शुक्रवार, 22 नोव्हेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. लोकसभा निवडणूक २०२४
  3. लोकसभा निवडणूक २०२४ बातम्या
Written By
Last Modified: शुक्रवार, 15 मार्च 2024 (13:37 IST)

बीडमधून पंकजा मुंडेंना तिकीट, प्रितम मुंडेंना डच्चू; भाजपच्या खेळीची 'ही' आहेत कारणं

pankaja munde
"एवढे दिवस वनवास भोगला आहे. बापरे, म्हटलं वनवास पाचच वर्षांचा असावा या युगात बाबा. जुन्या काळात 14 वर्षांचा वनवास होता, आम्हाला पाच वर्षांचा वनवास पुरे झाला की तुम्हाला अजून पाहिजे? तुम्ही सगळे आहात ना माझ्याबरोबर ?"
भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनी हे वक्तव्य केल्यानंतर दोनच दिवसांत त्यांचा वनवास संपल्याचं भाजपच्या दुसऱ्या यादीतून दिसून आलं. पंकजा मुंडे यांना बीड लोकसभा मतदारसंघातून लोकसभेची उमेदवारी जाहीर करण्यात आली. याआधी बीड लोकसभा मतदारसंघातून खासदार असलेल्या प्रितम मुंडेंना डावलून पंकजा यांना ही उमेदवारी देण्यात आली असल्यामुळे विविध तर्कवितर्क लावले जात आहेत.
 
पंकजा मुंडे यांनी याबाबत बोलताना म्हटलं, “मला लोकसभेची उमेदवारी देण्यात आली आहे. याचा मला आनंद आहे. माझं आणि प्रितमचं कॉम्बिनेशन चांगलं होतं. पण प्रितम यांचं तिकीट कापून मला दिलं त्यामुळे मनात संमिश्र भावना आहेत. आता मी लोकसभेची तयारी करणार आहे.”
 
2019 च्या विधानसभा निवडणूकीत धनंजय मुंडे यांनी पंकजा मुंडे यांचा पराभव केला होता. त्यानंतर झालेल्या विधानपरिषद, राज्यसभेच्या निवडणूकांमध्ये पंकजा मुंडे यांच्या नावाची चर्चा होत होती. पण पक्षाकडून पंकजा यांना संधी दिली गेली नाही.2020 नंतर राष्ट्रीय कार्यकारणीत राष्ट्रीय सचिव पदाची जबाबदारी दिली. त्यानंतर पंकजा यांना मध्यप्रदेश प्रभारी पदाची जबाबदारीही देण्यात आली होती.
 
केंद्रीय नेतृत्वाकडून होत असलेल्या या बदलामुळे पंकजा या राष्ट्रीय राजकारणात जाणार असं चित्र दिसत होतं.पण प्रितम मुंडे यांना डावलून त्याजागी पंकजा मुंडे यांना उमेदवारी दिल्याने अनेक प्रश्न उपस्थित झाले. प्रितम मुंडेंनी डावलून पंकजा यांना उमेदवारी देण्याची कोणती कारणं आहेत?
 
या कारणांसाठी प्रितम मुंडेंना डावललं?
पंकजा मुंडे या 2014 साली परळी विधानसभा मतदारसंघातून निवडून आल्या होत्या. राज्याच्या कॅबिनेट मंत्र्यांमध्ये त्यांना स्थान देण्यात आलं. पण 2019 च्या विधानसभा निवडणूकीत धनंजय मुंडे यांनी पंकजा मुंडे यांचा पराभव केला.पंकजा या राष्ट्रीय पातळीवर काम करत होत्या. पण अनेकदा भाजपच्या वरिष्ठांवर टीका करून पंकजा यांनी नाराजी वियक्त केली होती. त्यानंतर अजित पवार गट भाजपसोबत आला.
बीडमध्ये आता काय होणार? हा प्रश्न असताना धनंजय मुंडे यांनी पंकजा यांच्यासोबतचा वाद संपवण्यासाठी पुढाकार घेतला.
 
पंकजा आणि धनंजय मुंडे हे एकत्र आल्याचे अनेक व्हिडीओ मुंडे भाऊ-बहीणींनी सोशल मिडीयावर पोस्ट केले. बीडमधून आता विधानसभेचे उमेदवार कोण? या प्रश्नावर ‘भाजपच्या वरिष्ठांनी अजित पवार गटाला सोबत घेण्याचा निर्णय घेतला आहे.त्यामुळे बीडमध्ये भविष्यात कोण उमेदवार असेल हे तेच सांगू शकतील.’ असं पंकजा मुंडे म्हणाल्या होत्या. त्यानंतर त्यांनी काही दिवस ब्रेकही घेतला होता.
 
बीड विधानसभा मतदारसंघातून कोण ? त्याचं उत्तर भाजपच्या दुसऱ्या यादीतून समोर आलं. बीडमधून लोकसभेसाठी पंकजा मुंडे आणि विधानसभेसाठी धनंजय मुंडे हे गणित महायुतीने जुळवून आणल्याचं दिसतंय.प्रितम मुंडे या मागची दहा वर्ष बीड लोकसभा मतदारसंघातून खासदार आहेत. पण त्यांच्या कामातून लोकांमध्ये ठसा उमटवता आला नसल्याचं वरिष्ठ पत्रकार सुधीर सुर्यवंशी सांगतात.
 
ते पुढे म्हणतात, “त्यासाठी प्रितम मुंडे यांना मंत्रीमंडळातही स्थान मिळालं नव्हतं. पंकजा या प्रितम मुंडेंपेक्षा अधिक लोकप्रिय आहेत. कोणत्या ना कोणत्या कारणाने त्या सतत चर्चेत असायच्या. त्यांच्यामागे मोठा वंजारी समाज आहे. त्यासाठी पंकजा यांना डावलणं भाजपला शक्य नव्हतं.” त्यामुळे पंकजा यांची निवड करण्यात आली आहे असं वाटतं.2014 च्या निवडणूकीत प्रितम मुंडे सर्वाधिक मतांनी निवडून आल्या होत्या. प्रितम मुंडे यांना 7 लाख मतांची आघाडी मिळाली होती. 2019 च्या निवडणूकीत प्रितम यांना पुन्हा उमेदवारी देण्यात आली. पण मतांमध्ये मोठ्याप्रमाणात घट झालेली बघायला मिळाली.
 
प्रितम मुंडे यांना 2019 साली 1 लाख 68 हजार मतांची आघाडी मिळाली होती. मागच्या काही निवडणूकांमध्ये धनंजय मुंडे आणि पंकजा मुंडे यांच्या संघर्षात ओबीसी मतं ही विभागली गेल्याचं दिसून आलं. अजित पवारांशी युती झाल्यानंतर धनंजय मुंडे आणि पंकजा मुंडे यांच्यातला वाद मिटला.
जर या निवडणूकीत ओबीसी मतांची विभागणी झाली नाही आणि धनंजय आणि पंकजा मुंडे यांनी एकत्र येऊन ही निवडणूक लढली तर भाजपचा विजय निश्चित असेल.या खात्रीमुळे भाजपच्या वरिष्ठांनी पंकजा यांना लोकसभेत निवडून आणण्याचा निर्णय घेतला असू शकतो असं बोललं जातंय.
 
लोकमतचे सहायक संपादक संदीप प्रधान या उमेदवारीबाबत अधिक विश्लेषण करताना म्हणतात, “भाजपचे दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे यांनी पक्षासाठी काम करताना अनेक खस्ता खाल्या आहेत.
पंकजा आणि प्रितम यांना गोपीनाथ मुंडेंचा वारसा असल्याने भाजपने दोघींना पक्षात स्थान मिळावे अशी अपेक्षा होती. त्यांना ते 2014 आणि 2019 च्या निवडणुकीवेळी मिळालंही. पण मोदींचं राजकारण हे घराणेशाहीच्या विरोधातील आहे.
 
‘एक घर , एक पद’ या धोरणानुसार पंकजा किंवा प्रितम या दोघींपैकी एकालाच संधी दिली जाईल असा संदेश या उमेदवारीतून देण्यात आला आहे. जर दोघींची तुलना करायची असेल तर प्रितम यांच्यापेक्षा पंकजा मुंडे यांचं प्रतिनिधित्व अधिक प्रभावशाली आहे. पण अनेकदा पंकजा यांनी वरिष्ठ नेत्यांवर प्रत्यक्ष -अप्रत्यक्ष टीका केली आहे.त्याचबरोबर राज्याच्या राजकारणात ‘मी लोकांच्या मनातील मुख्यमंत्री आहे’ हे वक्तव्य त्यांना भोवलं होतं. या उमेदवारीमुळे राज्याच्या राजकारणातील परतीचे दोर कापले गेले आहे असं म्हणावं लागेल.”
 
कसा आहे पंकजा यांचा राजकीय प्रवास?
पंकजा मुंडे यांची राजकीय सुरूवात अर्थात त्यांचे वडील आणि भाजपचे दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे यांच्या छत्रछायेखाली सुरू झाला. गोपीनाथ मुंडे यांच्यासोबत दौरे करणे, विविध कार्यक्रमांमधून त्या दिसू लागल्या.
2009 साली गोपीनाथ मुंडे बीड लोकसभा मतदारसंघातून लोकसभेवर निवडून गेले. 2009 सालच्या विधानसभा निवडणूकीत परळी विधानसभा मतदारसंघातून पंकजा मुंडे यांना उमेदवारी देण्यात आली. धनंजय मुंडे यामुळे नाराज झाले. पण त्यांची नाराजी दूर करण्यासाठी त्यांना विधानपरिषदेवर संधी देण्यात आली.गोपीनाथ मुंडे असताना धनंजय विरूध्द पंकजा या सुप्त संघर्षाला सुरूवात झाली होती. 2013 साली धनंजय मुंडे यांनी राष्ट्रवादीत प्रवेश केला.
 
गोपीनाथ मुंडेंसाठी तो धक्का होता. 2014 च्या लोकसभा निवडणूकीत गोपीनाथ मुंडे मोठ्या मताधिक्याने निवडून आले. पण त्यानंतर त्यांचं अपघाती निधन झालं. त्यानंतर सर्व जबाबदारी पंकजा मुंडे यांच्यावर येऊन पडली. पंकजा यांच्याकडे गोपीनाथ मुंडेंच्या वारसदार म्हणून बघितलं जाऊ लागलं.
गोपीनाथ मुंडे यांच्या जागी प्रितम मुंडेंना उमेदवारी दिली. तर 2014 च्या विधानसभा निवडणूकीत परळी विधानसभा मतदारसंधातून पंकजा मुंडे विरूद्ध धनंजय मुंडे अशी लढत झाली.
त्यात पंकजा या मोठ्या मताधिक्याने निवडून आल्या. त्यांना राज्याच्या मंत्रीमंडळात महिला बालकल्याण, जलसंधारण आणि ग्रामविकास या खात्याची जबाबदारी मिळाली.या दरम्यान पंकजा या त्यांच्या वक्तव्यांमुळे चर्चेत राहील्या. अनेक वक्तव्य त्यांना भोवली. ‘मी लोकांच्या मनातील मुख्यमंत्री आहे.’ हे वक्तव्य त्यापैकीच एक.
 
पंकजा यांच्या आक्रमक स्वभावामुळे राज्यातील वरिष्ठांशी त्यांचा सुप्त संघर्ष सुरू झाला. वेगवेगळ्या कारणांवरून त्यांनी जाहीरपणे नाराजीही व्यक्त केली आहे.
मंत्री असताना पंकजा मुंडे यांच्यावर चिक्की घोटाळ्याचे गंभीर आरोप झाले होते. पंकजा यांचे भाऊ धनंजय मुंडे यांनी हे खळबळजनक आरोप केले. त्यावर चौकशी समिती स्थापन झाली.काही महिन्यांनी पंकजा यांना ‘क्लिन चिट’ मिळाली. चिक्की घोटाळ्यामुळे पंकजा यांची प्रतिमा मलिन झाली. पक्षाअंतर्गत संघर्ष, मतदारसंघात कामासाठी उपलब्ध नसणे अश्या कारणांमुळे धनंजय मुंडे हे परळीमध्ये पंकजा यांच्यापेक्षा वरचढ ठरत होते. 2019 च्या विधानसभा निवडणुकीत पुन्हा पंकजा विरूध्द धनंजय मुंडे अशी लढत झाली. यात पंकजा मुंडे यांचा पराभव झाला. त्यानंतर मागची पाच वर्ष त्या राष्ट्रीय पातळीवरच्या संघटनात्मक जबाबदाऱ्या पार पाडत आहेत.दरम्यानच्या काळात त्यांनी भाजपच्या केंद्रीय नेतृत्वावरही टीका केली होती. तेव्हा त्या विविध पक्षात प्रवेश करणार असं बोललं जात होतं.‘मी निष्ठेची इतकी लेचीपेची नाही. एकवेळ ऊस तोडायला जाईन पण निष्ठा गहाण टाकणार नाही’ असं विधान पंकजा मुंडेंनी केलं होतं. पाच वर्षांनंतर अखेर त्यांना बीड लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी देण्यात आली आहे.
 
Published By- Priya Dixit