1. मनोरंजन
  2. भटकंती
  3. माझा महाराष्ट्र
Written By
Last Modified: सोमवार, 20 नोव्हेंबर 2023 (15:00 IST)

नरनाळा : बहामनी राजवट, इमादशाही, निजामशाही, भोसले ते ब्रिटीश... काय आहे या किल्ल्याचा इतिहास?

Narnala qilla
Photo Credit : BBC/NITESH RAUT
गड-किल्ले म्हटलं की, आपल्याला आठवतो तो छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास आणि सह्याद्रीच्या कुशीतले अवघड, अनवट असे किल्ले. पण आज आम्ही तुम्हाला ज्या किल्ल्यावर घेऊन जात आहोत, तो सह्याद्रीच्या कडेकपारीमधला नाही, तर सातपुड्याच्या पर्वतरांगात वसलेला किल्ला आहे.
 
या किल्ल्याच्या इतिहासाशी भोसले राजघराण्याचा इतिहास जोडला गेला आहे, पण हे भोसले म्हणजे ‘नागपूरकर’ भोसले.
 
बहामनी साम्राज्यापासून इमादशाही, निजामशाही, मोगल, नागपूरकर भोसले आणि इंग्रजांची राजवट ज्याने पाहिली असा हा किल्ला.
 
या किल्ल्याचं नाव आहे नरनाळा. विदर्भात असलेल्या अनेक किल्ल्यांपैकी सर्वांत महत्त्वपूर्ण किल्ले म्हणजे सातपुड्यातील गाविलगड आणि नरनाळा. या दोन्ही किल्ल्यांचा इतिहास थोडाफार सारखा आणि एकमेकांना समांतर असाच आहे.
 
पण आज आपण जाणून घेणार आहोत नरनाळा किल्ल्याबद्दल.
 
कोठे आहे हा किल्ला?
अकोला जिल्ह्यातल्या अकोट तालुक्यापासून नरनाळा हा किल्ला 28 किलोमीटर अंतरावर आहे.
 
शहानूर या गावाच्या जवळ पोहोचल्यावरच या किल्ल्याची तटबंदी दिसायला सुरूवात होते.
 
किल्ल्याचा इतिहास
हा किल्ला एक हजार वर्षांपेक्षाही प्राचीन असल्याचं सांगितलं जातं. थेट चालुक्य कालापासून हा किल्ला अस्तित्त्वात आहे, असं मानलं जातं.
 
गोंड राजा नरनाळा सिंग याच्या नावावरून या किल्ल्याचं नाव नरनाळा पडल्याचंही सांगतात. हा किल्ला त्यानंतर वेगवेगळ्या राजवटींकडे हस्तांतरित होत राहिला.
 
पण यासंदर्भात कोणतीही लिखित माहिती नाहीये.
 
गाविलगड आणि नरनाळ्यावर देवगिरीच्या यादवांची सत्ता होती. देवगिरीचा पाडाव झाला आणि हा किल्ला खिलजीच्या ताब्यात आला.
 
त्यानंतर बहामनी साम्राज्य, बहामनी सल्तनतीचे तुकडे पडल्यानंतर वऱ्हाडली इमादशाही, मग मुघल, त्यानंतर निजाम, नागपूरकर भोसले आणि शेवटी ब्रिटीशांच्या ताब्यात हा किल्ला गेला.
 
दुर्गप्रेमी आणि गडकिल्ल्यांचे अभ्यासक अमित सामंत सांगतात की, या नरनाळा किल्ल्याचा ऐतिहासिक कागदपत्रातील पहिला उल्लेख ‘तारिख-ए-फरिश्ता’ या ग्रंथात आढळतो.
 
अमित सामंत यांनी बीबीसी मराठीशी बोलताना हा किल्ला कसा कसा हस्तांतरित होत गेला हे सांगितलं.
 
त्यानंतर या किल्ल्याची दुरुस्ती बहामनी साम्राज्याचा नववा राजा अहमदशहा वली यानं इसवी सन 1425 मध्ये केल्याचा उल्लेख आहे.
 
बहामनी साम्राज्याचा सुभेदार फतेउल्लाह इमाद उलमुल्क याने 1488 मध्ये नरनाळा किल्ल्याची दुरुस्ती केल्याचा उल्लेख आहे.
 
बहामनी साम्राज्याच्या विघटनानंतर इमादशाही, बरीदशाही, आदिलशाही, निजामशाही आणि कुतुबशाही अशा पाच शाह्या दख्खनमध्ये अस्तित्वात आल्या. फतेउल्लाह इमाद उलमुल्क याने इमादशाहीची स्थापना केली. वऱ्हाड प्रांतावर त्यांचं जवळपास 90 वर्षं राज्य होतं.
 
या पाचही सत्तांमध्ये सतत सुरू असलेल्या संघर्षात 1572 मध्ये गाविलगड आणि नरनाळा हे दोन्ही किल्ले निजामशाहीत सामिल झाले.
 
हा किल्ला निजामाकडे गेला कसा याची एक गोष्ट सांगितली जाते.
 
इमादशहाचा मुख्य प्रधान तुफालखानने इमादशाही बळकावली. 1572 मध्ये तुफालखान आणि मूर्तिजा निजामशाह यांच्यात युद्ध सुरू झालं. या युद्धात निजामाची सरशी होताना दिसली, तसा इमादशहा नरनाळा किल्ल्याच्या आश्रयाला गेला. निजामाने किल्ल्याला वेढा घातला, पण किल्ला हाती येईना.
 
याच दरम्यान तुफालखानसाठी घोडे आणि काही युद्ध सामुग्री घेऊन एक अफगाण व्यापारी तिथे आला. निजामाने या व्यापाऱ्याला आपल्याकडं वळवलं आणि त्याच्यासोबत काही सैनिक आतमध्ये पाठवले. व्यापारी आतमध्ये पोहोचताच आतून आणि बाहेरून एकाचवेळी तुफालखानवर हल्ला झाला आणि हा किल्ला निजामाकडे आला.
 
अर्थात, ही एक कथा... इतिहासात केवळ निजाम आणि इमादशाहीचा संघर्ष झाला आणि नरनाळा निजामाच्या ताब्यात गेल्याचा उल्लेख आहे, असं अमित सामंत म्हणतात.
 
मुघल, निजाम, भोसले ते ब्रिटीश
त्यानंतर हा किल्ला काही काळ मुघलांकडे तर पुन्हा काही काळ निजामांकडे जात राहिला. मुघलांच्या ताब्यात असलेला हा किल्ला मलिक अंबरने निजामशाहीत आणला. शहाजहानच्या काळात तो पुन्हा मुघलांकडे गेला.
 
त्यानंतर इसवी सन 1738 मध्ये रघूजी भोसले यांनी नरनाळा आपल्या ताब्यात घेतला. पण हे किल्ले पुन्हा निजामाच्या ताब्यात गेले.
 
निजाम आणि पेशवे यांच्यातल्या भांडणाचा फायदा घेऊन मुधोजी राजे भोसलेंनी 1752 मध्ये नरनाळ्याच्या जवळचा गाविलगड जिंकून घेतला.
 
1803 मध्ये लॉर्ड वेलस्ली आणि भोसल्यांचे किल्लेदार बेनिसिंग यांच्यात गाविलगडावर लढाई झाली. यात ब्रिटीशांची सरशी झाली.
 
18 डिसेंबर 1803 ला ब्रिटीश आणि भोसले यांच्यात झालेल्या तहानुसार गाविलगड आणि सोबतच नरनाळा हे दोन्ही किल्ले ब्रिटीशांकडे गेले.
 
सध्या हा किल्ला मेळघाट व्याघ्रप्रकल्पांतर्गत येतो.
 
कोण होते नागपूरकर भोसले?
मुधोजी आणि रुपाजी हे या घराण्यातील पहिले ज्ञात पुरुष. त्यांनी हिंगणी इथे जहागिरी खरेदी केली. त्यामुळे त्यांना हिंगणीकर असेही म्हणायचे. मुधोजी यांच्या मुलांपैकी परसोजी हे शिवाजी महाराजांच्या सेवेत होते.
 
पुढे राजाराम महाराजांनी परसोजींच्या अखत्यारिखाली गोंडवन, देवगढ, चांदा आणि वऱ्हाड हे प्रदेश दिले. (इसवी सन 1699). भोसले घराण्याला राजे व सेनासाहेब सुभा असा किताबही देण्यात आला होता.
 
रघोजी राजे भोसले हे या घराण्यातील सर्वांत नावाजलेले. शाहू महाराजांनी त्यांना बंगाल, बिहार, ओडिसा इथल्या चौथाई-सरदेशमुखीचे अधिकार दिले होते. (इसवी सन 1738) त्यांनी बंगालचा नवाब अलीवर्दीखान आणि मराठ्यांच्यात तह घडवून आणला होता.
 
त्यांनीच आपली राजधानी नागपूरला हलवली होती. त्यांच्या ताब्यात वऱ्हाडपासून कटकपर्यंतचा मुलूख होता, नरनाळा, गाविलगड, माणिकदुर्ग हे किल्ले त्यांच्या ताब्यात होते.
 
रघोजी राजे भोसले (दुसरे) याच्या कारकिर्दीत ब्रिटीशांसोबत झालेल्या लढाईत गाविलगड, नरनाळा हे किल्ले त्यांच्याकडून गेले. वऱ्हाड प्रांतही निजामाला दिला गेला. भोसल्यांचे स्वतंत्र अस्तित्त्व संपुष्टात आले.
 
किल्ल्याची रचना
दुर्गप्रेमी डॉ. जयंत वडतकर यांनी 'सातपुड्यातील किल्ले' हे पुस्तक लिहिले आहे. यात त्यांनी नरनाळा किल्ल्याबद्दल माहिती दिली आहे.
 
डॉ. वडतकर यांनी आपल्या पुस्तकात किल्ल्याच्या रचनेबद्दल सविस्तरपणे माहिती दिली आहे.
 
सातपुडा पर्वतरांगेमध्ये दोन बाजूंनी उंच व अभेद्कडे असलेल्या उंच आणि सपाट पठाराच्या नैसर्गिक तटबंदीचा उपयोग करून हा किल्ला बांधला गेल्याचं त्यांनी म्हटलं आहे.
 
समुद्रसपाटीपासून 3161 फूट उंचीवर हा किल्ला आहे. साधारणतः 392 एकरवर पसरलेल्या या किल्ल्याची तटबंदी 24 मैल इतकी आहे.
 
 
या तटबंदीमध्ये एकूण 67 बुरूज असून त्यांपैकी 11 बुरूज हे महत्त्वाचे आहेत. त्यातही खुनी बुरूज आणि तेलिया बुरूज हे विशेष प्रसिद्ध. खुनी बुरूजाचा उपयोग हा गुन्हेगारांचा कडेलोट करण्यासाठी या बुरूजाचा चौथरा वापरला जायचा. कदाचित त्यामुळेच हे नाव पडलं असावं.
 
किल्ल्यावर पोहोचल्यावर पहिला दरवाजा हा अकोट दरवाजा. तो शेर दरवाजा म्हणूनही ओळखला जातो. हा दरवाजा किल्ल्याच्या दक्षिणेकडील भागाचे पहिले प्रवेशद्वार असून दरवाज्याविषयी ब्रिटीश पुरातत्व अधिकारी हेन्री कौसिन्स यांनी आपल्या 1907 च्या अहवालात हा दरवाजा मोगल काळापूर्वीचा, गोंड कालीन किंवा त्याही पूर्वीचा असल्याचा उल्लेख आहे.
 
मात्र लिखित पुराव्यांनुसार या बहामनी सत्तेचा नववा सुलतान अहमदशहा वली याने इसवी सन 1425 मध्ये आपल्या एलिचपूर मुक्कामादरम्यान या किल्ल्याची दुरुस्ती करून घेतली.
 
अकोट दरवाजासह किल्ल्यावर लहानमोठे असे एकूण 22 दरवाजेही आहेत.
 
स्थापत्यकलेच्या दृष्टिने दरवाजे आणि बुरूजांसोबतच या किल्ल्याचं अजून एक वैशिष्ट्य म्हणजे पाणीपुरवठ्यासाठी बांधण्यात आलेले तलाव. या तलावांपैकी इमली तलाव, धोबी तलाव, रामतलाव, मोदी तलाव, सक्कर तलाव, सागर तलाव यांमध्ये उन्हाळ्यांतही पाणी असतं.
 
या तलावांसोबतच किल्ल्यावर उभारलेली पाणीपुरवठा व्यवस्था व पाणी साठवण प्रणालीही वैशिष्ट्यपूर्ण होती. खापरी नळ्यांपासून उभारण्यात आलेल्या पाणीपुरवठा योजनेचे आणि पाणी साठवण पद्धतीचे अनेक अवशेष किल्ल्यात पाहायला मिळतात.
 
दरबार हॉल ही किल्ल्यावरील सर्वांत मोठी, उंच आणि अजूनही सुस्थितीत असलेली इमारत आहे. ही वास्तू अंबा महल, अंबर महल किंवा बारादारी या नावांनीही ओळखली जाते. याच महालाच्या जवळ किल्ल्यावर एक मशीदही आहे. या मशिदीची ओळख औरंगजेब मस्जिद अशी असून त्याच नावाने तिचा उल्लेख जेम्स मुल्हारेनच्या रिपोर्टमध्येही आहे.
 
या अंबरमहालाच्या समोर बुऱ्हानुद्दिन अवलियाची कबर असून त्याला ‘कुत्तरदेव’ म्हणून पण ओळखलं जातं. या विचित्र नावाची कथाही विशेष आहे. कुत्रा चावल्यावर या कबरीचं दर्शन घेऊन सक्कर तलावात अंघोळ केल्यावर रोगी बरा होतो, असा समज आहे.
 
या तलावांच्या परिसरामध्ये भोसलेकालीन बगीच्याच्याही खुणा आहेत. विटा-चुन्याने बांधलेली वृंदावनं, म्हसोबाचा ओटा, दुर्गामाता मूर्ती, हनुमानाची मूर्ती, शिवलिंगही इथे पाहायला मिळतात. एका चौथऱ्यावर शेंदूर लावलेली मूर्ती जी म्हसोबाचा ओटा म्हणून ओळखली जाते आहे, इथं सर्पदंशावर उपचार करण्यासाठी पूजाअर्चा केली जायची असं म्हणतात.
 
या किल्ल्यावर भव्य अशी नौगज नावाची तोफ आहे. वीस फुटांहून अधिक लांब आणि अडीच मीटर घेर असलेली ही तोफ 1685 मध्ये नरनाळा किल्ल्यावर आणली होती. ही माहिती या तोफेवरच आहे. याखेरीजही दोन तोफा किल्ल्यावर आहेत.
 
एकूणच हा सगळा पसारा पाहायचा म्हटला तर संपूर्ण दिवस मोडतोच.
 
एरव्ही ट्रेकिंग म्हटलं की, सह्याद्रीतल्या किल्ल्यांकडेच पावलं वळतात. पण अनेक हौशी गिरीप्रेमी वाट वाकडी करून विदर्भातल्या या किल्ल्यालाही आवर्जून भेट देतात.
 
सध्या हा किल्ला पुराततत्व विभागाच्या अखत्यारित आहे. त्याचबरोबर तो अभयारण्य क्षेत्रातही येतो. त्यामुळे इथे फिरताना काही बंधनं नक्कीच येतात. पण कदाचित त्यामुळे किल्ल्याचं जतन होण्यास मदतही होऊ शकते.
 



































Published By- Priya Dixit