1. मराठी बातम्या
  2. लोकसभा निवडणूक २०२४
  3. लोकसभा निवडणूक २०२४ बातम्या
Written By
Last Modified: शुक्रवार, 19 एप्रिल 2024 (09:12 IST)

विद्यमान खासदार रणजीतसिंह नाईक निंबाळकर यांना उमेदवारी जाहीर

Lok Sabha Election 2024
मुंबई : पश्चिम महाराष्ट्रातील माढा लोकसभा मतदारसंघात भाजपाने विद्यमान खासदार रणजीतसिंह नाईक निंबाळकर यांना उमेदवारी जाहीर केली. त्यामुळे नाराज असलेले भाजपाचे नेते धैर्यशील मोहिते पाटील यांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षात प्रवेश करत उमेदवारी मिळवली आहे. त्यामुळे दोघांमध्ये चुरशीची लढत होईल, अशी शक्यता असतानाच आता माढा लोकसभा मतदारसंघात नवा ट्विस्ट आला आहे
 
धैर्यशील मोहिते पाटील यांना उमेदवारी जाहीर झाल्यामुळे दिवंगत ज्येष्ठ नेते गणपतराव देशमुख यांचे नातू डॉ. अनिकेत देशमुख हे नाराज होते. ते आता याच मतदारसंघातून अपक्ष अर्ज दाखल करणार आहेत.
 
अनिकेत देशमुख म्हणाले की, माढा लोकसभेत मागील काही दिवसांपासून ज्या घडामोडी सुरू आहेत, त्यामुळे सांगोल्यातील नागरिकांमध्ये प्रचंड नाराजी आहे. येथे राहणाऱ्या लोकांना राजकीय लोक गृहीत धरून गणपतराव देशमुख यांच्या नावाने साधारण एक लाख मते मिळणार अशी अपेक्षा करत आहेत. पण महाविकास आघाडीने जे काही केले ते दिशाहीन असल्याची, तसेच आपल्यावर अन्याय झाल्याची भावना नागरिकांमध्ये आहे. 
 
महाविकास आघाडीत असल्याने आम्हाला तुमच्याबद्दल चर्चा करायची आहे, असे सांगितले गेले. त्यामुळे आम्ही माढ्यात बैठकीला गेलो. पण चर्चेत आम्हाला एक सांगितलं गेलं आणि बैठकीत दुसरेच ठरले. हा आमच्यासाठी राजकारणातील धडा आहे. यापुढे अशी चूक होणार नाही. त्यामुळे अपक्ष म्हणून निवडणूक लढवावी, असा निर्णय आजच्या बैठकीत घेतला असल्याचे अनिकेत देशमुख यांनी सांगितले.

Edited By - Ratnadeep Ranshoor