शुक्रवार, 10 जानेवारी 2025
  1. वृत्त-जगत
  2. »
  3. कौल महाराष्ट्राचा
  4. »
  5. खबरबात
Written By भाषा|
Last Modified: मुंबई , मंगळवार, 13 ऑक्टोबर 2009 (10:21 IST)

पवार, देशमुखांची मतदानात आघाडी

महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसाठी आज सकाळी सातला मतदानाला सुरवात झाली. आज सकाळी लवकर मतदान करणार्‍यांमध्ये केंद्रीय मंत्री आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, केंद्रीय मंत्री विलासराव देशमुख, उद्योगपती अनिल अंबानी, मुंबईचे पोलिस आयुक्त डी. शिवानंदन आणि भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे अध्यक्ष शशांक मनोहर यांचा समावेश होता.

पवार यांनी मुलगी सुप्रिया सुळे हिच्यासह बारामती येते मतदान केले. राज्याच्या संपूर्ण विकासासाठी आम्ही कटिबद्ध आहोत. त्यासाठीच आम्हाला स्थिर सरकार द्यायचे आहे. शिवसेना-भाजप युती सरकार चालविण्यास सक्षम नाही, असे जनतेला वाटते आहे, असे सांगून महागाईचा या निवडणुकीवर काहीही परिणाम होणार नाही, असे पवार मतदानानंतर पत्रकारांशी बोलताना म्हणाले.

विलासराव देशमुख यांनी लातूर जिल्ह्यातील बाभूळगाव येथे आपल्या कुटुंबियांसह मतदान केले. कॉंग्रेस आघाडी बहूमताचा आकडा गाठेल, असा विश्वास त्यांनी यावेळी बोलताना व्यक्त केला. एकूण मतदारांपैकी साठ टक्के मतदार तरूण आहेत आणि आम्ही बहुतांश तरूण उमेदवार मिळाल्याने तरूणांची मते त्यांना मिळतील, असा दावाही त्यांनी केला.