1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. लोकप्रिय
Written By
Last Modified: शुक्रवार, 3 जून 2022 (19:25 IST)

क्षमा बिंदू कोण आहे? ती स्वत:शीच लग्न का करतेय?

ksham bindu
सोलोगॅमी म्हणजे स्वतःशीचं लग्न करणं. तसा हा ट्रेंड पाश्चिमात्य देशांमध्ये फॉलो केला जातो. जगभरात हा ट्रेंड झपाट्याने वाढत होताच. पण आता तो भारतात ही येऊन पोहोचलाय.
 
11 जूनला भारतात अशाच पध्दतीचा एक विवाहसोहळा पार पडणार आहे. संपूर्ण भारत या लग्नाचा साक्षीदार असेल. हा विवाहसोहळा क्षमा बिंदूचा असून 11 जून रोजी गुजरातमधील वडोदरा शहरातील एका मंदिरात हिंदू रितीरिवाजांसह लग्न पार पडेल.
 
मी तिच्याशी संपर्क साधला त्यावेळी ती घरी होती. तिने मला फोनवरचं सांगितलं की, 11 जूनला ती लाल रंगाचा लग्नाचा शालू नेसेल, हातावर मेंहदी काढेल आणि स्वतःच भांगात कुंकू भरेल. अग्नीला साक्षी ठेऊन सप्तपदी ही घेईल.
 
इतर विवाहसमारंभात ज्या पध्दतीने लग्नापूर्वीचे सर्व विधी पार पाडले जातात अगदी त्याच पद्धतीने बाकीचे विधी पार पाडले जातील. हळदी समारंभ, संगीत आणि मेंहदी समारंभ होईल. आता लग्नाआधीचे विधी गरजेचे असतात अगदी तसंच लग्नानंतरही हनिमूनला जाण्याची पद्धत आहे. त्यामुळे क्षमा हनिमूनला गोव्याला जाईल.
 
स्वतःसोबत लग्न केल्यानंतर तिने दोन आठवड्यांसाठी हनिमूनचा प्लॅन केला आहे.
 
क्षमा 24 वर्षांची असून ती समाजशास्त्राची विद्यार्थिनी आहे. यासोबतच ती ब्लॉगरही आहे.
 
ती म्हणते, "लोक मला बऱ्याचदा सांगायचे की मी परफेक्ट मॅच आहे. यावर मी त्यांना हो म्हणतेचं पण म्हणून मी स्वतःची निवड केल्याचंही सांगते."
 
क्षमा सांगते की स्वत:सोबत लग्न केल्यानंतर ती संपूर्ण आयुष्य स्वतःवरचं प्रेम करण्यात घालवेल.
 
ती म्हणते, "स्वतःशीचं लग्न करणं म्हणजे स्वतःला दिलेलं एक वचन आहे. स्वतःसाठी नेहमीचं उपलब्ध असण्याचं वचन. हे असं वचन आहे ज्यामध्ये तुम्ही स्वतःसाठी इच्छिलेलं आयुष्य आणि लाइफस्टाइल तुमच्या प्रगतीसाठी पोषक असेल. यातून तुम्ही जिवंत आणि आतून समाधानी जीवन जगाल."
 
सोलोगॅमी कधी सुरू झालं?
यावर क्षमा सांगते, "माझ्या प्रत्येक पैलूचा मी मनापासून स्वीकार करते हे दाखवण्याची ही पद्धत आहे. विशेषतः माझ्यात असलेल्या असमर्थता मग त्या शारीरिक असो, मानसिक असो किंवा काहीही असो, त्या स्वीकारणे. स्वतःशीचं लग्न करणे ही माझ्यासाठी कुठंतरी खोलवर रुजलेली भावना आहे. यातून मला सांगायचं आहे की मी स्वत:ला स्वीकारलं आहे... अगदी आहे तशा पद्धतीने."
 
क्षमा सांगते की, तिच्या या निर्णयामध्ये तिचं कुटुंब तिच्यासोबत आहे. मित्रमंडळींसह कुटुंब ही तिच्या या लग्नाला उपस्थित राहणार आहे.
 
ती पुढे सांगते, "माझी आई मला म्हणाली, अरे व्वा! तू नेहमीच काहीतरी नवा विचार करतेस. माझे पालक अगदी मोकळ्या मनाचे आहेत. ते मला म्हणाले की तुझा यात आनंद आहे ना तर तू तेच करावंस."
 
स्वतः सोबतचं लग्न केल्याची बातमी मी जवळपास 20 वर्षांपूर्वी पहिल्यांदा ऐकली होती. कॅरी ब्रॅडशॉ (अमेरिकन मालिका सेक्स अँड द सिटी मधील फेमस कॅरेक्टर) यांनी त्याचा उल्लेख केला होता. पण हा शो कॉमेडी ड्रामा होता.
 
रिपोर्टनुसार, मागील काही वर्षांत असे शेकडो विवाह झाले आहेत. सिंगल महिला सोलोगॅमीमध्ये आघाडीवर आहेत. या नववधू हातात पुष्पगुच्छ घेऊन पारंपरिक लग्नाच्या पोशाखात लग्नासाठी जातात. अनेक वेळा त्यांचे कुटुंबीय आणि मित्रमंडळी त्यांच्यासोबत असतात.
 
हे सर्वजण त्यांना चिअरअप करतात.
 
पण ही गोष्ट केवळ लग्नापुरती मर्यादित नाही. अशाच एका प्रकरणात 33 वर्षीय ब्राझिलियन मॉडेलने स्वतःशीच लग्न करून स्वतःलाच घटस्फोटही दिला होता.
 
सोलोगॅमीमुळे व्यवसायाच्या संधीही वाढल्या आहेत. यासाठी एक किट मिळतं ज्यात अंगठी आणि इतर वस्तू असतात.
 
आता अशा गोष्टी भारतात क्वचितचं ऐकायला मिळतात हे नाकारता येत नाही. त्यामुळे क्षमाच्या लग्नाची बातमी संपूर्ण भारतात चर्चेचा विषय ठरली आहे.
 
लोकांच्या प्रतिक्रिया काय आहेत
जेव्हा मी मेंटल हेल्थ एक्सपर्टशी बोलले तेव्हा त्यांनी अशा लग्नावर आश्चर्य व्यक्त केलं.
 
चंदीगडमधील पीजीआयएमईआर हॉस्पिटलमधील मानसोपचार विभागातील माजी डीन आणि प्रोफेसर असलेल्या डॉ. सविता मल्होत्रा सांगतात, 'माझ्या मते ही एक अतिशय विचित्र संकल्पना आहे.'
 
त्या म्हणतात, "प्रत्येकजणच स्वत:वर प्रेम करतो. स्वत:वर प्रेम आहे हे दाखवण्यासाठी तुम्हाला काही वेगळं करण्याची गरज नसते. ते आपल्या सर्वांमध्ये आधीपासूनच असतं. आणि प्रश्न जेव्हा लग्नाचा असतो, तेव्हा ते दोन व्यक्तींना एकत्र आणतं."
 
क्षमाच्या या बातमीने सोशल मीडियावरही चर्चेला उधाण आलंय. क्षमाने इतरांसमोर आदर्श ठेवलायं म्हणून काही लोक तिची स्तुती करतायत तर काही लोकांचा दृष्टिकोन याहून उलटा आहे.
 
जर दुसरी व्यक्तीच नसेल तर लग्नाची काय गरज आहे, असा सवाल एका महिलेने ट्विटरवरून केलाय. तर दुसरा एक व्यक्ती ट्विट करतो की, तिला तिच्या कौटुंबिक जबाबदारीपासून पळायचं आहे.
 
काही लोकांनी तर या प्रकाराला दुर्दैवी म्हटलंय.
 
क्षमा फक्त तिच्या टीकाकारांना एवढंच सांगू इच्छिते की,
 
"मी कोणत्या मुलाशी किंवा मुलीशी लग्न करायचं, हा माझा वैयक्तिक निर्णय आहे. सोलोगॅमी लोक ही नॉर्मल असतात हे मला सिद्ध करायचं आहे म्हणून मी स्वतःशी लग्न करते आहे.
 
मला लोकांना फक्त एवढंच सांगायचं आहे की, तुम्ही जन्माला येताना एकटेच आलात आणि तुम्हाला एकट्यालाच जावं लागतं. मग तुमच्यावर तुमच्यापेक्षा जास्त प्रेम कोण करतं? जेव्हा तुम्ही पडता तेव्हा तुम्हाला सांभाळायला ही तुम्हीच असता."