शुक्रवार, 27 डिसेंबर 2024
  1. लाईफस्टाईल
  2. छत्रपती शिवाजी महाराज
  3. महाराष्ट्रातील किल्ले
Written By
Last Modified: गुरूवार, 5 ऑक्टोबर 2023 (08:14 IST)

Koraigad Fort कोराईगड

Koraigad Fort
Koraigad Fort लोणावळ्याच्या पूर्वेपासून मुळशीच्या मावळतीकडे एक डोंगराळ भाग आहे. हा भाग मावळ म्हणून ओळखला जातो. हिंदवी स्वराज्य  स्थापनेत याच मावळातील मावळ्यांनी शिव छत्रपतींना मोलाची साथ दिली. याच बारा मावळातील मावळ्यांच्या रूपातील हत्यारबंद   भवानीनी महाराष्ट्राला शिवराज्याभिषेकासारख्या सोहळ्याचा साक्षीदार होण्याचा मान दिला. (6 जून 1674)
 
अशाच कोरबारस मावळातील किल्ले कोराईगडास पाहण्यासाठी णसाठी पर्यटकांची गर्दी वाढत आहे. लोणावळ्याहून अँबे व्हॅलीत जाणार्‍या   रस्त्यावर पेठ शहापूर हे किल्ल्याचे पायथ्याचे गाव लागते. या वाटेत भुशी डॅम, मोहाडी पिनॅकल, व्ह्यू पॉइंट अशी पर्यटन स्थळे तसेच आय  एन एस शिवाजी नेव्हीचा तळ लागतो. पेठ शहापूरच्या कोराईमाला हॉटेलजवळून गडाच्या चढाईस सुरुवात होते. 
 
समोरील कोराईगडाची तटबंदी आपणास खुणावत असते. मोबाइल टॉवर ओलांडून गर्द झाडीतून आपली पायपीट सुरू होते. काही अंतर पार केल्यावर अँबे व्हॅलीतून येणार्‍या पायर्‍यांजवळ पोहोचता येते. इथून काही पायर्‍या ओलांडल्या की गणेशगुहा दृष्टिपथात येते. पुन्हा पायर्‍यांची चढण ओलांडली की गडाचा गोमुखी बांधणीचा गणेश दरवाजा दिसतो. 
 
दक्षिणोत्तर पसरलेल्या कोराईगडावर आज एकही ऐतिहासिक वास्तू शिल्लक नाही. पण गडाची तटबंदी मात्र आजही शाबूत आहे. त्यावरून   अँबे व्हॅलीचे विहंगम दृश्य दिसते. सहारा ग्रुपच्या अँबे व्हॅलीतर्फे गडावरील देवळांची आणि गडाच्या पायर्‍यांची डागडुजी केली आहे. गडावर श्री शंकर, श्री विष्णू आणि गडमाता कोराईची छोटेखानी मंदिरे आहेत. 
 
korai garh1818 मध्ये कर्नल प्रॉथरने गडाचा ताबा घेतला. गडावरील कोराई देवीचे दागिने मुंबईच्या मुंबादेवीला अर्पण करण्यात आले. गडावर दोन बांधीव तळी आणि 3-4 तोफा आहेत. गडाच्या चोर दरवाज्यातून पायथ्याच्या आंबवणे गावात उतरता येते. अस्सल भटके किंवा गिर्यारोहकाशिवाय कुणीही या वाटेच्या फंद्यात पडू नये. गडावर सावलीसाठी एकही झाड नाही. निवार्‍यासाठी फक्त कोराई देवीचे मंदिर आहे. गडावर वृक्षारोपणाची गरज आहे. 
 
सह्याद्रीच्या याच दुर्गाच्या मदतीने शिवरायांनी हिंदवी स्वराज्य स्थापन केले. त्या दुर्गाच्या मदतीने राजांनी स्वराज्य वाढविले. शासनाने आता गडाची डागडुजी हाती घेतली आहे. अनेक शिवप्रेमी कोराई देवीच्या दर्शनासाठी येतात. पर्यटनासाठी येथे येणार्‍यांची संख्या वाढत आहे. 
 
म. अ. खाडिलकर