सोमवार, 23 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. लोकसभा निवडणूक 2024
  3. लोकसभा निवडणूक 2024 बातम्या
Written By
Last Modified: मंगळवार, 28 मे 2024 (19:55 IST)

उद्धव ठाकरे वि. एकनाथ शिंदे : 'हे' 13 लोकसभा मतदारसंघ ठरवणार ‘शिवसेना’ कुणाची?

Uddhav Thackeray Vs. Eknath Shinde
लोकसभा निवडणुकीसाठीच्या महाराष्ट्रातील सर्व जागांवर मतदान पार पडलंय. भल्या भल्या राजकीय विश्लेषकांना चक्रावून सोडणारं चित्र महाराष्ट्रात पाहायला मिळेल, असा अंदाज अनेकांचा आहे. किंबहुना, कुठल्या जागेवर कोण जिंकेल, याचा अंदाज बांधणंही कठीण होऊन बसलं आहे. तरी या निवडणुकीत एक मात्र निश्चित ठरणार आहे, ते म्हणजे ‘शिवसेना’ कुणाची?
 
दोन वर्षांपूर्वी एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात शिवसेनेतील 40 आमदारांनी बंड केलं आणि राज्यात भाजपसोबत सत्तेत बसले. एकनाथ शिंदे मुख्यमंत्री बनले. पुढे शिंदेंच्या नेतृत्वातील पक्षाला ‘शिवसेना’ हे नाव आणि ‘धनुष्यबाण’ हे चिन्हही मिळालं.
 
मात्र, माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे कायम दावा करत आले आहेत की, ‘खरी शिवसेना’ आमचीच आहे.
शिवसेनेच्या फुटीनंतर, किंबहुना महाविकास आघाडीच्या स्थापनेनंतरही राज्यव्यापी अशी मोठी निवडणूक झाली नव्हती. त्यामुळे उद्धव ठाकरेंच्या मागे शिवसैनिक आहेत की एकनाथ शिंदेंच्या मागे शिवसैनिक आहेत, हे ठामपणे कळू शकलेलं नाही. त्यामुळे या लोकसभा निवडणुकीच्या निकालातून हे चित्र पहिल्यांदा समोर येईल.
 
शिंदे आणि ठाकरे गट किती जागा लढतायेत?
एकनाथ शिंदे यांची शिवसेना महायुतीत आहे. महायुतीत अजित पवार यांच्या राष्ट्रवादीचा गट आणि भाजपही आहे. भाजपच्या वाट्याला महायुतीत जास्त जागा आल्यात. त्यामागोमाग एकनाथ शिंदेंच्याच पक्षाला जागा मिळाल्या आहेत. एकनाथ शिंदे महाराष्ट्रातील 48 पैकी 15 जागा लढत आहेत.
दुसरीकडे, उद्धव ठाकरे यांची शिवसेना महाविकास आघाडीचा भाग आहे. महाविकास आघाडीत काँग्रेस आणि शरद पवार यांची राष्ट्रवादी काँग्रेसही आहे.
 
महाविकास आघाडीत सर्वात जास्त जागा उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेच्या वाट्यालाच आल्या आहेत. उद्धव ठाकरेंची शिवसेना महाराष्ट्रात 23 जागा लढत आहे.
 
महाराष्ट्रातील 13 जागांवर ‘शिंदे वि. ठाकरे’ लढत
महाराष्ट्रातील अशा 13 जागा आहे, जिथे एकनाथ शिंदे यांची शिवसेना आणि उद्धव ठाकरे यांची शिवसेना एकमेकांसमोर उभे ठाकले आहेत. त्यामुळे किमान या जागांवर तरी शिवसैनिक कुणाच्या पाठीमागे आहेत, हे स्पष्ट होणार आहे.
 
मुंबई आणि ठाणे या दोन जिल्ह्यातील जागा तर शिवसेनेच्या दोन्ही गटांसाठी बालेकिल्लेसदृश आहेत. त्यामुळे इथल्या जागांकडे तर सगळ्यांचं लक्ष आहेच. मात्र, महाराष्ट्रातील इतर जागांवरही, जिथे ठाकरे विरुद्ध शिंदे अशी उमेदवारांची लढत होणार आहे, तिथेही चुरशीचा सामना रंगलेला दिसून येतोय.
आता आपण महाराष्ट्रातील ‘शिंदे विरुद्ध ठाकरे’ लढतीची सविस्तर यादी पाहूया.
 
1) उत्तर पश्चिम मुंबई - रवींद्र वायकर (शिवसेना) विरुद्ध अमोल कीर्तीकर (ठाकरे गट)
2) दक्षिण मध्य मुंबई - राहुल शेवाळे (शिवसेना) विरुद्ध अनिल देसाई (ठाकरे गट)
3) दक्षिण मुंबई - यामिनी जाधव (शिवसेना) विरुद्ध अरविंद सावंत (ठाकरे गट)
4) बुलडाणा - प्रतापराव जाधव (शिवसेना) विरुद्ध नरेंद्र खेडेकर (ठाकरे गट)
5) यवतमाळ - वाशिम राजश्री पाटील (शिवसेना) विरुद्ध संजय देशमुख (ठाकरे गट)
6) हिंगोली - बाबूराव कदम (शिवसेना) विरुद्ध नागेश पाटील आष्टीकर (ठाकरे गट)
7) औरंगाबाद - संदिपान भुमरे (शिवसेना) विरुद्ध चंद्रकांत खैरे (ठाकरे गट)
8) नाशिक - हेमंत गोडसे (शिवसेना) विरुद्ध राजाभाऊ वाजे (ठाकरे गट)
9) शिर्डी - सदााशिव लोखंडे (शिवसेना) विरुद्ध भाऊसाहेब वाकचौरे (ठाकरे गट)
10) मावळ - श्रीरंग बारणे (शिवसेना) विरुद्ध संजोग वाघेरे-पाटील (ठाकरे गट)
11) कल्याण - श्रीकांत शिंदे (शिवसेना) विरुद्ध वैशाली दरेकर (ठाकरे गट)
12) ठाणे - नरेश म्हस्के (शिवसेना) विरुद्ध राजन विचारे (ठाकरे गट)
13) हातकणंगले - धैर्यशील माने (शिवसेना) विरुद्ध सत्यजीत पाटील (ठाकरे गट)
कधीकाळी एकाच पक्षात, शिवसेनेत काम करणारे नेते आता एकमेकांविरुद्ध उभी ठाकली आहेत. तळागाळातला शिवसैनिक कुणाच्या बाजूनं उभा राहतो, हे 4 जून 2024 रोजीच्या निकालातून स्पष्ट होईल.

Published By- Priya Dixit