1. मराठी बातम्या
  2. अर्थजगत
  3. कृषीविश्व
  4. Relief for 10,000 farmers in Raigad district through the loan waiver scheme

रायगड जिल्ह्यातील १० हजार शेतकऱ्यांना कर्जमाफी योजनेचा दिलासा

रायगड जिल्ह्यातील १० हजार ७५ शेतकरी 'पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर शेतकरी सन्मान योजने'अंतर्गत कर्जमाफीसाठी पात्र ठरले आहेत. मात्र, या कर्जमाफीचा प्रत्यक्ष लाभ मिळवण्यासाठी पात्र शेतकऱ्यांना जवळच्या सेवा केंद्रावर जाऊन आधार प्रमाणीकरण (e-KYC) करणे बंधनकारक असणार आहे.
 
तिसऱ्या यादीत वाढले लाभार्थी: जिल्ह्यातील एकूणात १२,६८२ थकीत कर्जदारांची माहिती पोर्टलवर नोंदवण्यात आली होती. त्यापैकी पहिल्या यादीत ७,३६८, दुसऱ्या यादीत १,३७४ तर आता जाहीर झालेल्या तिसऱ्या यादीत १,३३४ शेतकरी पात्र ठरले आहेत. अशा प्रकारे एकूण नोंदींपैकी सुमारे ८०% शेतकऱ्यांना या योजनेचा फायदा होणार आहे.
 
कर्जमाफीचे नियम:
३० सप्टेंबर २०२५ पर्यंत पीक कर्ज थकीत असलेल्या आणि ३१ मार्च २०२६ पर्यंत त्याची परतफेड न करू शकलेल्या शेतकऱ्यांना २ लाख रुपयांपर्यंत कर्जमाफी दिली जाणार आहे.
 
२ लाख रुपयांपेक्षा जास्त थकीत कर्ज असलेल्या शेतकऱ्यांसाठी 'हेअर कट एसओपी' (Haircut SOP) प्रणालीचा वापर केला जाईल.
 
जे शेतकरी नियमितपणे कर्जाची परतफेड करतात, त्यांना ५० हजार रुपयांपर्यंत प्रोत्साहनपर अनुदान दिले जाईल.
 
बँका आणि संस्था: ही योजना राष्ट्रीयीकृत बँका, खासगी बँका, प्रादेशिक ग्रामीण बँका, जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँका आणि प्राथमिक कृषी पतपुरवठा संस्थांच्या (PACS) कर्जदारांसाठी लागू आहे.
 
पुढील प्रक्रिया व आवाहन:
जिल्हा उपनिबंधक तनवीर पाटील यांनी दिलेल्या माहितीनुसार, पात्र शेतकऱ्यांची यादी संबंधित बँक शाखा, विकास संस्था आणि ग्रामपंचायतींमध्ये उपलब्ध केली जाईल. ज्या शेतकऱ्यांचे नाव यादीत आहे, त्यांनी त्वरित जवळच्या सेवा केंद्रात जाऊन आपले आधार प्रमाणीकरण पूर्ण करून घ्यावे, तरच कर्जमाफीची रक्कम खात्यात जमा होणार आहे.
पुढील लेख
२६ किमी मायलेज देणाऱ्या मारुतीच्या या SUV साठी लोकांमध्ये मोठी क्रेझ, विक्री १५ लाखांच्या पार