देवदूत! सरकारी रुग्णालयांना ऑक्सिजन पुरवण्यासाठी त्याने खर्च केले ८५ लाख रुपये
महाराष्ट्रातील नागपूरमधील एका अब्जाधीशाने करोना कालावधीमध्ये शहराबरोबरच आजूबाजूच्या परिसरातील सरकारी रुग्णालयांना ऑक्सिजन पुरवठा करण्यासाठी तब्बल ८५ लाख रुपये खर्च केल्याची माहिती समोर आली आहे. प्यारे खान यांनी नागपूर आणि आजूबाजूच्या परिसरातील सरकारी रुग्णालयांना ४०० मेट्रीक टन ऑक्सिजनचा पुरवठा केलाय. देशभरामध्ये करोनाच्या दुसऱ्या लाटेत ऑक्सिजनची कमतरता जाणवत असल्याने प्यारे खान हे अनेक रुग्णांसाठी देवाप्रमाणे धावून आल्याचं चित्र पहायला मिळालं. प्यारे खान यांचा माल वाहतूक करण्याचा व्यवसाय असून त्यांनी पुरवलेल्या ऑक्सिजनमुळे अनेकांचे प्राण वाचले आहेत. त्यांनी आतापर्यंत एकूण ३२ टन ऑक्सिजन पुरवला आहे.
ऑक्सिजन वाहून आणण्यासाठी खान यांना सरकारी यंत्रणांनी पैसे देऊन केले. मात्र संकटाच्या काळामध्ये अशापद्धतीने मदत करणे हे माझं कर्तव्य असून रमझानच्या पवित्र महिन्यात मी केलेले हे काम म्हणजे जकातचं पवित्र काम असल्याचं खान म्हणालेत. रमजानच्या महिन्यामध्ये सामान्यपणे चांगल्या कामासाठी जो निधी गोळा किंवा दान केला जातो त्याला मुस्लीम धर्मीय लोकं जकात असं म्हणतात. संकटाच्या काळात माणुसकीच्या दृष्टीकोनातून मी मदत केलीय असंही खान सांगतात. एकेकाळी, प्यारे खान यांनी संत्रा विक्री करत पोटापाण्यासाठी धडपड केली होती. १९९५ साली ते नागपूर स्थानकाबाहेर संत्राविक्रेता होते. वडिलांचे किराणामालाचे दुकान होते मात्र प्यारे यांना काहीतरी वेगळं करण्याची इच्छा असल्याने ते तरुणपणापासून वेगवेगळ्या व्यवसायांमध्ये धडपड करत होते. आज त्यांच्या कंपनीची किंमत ४०० कोटी इतकी आहे. प्यारे खान यांनी सुरु केलेल्या ऑक्सिजन पुरवठ्याच्या मोहिमेमध्ये ११६ ऑक्सिजन कॉन्सट्रेटर्सचाही समावेश आहे. आताची परिस्थिती सामान्य झाल्यानंतर हे कॉन्सट्रेटर्स आयआयएम्स, सरकारी रुग्णालय आणि इंदिरा गांधी सरकारी कॉलेज आणि रुग्णालयाला दान करणार आहेत. प्यारे यांनी दोन क्रायोजेनिक ऑक्सिजन टँकर्स बंगळुरुवरुन मागवले. यासाठी त्यांनी बाजारभावापेक्षा दुप्पट किंमतही मोजली. दोन टँकर्स नागपूरमधील रुग्णांना मागवण्यासाठी प्यारे यांनी १४ लाखा रुपये अधिक मोजले.