1. मराठी बातम्या
  2. अर्थजगत
  3. महाराष्ट्र अर्थसंकल्प
Written By
Last Modified: गुरूवार, 9 मार्च 2023 (21:45 IST)

हा फिल गुड फॅक्टर निर्माण करणारा अर्थसंकल्प : अशोक चव्हाण

ashok chouhan
राज्य सरकारचा यंदाचा अर्थसंकल्प आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ‘फिल गुड फॅक्टर’ निर्माण करणारा अर्थसंकल्प आहे. उत्पन्न व खर्चाचा ताळमेळ न ठेवता लोकांना मृगजळ दाखवण्याचा प्रयत्न करण्यात आला असून, लोकप्रिय घोषणांचा पाऊस पाडणारा हा अर्थसंकल्प कितपत प्रत्यक्षात उतरेल, यावर प्रश्नचिन्ह असल्याचे माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी म्हटले आहे.
 
अर्थसंकल्पावर प्रतिक्रिया व्यक्त करताना ते म्हणाले की, उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भाषणाच्या प्रारंभी अनेक ऐतिहासिक वर्षांचा उल्लेख केला. मात्र, सुरुवातीला त्यांना मराठवाडा मुक्तिसंग्रामाच्या अमृतमहोत्सवी वर्षाचा जणू विसर पडला होता. भाषणाच्या शेवटच्या टप्प्यात त्यांनी या वर्षासाठी पुरेसा निधी देऊ, अशी मोघम घोषणा केली. मात्र किती निधी देणार व कोणते कार्यक्रम राबवणार ते स्पष्ट केले नाही. अर्थसंकल्पीय भाषणात अनेक महापुरूष, संत-महात्म्यांची नावे घेण्यात आली. हा केवळ लोकभावनांना हात घालण्याचा प्रयत्न आहे. महापुरूष व संत महात्म्यांची नावे घेण्याऐवजी त्यांच्या विचारधारेचे अनुसरण केले तर ते महाराष्ट्राच्या आणि जनतेच्या अधिक हिताचे ठरेल, असा टोलाही चव्हाण यांनी लगावला.
Edited by : Ratnadeep Ranshoor