1. मराठी बातम्या
  2. लोकसभा निवडणूक २०२४
  3. लोकसभा निवडणूक २०२४ बातम्या
Written By
Last Modified: गुरूवार, 28 मार्च 2024 (15:33 IST)

रामटेक : काँग्रेस उमेदवार रश्मी बर्वेंचं जात प्रमाणपत्र रद्द, कोर्टाचा सुनावणीस नकार, आता पुढे काय?

विदर्भातील महत्त्वाच्या रामटेक लोकसभा मतदारसंघातील काँग्रेस उमेदवार रश्मी बर्वे यांचं जात वैधता प्रमाणपत्र रद्द करण्यात आलं आहे. उमेदवारी अर्ज छाननी प्रक्रियेत जात पडताळणी समितीनं त्यांचं प्रमाणपत्र रद्द केलं.
 
यामुळं महाविकास आघाडीच्या उमेदवार असलेल्या रश्मी बर्वे यांची उमेदवारी आता धोक्यात आली आहे. त्यांची उमेदवारी रद्द झाल्यास त्यांच्या जागी त्यांचे पती श्यामकुमार बर्वे यांना उमेदवारी मिळू शकते.
 
या प्रकरणी रश्मी बर्वे यांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठामध्ये याचिका दाखल केली होती. पण त्यावर तातडीनं सुनावणी घेण्यास कोर्टानं नकार दिला आहे. त्याच्या याचिकेवर आता सोमवारी सुनावणी होणार आहे.
 
विनाकारण बदनामीसाठी अशाप्रकारचे आरोप केले जात असल्याचं बर्वे यांचं म्हणणं आहे.
 
रामटेकमध्ये शिवसेनेचे कृपाल तुमाने हे विद्यमान खासदार होते. पण तरीही महाविकास आघाडीत ही जागा काँग्रेसला देण्यात आली होती. काँग्रेसनं या जागेवरून जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा रश्मी बर्वे यांना उमेदवारी जाहीर केली होती.
 
लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यासाठीच्या उमेदवारीचे अर्ज भरण्याची अंतिम तारीख बुधवारी 27 मार्च रोजी होती. त्यानंतर दाखल झालेल्या उमेदवारी अर्जांची गुरुवारी छाननी करण्यात आली.
 
रामटेक हा लोकसभा मतदारसंघ अनुसूचित जाती (SC)साठी राखीव आहे. त्यासाठी काँग्रेसनं रश्मी बर्वेंचा अर्ज दाखल केला. पण छाननीदरम्यान त्यांचं जात वैधता प्रमाणपत्र रद्द करण्याचा निर्णय जात पडताळणी समितीनं घेतला.
 
सामाजिक न्याय विभागाकडं रश्मी बर्वे यांच्या जात वैधता प्रमाणपत्राच्या विरोधात तक्रार करण्यात आली होती. त्या तक्रारीवरून जात पडताळणी समितीला तपासणीचे आदेश देण्यात आले होते.
 
नेमकं काय घडलंय?
सुरुवातीला जात प्रमाणपत्रक्ष पडताळणी समितीकडे बर्वे यांच्या जातवैधता प्रमाणपत्राशी संबंधित कागदपत्रांची माहिती सुनील साळवेंनी मागवली होती. पण, ही माहिती खासगी असल्याचं सागंत हा अर्ज फेटाळण्यात आला होता.
 
त्यानंतर सुनील साळवे यांनी प्रथम अपीलीय अधिकाऱ्याकडे अर्ज केला तेव्हा त्यांना माहिती देण्यात आली. पण, पूर्ण माहिती मिळाली नाही म्हणत साळवे राज्य माहिती आयुक्तांकडे गेले. यानंतर राज्य माहिती आयुक्तांनी पोलीस अधीक्षकांना चौकशी करण्याचे आदेश दिले.
 
त्यावर मला उत्तर देण्याची संधी द्या अशी मागणी बर्वेंनी माहिती आयुक्तांकडे केली होती. पण, आयुक्तांनी त्यांचा अर्ज फेटाळला. त्यानंतर बर्वे उच्च न्यायालयात गेल्या. त्यावेळी उच्च न्यायालयाने आदेश दिल्यानंतर आयुक्तांनी आदेश मागे घेतले.
 
पण, राज्य शासनाच्या सामाजिक न्याय विभागानं जिल्हा जात पडताळणी समितीला त्यांची कागदपत्र तपासण्याचे आदेश दिले होते.
 
त्यानंतर सुनील साळवेंनी पुन्हा हायकोर्टात धाव घेतली. त्याचबरोबर पारशिवनीच्या वैशाली देविया यांनीही हायकोर्टात याचिका दाखल केली. या याचिकांवर तातडीनं सुनावणी घेण्यास कोर्टानं नकार दिला.
 
या दोन्ही याचिकांनंतर रश्मी बर्वे यांनी कोर्टात कॅव्हिएट दाखल केली.
 
लोकसभा निवडणुकीत काँग्रेसकडून उमेदवारी मिळाल्यामुळंच उमेदवारांनी विनाकारण बदनामी करण्यासाठी हे षडयंत्र रचल्याचा आरोप बर्वे यांनी केला आहे.
 
...तर पतीला उमेदवारी
रश्मी बर्वे यांनी सादर केलेल्या एबी फॉर्मवर दुसऱ्या क्रमांकावर पर्यायी उमेदवार म्हणून त्यांचे पती श्यामकुमार बर्वे यांचं नाव लिहिलं आहे. त्यामुळं रश्मी यांची उमेदवारी रद्द झाल्यास त्यांचे पती उमेदवार असतील.
 
उमेदवारी अर्ज दाखल करत असताना प्रत्येक उमेदवाराला अर्जासोबत एबी फॉर्मवर पर्यायी उमेदवाराचं नावही द्यावं लागत असतं. काही अडचण आल्यास त्या उमेदवाराचा विचार केला जातो.
 
रश्मी बर्वे या कामठी-टेकडी जिल्हा परिषधेच्या माजी अध्यक्ष राहिलेल्या आहेत. 2019 मध्ये पहिल्याच प्रयत्नात त्या निवडून आल्या आणि जिल्हा परिषदेच्या अध्यक्षदेखिल बनल्या होत्या.
 
रामटेकमध्ये काँग्रेस-शिवसेनेचे वर्चस्व
रामटेक हा विदर्भातील एक अत्यंत महत्त्वाचा मतदारसंघ समजला जातो. दरवर्षी नागपूरनंतर याच मतदारसंघाची सर्वाधिक चर्चा झाल्याचं पाहायला मिळत असतं.
 
या मतदारसंघावर कायम काँग्रेसचं वर्चस्व राहिल्याचं पाहायला मिळालं होतं. पण 1999 पासून शिवसेनेनं या वर्चस्वाला तडा देत मतदारसंघात बाजी मारली होती. 1999 आणि 2004 असे सलग दोन वेळा शिवसेनेचे सुबोध मोहिते इथून निवडून आले.
 
2009 मध्ये मुकूल वासनिक यांनी हा मतदारसंघ पुन्हा काँग्रेसला मिळवून दिला. मात्र 2014 आणि 2019 मध्ये कृपाल तुमाने यांच्या माध्यमातून शिवसेनेनं परत याठिकाणी वर्चस्व निर्माण केलं.
 
कृपाल तुमाने शिंदे गटात असून शिवसेनेनं(शिंदे गट) त्यांचं तिकिट मात्र कापलं आहे. त्यांच्या जागी शिवसेनेनं राजू पारवे यांना उमेदवारी जाहीर केली आहे. त्यामुळं शिवसेना शिंदे गट विरुद्ध काँग्रेस असा लढा इथं होणार आहे.
 
आता रश्मी बर्वे यांच्या उमेदवारीबाबत वेगळा तिढा निर्माण झाल्यानंतर पुढची गणितं कशाप्रकारची असतील आणि मतदारसंघात कोणाचं वर्चस्व राहील हे पाहणं रंजक ठरणार आहे.