मंगळवार, 7 जानेवारी 2025
  1. लाईफस्टाईल
  2. »
  3. वेबदुनिया विशेष 08
  4. »
  5. महाराष्ट्र दिन
Written By वेबदुनिया|

माय मराठी

सीताराम काशीनाथ देव

कोटि कोटि प्रणति तु्झ्या चरण तळवटीं,
जय, जय, जय, जय विजये ! माय मराठी! धृ.

पुत्र तुझे आम्ही नित सेवणें तुला,
दिग्विजया नच तुझिया साजते तुला,
मान आर्य संस्कृतिचा तूच राखिला,
धर्म हिंदराष्ट्राचा तूंच जगविला,
दास्य-दैन्य-दुर्गातिची तोडिली मिठी.
जय, जय, जय, जय विजये ! माय मराठी! ।।1।।

वैराग्या, पुरुषार्था, शिकवि घरिं घरीं,
ज्ञानेश्वर निर्मि तुझिच ज्ञान निर्झरी,
शक्ति, युक्ति, मुक्ति बोधुनी खरी,
दासही करी समर्थ बोध बहुपरी,
मदन रतिस डुलवि झुलवि लावण नटी.
जय, जय, जय, जय विजये ! माय मराठी! ।।2 ।।

बोल तुझे मोलाचे रोकडे खडे,
मद पंडित वीरांचा ऐकतां झडे,
घुमति तुझे पोवाडे जव चहूंकडे,
तख्त तुझ्या छळकांचे तोंच गडबडे,
हर, हर, ही गर्जनाहि काळदल पिटी.
जय, जय, जय, जय विजये ! माय मराठी! ।।3।।

सरळ शुद्ध भावाची सुरस मोहिनी,
पाप, ताप हरति जिला नित्य परिसुनी,
ती अभंग वाणि गोड अमृताहुनी,
कां न तिला मोहावा रुक्मिणी - धनी?
ऐकण्यास सतत उभा भीवरे तटी.
जय, जय, जय, जय विजये ! माय मराठी! ।।4।।

जोंवरी ही धरणि चंद्र, सूर्य जोंवरी
भूवरि सत्पुत्र तुझे वसति तोंवरी,
रक्षितील वैभव शिर होउनी करीं,
दुमदमुमेल दाहिदिशी हीच वैखरी-
''धन्य महाराष्ट्र देश, धन्य मराठी!''
जय, जय, जय, जय विजये ! माय मराठी! ।।5।।