शुक्रवार, 22 नोव्हेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. विधानसभा निवडणूक 2024
  3. महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2024
Written By
Last Modified: शुक्रवार, 16 ऑगस्ट 2024 (12:34 IST)

निवडणूक आयोग आज करणार विधानसभा निवडणुकांची घोषणा, तारखांकडे महाराष्ट्राचेही लक्ष

election
केंद्रीय निवडणूक आयोगानं शुक्रवारी दुपारी पत्रकार परिषद बोलावली आहे. या पत्रकार परिषदेत आगामी काळातील विधानसभा निवडणुकांची घोषणा केली जाणार आहे. दुपारी तीन वाजता या पत्रकार परिषदेचं आयोजन करण्यात आलं आहे.
 
आगामी काळात देशात महाराष्ट्रासह हरियाणा, झारखंडआणि जम्मू-काश्मीर या चार राज्यांमध्ये निवडणुका होऊ घातल्या आहेत. त्यामुळं नेमक्या कोणत्या राज्यांसाठी निवडणुकांची घोषणा केली जाणार याकडं सर्वांचं लक्ष लागलेलं असेल.
 
महाराष्ट्राच्या विधानसभेच्या कार्यकाळाचा विचार करता नोव्हेंबरपर्यंत सध्याच्या विधानसभेचा कार्यकाळ आहे. त्यापूर्वी नवं सरकार स्थापन होणं अपेक्षित आहे. त्यामुळं ऑक्टोबरमध्ये निवडणुका होण्याची दाट शक्यता आहे.
 
सर्वोच्च न्यायालयानं सप्टेंबर 2024 पर्यंत जम्मू काश्मीरमध्ये निवडणुका घेण्यासाठी सरकारनं पावलं उचलायला हवी असे निर्देश दिले होते. त्या पार्श्वभूमीवर नेमक्या कोणत्या राज्यांच्या निवडणुका जाहीर होणार हे पत्रकार परिषदेत स्पष्ट होईल.
 
त्यामुळं महाराष्ट्रातही आताच निवडणुका होणार की आधी इतर राज्यांची निवडणूक जाहीर होणार याकडं सगळ्यांचं लक्ष असेल.
 
जम्मू काश्मीरसाठी 30 सप्टेंबरपर्यंत मुदत
सुप्रीम कोर्टानं गेल्या वर्षी दिलेल्या एका निर्णयामध्ये निवडणूक आयोगाला जम्मू काश्मीरमध्ये 30 सप्टेंबरपूर्वी निवडणुका घेण्यासाठी पावलं उचलण्याचे निर्देश दिले होते.
 
जम्मू काश्मीरमधून 370 कलम हटवण्याच्या विरोधातील याचिकेवरील सुनावणीदरम्यान सुप्रीम कोर्टानं हा आदेश दिला होता.
लडाखचा केंद्रशासित प्रदेशाचा दर्जा सु्प्रीम कोर्टानं कायम ठेवला होता. त्याचवेळी जम्मू-काश्मीरला वेगळ्या राज्याचा दर्जा बहाल करून त्याठिकाणी निवडणुका घ्याव्यात असं सुप्रीम कोर्टानं म्हटलं होतं.
 
भारतीय निवडणूक आयोगानं 30 सप्टेंबर 2024 पर्यंत जम्मू काश्मीरमध्ये निवडणुका घ्याव्यात असे निर्देश सरन्यायाधीश डी. वाय. चंद्रचूड यांच्या अध्यक्षतेखालील पीठानं दिले होते.
 
महाराष्ट्राच्या तारखांकडे लक्ष
महाराष्ट्र विधानसभेचा सध्याचा कार्यकाळा हा नोव्हेंबरमध्ये संपत आहे. म्हणजे नोव्हेंबर अखेरीस राज्यात नव्या सरकारची स्थापना होणं अपेक्षित आहे.
 
त्यासाठी राज्यात ऑक्टोबर महिन्यात विधानसभेसाठी निवडणुका होतील अशी शक्यता वर्तवण्यात येत होती. त्यामुळं निवडणूक आयोग आज काय घोषणा करणार याकडं राज्याचं लक्ष आहे.
 
राज्यात आगामी काही दिवसांत गणेशोत्सव येऊ घातला आहे. त्या पार्श्वभूमीवर गणेशोत्सवानंतर विधानसभा निवडणुका होतील असाच अंदाज वर्तवण्यात येत होता.
राज्याच्या राजकीय स्थितीचा विचार करता यावेळी राज्यात महाविकास आघाडी आणि महायुती अशी दोन आघाड्यांमध्ये निवडणूक होणार हे जवळपास स्पष्ट आहे.
 
आता काही महिन्यांपूर्वी झालेल्या लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रात लवकर निवडणुका होणार की आधी इतर राज्यांच्या निवडणुका जाहीर केल्या जाणार हे पाहावं लागणार आहे.
महाराष्ट्रातील राजकीय स्थिती
महाराष्ट्रात राजकीय स्थितीचा विचार करता 2019 ते 2024 ही पाच वर्ष एकामागून एक राजकीय धक्के किंबहुना भूकंप देणारी ठरली आहेत.
 
निवडणुकांच्या आधीच्या आघाड्या, नंतरच्या आघाडाच्या, पक्षफुटी, पक्षांवर दावे, निवडणूक आयोग आणि सर्वोच्च न्यायालयातील खटले असं बरंच काही या 5 वर्षांत महाराष्ट्राच्या राजकारणात घडलं आहे.
 
राज्यातील 288 जागांच्या विधानसभेत 2019 च्या निवडणुकीचा विचार करता भाजपनं सर्वाधिक 105 जागा जिंकल्या होत्या. त्यानंतर शिवसेनेनं 56, राष्ट्रवादी काँग्रेसनं 54 तर काँग्रेसनं 44 जागा जिंकल्या होत्या.
पण सर्वाधिक जागा जिंकूनही भाजपला सत्ता स्थापन करता आली नाही. शिवसेनेनं अडीच वर्ष मुख्यमंत्री पदाच्या मागणीवरून भाजपची साथ सोडली. त्यानंतर महाविकास आघाडीचा प्रयोग झाला आणि शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस यांचं एकत्रित सरकार स्थापन झालं.
 
हे सरकार सत्तेत असतानाच शिवसेनेला धक्का देत एकनाथ शिंदेंनी बंड केले. फडणवीसांच्या साथीनं त्यांनी सत्ता स्थापन करत मुख्यमंत्रीपद मिळवलं. त्यानंतर शिवसेना पक्ष आणि चिन्हंही त्यांना मिळालं.
 
त्यानंतर लोकसभेच्या काही महिन्यांपूर्वी अजित पवारांनीही शरद पवारांशी बंड केले. तेही शिंदे-फडणवीस सरकारमध्ये सहभागी झाले. त्यांनाही राष्ट्रवादी पक्ष आणि पक्षचिन्हं मिळालं.
 
आता या सर्व राजकीय गुंतागुंतीच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रात निवडणुका होणार आहेत. त्यामुळं ठरावीक वेळेनुसार ऑक्टोबरमध्येच निवडणुका होणार की लवकर याकडं आता सगळ्यांचं लक्ष आहे.
 
बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.
Published By- Priya Dixit