मंगळवार, 7 जानेवारी 2025
  1. वृत्त-जगत
  2. »
  3. कौल महाराष्ट्राचा
  4. »
  5. खबरबात
Written By वेबदुनिया|
Last Modified: ठाणे - , शुक्रवार, 23 ऑक्टोबर 2009 (12:33 IST)

ठाणे जिल्हयात संमिश्र प्रतिसाद

मुख्यमंत्री ठरवणारा जिल्हा म्हणून गाजावाजा झालेला ठाणे जिल्हयाने कुठल्याही एका पक्षाला वा आघाडीला जनाधार न देता संमिश्र प्रतिसाद दिला आहे.

ठाणे जिल्हयातील २४ विधानसभा मतदारसंघांपैकी शिवसेना-भाजपा युतीला दहा जागा मिळाल्या असून काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीला सहा जागा मिळाल्या आहेत. जिल्हयात शिवसेनेला सहा व भाजपाला चार, राष्ट्रवादीला पाच तर काँग्रेसला फक्त एकच पालघरची जागा मिळाली आहे. मनसे व समाजवादी पक्षाने जिल्हयात प्रथमच खाते उघडले आहे.

मनसेला कल्याण ग्रामीण व कल्याण पश्चिम अशा दोन जागा तर समाजवादी पक्षाला भिवंडीतील दोन्ही जागा मिळाल्या आहेत. हितेंद्र ठाकूर यांच्या भव्य विकास आघाडीला दोन, कल्याण पूर्वेतून गणपत गायकवाड यांच्या रुपाने एक अपक्ष तर मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाला एक जागा मिळाली आहे.

ठाणे जिल्हयात शिवसेनेने ठाणे शहरातील तिन्ही जागा जिंकल्या असून अंबरनाथ, शहापूर व वसई अशा सहा जागा सेनेला आहेत. भाजपाने डोंबिवली, उल्हासनगर, भिवंडी ग्रामीण, विक्रमगड अशा चार जागा मिळाल्या आहेत. राष्ट्रवादीने बेलापूर, ऐरोली, मुंब्रा-कळवा, मुरबाड, मिरा-भाईंदर अशा पाच जागा, काँग्रेसने पालघरची, समाजवादी पक्षाने भिवंडीच्या दोन्ही, मनसेने कल्याणच्या दोन तर मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाने डहाणूची जागा जिंकली आहे.

दिग्गजांचा पराभव
ठाणे जिल्हयातील माजी मंत्री व गेल्या चार निवडणूकांमध्ये निवडून आलेल्या पालघरच्या मनिषा निमकर यांचा पराभव झाला आहे. उल्हासनगरचे पप्पू कलानी यांचा पराभवही आश्चर्यकारक मानला जात आहे. मुरबाडचे आमदार गोटीराम पवार यांचाही पराभव झाला आहे. भिवंडीचे शिवसेनेचे आमदार योगेश पाटील पराभूत झाले आहेत.

या निवडणूकीत ठाणे जिल्हयातून अनेक नवखे उमेदवार विधानसभेत पोहोचले आहेत. कल्याण पश्चिमेतून विजयी झालेले मनसेचे प्रकाश भोईर यांच्या रुपाने एका सामान्य कार्यकर्त्याला आमदार होण्याची संधी मिळाली आहे. कल्याण पूर्वेतून गणपत गायकवाड, अंबरनाथचे डॉ. बालाजी किणीकर, वसईतून शिवसेनेचे विवेक पंडीत, नालासोपार्‍यातील बहूजन विकास आघाडीचे क्षितीज ठाकूर, ऐरोलीतून संदीप नाईक इत्यादी प्रथमच विधानसभेत जाणार आहेत.

एकनाथ शिंदे यांना सर्वाधिक मते
ठाणे जिल्हयातून सर्वाधिक मते व विक्रमी मताधिक्क्याने विजयी होण्याचा मान शिवसेनेचे ठाणे जिल्हा संपर्कप्रमुख आमदार एकनाथ शिंदे यांना लाभले आहे. एकनाथ शिंदे यांना ७३ हजार ४९९ मते मिळाली. सुमारे ३८ हजाराहून अधिक मताधिक्क्यांनी त्यांचा विजय झाला. कल्याण पूर्वेतून विजयी झालेले गणपत गायकवाड यांना सुमारे २५ हजारांचे मताधिक्य मिळाले. तर अंबरनाथमधील डॉ. बालाजी किणीकर यांना २० हजाराचे मताधिक्य मिळाले आहे.