शनिवार, 28 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. लोकप्रिय
Written By
Last Modified: सोमवार, 21 ऑक्टोबर 2019 (14:04 IST)

हिच ती वेळ, हाच तो क्षण; सावरकर चर्चेचा विषय व्हावा...

कॉंग्रेसचे भूतपूर्व अध्यक्ष श्री. राहुल गांधी ह्यांनी लोकसभा निवडणूकीच्या दरम्यान कोणताही संदर्भ न देता सावरकरांवर टिका केली होती. गांधी आमचे आणि सावरकर तुमचे असंही ते म्हणाले होते. याचा अर्थ त्यांना असं वाटतं की ते गांधींच्या मार्गावरुन चालत आहेत आणि भाजपा हा सावरकरांच्या मार्गावरुन चालत आहेत. राहुल गांधी ह्यांना जर कुणी प्रश्न विचारला की गांधींचा मार्ग कोणता आणि सावरकरांचा मार्ग कोणता तर त्यांना उत्तर देता येणार नाही. कारण त्यांचा सावरकरांबद्दल तर अभ्यास नाहीच आहे. पण ज्या मार्गावरुन चालण्याची ते ग्वाही देतात त्या गांधींचाही अभ्यास राहुल ह्यांनी केलेला नाही. मुळात अभ्यास हा राहुल ह्यांचा पिंड नाही. विषय असा आहे की महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणूकीच्या जाहिरनाम्यात भाजपाने सावरकरांना भारतरत्न देण्यासाठी प्रयत्न करण्यार असल्याचे म्हटले आहे. महाराष्ट्रात युतीचे सरकार येणार यात कुणा सुज्ञ राजकीय विश्लेषकाचे मतभेद होणार नाहीत. मुळात ही निवडणूक राज्यात विरोधी पक्ष म्हणून कोणाचा दबदबा असेल यावर बेतलेली आहे. असो. तर मुद्दा असा की राज्यात भाजपाचे पुन्हा सरकार येईल आणि सरकारकडून सावरकरांना भारतरत्न मिळण्यासाठी सकारात्मक प्रयत्नही केले जातील. केंद्रातही भाजपाचे सरकार असल्यामुळे सावरकरांना भारतरत्न मिळण्याचा मार्ग मोकळा आहे... पण त्यांना भारतरत्न मिळण्यावरुन वाद निर्माण झाला आहे. कन्हैया कुमारने सावरकरांना भारतरत्न दिल्यावर भगतसिंहाचा अपमान होईल असे चमत्कारिक विधान केले आहे. आपल्याकडे प्रॉब्लेम असा आहे की असे विधान केल्यावर त्याचा संदर्भ विचारण्याची प्रथा भारतीय मीडियामध्ये नाही. माजी पंतप्रधान मनमोहन सिंह सुद्धा म्हणाले की कॉंग्रेसचा सावरकरांना विरोध नसून सावरकरांच्या हिंदुत्वाला विरोध आहे. याचा नेमका अर्थ काय, असं कुणाही पत्रकाराला विचारावसं वाटलं नाही, ही भारतीय पत्रकारितेची दशा आहे. मनमोहन सिम्ह ह्यांनी हिंदुत्व हा ग्रंथ वाचला आहे असं गृहित धरुनही प्रश्न विचारता आला असता. सावरकराचं हुंदुत्व काय होतं आणि त्याला का विरोध आहे असं विचारलं असतं तर कदाचित सिंह ह्यांना नेमकं काय म्हणायचंय ते कळलं असतं. असो.
 
सोशल मीडियावर एकदा नजर फिरवली तर आपल्या लक्षात येईल की आता परिस्थिती बदललेली आहे. भारतात हिंदू वोटबॅंक नावाचा प्रकार नव्हता. पण आता तो होताना दिसत आहे. म्हणूनच लोकसभेच्या पराभवानंतर कॉंग्रेसने अधिकृतपणे सावरकरांना भारतरत्न द्यायला विरोध केलेला नाही.
 
निवडणूकीच्या वेळेस हिंदु वोट बॅंक लक्षात घेऊन राहुल गांधी अक्षरशः जनेऊधारी ब्राह्मण होऊन देवळात घंटा वजवत फिरत होते. पण त्यांनी सावरकरांवर टिका सुरु ठेवली होती. कारण त्यांना माहित नव्हतं की केवळ देवळात जाण्याने हिंदु वोट बॅंक तयार होत नाही. तुम्ही सावरकरांवर कोणताही संदर्भ न देता, केवळ राजकारणासाठी वा द्वेषासाठी टिका केली तर हिंदू ते सहन करणार नाहीत आणि मतपेटीतून त्याला उत्तर देतील हे आता कॉंग्रेसला कळून चुकले आहे. पण कव्हैयासारखे कम्युनिस्ट मात्र अजूनही तिच री ओढतायत. त्याचं कारण त्याच्याकडेही दुसरे मुद्दे नाहीत. सावरकर हे अतिरेकीवृत्तीचे होते हे दर्शवून त्यांना एका बाजूला काढायचं आणि गांधी, आंबेडकर आदि लोकोत्तर नेत्यांना एका बाजूला काढायचं हा प्रकार कॉंग्रेसने गेली ७० वर्षे केलेलाच आहे. तो प्रकार आता कन्हैया आदि तरुण डावे करत आहेत. पण हा प्रकार कालबाह्य झाला आहे हे कन्हैयाच्या व त्याला बोलते करणार्‍यांच्या अजून लक्षात आलेलं नाही. तसं असतं तर जितेम्द्र आव्हाडांच्या प्रचार सभेत वा रॅलीत "हमे चाहिये आझादी, गांधीवाली आझादी, आंबेडकरवाली आझादी" असले गाणे तो गात बसला नसता. गांधीवाली आझादी आणि आंबेडकवाली आझादी, दोन्ही वेगवेगळ्या होत्या. मुळात गांधी आणि आंबेडकर हे राजकीय विरोधक. आपण त्या मुद्द्याकडे नको वळूया. या लेखापुरते म्हणायचे तर सावरकरांना एका बाजूला सारुन इतर नेत्यांना दुसर्‍या बाजूला काढून सावरकरांना मानणारा वर्ग हा अतिरेकी आहे असा भासवण्याचा प्रयत्न आजही सुरु आहे. मुळात खोटं व संदर्भहीन बोलणार्‍यांना आवाज मोठा आहे आणि सावरकरांच्या बाजूने असणार्‍यांचा आवाज अजूनही खूप लहान आहे, हा महत्वाचा फरक आपण लक्षात घेतला पाहिजे.
 
आता वेळ येऊन ठेपली आहे, जे डावे नाहीत त्यांनी पुढे येऊन चर्चा करण्याची व आपले मुद्दे समर्थपणे मांडण्याची. सावरकर हा चर्चेचा विषय होतोय हा आजच्या घडीला शुभशकुन आहे, कारण आता जग बदललं असल्यामुळे आणि डाव्यांना व कॉंग्रेसी संस्कृतीला लोक वैतागले असल्यामुळे सावरकरांची चर्चा होणे अतिशय महत्वाचे आहे. म्हणून कन्हैया कुमारने केलेलं विधान, राहुल गांधींनी खालच्या दर्जाची केलेली टिका आणि इतर सावरकर विरोधकांकडून होणारा, त्यांना भारतरत्न देण्यासंबंधीचा विरोध म्हणजेच भारताच्या नाट्यमय प्रवासातील एका नव्या अंकाची नांदी आहे. म्हणून मला असं प्रामाणिकपणे वाटतं की सावरकरांची चर्चा आता सातत्याने झाली पाहिजे. सावरकर अभ्यासकांनी यावर सतत लेख, व्याख्याने वा व्हिडिओ करुन प्रचार प्रसार करायला पाहिजे. केवळ मराठी नव्हे तर हिंदी, इंग्रजीत सुद्धा प्रचार प्रसार व्हायला पाहिजे. इतकंच नाही तर डिबेट सारखे कार्यक्रम आयोजित करुन यावर सतत बोललं राहिलं पाहिजे. सावरकर हे एक असे क्रांतिकारक आणि समाजसुधारक आहेत ज्यांच्यावर सतत खोटी टिका होते आणि कारण नसताना त्यांना बाजूला सारलं गेलं. आता मात्र लोकांना मूर्ख बनवणं इतकं सोपं राहिलं नाही. सोशल मीडियाच्या या युगात लोक बुद्धिवादी आणि तर्कसुसंगत झाले आहेत. म्हणून बुद्धिवादी आणि तर्कसुसंगत असलेले सावरकर लोकांपुढे मांडणे हे हिताचे सुद्धा आहे... त्यामुळे हिच ती वेळ, हाच तो क्षण; आता सावरकरांची चर्चा झाली पाहिजे. लोकांना सत्य कळलं पाहिजे. हा सूर्य आणि हा जयद्रथ हे लोकांना कळलंच पाहिजे. त्यामुळे सारवकरांची चर्चा झालीच पाहिजे.
 
लेखक: जयेश शत्रुघ्न मेस्त्री