1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. लोकप्रिय
Written By
Last Modified: शुक्रवार, 31 मार्च 2023 (16:24 IST)

राम वनवासात असतांना अनेक वर्ष निवासी असलेले नाशिक आहे आता मंदिरांचे शहर, पाहूयात नाशिकला धार्मिक नगरी/ राजधानी दक्षिण काशी का म्हणतात ?

Importance and sanctity of river Godavari  Ramkund Kapaleshwar Temple Sri Kalaram Temple Sitagunpha Kartikswamy Temple Naroshankar Temple Sundernarayan Temple Bhaktidham Gurugangeshwar Veda Temple Muktidham Takli Math Someshwar Temple Chamaraj Caves Akshardham Temple Kodanddhari Ram Temple Shantinath Digambar Jain Temple Khandoba Temple
आपलं नाशिक
प्राचीन काळात पद्यपुर, जनस्थान अशी नावं धारण करणारं हे शहर मोगल काळात गुलशनाबाद होतं. नंतर ते नासिक झालं आणि आता नाशिक, पद्यपुर म्हणजे कमळांचं शहर आणि गुलशनाबाद म्हणज‌ए फ़ुलाचं शहर. या दोन नावांमध्ये कमालीचे साम्य आहे. लक्ष्मणाने शूर्पणखेचं नाक म्हणजे नासिका या ठिकाणी कापलं म्हणून नासिक हे नांव असावं. दक्षिण गंगा गोदावरिच्या काठी वसलेलं, वाढलेलं, सिंहस्थ कुंभमेळा भरविण्याचा मान असलेलं नाशिक शहर पुराण काळात मुळं रुजवलेलं. इतिहासाच्या अवकाशात फ़ांद्या फ़ैलावलेल्या. आधुनिकतेच्या मोहराचे धुमार शाखेशाखेवर लगडलेले. प्राचीन तीर्थस्थळ ते आधुनिक सांस्कृतिक- औद्योगिक नगरी ही आहे नाशिक शहराची वाटचाल.
 
गोदावरी नदीचे महत्व व पावित्र्य
 
भारतात गंगा नदीस धार्मिक महत्व आहे तसेच महत्व गोदावरी नदिसही आहे. गोदावरी नदीस "गंगा" असेही म्हटले जातेच. नाशिकमधील गोदावरी नदीस पवित्र का मानले जाते? तर गोदावरी नदी नाशिक शहरातच दक्षिणेकडे पुर्ण वळण घेते म्हणून तिला पावित्र्य प्राप्त झाले आहे. पुराणातील मतांनुसार, उत्तरेस वळते तेव्हा गंगा पवित्र होते, पश्चिमेस वळते तेव्हा यमुना पवित्र होते, पुर्वेस वळते तेव्हा पायोशनी नदी पवित्र होते. दक्षिणेस वळते तेव्हा गोदावरीही पवित्र होते. याखेरीज भूगर्भातील सात जलप्रवाह गोदावरीस येथेच मिळतात. त्याची नावे अशी- अरूणा, वरुणा, सरस्वती, श्रध्दाख मेधा, सावित्री व गायत्री, गुरु सिंह राशीला येतो त्या काळात गंगा, साडेतीन कोटी तीर्थे व तेहेतीस कोटी देव गोदावरीच्या भेटीस येतात व स्वतःला पुन्हा पवित्र करुन घे‌ऊन जातात. सिंहस्थ म्हणजे गोदावरी नदीचा बारा वर्षानी येणार‌आ वाढदिवस. याबद्दल कथा अशी- मांधाता राजाच्या काळात शंकर, गौतम ऋषींवर प्रसन्न झाले. त्यांनी आपल्या जटेच्या एक भाग गौतमांना दिला. तो गौतमांनी कुर्मावतार काळात व सिंह राशीत गुरु असतांना माघ शुध्द दशमीस ब्रम्हगिरी पर्वतावर स्थापन केला व त्यातुन गोदावरी नदीचा उगम झाला. म्हणून सिंहस्थ म्हणजे गोदावरीचा वाढदिवस.
 
रामकुंड
नाशिकमध्ये आल्याबरोबर बहुतेक भाविक सर्वात आधी रामकुंडावर येतात. त्यांना रामकुंडात पुण्यस्नान करण्याची आस असते. कारण रामकुंड पवित्र स्थान मानले जाते. या रामकुंडाला लागुन सीताकुंडसुध्दा आहे. अनेक भाविकांना याची माहीती नसते. रामकुंड आता जरी बांधलेल्या स्वरुपात दिसत असले तरी रामायण काळात गोदावरी नदीच्या प्रवाहाचाच तो एक भाग होता. राम-सिता-लक्ष्मण तपोवनातील आपल्या पर्णकुटीकडून या ठिकाणी स्नानासाठी यायचे, म्हणून पुढील काळात रामकुंडाला महत्व मिळाले. रामकुंडात जिवंत पाण्याचे झरे आहेत. कदाचित त्यामुळेच येथे मृतांच्या अस्थींचे विलीनीकरण सहज होते. हिंदू धर्मशास्त्रात मोक्षप्राप्तीसाठी ही महत्वाची बाब मानली जाते. रामकुंडाचे एकुण क्षेत्रफ़ळ ३३० चौ.फ़ूट आहे. बांधणी भक्कम, दगडी आहे. रामकुंडाची बांधणी पेशवे काळापुर्वी म्हणजे इ.स. १६९६ साली झाली व तेव्हाचे एक सरदार चित्रराव खटावकर यांनी ती केली आहे. पेशवे काळात या रामकुंडाची चांगली दुरुस्ती केली गेली व अलीकडेच इ.स. २००५ मध्येही त्यात सुधारणा करण्यात आली आहे.
 
कपालेश्वर मंदिर
रामकुंडात स्नान केल्यानंतर, कपालेश्वर मंदिरात जावं, रामकुंडासमोरच असलेले हे मंदिर, जागृत देवस्थान मानले जाते. श्रीविष्णुने स्वहस्ते येथील शिवपिंड स्थापन केलेली असल्याने बारा ज्योर्तिलिंगांचे पुण्य श्री कपालेश्वर दर्शनाने होते. गाभार्‍यातील शिवपिंड प्राचीन असून, शिवपिंडीसमोर नंदीमूर्ती मात्र नाही. कारण पुराणकथेनुसार श्री शंकरांच्या माथी ब्रम्हहत्येचे पातक होते. नंदीच्या बोलण्यातून श्री शंकरांना समजले की, रामकुंडामधील अरुणासंगम तीर्थात स्नान केल्यास हे पातक नाहीसे हो‌ईल. त्याप्रमाणे श्री शंकरांनी अरुणासंगम केल्याने येथे नंदीमुर्ती नाही. इ.स.१७२८ मध्ये कोळी जमातीने या मंदिराची बांधणी केली. इ.स. १७६३ मध्ये जगजीवनराम पवार यांनी मंदीर आवाराचा विस्तार केला. कृष्णाजी पाटील पवार यांनी पायर्‍या बांधुन दिल्या. मंदिरात महशिवरात्री, त्रिपुरारी पौर्णिमा, वैकुंठ चतुर्थी व श्रावण सोमवारी विविध पूजा‌अर्चा विधी व उत्सव साजरे केले जातात.
 
श्री काळाराम मंदिर
काळाराम मंदिर म्हणजे नाशिकमधील सर्वात महत्वाचे मानले जाणारे मंदिर. अतिशय सुंदर बांधणी, प्रशस्थ आवार, किर्तन, धार्मिक व्याख्यानं, भाषणं, इत्यादींसाठी छोटासा दगडी मोकळा सभामंडप, मंदिराच्या आतील चारही बाजुने सुमारे ८४ मोकळ्या ओवर्‍या. ही सोय खास भाविकांसाठी आहे. म्हणजे बाहेरगावाहून आलेले सर्वसाधारण भाविक यात्रेकरु या ओवर्‍यात विनामुल्य मुक्कामी राहू शकतात. या मंदिराची रचना पुर्णपणे दगडी व मजबुत आहे. चारही बाजूने सुरक्षित दगडी तटबंदी आहे. प्रवेशासाठी चार महाद्वार अर्थात पुर्व दिशेने आहे. या महद्वारात उभे राहिल्यावरसुध्दा मंदिरातील राम-सिता-लक्ष्मण यांच्या सुंदर, प्रसन्न मूर्त्यांचे दर्शन हो‌ऊ शकते. मूर्त्यांची प्रतिष्ठापना एका छोटेखानी सिंहसनावर केली आहे. मूर्त्यांना कलात्मक अलंकाराने नटवले असून मुकुटही आहे. मूर्त्यांच्या मागे व आजुबाजुस प्रभावळ आहे. याच मुर्त्यांच्या समोर असलेल्या सभामंडपात रामभक्‍त हनुमानाची मुर्ती आहे. हनुमानाचे मुख अर्थातच श्रीरामांकडे आहे. या मंदिराचे बांधकामास बारा वर्षे लागली. (१७८२ ते १७९४) पेशवे काळातील सरदार खंडेराव त्र्यंबक व रंगराव ओढेकर यांच्या देखरेखीखाली हे बांधकाम करण्यात आले. मंदिराची उंची ७० फ़ूट आहे.
 
सीतागुंफ़ा
सीतागुंफ़ा म्हणजे वनवास काळातील सीतेचे राहण्याचे स्थान होय. सीतागुंफ़ेत प्रवेशासाठी कोणतेही शुल्क वा तिकिट नाही. उजव्या बाजुने अरुंद व उतरता प्रवेशमार्ग आहे व डाव्या बाजूने तसाच अरुंद पण बाहेर येण्याचा मार्ग आहे. खाली उतरल्यावर गुंफ़ेत राम-सिता-लक्ष्मण यांच्या सुंदर मुर्त्या आहेत. दुसर्‍या बाजुस सुंदर शिवलिंग आहे. दर्शन घे‌ऊन इच्छा असल्यास पूजादेखील करता येते. तपोवन : रामायण काळातील दंडकारण्याचा एक भाग म्हणजे हल्लीचे तपोवन होय. राक्षसी शूर्पणखेचे नाक (नासिका) लक्ष्मणाने कापले व त्यावरुन या शहराचे नाव "नाशिक" पडले. त्या लक्षमणाने जुने मंदिर व नवीनही मंदिर तपोवनातच आहे. २००४ मधील सिंहस्थ काळात तपोवनात रस्ते व इतर सुधारणा करण्यात आले आहेत. तपोवनात अनेक मंदिरे आहेत. त्यापैकी पाचमुखी हनुमान बालाजी मंदिर, कृष्णतीर्थाश्रम, स्वामी जनार्दन मठ, नर्मदेश्वरी आश्रम, गोपाळ मंदिर, इत्यादी प्रमुख आहेत. सात तीर्थे व शूर्पणखा तीर्थही आहे. मंदिरांबरोबरच गोदावरी नदीच्या प्रवाहाच्या आजूबाजूस छोटा पूल व फ़रसबंद मोकळी जागा आहे. झाडी झुडपाने येथील वातावरण खूपच छान व शांततापुर्ण वाटते.
 
कार्तिकस्वामी मंदिर
काळाराम मंदिराच्या अलीकडे आहे. कार्तिकस्वामींची मुर्ती पूर्णाकृती, उभी, मुकुटधारी, वस्त्रालंकारयुक्‍त असुन कार्तिक पौर्णिमेस यात्रा भरते व या दिवशी स्त्रिया दर्शन लाभ घे‌ऊ शकतात.
 
नारोशंकर मंदिर
सीतागुंफ़ा-काळाराम मंदिराकडून परततांना सरदार चौकाकडे जाणार्‍या गल्लीने खाली उतरल्यावर व रामसेतू पुलाच्या एका कोपर्‍यात हे जुने आणि चांगले मंदिर आहे. पेशवे काळातील एक सरदार नारोशंकर यांच्या स्मरणार्थ हे नाव दिले गेले. या मंदिराची शिल्परचना व कलाकुसर नेहमी वाखाणली जाते. याही मंदिरास तीन बाजुने तटबंदी आहे. पण आवार नसल्याने मंदिर तसे लहान वाटते. चार बाजूला घुमट आहे. ते किल्ल्यावरील लहान बुरुजासारखे वाटतात. मंदिराच्या दर्शनी प्रवेशद्वारावर मोठी घंटा टांगलेली आहे. ही घंटा विजयाचे प्रतीक म्हणुन सरदार नारोशंकरांनी वस‌ईच्या चर्चमधून आणली. घंटेवर इ.स.१७२१ असे कोरलेले आहे. भारतीय शिल्पकतेली इतिहासात या मंदिराच्या शिल्पाकृतींना महत्व आहे.
 
सुंदरनारायण मंदिर
हे मंदिर अहिल्यादेवी होळकर पुलाच्या कडेला व गोदावरी नदीपत्राजवळच आहे. या पुलाचे जुने नाव व्हिक्टोरिया पुल होते. कपालेश्वर जसे शंकराचे मंदिर तसेच सुंदरनारायण मंदिर हे विष्णुचे. या मंदिराची बांधणी इ.स.१७५६ मध्ये गंगाधर यशवंत चंद्रचुड यांनी केली. मंदिरात श्रीविष्णूची उर्फ़ सुंदरनारायणाची मूर्ती मुख्य आहे व डावी-उजवीकडे लक्ष्मी व सरस्वती देवींच्या मुर्त्या आहेत. नारोशंकराप्रमाणेच या मंदिरावरील कोरीव कलाकुसर आकर्षक आहे. प्रवेशद्वार, लहान मंडप, मोठा मंडप आणि छोट्या-छोट्या दगडी कंगोर्‍यांचा घुमट अशी रचना आहे. २१ मार्च रोजी सूर्योदय होताच पहिली सूर्यकिरणे सरळ मूर्तीवरच पडावीत अशी रचना केली आहे. सुंदरनारायण नावामागे पौराणिक कथा आहे. जालंदर राक्षसाचा नाश करण्यासाठी श्रीविष्णुने जालंदरचेच काळे रुप घ्यावे लागले. सती वृंदेने त्याला शाप दिला होता. गोदावरीत स्नान केल्यानंतर शापाचे सामर्थ्य संपले व श्रीविष्णूस पुर्वीचे सुंदर रुप प्राप्त झाले म्हणून तो सुंदरनारायण होय.
 
भक्‍तीधाम
आहिल्यादेवी होळकर पूल संपताच, मालेगांव स्टँड चौकातुन डावीकडे जाणार्‍या रस्त्याने पुढील चौकात आल्यावर उजवीकडे वळणदार रस्त्याने मुख्य सिग्नल चौकात यावे. त्याच चौकात डावीकडे लगेचच हे जुने भक्‍तीधाम मंदिर आहे. मंदिरात श्री पशुपतिनाथाची (श्री शंकराची) मूर्ती मुख्य आहे तर सभामंडपात नर-नारायण-विराट दर्शन, राम-सिता-लक्ष्मण यांच्या सुरेख मूर्त्या आहेत. मंदिराच्या आतील बाजूस बारा ज्योर्तिलिंगाचे दृश्य तयार केलेले आहे. पूर्वी मंदिराच्या प्रवेशद्वाराचे वर प्राणांच्या सुंदर मूर्त्या होत्या. त्यात आता बदल करण्यात आला आहे. जुन्या दृश्यांऐवजी आता सप्तश्रृंगी देवी, गणेश मूर्ती व त्या दोघात सूर्याचा रथ असे छान दृश्य आहे. मंदिरास लागून कैलास मठ आहे. येथे वेद विद्यालयही चालवले जाते.
 
गुरुगंगेश्वर वेद मंदिर
भक्‍तीधामामध्ये वेदांच्या अभ्यासासाठी सुविधा आहे पण गुरुगंगेश्वर वेद मंदिरात वेदांनाच मुर्ती विषय बनवले आहे. वेदग्रंथाचीच येथे प्रतिष्ठापना करण्यात आली आहे. हे गुरुगंगेश्वर वेद मंदिर नाशिक शहरात, मध्यवर्ती ठीकाणी म्हणजे नवीन बसस्थानकापासून, त्र्यंबकेश्वरकडे जाणार्‍या रस्त्यावरच फ़क्‍त अर्धा कि.मी. अंतरावर आहे. भौमितीक रचनेनुसार प्रवेशद्वार अर्धचंद्राकृती असून दोन्ही बाजुस व मध्यभागी पण जरा मागील अंतरावर गोपुरांसारखी पण फ़क्‍त उंचीच्या संदर्भात शिखरासह रचना आहे. शिवाय हे शिखर नेहमीच्या मंदिरांसारखे व कळसयुक्‍त स्वरुपाचे नाही. संगमरवराचा वापरही अनोखा आहे. इटालियन मार्बल व जेरुसलेम येथील पिवळसर रंगाच्या संगमरवराचा वापर मंदिर बांधणीसाठी केला आहे. आतमध्ये छताला बिलोरी काचेची झुंबरं आहेत व त्यात छोटे बल्ब बसवुन झगमगाट जाणवेल अशी कारागिरी केली आहे.
 
मुक्‍तीधाम
मुक्‍तीधामचं मंदिर हे आधुनिक काळातील असून, संपुर्ण मंदिर बांधणीसाठी राजस्थानातील मक्राना जातीच्या व संपुर्ण शुभ्र्च संगमरवरी टा‌ईल्स वापरल्या आहेत. त्यामुळेच मंदिराची पवित्रता मनावर ठसते. मंदिरात राम-सिता-लक्ष्मण, राधा-कृष्ण, लक्ष्मी-नारायण यांच्या सुबक-सुंदर मुर्त्या आहेत. हे मंदिर म्हणजे सर्वधर्मसमभावाचे प्रतीक असल्याने, भारतातील महत्वाच्या संत-विभुतींच्या मूर्त्या येथे क्रमशः स्थापन केल्या आहेत. त्यात शेगावचे संत गजानन महाराज, शिर्डीचे सा‌ईबाबा, पंढरपुरचे विठ्ठल-रखुमा‌ई, द्वारकेचा द्वारकाधीश, महालक्ष्मी, सिध्दिविनायक, दुर्गादेवी, सरस्वतीदेवी, श्रीगुरुदत्त, गायत्रीदेवी, जलारामबाबा, भक्‍त नरसी मेहता, संत जनाबा‌ई, डाकोरचे रणछोडजी, तिरुपती बालाजी, संत गुरुनानक यांचा समावेश आहे. या मूर्त्या क्रमाने बघतांना आपो‌आपच मंदिरातून एक परिक्रमा पूर्ण होते. अगदि शेवटी बद्रीनाथ धाम, बारा ज्योर्तिलिंगे व गंगावतरणाचे सुंदर दृश्यही कायमस्वरुपी तयार करुन ठेवले आहे. सभामंडपात भिंतीवर गीतेचा संपूर्ण १८वा अध्याय लिहिलेला आहे. शिवाय श्रीकृष्ण अर्जुनाला गीता सांगत असल्याचे छान रेखाटनही आहे.
 
टाकळी मठ
टाकळी मठ हे रुढार्थाने मंदिर स्वरुपाचे नाही. महाराष्ट्रातील एक संप्रदायी रामदास स्वामी यांनी स्थापन केलेला पहिला मठ म्हणून हा महत्वाचा मानला जातो. योगायोगाचा भाग असा कि, श्रीरामांना १४ वर्षे वनवासासाठी नाशिकमध्ये वास्तव्य करावे लागले होते. त्याच श्रीरामांच्या भक्‍तीसाठी रामदास १२ वर्षे नाशिकच्या गोदावरीकाठी मुक्कामी राहिले. रामदास स्वामी खुप साधेपणाने राहत असत. त्यामुळे या मंदिरांच्या परिसरात साधेपणा जपलेला आढळतो. त्यांनी स्थापन केलेला हा पहिलाच मारुती होय. त्यांच्या पादुका व कुबडी येथे पहावयास मिळतात. दासनवमी, रामनवमी आणि हनुमान जयंती हे उत्सव येथे एखाद्या यात्रेसारखे साजरे केले जातात. त्यासाठी मोठी सभागृहे आहेत. परिसराचे सुशोभीकरण करतांना गोदावरी नदीकाठी, मठाजवळ लांबलचक घाटही बांधण्यात आला आहे. एक शांत व वेगळे स्थान म्हणून पर्यटक येथे भेट देत असतात.
 
सोमेश्वर मंदिर
नाशिककरांना मोहात पाडणारे व आवडता पिकनिक स्पॉट समजले जाणारे निसर्गरम्य स्थळ म्हणजे सोमेश्वर मंदिराचा हिरवागार परिसर होय. गोदावरी नदिकाठीच असल्याने या स्थानाला वेगळेच परिणाम लाभले आहे. चार मंदिरांपैकी सोमेश्वर मंदिर प्रमुख आहे व राम-सिता-लक्ष्मण, श्री विष्णु-लक्ष्मी आणि रामभक्‍त हनुमानाचे अशी इतर अशी तीन मंदिरे आहेत. सोमेश्वर मंदिराच्या पुढे डावीकडून एक पायवाट नदिपात्राकडे जाते. येथे स्नानाचा आनंद घेता येतो. आणखी पुढे गेल्यावर २५-३० फ़ूटांवरुन कोसळणारा धबधबा दिसतो. त्याच्या फ़ेसाळत्या शुभ्र पाण्यामुळे त्यास "दुधसागर धबधबा" म्हणतात. विशेषतः पावसाळ्यात या धबधब्याचे खरे सौंदर्य पाहण्यासारखेच असते.
 
चामराज लेणी
लेणी म्हटली की डोळ्या समोर अजिंठा-वेरुळ्सारखी लेणी येतात, पण सर्वच ठिकाणी तशी अपेक्षा करणे योग्य नसते. लेणी म्हणजे डोंगरातील छोट्या गुंफ़ा असाही अर्थ घ्यावा लागतो. चामराज लेणीसुध्दा याच प्रकारच्या आहेत. नाशिक शहरापासुन सुमारे ८ कि.मी. अंतरावरील एका छोट्या पर्वतावर या लेण्या आहेत. त्यासाठी पेठ रोडने पुढे जावे लागते व नंतर "बोरगड" चा रस्ता लेण्यांकडे नेतो. एक गोष्ट चांगली आहे की लेण्यांपर्यत जाण्यासाठी चांगल्या दगडी पायर्‍या आहेत. ही लेणी जैनांची असल्याने आदिनाथांची काळ्या पाषाणाची मुर्ती मुख्य आहे व इतर दोन लेण्यात जैनधर्मातील वेगवेगळी दृश्ये मूर्तीरुपात मांडली आहेत. ११ व्या शतकातील या लेण्यांना गजपंथी लेणी असेही म्हणतात. या टेकडीवरुन नाशिक शहराचे सुंदर दृश्य दिसते. लेण्यांकडे जाण्यापूर्वीच टेकडीच्या पायथ्याशी पार्श्वनाथा जैन मंदिर आहे. वाटल्यास ते आधी पाहून मग लेण्यांकडे जावे.
 
अक्षरधाम मंदिर
पुर्वी या मंदिरास ब्रम्हचारी आश्रम नाव होते. तपोवनाकडे जाणार्‍या रस्त्याच्या अलीकडे औरंगाबाद हायवेला लागून हे मंदिर आहे. मंदिरात राधा-कृष्ण, लक्ष्मी-नारायण व रनछोडदास विक्रम यांच्या मुर्त्या आहेत.
 
कोदंडधारी राम मंदिर
देशात अशा प्रकारची हि एकमेव मुर्ती असल्याचे सांगितले जाते, कारण फ़क्‍त रामाचीच मुर्ती स्थापन करु नये असा दंडक आहे. वैशिष्ट्य असे कि, येथील भोसला मिलिटरी स्कुलमध्ये प्रशिक्षण घेणार्‍या विद्यार्थींनी उडविलेल्या बंदुकीच्या गोळ्यांच्या धातुतून ही मुर्ती बनवली असल्याने तिची चकाकी कायम असते व मुर्तीवरही रासायनिक प्रक्रिया वा इतर परिणाम होत नाही. मूर्तीतून रामाचे लोभसवाणे पण कणखर व्यक्‍तिमत्व साकार होते. रामाच्या डाव्या हातात धनुष्य, उजव्या हातात बाण व डोक्यावर मुकुट असून प्रत्यंचा सरळ रेषेत ताण दिल्यासारखी बरोबर वाटते.
 
शांतिनाथ दिगंबर जैन मंदिर
देवळाली येथे शांतिनाथांची, भारतातील एकमेव ५१ इंची, पद्‍मासनी, पंचधातुची मूर्ती, त्याखेरीज ५ फ़ुटी, खड्‍गासनी श्री आठ बलभद्राजींची मूर्ती, इंद्रसभा, राजसभा, जन्मकल्याण, शोभायात्रा, इत्यादी सुशोभित दालने. पैकी इंद्रसभेतील काचकाम सुंदर व आकर्षण आहे.
 
खंडोबा मंदिर
देवळाली कॅम्प विभागात असुन. पार्किंगची सुविधा आहे. पायथ्याशीच सुंदर हिरवेगार उद्यान. तेथुन १०० पायर्‍या चढुन टेकडीवर जावे लागते. टेकडीवर डोंगरातील यांत्रिक धबधबा, सूर्यादय-सुर्यास्ताचे कृत्रिम दृश्य छान वाटते. येथेच खंडोबाचे जुळे मंदिर असून दोन्ही घुमटाकृती छताचे आहेत. खंडोबाची मोठी मुर्ती व बाणा‌ई-म्हाळसाची मूर्ती आहे. नंदि मूर्तीही आहे. मंदिराची गोलाकार रचना वेगळी वाटते. टेकडीतून देवळातीचा परिसर, लष्करी रस्ते, थर्मल पॉवर स्टेशन, इत्यादी दिसते.
 
Edited By- Ratnadeep Ranshoor