मंगळवार, 12 ऑगस्ट 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. लोकप्रिय
Written By
Last Modified: गुरूवार, 22 एप्रिल 2021 (18:28 IST)

कोरोना रुग्णांच्या सेवेसाठी ती स्कुटीवर 180 किमी प्रवास करत मध्यप्रदेशातून महाराष्ट्र पोहचली

Young doctor travelled 180 km on scooty
जिकडे तिकडे कोरोनाची भीती पसरलेली, सर्व राज्यांमध्ये स्थिती गंभीर, शहरांमध्ये लॉकडाऊन किंवा कर्फ्यू अशा भीतिदायक परिस्थितीत कोरोना रुग्णांची सेवा करायची याची जिद्द मनात बाळगून ती स्कुटीवर निघाली आणि 180 किमीचा प्रवास गाठत आपल्या कर्त्वयावर परतली. तिच्या हिमतीला दाद आहे कारण मध्य प्रदेशाच्या बालाघाटपासून ते नागपूरपर्यंतचा प्रवास सोपा नव्हता कारण रस्त्यात नक्षलींचा परिसर आणि दाघ जंगल यालाही ती घाबरली नाही.
 
डॉक्टर प्रज्ञा घरडे असं या धाडसी तरुणीचं नाव असून प्रज्ञा नागपूरच्या एका खासगी रुग्णालयातील कोविड सेंटरमध्ये देखील सेवा देते. मधल्या काही काळात स्थिती आटोक्यात आल्यामुळे प्रज्ञा या मध्य प्रदेशात बालाघाट इथं त्यांच्या घरी सुटीसाठी गेल्या होत्या. पण काही दिवसांनी पुन्हा कोरोनाचा संसर्ग मोठ्या प्रमाणावर वाढल्याने आरोग्य यंत्रणेवरचा चांगलात ताण वाढला. यामुळे पुन्हा डॉक्टरांना बोलवण्यात आलं. परिस्थितीची जाणीव असलेल्या प्रज्ञाला पुन्हा कर्तव्यावर परतायचं होतं. पण लॉकडाऊनमुळं मध्य प्रदेशातून महाराष्ट्रात येणाऱ्या बस किंवा रेल्वेमध्ये जागा मिळत नव्हती. जाणं आवश्यक असताना प्रवास कसा करावा हा मोठा प्रश्न प्रज्ञासमोर होता. मात्र त्यांनी न घाबरता एक निर्णय घेतला. आपल्या स्कुटीने प्रवास करण्याचा.
 
कुटुंबातील लोकांना काळजी वाटू लागली कारण नक्षलींचा प्रभाव असलेल्या भागेतून एकट्याने दुचाकीवर प्रवास करण्याची परवानगी द्यायची तरी कशी पण त्यांचा निर्णय ठाम होता. अखेर प्रज्ञाने तयारी केली व आपल्या सामानसकट बालाघाट ते नागपूरचा 180 किमीचा प्रवास स्कुटीने गाठला. 7 तासांचा प्रवास करताना लॉकडाऊनमुळे रस्त्यात कुठंही खाण्या-पिण्याची किंवा थांबण्याची सोय नव्हती. रखरखत्या उन्हात आपल्या सामानासह प्रवास करत त्या पुन्हा रुग्णांच्या सेवेत रुजु झाल्या.
 
प्रवास सोपा नव्हता पण आपल्या कामावार परतल्याचं समाधान अधिक असल्याचं त्यांना जाणवलं. त्या 12 तास पीपीई किट घालून कोविड रुग्णांवर उपचार करतात. अशा कोरोना योद्धांच्या जिद्दीला सलाम...