मंगळवार, 26 नोव्हेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. अर्थजगत
  3. महाराष्ट्र बजट
Written By
Last Updated : गुरूवार, 3 मार्च 2022 (16:34 IST)

भगतसिंह कोश्यारींच्या भाषणावेळी 'जय शिवाजी'च्या घोषणा, राज्यपाल अभिभाषण न करताच गेले

महाराष्ट्राच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाला आजपासून सुरुवात झाली आहे.
 
राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या भाषणाने अधिवेशनाला सुरुवात झाली. मात्र, राज्यपाल बोलायला उभं राहिल्यानंतर शिवसेनेकडून जोरदार घोषणाबाजी झाली. जय भवानी, जय शिवाजीच्या घोषणा सुरुवातीला दिल्या गेल्या. नंतर गोंधळ, घोषणाबाजी सुरू झाली. त्यातच आपलं भाषण सुरू ठेवण्याचा राज्यपालांनी प्रयत्न केला. मात्र, नंतर ते निघून गेले. अभिभाषणाची प्रत त्यांनी पटलावर ठेवली.
 
त्यानंतर अधिवेशनाचं थेट प्रक्षेपण बंद करण्यात आलं. काही वेळानंतर सभागृहाचं कामकाज पुन्हा सुरू झालं.
 
औरंगाबाद येथे झालेल्या एका कार्यक्रमात राज्यपालांनी शिवाजी महाराज आणि रामदास स्वामी यांच्यातील गुरू शिष्यांच्या नात्याबद्दल विधान केलं होतं. चाणक्य के बिना चंद्रगुप्त को कौन पुछेगा, समर्थ के बिना शिवाजी को कौन पुछेगा, गुरू का बडा महत्त्व होता है, असं विधान त्यांनी केलं होतं. या पार्श्वभूमीवर सत्ताधारी बाकांवरून ही घोषणाबाजी झाली.
 
'राज्यपालांना त्या वक्तव्याबद्दल माफी मागावी लागेल'
छत्रपती शिवाजी महाराज हे आमचं दैवत आहे. त्यांच्याबद्दल अपमानास्पद बोलणं त्याचप्रमाणे महात्मा जोतिबा फुले आणि सावित्रीबाई फुले यांच्याविषयी अपमानास्पद बोलण्याचं धाडस राज्याचे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी कसं केलं? या वक्तव्यांबद्दल त्यांना दिल्ली दरबाराचं समर्थन आहे का? असा प्रश्न काँग्रेस नेते नाना पटोले यांनी उपस्थित केला.
 
त्यांना अशा वक्तव्यांबद्दल माफी मागावी लागेल, असंही पटोले यांनी म्हटलं.
 
पटोले यांना माध्यमांशी बोलताना पुढे म्हटलं की, महाराष्ट्राच्या विधानसभेत वेळ आली तर अशाप्रकारचा प्रस्तावही आणला जाईल. त्याबद्दलची कायदेशीर गोष्टीही आम्ही पाहात आहोत.
 
शिवाजी महाराज, जोतिबा फुलेंबद्दलची आक्षेपार्ह विधानं खपवून घेतली जाणार नाही. त्यामुळे भाजपने त्यांची भूमिका मांडावी, असंही पटोलेंनी म्हटलं.
 
राज्यपाल अभिभाषण सोडून गेल्याबद्दल विचारलेल्या प्रश्नावर नाना पटोले यांनी म्हटलं की, छत्रपती शिवाजी महाराजांचा जयघोष त्यांना सहन होत नाही, असा त्याचा अर्थ असू शकतो.
 
मलिकांच्या राजीनाम्यासाठी विरोधक आक्रमक
दरम्यान, अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी भाजपच्या नेत्यांनी विधीमंडळाच्या पायऱ्यांवर नवाब मलिक यांच्या राजीनाम्यासाठी जोरदार घोषणाबाजी केली आहे.
 
"दाऊद समर्थकांचा राजीनामा जोवर होत नाही, तोवर आमचा संघर्ष सुरूच राहिल," असं विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी म्हटलं आहे.
 
तर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे अधिवेशनासाठी विधीमंडळात पोहचले आहेत.
 
3 मार्च ते 25 मार्च या कालावधीत अर्थसंकल्पीय अधिवेशन होणार आहे. तर, 11 मार्चला राज्याचा अर्थसंकल्प सादर होणार आहे.
 
नवाब मलिकांच्या अटकेसोबतच केंद्रीय यंत्रणांचा वापर, भाजप नेते किरीट सोमय्यांवर झालेले आरोप, केंद्रीय मंत्री नारायण राणे आणि नीतेश राणे यांच्यावरील कारवाई या मुद्द्यांवरही अधिवेशनात गोंधळ होऊ शकतो.
 
राज्यातील वीजेचा प्रश्न, ओबीसी आरक्षण, एसटी कर्मचाऱ्यांचे आंदोलन हे मुद्देही या अधिवेशनात गाजतील.
 
या अर्थसंकल्पीय अधिवेशनात विधानसभा अध्यक्षांची निवड होणार का, याकडेही सर्वांचं लक्ष असेल. नाना पटोले यांनी राजीनामा दिल्यानंतर विधानसभेचं अध्यक्षपद रिक्त आहे.
 
दरम्यान, अधिवेशनाच्या आदल्या दिवशी, म्हणजे बुधवारी (2 मार्च) राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या उपस्थितीत वाय. बी. चव्हाण सेंटरमध्ये राष्ट्रवादीच्या मंत्र्यांची बैठक पार पडली. महाविकास आघाडीच्या नेत्यांची बैठक छगन भुजबळ यांच्या निवासस्थानी झाली. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत ही बैठक पार पडली.
 
भाजपच्या नेत्यांची बैठकही मुंबईत झाली.