‘स्ट्राईक’ची धमकी कसली देता? - सामना
दैनिक सामना अर्थात शिवसेना पक्षाचे मुखपत्र असललेल्या वृत्तपत्राने पाकवर जोरदार टीका केली आहे. तर उलट स्ट्राईक’ची धमकी कसली देता? कशाला असा प्रश्न शिवसेना विचारात आहे. पाकला काहीच फरक पडणार नाही. उलट आपले सैनिक शहीद होत आहेत. त्यामुळे पाकला मोठा धडा शिकवावा लागणार असून अचानक मोठा धक्का दया त्यांना सांगू नका असे सामानातून स्पष्ट केले आहे. सामनाचा लेख पुढील प्रमाणे.
दोन वर्षांपूर्वी पाकिस्तानवर सर्जिकल स्ट्राईक झाला. हा सर्जिकल स्ट्राईक पाकिस्तानला धडा शिकवण्यासाठीच झाला होता, पण सर्जिकल स्ट्राईकमुळे पाकिस्तानला धडा मिळाला काय? या स्ट्राईकने पाकचे शेपूट सरळ झाले नसेल तर दुसऱया ‘स्ट्राईक’ची धमकी कसली देता? सर्जिकल स्ट्राईक हा शत्रूला अचानक धक्का देण्यासाठी केला जातो. पण अशा धक्क्याने डोके ताळय़ावर येईल ते पाकिस्तान कसले! आपल्या लष्करप्रमुखांचा आशावाद दुर्दम्य आहे, पण पाकिस्तानकडून आशा बाळगता येणार नाही. सर्जिकल स्ट्राईकचे राजकारण चालले आहे. ते थांबले तरी पुरे.
पाक सुधारला नाही तर पुन्हा सर्जिकल स्ट्राईक करू, असे हिंदुस्थानच्या लष्करप्रमुखांनी सांगितले आहे. संरक्षणमंत्री निर्मला सीतारामन या अजूनही भाजप प्रवक्त्याच्या भूमिकेतून बाहेर पडलेल्या नाहीत. सध्या गाजत असलेल्या राफेल घोटाळाप्रकरणी वकिली करण्यात त्या अडकून पडल्याने लष्करप्रमुखांनी पाकिस्तानला इशारा दिलेला दिसतो. पाकिस्तानी कुत्र्याचे शेपूट सत्तर वर्षांपासून वाकडे ते वाकडेच आहे. पाकिस्तान सुधारणार नाही. तरीही आमचे राज्यकर्ते पाकड्यांच्या बाबतीत इतके आशावादी कसे असू शकतात? दोन वर्षांपूर्वी पाकिस्तानवर सर्जिकल स्ट्राईक झाला. हा सर्जिकल स्ट्राईकही पाकिस्तानला धडा शिकवण्यासाठीच झाला होता व त्याच सर्जिकल स्ट्राईकचा विजयोत्सव साजरा करून भाजपने उत्तर प्रदेशच्या विधानसभा निवडणुका लढवल्या होत्या. भाजपने निवडणुका जिंकल्या, पण सर्जिकल स्ट्राईकमुळे पाकिस्तानला धडा मिळाला काय? सर्जिकल स्ट्राईकनंतर कश्मीरात पाक पुरस्कृत हिंसाचार वाढला आहे. गेल्या दोन वर्षांत पाकड्यांचे हल्ले व आमच्या सैनिकांची बलिदाने वाढत आहेत. गेल्या महिनाभरात सुरक्षा दलाच्या जवानांचे अपहरण करून त्यांच्या हत्यांचे सत्र सुरू झाले आहे. जवानांची मुंडकी उडवून हिंदुस्थानला आव्हान दिले जात असताना आम्ही फक्त सर्जिकल स्ट्राईकचे इशारे देत बसलो आहोत. दोन वर्षांपूर्वीच्या सर्जिकल स्ट्राईकमध्ये शौर्य गाजविलेले लान्स नायक संदीप सिंह हेदेखील सोमवारी एका चकमकीदरम्यान शहीद झाले. जम्मू-कश्मीरमधील तंगधार सेक्टरमध्ये ही चकमक झाली. संदीप सिंह आणि त्यांच्या पथकाने तीन दहशतवाद्यांना कंठस्नान घातले, मात्र संदीप यांना हौतात्म्य पत्करावे लागले. सर्जिकल स्ट्राईकच्या दुसऱया वर्धापन दिनाच्या पूर्वसंध्येलाच त्यात सहभागी असलेला आमचा एक बहादूर जवान दहशतवाद्यांशी लढताना शहीद होत असेल तर कसे व्हायचे? आता या सर्जिकल स्ट्राईकचा दिवस शौर्य दिवस, विजय दिवस साजरा करा असे आदेश म्हणे विद्यापीठांना देण्यात आले.