Maharashatra Day 2023 समुद्रात ढोल ताशाचं वादन
महाराष्ट्रासाठी 1 मे हा दिवस खूप खास आहे. याच दिवशी महाराष्ट्र राज्याची स्थापना झाली होती. या दिवसाला जगभरात आंतरराष्ट्रीय कामगार दिन म्हणून साजरा केला जातो. अठराव्या शतकात झालेल्या कामगार चळवळीच्या गौरवासाठी आजचा दिवस खूप महत्त्वाचा आहे. जगभरात हा दिवस वेगवेगळ्या पद्धतीने साजरा केला जातो.
सातासमुद्रपार असलेल्या मराठी माणूसदेखील वेगवेगळ्या पद्धतीने महाराष्ट्र दिन साजरा करतो. आखाती देशातील पहिले आणि एकमेव पारंपारिक ढोल ताशा पथक त्रिविक्रम ढोल ताशा यांनी महाराष्ट्र दिनाच्या निमित्ताने एक आगळा वेगळा विश्वविक्रम प्रस्थापित केला आहे.
महाराष्ट्र दिन साजरा करण्यासाठी त्यांनी चक्क एक लक्झरी योटवर, पर्शियन गल्फ या समुद्रात जगातील एकमेव 7 स्टार हॉटेल 'बुर्ज अल अरब' याच्यासमोर पाण्यात ढोल ताशाचं वादन केलं. पथकाचे संस्थापक सागर पाटील यांच्या डोक्यातून ही आगळी वेगळी संकल्पना समोर आली.
या उपक्रमात पथकातील 20 वादकांनी सहभाग घेतला. विशेष म्हणजे यात महिलांचाही समावेश होता. ही योट दुबई मरीनामधून वादकांना घेऊन निघाली आणि वाटेत Dubai Eye Giant Wheel समोरून वादन करीत बुर्ज अल अरब या हॉटेलच्या समोर थांबली. या ठिकाणी ढोल ताशाचे वादन करून या पथकाने परतीचा प्रवास केला.