शनिवार, 28 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. लोकप्रिय
Written By
Last Modified: शुक्रवार, 25 ऑक्टोबर 2019 (14:38 IST)

जनता विरोधी पक्षात...

महाराष्ट्र विधानसभेचे निकाल समोर आले आहेत. पुन्हा एकदा देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री होतील असे वातावरण निर्माण झाले आहे. सत्तेचं समीकरण कसं असेल हे पुढे कळलंच. पण राज ठाकरेंच्या भाषेत सांगायचं तर समोर आलेला निकाल अनाकलीय आहे. जवळ जवळ सगळ्यांचेच अंदाज चुकलेले आहेत. यावेळी वेगळया कामात व्यग्र असल्यामुळे महाराष्ट्र विधानसभा निवडणुकी संबंधित लेख लिहिता आले नाही. 
 
पण मी प्रामाणिकपणे मान्य करतो की मलाही असं वाटलेलं की यंदाचा युतीचा विजय भव्य असेल. तसं झालं नाही... 
 
सध्या सोशल मीडियावर विनोद व्हायरल होतोय की राहून गांधी ह्यांच्या पुरेशा सभा झाल्या नाहीत म्हणून काँग्रेसला चांगली मते मिळाली. राहुल हे भाजपचे स्टार प्रचारक आहेत. वगैरे वगैरे... शरद पवार पावसात भिजल्याचे सार्थक झाल्याचेही म्हटले जात आहे. पवार साहेबांची गरजेपेक्षा जास्त स्तुती होत आहे. या वयात पवारांनी जी लढत दिली यातून खरंच शिकण्यासारखं आहे. पवार ही इन्स्टिट्यूट आहे यात वाद नाही. पण पवारांना त्यांच्या संबंध आयुष्यात कधी एकहाती सत्ता स्थापन करता आली नाही. त्यामानाने फडणवीस खूप पुढे गेलेले आहेत. मला निवडणुकीचे निकाल पाहून हा पवार पॅटर्न मुळीच वाटत नाही. एकट्या पवारांना (एक पक्ष म्हणून सुद्धा)  संबंध महाराष्ट्राने कधीच स्वीकारलं नव्हतं ही वस्तुस्थिती आहे. 
 
मुळात हा युतीचा विजय झालाय हे सत्य सर्वांनी स्वीकारलं पाहिजे.  भाजप जितक्या सीट्स लढली, त्यामानाने त्यांना मिळालेले यश देखील मोठे आहे. शिवसेनेला मात्र आपला करिष्मा दाखवता आलेला नाही. तरी त्यांना सत्तेतला मोठा वाटा मिळण्याची शक्यता आहे कारण भाजपची गोत्यात सापडलाय.
 
हा जो अनपेक्षित निकाल समोर आलाय तो फडणवीस आणि उध्दवजींच्या चुकलेल्या रणनीतीचा परिणाम आहे. नरेंद्र मोदींनी दिलेली काँग्रेस मुक्त भारत याचा अर्थ महाराष्ट्र भाजपने काँग्रेसयुक्त भाजप असा घेतला आहे आणि आमचं ठरलंय म्हणत भाजपने राष्ट्रवादी फोडायला सुरुवात केली व ज्यावेळी भाजपमध्ये जागा कमी पडल्या तेव्हा या आयारामांना शिवसेनेत पाठवण्यात आलं. या बळावर दोघे बहुसंख्येने निवडून येतील अशी ही रणनीती होती. पण आयाराम तर पडलेच, बंडखोर जिंकून आले आणि जनतेने "नोटा"ला मोठ्या प्रमाणात साथ दिली. याचा अर्थ काय? मी ज्या विभागात राहतो तिथेही साडे तीन हजारच्या आसपास लोकांनी नोटा दाबला. का? तर काँग्रेसचा आमदार नको, मग कोणाला वोट करायचं तर भाजपला, पण भाजपचा "तो" उमेदवार लोकांना नको. म्हणून लोक निटाकडे वळले. हे गणित भाजपने व्यवस्थित समजून घेतलं पाहिजे. 
 
महाराष्ट्र हा काँग्रेसचा बालेकिल्ला होता. पाहिल्यादा सलग कांग्रेस 2 टर्म सत्तेपासून दूर राहणार आहे हे आपण सर्वांनी लक्षात घेतलं पाहिजे. महाराष्ट्रातल्या जनतेने युतीच्या बाजूने कौल दिलेला आहे. पण तो कौल देताना त्यांनी बजावले सुद्धा आहे की जनतेला गृहीत धरू नका. उदयनराजे भोसले ह्यांचा पराभव सुद्धा बोलका आहे. आता छत्रपतींची गादी आणि गादीशी बेईमानी असली भाषा होतेय पण यावेळी राष्ट्रवादीत असताना उदयनराजेंना कडवी झुंज द्यावी लागली होती. त्यांना सहज विजय मिळालेला नव्हता. पोटनिवडणुकीत जनतेने राहिलेली कसर भरून काढली. 
 
याचं आत्मपरीक्षण आता युतीने करायचे आहे. जरी विजय मिळालेला असला तरी यावेळचं गणित चुकलेलं आहे. बहुसंख्य जनतेला काँग्रेस आणि राष्ट्रवादी नकोय, त्यांना नवीन पर्याय हवा आहे. म्हणून जनता भाजपकडे आशेने पाहतेय. पण जर भाजप जनतेला नको आलेल्या काँग्रेस राष्ट्रवादीच्या नेत्याना उमेदवारी देणार असेल तर जनतेने काय करावं? एकतर ते नोटा दाबतील, नाहीतर भाजपच्या विराधात वोट करतील. हेच या निवडणुकीत जनतेने दाखवले आहे. म्हणून मला म्हणावसं वाटतं की महाराष्ट्रातली जनता सुज्ञ आहे. त्यांनी सत्ताधाऱ्यांना दाखवून दिलंय की आमचं तुमच्यावर, तुमच्या कामावर लक्ष आहे. त्यामुळे हा पवार पॅटर्न नाही, हा जनता पॅटर्न आहे. आता विरोधी पक्षाच्या बाकावर काँग्रेस किंवा राष्ट्रवादी नसून साक्षात जनता आहे हे सरकारने लक्षात ठेवलं पाहिजे.
 
लेखक: जयेश शत्रुघ्न मेस्त्री