सोबतच असेल.”
 
बीबीसीशी बोलताना अजलान शाह म्हणाला की, “माझं लग्न वारिशाशी होऊ शकलं, कारण तिलाही प्राणी आवडतात. अन्यथा, मी कधी सापांसोबत असतो किंवा कधी पालींसोबत असतो. त्यामुळे माझ्यासोबत कुणी मुलगी राहू पाहत नाही. वारिशानं मात्र मला एकदा सांगितलं होतं की, तिला गाढवं आवडतात. मला ही गोष्ट लक्षात होती. विशेष म्हणजे माझ्या आईलाही गाढवांचे शिंगरू आवडतात.”
अजलान शाहचं म्हणणं आहे की, धोबी घाटावरून गाढवीण आणि शिंगरू 30 हजार रुपयांना खरेदी केला.
 
तो पुढे सांगतो की, “आता या शिंगराला मजुरी करावी लागणार नाही. शेतात मजा करेल, खाईल आणि आमच्यासोबत खेळेल.”
 
अजलान शाह म्हणतो, “काही लोक कौतुक करत आहेत की, गाढवाचं शिंगरू गिफ्ट दिला, तर काही लोक म्हणतात की, यात नवीन काय आहे, गाढवही प्राणीच तर आहे.”
 
“माझ्या अंदाजानुसार, लोक निशाणा बनवतील, बॅशिंग करतील, मीम बनवतील. मात्र, मला माझ्या पत्नीला सरप्राईज द्यायचं होतं. ती विचारही करू शकत नव्हती की, लग्नाच्या दिवशी मी गाढव घेऊन तिथे असेन.
 
“मित्र-परिवाराला अंदाज होताच की, काहीतरी वेगळं करेन. आम्ही मेहंदीचा दिवस सफारी पार्कमध्ये हत्तींसोबत दिवस घालवला होता,” असं अजलान शाह म्हणतो.
 
अजलान शाहनं गिफ्ट देताना वारिशाला म्हटलं की, “प्लीज, हे मी मनापासून देत आहे. हा माझा आवडता प्राणी आहे. याची मस्करी करू नये.”
 
तो पुढे सांगतो की, “मी माझा फोन सायलेंट केला आहे आणि कुठल्याच कमेंट मी वाचत नाहीय. मी माझे आयुष्य एन्जॉय करतोय.”
 
सोशल मीडियावर कौतुकही आणि टर उडवणंही सुरू
अजलान शाहने सोशल मीडियावर पोस्ट केलेल्या व्हीडिओतून विनंती केली होती, या प्रेमाच्या गिफ्टची कुणीही टर उडवू नये.
 
काही लोक या गिफ्टचं कौतुक करत आहेत, तर काहीजण टर उडवत आहेत.
 
एका युजरनं लिहिलंय की, “पत्नीला तसंही पती गाढवच वाटतो, आणखी त्यामुळे प्रत्यक्ष गाढवाची काय आवश्यकता होती. दोन महिने वाट पाहायची ना.”
तर मुआज सिद्दिकी नामक युजरनं लिहिलंय की, “बस कर रे भाई, असं काही करू नकोस की आम्हाला ते पूर्ण करणं मुश्किल होऊन बसेल.”
 
एका युजरनं म्हटलंय, जर गाढवच गिफ्ट द्यायचा होता, तर त्याचं निमित्त तरी वेगळं शोधायचं.
 
अशा मिश्र स्वरूपात प्रतिक्रिया पाहायला मिळतायेत.

Published By- Priya Dixit