1. मनोरंजन
  2. भटकंती
  3. माझा महाराष्ट्र
Written By
Last Updated : गुरूवार, 11 जुलै 2024 (08:42 IST)

नळदुर्ग : स्वराज्याबाहेरचा सगळ्यांत मोठा 'मिश्रदुर्ग'

Naldurg
DHARASHIV DISTRICT OFFICE
मराठवाडा म्हटलं की कमी पाऊस, शेतकरी आत्महत्या, योजनांचा आणि निधीचा अनुशेष असं साधारण चित्र अनेकांच्या डोळ्यासमोर येतं पण तुम्हाला माहितीय का की प्राचीन काळी युरोपसोबत होणाऱ्या व्यापाराचं मराठवाडा हे एक महत्त्वाचं केंद्र होतं.
 
मराठवाड्यातल्या तेर, पैठण, भोकरदन अशा छोट्या छोट्या शहरांमधला माल सह्य्राद्रीच्या नाणेघाटातून नालासोपारा बंदरात जाई आणि तिथून जहाजाद्वारे तो माल युरोपात पोहोचवला जात असे.
 
दक्षिण भारत ते युरोप व्हाया मराठवाडा अशा या प्राचीन काळातील व्यापारी मार्गाला संरक्षित करण्यासाठी या रस्त्यावर अनेक महत्त्वाचे किल्ले बांधले गेले.
 
सुमारे दोन हजार वर्षांपासून विविध राजवंशांनी मराठवाड्याच्या या भूमीवर राज्य केलं आणि त्यामुळेच मराठवाड्यातल्या उस्मानाबाद जिल्ह्यात अनेक महत्त्वपूर्ण किल्ले बांधले गेले.
 
मराठवाड्याच्या रणरणत्या उन्हात कधी साम्राज्याचं रक्षण करण्यासाठी तर कधी रयतेला रसदेची वानवा जाणवू नये म्हणून नळदुर्ग, परंडा, औसा, उदगीर, रामदुर्ग हे किल्ले कणखरपणे उभे होते.
 
नळदुर्ग हा महाराष्ट्रातील सगळ्यांत मोठा मिश्रदुर्ग आहे.
 
नळदुर्ग आणि रणमंडळ अशा दोन किल्ल्यांना जोडून बनवण्यात आलेला हा किल्ला अत्यंत वैशिष्ट्यपूर्ण आहे. कारण या किल्ल्यात केलेलं पाण्याचं व्यवस्थापन आणि त्यातून किल्ल्याच्या शासकांनी आजूबाजूच्या प्रदेशावर मिळवलेलं नियंत्रण हा खरोखर अभ्यास करण्याजोगा विषय आहे.
 
नळदुर्ग हा तिन्ही बाजुंनी पाण्याने वेढलेला असून या किल्ल्याच्या चौथ्या बाजूला खोल दरी आहे.
 
नळदुर्ग ज्या डोंगरावर बांधला गेलाय त्या डोंगराला चारही बाजूंनी इतर डोंगरांचं संरक्षण आहे आणि म्हणूनच नळदुर्गच्या अतिशय जवळ गेल्याशिवाय हा किल्ला दिसतच नाही.
 
सुमारे तीन किलोमीटरवर पसरलेल्या या विस्तीर्ण किल्ल्यात असलेला पाणीमहाल अत्यंत प्रेक्षणीय आहे.
 
किल्ल्याजवळून वाहणाऱ्या बोरी नदीचं संपूर्ण पात्र वळवून त्याचा उपयोग किल्ल्याच्या रक्षणासाठी केला गेलाय. पावसाळ्यात पाऊस झाला की या किल्ल्यातले वेगवेगळ्या रंगांचे नर-मादी धबधबे पाहायला पर्यटकांची प्रचंड गर्दी होते.
नळदुर्ग आणि रणमंडळ या दोन किल्ल्यांना जोडून हा किल्ला बनवला असल्यामुळे अनेकजण याला जोडकिल्ला असंही म्हणतात.
 
किल्ल्याच्या सुरक्षिततेसाठी तटबंदी उभारली असून या किल्ल्यात एकूण 114 बुरुजही आहेत.
 
परांडा, उपळी, संग्राम आणि नवबुरुज ही नळदुर्गच्या काही मुख्य बुरुजांची नावं. यापैकी उपळी बुरुजावर तीन तोफा ठेवण्याची प्रशस्त जागा असून किल्ल्यातलं हे सगळ्यांत उंच ठिकाण आहे.
 
किल्ल्यात प्रवेश करण्यासाठी हुलमुख दरवाजा हा मुख्य दरवाजा आहे. नळदुर्गच्या किल्ल्याची रचनाच शत्रूला चकवा देण्यासाठी केली गेलीय हे या गडाच्या दरवाजावरूनच कळतं.
 
तुम्ही सुरुवातीला एका दरवाज्यासारख्या दिसणाऱ्या प्रवेशद्वारात जाता तेंव्हा तुम्हाला कळतं की हा गडाचा मुख्य दरवाजा नसून हा केवळ एक चकवा आहे.
 
काही वळणं घेतल्यानंतर किल्ल्याचं मुख्य प्रवेशद्वार नजरेस पडतं आणि मग सुरु होतो रहस्यमयी नळदुर्गची एकेक गुपितं उलगडण्याचा अतिशय रंजक प्रवास.
 
नळदुर्ग हे नाव कसं पडलं?
पौराणिक काळातील नळ आणि दमयंती यांच्याशी या किल्ल्याचा संबंध जोडला जातो. 'तारीख ए फरिश्ता' या ग्रंथामध्ये हा किल्ला राज 'नळ' याने बांधला असा उल्लेख करण्यात आलेला आहे. यावरूनच या किल्ल्याला नळदुर्ग असं नाव मिळालं.
 
इतिहासकार आणि अभ्यासक जयराज खोचरे असं सांगतात की नळदुर्ग या शहराचं जुनं नाव मैलारपूर असं आहे.
 
मैलार म्हणजे खंडोबा. तेलुगू भाषेत 'नल्ला' म्हणजे काळा आणि 'दुर्ग' म्हणजे किल्ला. याचनुसार काळ्या कातळापासून बनलेल्या या किल्ल्याला 'नळदुर्ग' असं नाव पडलं असल्याचीही दाट शक्यता आहे.
 
आदिलशाहीमध्ये या किल्ल्याला शाहदुर्ग असं नाव ठेवलं गेलं असलं तरी हे नाव काही प्रचलित होऊ शकलं नाही.
 
चालुक्य, बहामनी, निजामशाही, आदिलशाही, मोगल, मराठे आणि इंग्रजांची सत्ता पाहिलेला हा नळदुर्ग स्वतंत्र भारतातही अत्यंत कणखरपणे उभा आहे.
 
नळदुर्ग किल्ल्याचा इतिहास
'दुर्ग नळदुर्ग' या पुस्तकात नळदुर्ग किल्ल्याच्या इतिहासाबाबत जयराज खोचरे असं लिहितात की, बहामनी काळात इसवीसन 1351 ते 1480 या काळात मातीच्या किल्ल्याची पुनर्बांधणी करण्यात आली.
 
मातीची जागा दगडाने घेतली आणि नळदुर्गचा हा किल्ला भरभक्कम बनला. याच किल्ल्याला लागून एक जुना रणमंडळ नावाचा एक किल्लाही आहे.
 
इसवीसन 1481 मध्ये विजापूरच्या आदिलशहाने नळदुर्ग किल्ला जिंकला.
 
पुढे 1558 मध्ये आदिलशहाने या किल्ल्याला दगडी चिऱ्यांची मजबूत तटबंदी बांधली आणि दुसऱ्या इब्राहिम आदिलशहाने इसवीसन 1613 मध्ये बोरी नदीवर बंधारा बांधून पाणीमहालाचे काम हाती घेतले. यामुळेच नळदुर्ग आणि रणमंडळ हे किल्ले एकमेकांशी जोडले गेले.
 
इसवीसन 1676 मध्ये औरंगजेबाने हा किल्ला जिंकून घेतला आणि मुघलांनी या किल्ल्यावर ताबा मिळवला.
 
पुढे 1724 मध्ये मीर कमरुद्दीन उर्फ निजाम-उल-मुल्क आसफजाह' याने मोगलांशी फारकत घेऊन स्वतंत्र सत्ता स्थापन केली आणि नळदुर्ग निजामांच्या ताब्यात आला.
 
1758 मध्ये पेशव्यांनी शिंदखेडच्या तहात हा किल्ला जिंकला होता आणि म्हणून नळदुर्गवर काहीकाळ मराठ्यांची सत्ताही होती. पण पुन्हा एकदा निजामाने हा किल्ला स्वतःच्या ताब्यात घेतला.
 
ईस्ट इंडिया कंपनीच्या कर्जापोटी पुढे 1853 मध्ये निजामाने वऱ्हाड, नळदुर्ग आणि रायचूर हे जिल्हे इंग्रजांना आंदण दिले.
 
1857 मध्ये उठाव झाला आणि तो उठाव मोडीत काढण्यासाठी निजामाने सहकार्य केलं म्हणून इंग्रजांनी नळदुर्ग आणि रायचूर हे दोन किल्ले निजामाला बक्षीस म्हणून दिले.
 
पुढे 1948 मध्ये भारत सरकारने पोलीस ऍक्शन करून हा किल्ला आणि संपूर्ण मराठवाडा निजामाच्या ताब्यातून सोडवला आणि हा भूभाग स्वतंत्र भारतात सामील झाला.
 
पाणीमहल आणि धरण
इब्राहिम आदिलशाह दुसरा याच्या काळात मीर इमादिन या वास्तुशास्त्रज्ञाने हा पाणी महल आणि हे धरण बोरी नदीवर उभं केलंय.
 
याच पाणीमहलात हिजरी 1022 (इसवीसन 1613) मध्ये पर्शियन भाषेत लिहिलेल्या एका लेखावरून या धरणाची विस्तृत माहिती मिळते.
 
पहिल्या अली आदिलशाहने (इसवीसन 1558 ते 79) या धरणाचं बांधकाम सुरु केल्याची माहिती पाणीमहलात असणाऱ्या उल्लेखावरून कळतं. त्यानंतर सुमारे चाळीस वर्षांनी दुसऱ्या इब्राहिम आदिलशाहच्या काळात या धरणाचं बांधकाम पूर्ण झालं.
 
हे धरण केवळ सामरिकदृष्ट्याच महत्त्वाचं नव्हतं तर आदिलशाहीच्या सुलतान आणि इतर मनसबदारांसाठी ही एक आरामाची जागाही होती.
 
धरणाच्या भिंतीत असणाऱ्या पाणीमहलात असणारी कारंजी, पाणी महालाच्या खिडक्यांमधून दोन्ही बाजूंनी दिसणारी जलप्रपाताची मनोहर दृश्य हे सिद्ध करतात.
 
इसवीसन 1520 मध्ये विजयनगर साम्राज्याने आदिलशाहीचा पराभव केल्यानंतर दोन किल्ल्यांना जोडण्यासाठी बांधण्यात आलेलं हे धरण आदिलशाहच्या बचावाच्या योजनेचा एक भाग होता हे सिद्ध होतं.
हे धरण डोळ्यांना जेवढं सुंदर दिसतं तेवढंच मेंदूलाही कामाला लावण्याची ताकद त्यात आहे.
 
मराठवाड्यात होणारा कमी पाऊस पाहता किल्ल्यात राहणाऱ्या सैन्याला आणि रयतेला दुष्काळात पाणी कमी पडू नये यासाठीसुद्धा हे धरण बांधलं होतं.
 
या धरणाचं एकूण क्षेत्रफळ 82,569 स्क्वेअर किलोमीटर आहे आणि विशेष बाब म्हणजे या पठारावर असणाऱ्या शेतीची समुद्रसपाटीपासूनची उंची आणि धरणाची उंची एकच असल्यामुळे शेतीला पाणी पुरवणं देखील अत्यंत सोपं आहे.
 
पाणी अडवण्यासाठी उभारण्यात आलेल्या या धरणाच्या भिंतीत एक अत्यंत हवेशीर पाणी महल बांधलेला आहे.
 
नदीचं पाणी इथे साठलं की याच महालावरून नर व मादी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या सांडव्यातून हे पाणी वाहू लागतं, हे पाणी वाहत असताना या महालाच्या कोणत्याही भागाला पाण्याचा स्पर्शही होत नाही.
 
पाणी महालापर्यंत जाण्यासाठी पायऱ्या आहेत. पाणीमहालाच्या एका भिंतीवर फारशी भाषेत लिहिलेला एक शिलालेख आहे.
 
त्यात लिहिलं आहे -
 
'आजदीदन इ चष्म मुहिब्बान रोशन मीग दर्द व चष्म दुष्मनान गदर्द कूर' त्याचा मराठी अनुवाद 'या महालास मित्रत्वाच्या दृष्टीने पाहिल्यास डोळे दिपून जातील व शत्रुत्वाच्या दृष्टीने पाहिल्यास डोळ्यापुढे अंधकार येईल' असा होतो.
 
जलव्यवस्थापनातून राज्यव्यवस्थापन
प्राचीनकाळी उंचच उंच डोंगरांच्या माथ्यावर किल्ले बांधले जात असतं. पण काळानुसार युद्धाच्या पद्धतीत बदल होत गेले, राजांकडे असलेल्या सैन्याची संख्या वाढत गेली आणि दुर्गमाथ्यावर किल्ले बांधण्याच्या योजनेवर अनेकांना पुनर्विचार करावा लागला.
 
शिखरांच्या माथ्यावर बांधलेल्या किल्ल्यांची रसद बंद केली तर किल्ल्यात असणाऱ्या सैन्याला आणि रयतेला पाण्यासाठी केवळ पावसावर अवलंबून राहावं लागायचं.
 
या पाण्याला साठवण्यासाठी अनेक किल्ल्यांमध्ये बनवलेले पाण्याचे टाके आपण पहिले असतील पण नळदुर्ग याच बाबतीत थोडासा वेगळा आहे.
 
पाण्यावर नियंत्रण ठेवून प्रदेशातल्या शेतीवर आणि पर्यायाने अर्थव्यवस्थेवर कसं नियंत्रण ठेवलं जायचं याचा उत्तम नमुना म्हणजे नळदुर्ग किल्ल्यात केलेलं हे जलव्यवस्थापन.
 
पुरातन काळापासून दख्खनच्या सुलतानांसाठी पवित्र आणि धार्मिक आशय असलेले जलव्यवस्थापन हे एक आवश्यक असे राजकीय साधन होते.
 
त्याकाळातील धरणं ही केवळ पाणी आणि जमिनीवर राजाचं असणारं नियंत्रण दाखवत नव्हती तर धरणांसारख्या अतिशय तांत्रिक बांधकामामध्ये बांधलेला 'पाणीमहल' हे राजाच्या शक्तीचं एक अनोखं प्रतीक म्हणावं लागेल. दक्खनच्या संस्कृतीवर राज्य केलेल्या साम्राज्यांची ही प्रतीकं आहेत.
 
नळदुर्ग हा किल्ला केवळ साम्राज्याच्या संरक्षणासाठी सीमेवर बांधण्यात आलेली एक वास्तू नव्हती ते 'पाणी' या त्याकाळच्या महत्त्वपूर्ण चलनावर नियंत्रण ठेवणारी ती एक अजस्त्र वास्तू होती.
 
आदिलशाहीत हे धरण जरी बांधलं गेलं असलं तरी पुढे निजामशाही आणि नंतर इंग्रजांच्या ताब्यात जाऊनही नळदुर्गच्या धरणाने त्या प्रदेशातील शेतीच्या विकासासाठी किंवा त्या शेतीला जिवंत ठेवण्यासाठी महत्त्वाची भूमिका बजावली.
 
आताची परिस्थिती
अगदी काही वर्षांपूर्वीपर्यंत नळदुर्ग हा अत्यंत दुर्लक्षित किल्ला होता, पण पुढे एका खाजगी कंपनीने या किल्ल्याचं व्यवस्थापन केल्याने लातूर, उस्मानाबाद, सोलापूर जिल्ह्यातील पर्यटकांसाठी नळदुर्ग हे एक आकर्षणाचं केंद्र बनलं आहे.
 
आता किल्ल्यात बगीचे विकसित करण्यात आले आहे, कारंजी बनवली गेलीयत, शौचालय, पर्यटकांना फिरण्याची सोय व्हावी म्हणून इलेक्ट्रिक गाडी, धरणाच्या जलाशयात बोटिंग इत्यादी सोयी करण्यात आल्या आहेत.
अजूनही चांगला पाऊस झाला की प्रवाहित होणाऱ्या नर-मादी धबधब्यांना बघण्यासाठी पर्यटकांची गर्दी होते.
 
नळदुर्गला येणाऱ्या पर्यटकांसाठी या किल्ल्याचं स्थापत्य, इतिहास समजावून सांगणारी पुरेशी यंत्रणा इथे उपलब्ध नाहीयेत.
 
मुंबई-हैद्राबाद महामार्गावर असूनही तुम्हाला रस्त्याने इथे येताना अनेक खड्ड्यांचा सामना करावा लागतो कारण मागच्या दीड दशकापासून या महामार्गाचं काम अतिशय संथ गतीने सुरु आहे.

Published By- Priya Dixit