निवडणूक लढवावीशी वाटत असेल, तर त्यात गैर काय?
आदित्य ठाकरे असो किंवा पुत्र अमित ठाकरे, त्यांना निवडणूक लढवावीशी वाटत असेल, तर त्यात गैर काय? असं म्हणत मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पाठिंबा दिला आहे. निवडणूक लढवावी की नाही, हे प्रत्येकाचं वैयक्तिक मत आहे. उद्या माझ्या मुलाला निवडणुकीत उतरायचं असेल, आणि तो याबाबत ठाम असेल, तर मी नाही म्हणणार नाही. पण त्याला स्वतःविषयी खात्री वाटत नसेल तर कोण काय करु शकेल? असं राज ठाकरे म्हणाले आहेत. एका हिंदी वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत राज ठाकरे बोलत होते.
‘बाळासाहेब आधीपासूनच व्यंगचित्रकार होते. माझे आजोबा म्हणाले होते, की याला जे जे स्कूल ऑफ आर्ट्सला पाठवू नका, याचा हात खराब होईल. जेव्हा उद्धव किंवा मी जे जे स्कूल ऑफ आर्ट्समध्ये जायचं म्हटलं, तेव्हा त्यांनी नकार नाही दिला. त्यांनी आपली मतं आमच्यावर लादण्याचा कधी प्रयत्न नाही केला.’ हे उदाहरण देत आपल्या पुढच्या पिढीला निवडणूक लढण्याबाबत निर्णय घेण्याचं स्वातंत्र्य असल्याचं राज ठाकरे यांनी सांगितलं.