बुधवार, 25 डिसेंबर 2024
  1. मनोरंजन
  2. भटकंती
  3. माझा महाराष्ट्र
Written By
Last Updated : शनिवार, 22 जुलै 2017 (12:06 IST)

चिंब भटकंती: ब्रम्हगिरी पर्वत एक साहसी ट्रेक

माझ्या सासारवाडीतील सर्व मंडळींसोबत आम्ही नाशिक त्रिम्बकेश्वर दर्शनासाठी सह कुटुंब अर्थात माझे साडू, सासू सासरे, मेहुनी असे सर्व त्रिम्बकेश्वर ला सकाळी 5 वाजता बस ने पोहोचून गजानन महाराज भक्त निवास मध्ये फ्रेश होऊन साधारणतः 12 वाजता ब्रम्हगिरी पर्वताच्या पायऱ्या जिथे आहेत तिथे जायला निघालो. आधी आम्ही सर्वांनीच चढायचे असा विचार होता पण भक्त निवास च्या गेट वर आलो तेंव्हा सकाळ पासून थोडा थांबलेल्या पावसाने अचानक जोर घेतला. पूर्ण अंग ओले चिंब झाले होते। निवृत्तीनाथ महाराजांच्या मंदिराकडून जाताना तर अक्षरशः नाल्याच्या पाण्याचा प्रवाह आल्या सारखा गुडघ्या पर्यंत पाणी आले होते. अखेर ब्रम्हगिरीच्या पायथ्याशी पोहोचलो. येथून पायऱ्या चालू होतात. ब्रम्हगिरी टॉप पर्यंत साधारणतः ६०० पायऱ्या आहेत. तेथे टपरीवर मस्त गरमा गरम चहा घेतला. पावसाचा जोर पाहता व आमची २-३ वर्षाची लहान मुले असल्याने माझ्या पत्नीने माघार घेतली कारण लहान मुलांना घेऊन इतक्या पावसात चढणे रिस्की वाटले. पण आम्हा दोघांना अर्थात मला आणि माझ्या साडूला ब्रम्हगिरी चढण्याची परवानगी दिली व शुभेच्छा दिल्या.
माझा साडू तसा देव माणूस आठ्वड्यातले 4 दिवस उपवास. सकाळपासून हा कार्यकर्ता केवळ दूध, शेंगदाणे लाडूवरच व सोबत दिलेली राजगिरा लाड़ूची पुडकी असे घेऊन आम्ही सर्वांचा निरोप घेऊन चढाई सुरु केली. मजा येत होती. एक तर आम्ही दुष्काळी मराठवाड्यातले आम्हाला इतका पाऊस अनुभवण्याची सवय नव्हती सोबत हिरवळीने सजलेले डोंगर आणि  समोर दिसणारा विशाल ब्रम्हगिरी पर्वत, त्याच्या कडयातून कोसळणारे झरे, हिरवळ अत्यंत नयमरम्य दृश्य होते. वाटेत ठिकठिकाणी छोटे मोठे मंदिर होते, यात्रेकरूंना बसायला छान सिमेंट काँक्रीटचे बाकडे होते.
ब्रम्हगिरीचा इतिहास: 
आख्यायिकेनुसार गौतमी ऋषी आणि त्यांची पत्नी अहिल्या या पर्वतावर राहत असत. गौतमी ऋषीने भगवान शंकराची तपश्चर्या करून या पर्वतातून गंगा आणली. ज्याला गौतमी नदी या नावाने देखील ओळखले जाते.
 
ब्रम्हगिरी पर्वत हे त्रिम्बकेश्वर च्या पश्चिमेला वसलेले पर्वत ज्याची समुद्रसपाटीपासूनची उंची 1298 मीटर्स आहे.  1908 मध्ये ब्रम्हगिरी पर्वतावर जाण्यासाठी सेठ लालचंद जशोदानंद भम्भानी रा. कराची (सध्या पाकिस्तान) आणि सेठ गणेशदास यांनी 40,000/- रुपये खर्चून या दगडी पायऱ्या बांधल्या होत्या ज्यामुळे पर्वतावर जाणे येणे सोपे झाले.  या डोंगरातून 3 दिशेने पाण्याचा प्रवाह वाहतो पूर्वेकडे वाहत जाऊन पुढे गोदावरी, दक्षिणेकडे वैतरणा तर एक प्रवाह जो पश्चिमेकडे जातो त्याला पश्चिम गंगा जो पुढे चक्रतीर्थ जवळ गोदावरी नदीला मिळतो.
सुरवातीला उत्साहात जसे हा निसर्ग आम्हाला आनंद लुटायला बोलवतोय या जोश मध्ये पाऊस चालू असतांना देखील आम्ही मस्त पटपट पायऱ्या चढत जिथे जिथे संधी मिळेल तिथे या सुंदर पर्वताचे त्यातून वाहणाऱ्या झऱ्याचे व सोबत आमचे सेल्फी मोबाईल मध्ये टिपत होतो. 
बघता बघता आम्ही 1 किलोमीटर आलो असेल. तिथून 1 रस्ता गंगा द्वार, गोरखनाथ गुफा व स्वयंभू महादेव कडे जाते आणि सरळ वर ब्रम्हगिरी कडे. आम्ही ब्रम्हगिरी कडे निघालो. डोंगराच्या जवळ जवळ आलो तसे जवळून झरे, धबधबे पाहता आले. वाटेत एक छोटेसे हनुमान मंदिर होते तिथे दर्शन घेतले. तिथून ब्रम्हगिरी पर्वत आपले  स्वागत करीत आहे अशी कमान होती. पुढे पाहतो तर काय मेटघर किल्ल्याकडे जाणाऱ्या अरुंद पायऱ्या पण दोन्ही बाजूने कठडे होते व ढो ढो पावसामुळे गुडघ्या पर्यंत पाणी आले होते. तिथून खरी मजा अर्थात  परीक्षा सुरु झाली. उपवास असल्यामुळे येणारा थकवा व चप्पल घातल्यामुळे आमच्या साडूने कदरून चप्पल बाजूला सोडली थोडे पाणी व चहा घेऊन आम्ही चढाई सुरु केली. उजव्या बाजूला धबधबा कोसळत होता. व पुढे त्याचे पाणी पायऱ्यांवरून दरीत वाट काढत जात होते. अंग भिजल्यामुळे थंडी वाजत होती पण उत्साह कमी होत नव्हता. मेटघर किल्ला सुरु झाला आणि आमचे स्वागत आपले पूर्वज अर्थात माकडे जे द्वारपाल सारखे आमच्या खिश्याची झडती घेत होते. आणि मग काय राजगिरा लाडू व चिक्कीचे पाकीट त्यांना सापडले आम्ही देखील विरोध न करता त्यांना देऊन टाकले. किल्ला चढतांना त्याच्या उजव्याबाजूला कड्यात कोरलेली शिल्पे व गुफा चढतांना लक्ष वेधून घेत होत्या.  पावसामुळे या वानर राजांनी आपली बैठक या गुफे मध्ये लावली होती. अरुंद पायऱ्या व पावसामुळे त्यावरून वाहणाऱ्या पाण्यातून वाट काढत होतो सोबत पायऱ्या स्टीप असल्याने चढतांना थोडा दम लागत होता. परंतु मागून  काही तरुण हरहर महादेव च्या घोषणा देत आले  आमच्यातही उत्साह आला. आम्ही डोंगराच्या माथ्याजवळ आलो. पाऊस व वारा यामुळे काही टपरी वाल्यांच्या झोपड्या पडल्या होत्या. 2 दिवसातील प्रचंड पाऊस, पूर यामुळे मेन पायऱ्याचा रस्ता वाहून गेला होता. मग आम्ही चिखलातून व निसरड्या वाटेतून सांभाळत डोंगर चढत होतो. प्रचंड वाहणाऱ्या वाऱ्यामुळे व बाजूला दिसणार उताराच्या भीतीमुळे ज्याला 'डाऊनहील फोबिया' म्हणतात माझे साडू घाबरले होते. त्यांचा हात पकडून सपोर्ट देत वर चढलो तर पाहतो काय ब्रम्हगिरी मंदिराकडे जाणारी एकेरी व निसरडी वाट. डोंगराच्या माथ्यावर प्रचंड वारा घोघावत होता. त्यातही मला फोटो काढण्याचा मोह आवरला नाही. माझे साडू थकले होते त्यांनी परत जायचा विचार बोलून दाखवला तेंव्हा एक 7-8 वर्षाची मुलगी मस्त पैकी आपल्या आई वडिलांसोबत चढत होती. त्या चिमुकलीचा हिम्मत, उत्साह पाहून आम्हा दोघांना एक प्रकारची ऊर्जा मिळाली. पुढे निसरड्या वाटेतून दाट धुक्यातून मार्ग काढत उतरत आम्ही ब्रम्हगिरी मंदिर येथे पोहोचलो.  
ब्रम्हगिरी मंदिर येथे गौतम ऋषीचे मंदिर, शंकराची पिंड असून तेथे आम्ही शिव लिंगाचे दर्शन घेतले.तेथे एक कुंड आहे. नंदीच्या मुखातून गंगा वाहते ज्याला गोदावरीचे उगमस्थान मानतात त्याचे पाणी बाटलीत भरले. तेथे गोदावरी गंगेचे देखील मंदिर आहे. त्याचे आम्ही दर्शन घेतले. माझ्या साडूने तेथे पुजाऱ्याच्या म्हणण्यानुसार गोदान पुजा केली परंतु माझा यात विश्वास नसल्याने या सुंदर निसर्गाचे सौंदर्य पाहण्यात मी मग्न होतो. सभोवतालच्या सह्याद्रीच्या पर्वताच्या रांगा, दाटलेले धुके, खोल दऱ्या कड्या जवळ उभे असतांना  वाहणाऱ्या वाऱ्यामुळे झऱ्याचे पाणी अंगावर उडत होते.  आम्ही मस्त चहा घेऊन परतीकडे निघालो. हा रास्ता थोडा पुढे डोंगराला वळसा घालून एक  मंदिर आहे तिथून माथ्याकडे जातो. आम्ही डोंगरी पठारावरून जात असतांना कड्या जवळ आलो तेंव्हा वाटेत प्रचंड वाहणाऱ्या वाऱ्यामुळे झऱ्याचे पाणी आमच्या अंगावर उडत असतांना मला आंबोलीतील कावळेशेत  पॉईंट ची आठवण झाली. पुढे माथ्याकडे चढू लागलो तर पावसाने माती ढासळली होती. माझ्या साडूला दरी पाहून चक्कर येऊ लागली त्याला धीर व खांद्यावर आधार देत वर आणले. हॉटेलवर थोडा फराळ व चहा घेऊन आम्ही खाली उतरू लागलो. वाटेत अनेक भाविक होते त्यांना शुभेच्छा देत मस्त पावसाचा आनंद घेत ओलेचिंब अंगाने 3 वाजता पायथ्याशी आलो. निवृत्तीनाथ महाराज यांच्या समाधीचे दर्शन घेऊन दुसऱ्या दिवशी सहकुटुंब त्रिम्बकेश्वर मंदिराचे दर्शन घेतले. पावसामुळं पत्नी व माझ्या चिमुकल्या मुलींना ब्रम्हगिरी पर्वतावर नेऊ शकलो नाही. पण पुढे नक्कीच येईल. 
 
डॉ पवन सत्यनारायण चांडक