शुक्रवार, 10 जानेवारी 2025
  1. मनोरंजन
  2. भटकंती
  3. माझा महाराष्ट्र
Written By

नर्मदेच्या तीरावरचे 'महेश्वर'

महेश्वर हे मराठी मनांसाठी अभिमानस्पद असं गाव आहे. मध्य प्रदेशात नर्मदेच्या किनारी वसलेल्या या गावातच अहिल्याबाई होळकर यांची राजधानी होती. इथे बसूनच त्यांनी माळव्यातील मराठी दौलतीचा कारभार हाकला. पण त्याचबरोबर सम्राट कार्तवीर्य अर्जुन याची राजधानी म्हणूनही महिष्मती अर्थात महेश्वरची ओळख आहे. पहाण्यासारखं इथे बरंच काही आहे. किल्ला, मंदिरे, नर्मदेचा किनारा आणि महेश्वरी साड्या हे येथे येण्याचे आकर्षण बिंदू आहेत.

महेश्वरला कवेत घेऊन नर्मदा येथून जाते. या नदीवर बांधलेले घाट देखणे आहेत. पेशवा घाट, फणसे घाट, अहिल्या घाट हे प्रसिद्ध घाट आहेत. या घाटावर फारशी लगबग दिसत नाही. नदीच्या एकाच बाजूला घाट असल्याने तिथे बसून पलीकडचे ग्रामीण जीवन अतिशय छानपैकी बघता येते.

राजगादी आणि राजवाडा
नर्मदेच्या तीरावरच किल्ला आहे. त्यातील राजगादीवर अहिल्याबाईंची मूर्ती आहे. ही राजगादी पाहिल्यावर तो सगळा काळ जिवंत होऊन आपल्यासमोर ठाकतो. या किल्ल्यावरूनच संथ वाहत जाणार्‍या नर्मदेचे धीरगंभीर पात्र दिसते. याच किल्ल्यात महेश्वरी साड्या तयार करण्याची केंद्रे आहेत. या विणकरांना अहिल्याबाईंनी त्यावेळी सूरत वगैरे शहरातून बोलवले होते. त्यांच्या पुढच्या पिढ्याही येथे हेच काम करत आहेत. किल्ल्यातील छोट्या मंदिरातूनच येथील प्रसिद्ध दसरा उत्सवाची सुरवात केली जाते.

मंदिरे
महेश्वरातील मंदिरेही प्रसिद्ध आहेत. कालेश्वर, राजराजेश्वर, विठ्ठलेश्वर व अहिल्येश्वर ही मंदिरे खासकरून पाहण्यासारखी आहेत. मंदिरावरची नक्षी, त्यामागील कल्पना या सगळ्या गोष्टी खरोखरच देखण्या आहेत. अहिल्याबाई या जनतेप्रती कनवाळू व गुन्हेगारांप्रती कठोर शासक म्हणून प्रसिद्ध होता. आपल्या मुलालाही त्याच्या गुन्ह्याबद्दल त्यांनी हत्तीच्या पायी देऊन मारले होते, अशी कथा आहे. त्याचे मंदिरही येथे उभारण्यात आले आहे.

कसे पोहोचाल?
हवाई मार्ग- महेश्वरला यायला जवळचे विमानतळ इंदूर आहे.
रस्ता मार्ग- इंदूरहून येथे दोन मार्गांनी येता येते. त्यामुळे दोन मार्गांनी हे ७७ व ९९ किलोमीटर आहे. मुंबई आग्रा महामार्गावर धामणोदपासूनही येथे येण्यासाठी फाटा आहे. याशिवाय इंदूर खांडवा मार्गावर असलेल्या बडवाह येथूनही महेश्वरसाठी फाटा आहे.
रेल्वे मार्ग- महेश्वरसाठी बडवाह हे जवळचे रेल्वे ठिकाण आहे. इंदूर खांडवा या छोट्या लाईनवर बडवाह आहे.
जुलै ते मार्चपर्यंतचा काळ येथे येण्यासाठी उपयुक्त आहे.
रहाण्याची व्यवस्था- येथे गेस्ट हाऊस, रेस्ट हाऊस, धर्मशाळा आहेत.