1. मराठी बातम्या
  2. लोकसभा निवडणूक २०२४
  3. लोकसभा निवडणूक २०२४ बातम्या
Written By
Last Modified: मंगळवार, 16 एप्रिल 2024 (20:12 IST)

सांगली : कोणी उमेदवार दिला जाणार असेल तर मी माघार घ्यायला तयार आहे-विशाल पाटील

vishal patil
सांगली जागा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला सुटली असली तरी जिल्ह्यातील काँग्रेस नेते विशाल पाटील हे निवडणूक लढवण्यावर ठाम असून त्यांनी आज उमेदवारी अर्जही दाखल केला. हा अर्ज दाखल केल्यानंतर प्रसारमाध्यमांशी बोलताना पाटील यांनी महत्त्वाचं वक्तव्य केलं आहे. "सांगलीची जागा काँग्रेसला सुटून या जागेवर काँग्रेसचाच इतर कोणी उमेदवार दिला जाणार असेल तर मी माघार घ्यायला तयार आहे," असं ते म्हणाले.
 
उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर विशाल पाटील यांनी म्हटलं आहे की, "भाषणात बोलताना स्वाभाविकपणे काही भावना उफाळून येतात. काँग्रेसच्या जडणघडणीत आमच्या कुटुंबाचा खूप मोठा वाटा राहिला आहे.

वसंतदादा पाटलांनी या जिल्ह्यात काँग्रेस घराघरात रुजवली. असं असताना या जिल्ह्यात मागच्या आणि आताच्या निवडणुकीतही काँग्रेसचा उमेदवारच दिला जात नसेल, तर जनतेच्या भावना तीव्र होणं स्वाभाविक आहे. काँग्रेसचा उमेदवार मीच असलो पाहिजे, असं काही नाही. त्यामुळेच पहिल्या दिवसापासून मी सांगतोय की, माझ्या उमेदवारीला विरोध करायचा म्हणून तुम्ही काँग्रेसची उमेदवारी घालवणार असाल तर मी थांबायला तयार आहे.

मी आधीच सांगितलं की, राजकारणात येण्यासाठी किंवा पद भोगण्यासाठी मी माझ्या विचारधारेशी कोणत्याही प्रकारचा समझोता करणार नाही. जिल्ह्यातील शिवसेनेच्या नेत्यांनीही माझ्याकडे मेसेज पाठवण्याचा प्रयत्न केला की, तुम्ही आमच्याकडे या. राज्य नेतृत्वाकडून असा कोणताही सल्ला आलेला नाही. मात्र असा सल्ला आला असता तरी आम्ही सांगितलं असतं की आम्ही काँग्रेसच्या विचारधारेवर ठाम आहे आणि पुढेही ठाम राहू," अशा शब्दांत पाटील यांनी आपली भूमिका मांडली.

Edited By - Ratnadeep Ranshoor