शुक्रवार, 29 मार्च 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. लोकप्रिय
Written By
Last Modified: सोमवार, 21 जून 2021 (21:53 IST)

RSS: डॉ. केशव बळीराम हेडगेवार कोण होते?

'हिंदू संस्कृती हिंदुस्तानाचा श्वास आहे. त्यामुळे जर हिंदुस्तानाचं संरक्षण करायचं असेल, तर आपल्याला हिंदू संस्कृतीचं संवर्धन करावं लागेल, हे स्पष्ट आहे.'
 
'ताकद ही संघटनेच्या माध्यमातून येते, हे लक्षात ठेवलं पाहिजे. त्यामुळे प्रत्येक हिंदूचं हे कर्तव्य आहे की, हिंदू समाजाला कणखर बनवण्यासाठी हरतऱ्हेचे प्रयत्न करावे.'
 
'राष्ट्रीय स्वयंसेवक हे उद्दिष्ट समोर ठेवून काम करत आहे. जोपर्यंत लाखो युवक याच उद्दिष्टाला आपल्या आयुष्याचं ध्येय मानत नाहीत, तोपर्यंत देशाचं आताचं भाग्य बदलू शकत नाही. यादृष्टीने युवकांचे विचार बदलण्याचं परमलक्ष्य संघाचं आहे.'
 
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या (RSS) वेबसाईटवर जेव्हा तुम्ही व्हिजन अँड मिशन या विभागावर क्लिक करता, तेव्हा समोर दिसणाऱ्या वेबपेजवर सर्वांत वरील बाजूस ही वाक्यं दिसतात.
 
आणि ही विधानं कुणाची आहेत? तर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे संस्थापक डॉ. केशव बळीराम हेडगेवार यांची.
 
हेडगेवारांचं नाव कुठल्या ना कुठल्या कारणानं चर्चेत असतं. भारताचे माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी हे हयात असताना, संघाच्या कार्यक्रमात सहभागी झाले होते. त्यावेळी हेडगेवार निवासला भेट दिल्यानंतर व्हिजिटर बुकमध्ये लिहिलेलं वाक्य चर्चेत आलं होतं.
 
प्रणव मुखर्जी यांनी डॉ. हेडगेवार निवासाचा दौरा केल्यानंतर व्हिजिटर बुकमध्ये लिहिलं, "मी आज इथं भारतमातेचे महान पुत्र डॉ. के. बी. हेडगेवार यांना श्रद्धाजंली देण्यासाठी आलो आहे."
 
प्रणव मुखर्जींनी लिहिलेलं हे वाक्य सोशल मीडियावर व्हायरल झालं. तसंच, प्रणव मुखर्जी यांनी संघाच्या कार्यक्रमात केलेल्या भाषणाचीही मोठी चर्चा झाली.
 
प्रणव मुखर्जींच्या व्हिजिटर बुकमधील वाक्याची आणि भाषणाची आजवर बरीच चर्चा झाली. आता आपण त्या व्यक्तीबद्दल जाणून घेऊ, ज्यांच्या निवासस्थानाला मुखर्जींनी भेट दिली होती आणि ज्यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची स्थापना केली.
 
डॉ. केशव बळीराम हेडगेवार कोण होते, ते मूळचे कुठले होते, त्यांनी संघाची स्थापना कशी केली, त्यांचा उद्देश काय होता, या सर्व प्रश्नांची उत्तरं आपण शोधण्याचा प्रयत्न करणार आहोत.
 
22 जून 1897 रोजीची गोष्ट. राणी व्हिक्टोरिया यांच्या राज्यरोहणाच्या 60 व्या वर्धापन दिनानिमित्त सोहळा होता. मात्र, आठ वर्षांचा एक मुलगा शांत आणि दु:खी होता. हा सोहळ्यात सहभागी न होता घरी परतला. घरी परतल्यानंतर मिठाई फेकून दिली आणि कोपऱ्यात जाऊन बसला.
 
मोठ्या भावानं विचारलं, "केशव, तुला मिठाई नाही का मिळाली?"
 
छोट्या केशवनं उत्तर दिलं, "मिळाली होती. मात्र, इंग्रजांनी आपल्या भोसले घराण्याला संपवलं. आपण त्यांच्या सोहळ्यात कसं सहभागी होऊ शकतो?"
 
'डॉ. हेडगेवार : द एपोक मेकर' नामक चरित्रात हा किस्सा सांगण्यात आलाय. बी. व्ही. देशपांडे आणि एस. आर. रामास्वामी यांनी हे चरित्र लिहिलंय. एच. व्ही. शेषाद्री यांनी या चरित्राचं संपादन केलंय.
 
हेडगेवार यांचं कुटुंब मूळचं तेलंगाणाच्या कांडकुर्ती गावातील होतं. मात्र, 1 एप्रिल 1889 रोजी ज्यावेळी केशव बळीराम हेडगेवारांचा जन्म झाला, तेव्हा ते नागपुरात स्थायिक झाले.
 
1925 साली राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची स्थापना करणाऱ्या डॉ. हेडगेवार यांचा जन्म बळीरामपंत आई रेवती या दाम्पत्याच्या पोटी झाला.
 
केशव बळीराम हेडगेवार जेव्हा 13 वर्षांचे होते, तेव्हा प्लेगची साथ पसरली होती. या साथीत केशव बळीराम हेडगेवारांच्या आई-वडिलांचं निधन झालं. त्यांचे मोठे भाऊ महादेवपंत आणि सीतारामपंत यांनीच केशव बळीराम हेडगेवारांच्या पुढील शिक्षणाची जबाबदारी पार पाडली.
 
शिक्षण कसं झालं?
 
असं सांगितलं जातं की, केशव बळीराम हेडगेवार जेव्हा पुण्यात शालेय शिक्षण घेत होते, तेव्हा वंदे मातरम् गीतामुळे त्यांना बाहेर काढण्यात आलं होतं. कारण असं करणं ब्रिटिशांच्या सर्क्युलरचं उल्लंघन मानलं गेलं होतं.
 
मॅट्रिकनंतर त्यांना 1910 साली वैद्यकीय शिक्षणासाठी कोलकात्याला पाठवण्यात आलं. 1914 साली वैद्यकीय विषयाची परीक्षा दिल्यानंतर अप्रेंटिसशिप केली आणि 1915 साली ते डॉक्टर बनून नागपुरात परतले.
 
संघाच्या माहितीनुसार, "शासकीय सेवेत जाण्यासाठी किंवा स्वत:चं हॉस्पिटल उघडून पैसे कमवण्यासाठी हेडगेवार हे डॉक्टर बनले नव्हते. भारताचं स्वातंत्र्य हेच त्यांचं ध्येय होतं. या ध्येयाचा विचार करता करता त्यांना स्वातंत्र्य मिळवण्याच्या क्रांतिकारी हालचालींच्या मर्यादा लक्षात आल्या."
 
 
"दोन-चार इंग्रज अधिकाऱ्यांच्या हत्यांनी इंग्रज इथून जाणार नव्हते. कोणत्याही मोठ्या आंदोलनासाठी लोकांचं समर्थन आवश्यक असतं. क्रांतिकाऱ्यांच्या कामांमध्ये याचा अभाव होता. सर्वसामान्य लोकांमध्ये जोपर्यंत स्वातंत्र्याची प्रखर इच्छाशक्ती निर्माण होत नाही, तोपर्यंत स्वातंत्र्य प्राप्त होणार नाही आणि स्वातंत्र्य मिळालं तरी टिकणार नाही. ही गोष्ट डॉ. हेडगेवारांना कळली होती.
 
"त्यामुळे नागपुरात परतल्यानंतर त्यांनी स्वत:ला क्रांतिकारी हालचालींपासून दूर केलं आणि ते काँग्रेसच्या जनआंदोलनांमध्ये सहभागी झाले. हे वर्षं होतं 1916 चं. लोकमान्य टिळक मंडाल्याच्या तुरुंगातून सहा वर्षांचा कारावास भोगून परतले होते. स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळवणारच, अशी घोषणा टिळकांनी दिली होती. ही घोषणा लोकांमध्ये नवचैतन्य निर्माण करत होती."
 
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची स्थापना
संघाच्या माहितीनुसार, "डॉ. हेडगेवार इंग्रज सरकारविरोधात आक्रमक भाषण देऊ लागले. त्यामुळे इंग्रज सरकारनं त्यांच्यावर भाषणबंदी लादली. मात्र, हेडगेवारांनी हार मानली नाही. त्यांनी भाषणं देणं सुरूच ठेवलं. त्यामुळे इंग्रजांनी त्यांच्याविरोधात खटला दाखल केला आणि त्यांना एका वर्षाचा तुरुंगवास सुनावला. 12 जुलै 1922 रोजी ते तुरुंगातून बाहेर आले."
 
डॉ. हेडगेवारांनी 1925 साली विजयादशमीच्या दिवशी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची स्थापना केली. 1936 मध्ये संघाची महिला शाखा सुरू झाली.
 
संघाच्या सुरुवातीच्या अनुयायांमध्ये भैय्याजी दानी, बाबासाहेब आपटे, बाळासाहेब देवरस आणि मधुकरराव भागवत (सरसंघचालक मोहन भागवत यांचे वडील) हे होते. संघाची स्थापना महाराष्ट्रातील नागपुरात करण्यात आली. त्यानंतर नागपूरमधूनच संघ आजूबाजूला पसरत गेला.
 
डॉ. हेडगेवारांनी इतर प्रांतांचा दौरा करून संघाच्या उद्देशाचा प्रचार केला. इतर लोकांना त्यांनी संघाशी जोडण्याचा प्रयत्न केला. त्यांनी स्वयंसेवकांना वाराणसी, लखनऊपर्यंत पाठवलं. त्याचसोबत संघाच्या शाखाही वाढवल्या.
 
टीकाकारांच्या मते, 1925 साली संघाची स्थापना केल्यानंतर डॉ. हेडगेवारांनी ब्रिटिशविरोधी आंदोलनापासून संघाला दूर ठेवण्याचा निर्णय घेतला.
 
भारताच्या स्वातंत्र्य लढ्यातील डॉ. हेडगेवारांच्या सहभागाबाबत आजही टीकाकार प्रश्न उपस्थित करतात. इतिहासाचे प्रसिद्ध जाणकार शम्सुल इस्लाम यांनी बीबीसीशी बोलताना सांगितलं की, डॉ. हेडगेवार दोनवेळा तुरुंगात गेले होते.
 
"पहिल्यांदा 1920 साली खिलाफत आंदोलनासंबंधी भडकवणारं भाषण दिलं होतं आणि दुसऱ्यांदा 1930 साली मिठाच्या सत्याग्रहाच्या दरम्यान. मात्र, डॉ. हेडगेवार तिथं का गेले? तर जे काँग्रेस कार्यकर्ते तिथं येत, त्यांना संघाशी जोडण्याचा प्रयत्न ते करत असत" असं शम्सुल इस्लाम सांगतात.
 
"याचा परिणाम असा झाला की, 1933 साली ऑल इंडिया काँग्रेस कमिटीने प्रस्ताव मंजूर केला की, राष्ट्रीय स्वंयसेवक संघ, हिंदू महासभा आणि मुस्लीम लीग या तिन्ही संघटनांशी काँग्रेस कुठलाच संबंध ठेवणार नाही," असं शम्सुल इस्लाम सांगतात.
 
'संघ वृक्ष के बीज : डॉ. केशव बळीराम हेडगेवार' या पुस्तकात म्हटलंय की, "संघाची स्थापना केल्यानंतर डॉ. हेडगेवार त्यांच्या भाषणात हिंदू संघटनेबाबत बोलत असत. सरकारवर ते टीका करत नसत."
निधन कधी झालं?
1929 साली ज्यावेळी काँग्रेसनं संपूर्ण स्वातंत्र्याचा प्रस्ताव मंजूर केला आणि 26 जानेवारी 1930 रोजी स्वातंत्र्य दिन साजरा करण्याचं आवाहन केलं, तेव्हा डॉ. हेडगेवार यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या शाखेत भगवा ध्वज फडकवण्याचं आवाहन केल्याचं सांगितलं जातं.
 
शम्सुल इस्लाम यांच्या माहितीनुसार, डॉ. हेडगेवार यांनी अनेकदा म्हटलंय की, काँग्रेसचा राष्ट्रवाद हा उथळ राष्ट्रवाद आहे.
 
इस्लाम सांगतात, "जेव्हा काँग्रेसकडून संपूर्ण स्वातंत्र्याची घोषणा करण्यात आली आणि म्हटलं गेलं की 26 जानेवारी 1930 रोजी तिरंगा फडकावून स्वातंत्र्य दिन साजरा केला जाईल. तेव्हा हेडगेवारांनी याचा विरोध करत संघाच्या सर्व शाखांना आदेश दिला की, 26 जानेवारी रोजी भगवा ध्वज फडकावून सलामी द्या आणि प्रत्येक व्यक्तीला याचा अर्थ आणि महत्त्व समजावून सांगा."
 
महात्मा गांधी यांनी ज्यावेळी ब्रिटिश सरकारविरोधात सत्याग्रह सुरू केला, तेव्हा डॉ. हेडगेवार हे त्यात सहभागी झाल्याचं म्हटलं जातं. मात्र, ते व्यक्तिगत रूपानं त्यात सहभागी झाले होते, संघ त्यात सहभागी नव्हता..
 
याचं हे कारण सांगितलं जातं की, राष्ट्रीय स्वयंसवेक कुठल्याही स्थितीत राजकीय घटनांपासून दूर राहावं अशी त्यांची इच्छा होती.
 
 
दुसरीकडे, संघाचं म्हणणं आहे की, "1940 रोजी विनायक दामोदर सावरकरांनी पुणे प्रांताच्या बैठकीत भाषण केलं आणि श्यामा प्रसाद मुखर्जींनी डॉ. हेडगेवारांना भेटून बंगालच्या हिंदूंच्या दुरावस्थेबाबत काळजी व्यक्त केली. 9 जूनला डॉ. हेडगेवारांनी नागपुरात तृतीय वर्ष सहभागींना संबोधित केलं."
 
21 जून 1940 रोजी डॉ. हेडगेवारांचं निधन झालं.
 
इस्लाम सांगतात, "14 ऑगस्ट 1947 रोजी संघाचं मुखपत्र ऑर्गनायझरमध्ये लिहिलं की, जे लोक नशिबानं सत्तेपर्यंत पोहोचले, त्यांनी हिंदूंच्या हातात तिरंगा सोपवलाय. मात्र, देशातील हिंदूंना हे मान्य होणार नाही."
 
"यात तीन रंग आहेत आणि तीन रंग अशुभ असतात. या झेंड्याला मानल्यास देशाच्या मानसिकतेवर वाईट परिणाम होईल," असंही ऑर्गनायझरमध्ये लिहिलं होतं.