शनिवार, 11 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. आज-काल
  3. महाराष्ट्र दिन
Written By वेबदुनिया|

गर्जा महाराष्ट्र माझा

maharashatra din
लाभले आम्हास भाग्य बोलतो मराठी
जाहलो खरेच धन्य ऐकतो मराठी
धर्म, पंथ, जात एक जाणतो मराठी
एवढ्या जगात माय मानतो मराठी 
संयुक्त महाराष्ट्राच्या स्थापनेनंतर राज्यकारभाराची सूत्रे मराठी माणसाच्या हाती आली तरी धनदांडग्या अमराठी भाषिकांचे वर्चस्व उत्तरोत्तर वाढतच गेले. 'मराठे लढाया जिंकताना आणि हाता हरतात' हे इतिहासातील भूत वर्तमानकाळातही छळत आहे. व्यापार, गिरण्या, कारखाने, सार्वजनिक उपक्रम विकसित झाले. त्यात मराठी माणसांना धूर्तपणे डावलून, अमराठी लोकांना नोकर्‍यांमध्ये सामावले गेले. त्याविरूद्ध आवाज उठवण्याची, लढण्याची हिम्मत केवळ बाळासाहेबांनी आणि त्यांच्या शिवसेनेने केली. महाराष्ट्र , मराठी भाषा, मराठी संस्कृती सातत्याने जागृत आणि ज्वलंत ठेवण्याचे सत्कार्य गेली 4 दशके अथक करण्याचे श्रेय शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरेना जाते. देशपरदेशातील प्रत्येक मराठी घरामध्ये, मनामध्ये त्यांना अढळ स्थान आहे. ते अनभिषिक्त मराठी हृदयसम्राट आहेत.

मराठी जणांची प्रवृती आणि इतिहासावरून असे लक्षात येते की कला, सामाजिक विचार आणि अध्यात्म या तीन क्षेत्रांत ते कायम प्रभावी आहेत. ज्ञानेश्वर (ज्ञानेश्वरी), तुकाराम (गाथा), एकनाथ (भारूड), रामदास (दासबोध, मनाचे श्लोक), मोरोपंत (आर्या) बहिणाबाई चौदरी, जी.ए. कुलकर्णी, माडगुळकर बंधू, जयवंत दळवी, दुर्गा भागवत, गो. नी. दांडेकर, नरेंद्र जाधव, गौरी देशपांडे, भालचंद्र नेमाडे, दि.पु. चित्रे, वीणा गवाणकर, कृष्णमेघ कुंटे यांचे साहित्य जागतिक दर्जाचे आहे.

सावित्रीबाई फुले, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज, लोकहितवादी, न्यायमूर्ती रानडे, समाजसुधारक आगरकर, महर्षी शिंदे, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, शि.म. परांजपे इत्यादींच्या सामाजिक विचारांची प्रभावळ मराठीला लाभली. त्यांच्या प्रगतीशील विचारांमुळे विसाव्या शतकाच्या सुरूवातीस महाराष्ट्र संपूर्ण देशात अग्रेसर होता. आजही आहे. सामाजिक समता, स्त्रीमुक्ती, अंधश्रद्धा निर्मूलन, आदिवासींचे हक्क, पर्यावरण संवर्धन विकास इ. बाबतीत मराठीतील विचारमंथन लक्षणीय आहे. उदाहरणेच द्यायची झाली तर आनंदवनचे कै. बाबा आमटे, साधनाताई आमटे, नर्मदा बचाव आंदोलनाच्या मेधा पाटकर, डॉ. अभय आणि राणी बंग, लेखक विश्वास पाटील, ‍कविता महाजन, ज्योतिदर्भास्कर साळगांवकर, मुक्तांगणचे डॉ. अनिल अवचट, डॉ. सुनंदा अवचट इ.

महाराष्ट्रासाठी देशासाठी त्याग करणे हे जणू मराठी माणसांचे परंपरागत, पिढीजात कर्तव्य असल्याने (छत्रपती शिवाजी महाराजांचे हिंदवी स्वराज्य, पेशवे-शिंदे-होळकरांचे अटकेपार झेंडे आणि पानिपतची मर्दुमकी, तात्या टोपे, झाशीची राणी, स्वातंत्र्यसेनानी वासुदेव फडके, उमाजी नाईक, नाना पाटील, लोकमान्य टिळत, स्वातंत्र्यवीर सावरकर, हुतात्मा चाफेकर इत्यादींचा स्वातंत्र्यलढ्या, छ‍त्रपती शाहू महाराज, महात्मा फुले, महर्षी कर्वे, कर्मवीर भाऊराव पाटील, गाडगे महाराज, विनोबा भावे, साने गरूजी, सेनापती बापट, प्रबोधनकार ठाकरे इ. ची समाजसुधारणा) मराठ्यांचे शौर्य, हौतात्म्य, सामाजिक कार्य उपेक्षित राहिले.

'प्राप्तकाल हा विशाल भुधणल सुंदर लेणी त्यात खोदा' असे आवाहन केशवसुतांनी 100 वर्षांपूर्वी केले. त्यापुढे त्यांनी असेतही सांगितले, 'निजनामे त्यावरती नोंदा' यात मराठी माणूस मागे पडतो. त्यामुळे काम मराठी माणसांनी करायचे आणि त्याचे श्रेय लाटणार इतर उपटसुंभ. आपली मराठी माणसं प्रसिद्धीपराङमुख राहण्यात धन्यता मानतात. पानिपतच्या लढाईमदील मराठ्यांच्या शौर्याचे पोवाडे, पानिपत परिसरात आजही गायले जातात. अहमदशहा अब्दाली विरूद्ध लढण्यासाठी केवळ महाराष्ट्रातून नव्हे तर अखंड हिंदुस्थानातून अवघे मराठी सैन्य गोळा झाले होते. दिल्लीचे तख्‍त राखणे आणि परकीय अब्दालीपासून हिंदुस्थानी जनतेते रक्षण करणे या ध्येयाने ते प्रेरित झाले होते. अपुर्‍या पाठबळावर आणि भुकेल्या पोटीदेखील मराठ्यांनी आक्रामकांना परतवून लावले. परिणामी लुटालूट, जाळपोळ, धर्मांतर अशी अनेक संकटे टळली. पानिपतच्या लढाईचे हे राजकीय आणि सामाजिक फलित मराठ्यांच्या बलिदानामुळे शक्य झाले. मराठ्यांची प्राण पणाला लावून दिलेल्या शब्दाला जागण्याची वृती आणि कडवा प्रतिकार यामुळेच हे घडले.

लोकमान्य टिळक, स्वातंत्र्यवीर सावरकर, हुतात्मा चाफेकर इ. मराठी नेते कोणत्याही वैयक्तिक स्वार्थाशिवाय केवळ राष्ट्रभक्तीने प्रेरित होऊन, सर्वस्वाचा त्याग करून स्वातंत्र लढ्यात झुंजले. त्यासाठी लोकमान्यांना मंडालेत कारावास, स्वातंत्र्यवीर सावरकरांना अंदमानात काळ्या पाण्याची जन्मठेप आणि चाफेकरांना फाशीची शिक्षा भोगावी लागली. स्वातंत्र्यप्राप्तीनंतर सत्तेवर आलेल्या काँग्रेस सरकारने मराठी स्वातंत्र्यसेनांनींची उपेक्षाच नव्हे तर मानहानी केली. स्वातंत्र्यवीर सावरकरांना गांधी - हत्येच्या खटल्यात गोवले. त्यांची बी.ए.ची पदहवीही रोखली. चिंतामणराव देशमुखांसारख्या विद्वान अर्थतज्ज्ञाला नेहरूंनी अपमानास्पद वागणूक देऊन राजीनामा देण्यास भाग पाडले. याविरूद्ध मोहनदास गांधींनी आपल्या वैयक्तिक अपमानाचा (रेल्वे फर्स्टक्लासच्या डब्यामधून ब्रिटिश अधिकार्‍याने हाकलेले) बदला घेण्यासाठी स्वातंत्र्य चळवळीत भाग घेतला. तुरुंगात असताना गांधींना श्रम, छळ झाल्याचे ऐकिवात नाही. तरीही त्यांना म्हणायचे राष्ट्रपिता, महात्मा आणि सर्व सार्वजनिक ठिकाणांना त्यांच्याच नावाच्या पाट्या!

अलिकडे मराठी मंडळींनी अमेरिकेत आपला जरीपटका फडकावला आहे. अमेरिकेतील धरणे, रस्ते, उड्डाणपूल बांधणार्‍यांमध्ये, अत्याधुनिक सिग्नल यंत्रणा निर्माण करणार्‍यांमध्ये मराठी माणसे आहेत. सॉफ्टवेअर इंजिनिअर्स, डॅक्टर्स, आर्कीटेक्टस् मराठी आहेत. ते सर्व तेथे परप्रांतीय आहेत आणि अमेरिकेच्याच (कर्मभूमीत) समृद्दीत भर घालीत आहेत. तिथे झोपड्या बांधून, कचरा टाकून, थुंकून गलिच्छपणा करीत नाहीत. गुंडगिरी, अरेरावी, धाकदपटशाही, बेकायदेशीर कृत्ये करीत नाहीत.

बहुतेक मराठी घरांमधून मुलांवर संस्कार होतात 'बेटा, भरपूर अभ्यास कर, उच्चशिक्षण घे, शिक्षणाच्या जोरावर चांगली नोकरी मिळव, पण पैशांच्या मागे लागू नकोस. त्याऐवजी समाजसेवा कर.' मुले शिकतात, मुली डॉक्टर्स, मुलगे इंजिनियर्स होतात. मनापासून समाजकार्यात रमतात पण पैशांच चणचण कायमचीच, त्यामुळे गिरगाव, दादरच्या मध्यवर्ती जागा सोडून कल्याण, डोंबिवली, विरार-वसईकडे ढकलले जातात. यावर उपाय म्हणजे संस्कार करणार्‍या वडीलधार्‍या मंडळींचे प्रबोधन केले पाहिजे. बालमनावर, युवापिढीवर यश-संपत्तीचा संस्कार करणे आवश्यक आहे.

महाराष्ट्रात थोर साधुसंत,वीर लढवय्ये, मुत्सद्दी राजकरणी, प्रतिभावंत कवी, लेखक निर्माण झाले आहेत. आपल्या समृद्ध, प्रगल्भ ज्ञानाने मराठीची मशाल धगधगत ठेवण्याची ऊर्जा मराठी माणसात आहे. गरज आहे निर्धाराची!

('आपले वसंतश्री' या दिवाळी अंकातून साभार)