आचारसंहिता भंगाबद्दल राहुल गांधींवर कारवाई करा प्रदेश भाजपची निवडणूक आयोगाकडे मागणी
वणी (जि. यवतमाळ ) येथे झालेल्या जाहीर सभेत बोलताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर असभ्य भाषेत टीका करून काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी आचारसंहितेचा भंग केला असून त्यांच्यावर कारवाई करावी अशी मागणी प्रदेश भारतीय जनता पार्टी तर्फे राज्य निवडणूक आयोगाकडे करण्यात आली आहे.
भाजपा प्रदेश उपाध्यक्ष आ. प्रसाद लाड, प्रदेश सचिव संजय उपाध्याय यांनी बुधवारी राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी बलदेव सिंग यांची भेट घेऊन या बाबतचे निवेदन सादर केले.
या तक्रारीत म्हटले आहे की, वणी येथे जाहीर सभेत भाषण करताना राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा उल्लेख 'जेबकतारी' असा केला आहे. या सभेचा व्हिडीओ तसेच स्थानिक वृत्तपत्रात आलेल्या बातम्यांमध्ये राहुल गांधी यांनी केलेल्या टीकेचा उल्लेख करण्यात आला आहे. पाकीटमार ज्या पद्धतीने ज्याचा खिसा कापायचा आहे त्याचे लक्ष विचलीत करतो, त्या प्रमाणे मोदी सरकार तुमचे लक्ष विचलीत करून अंबानी, अदानी या सारख्या उद्योगपतींचा फायदा करून देत आहे, असे विधान राहुल गांधी यांनी केले आहे. राहुल गांधी यांनी केलेले हे विधान कोणत्याही पुराव्याविना आणि आधाराविना केले आहे. या विधानामुळे लोकप्रतिनिधी कायदा १९५१ मधील कलम ८ आणि भारतीय दंड विधान १८६० मधील कलम ५०५ चा भंग झाला आहे. त्याचबरोबर या टीकेने मोदी यांचे चारित्र्यहनन करण्याचा प्रयत्न करण्यात आला असून त्यामुळे लोकप्रतिनिधी कायद्याच्या कलम १२३ (४) चे उल्लंघन झाले असल्याने आयोगाने राहुल गांधी यांच्यावर कारवाई करावी, अशी मागणीही या निवेदनात करण्यात आली आहे.