रविवार, 28 एप्रिल 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. मराठा आरक्षण
Written By
Last Modified: बुधवार, 26 मे 2021 (17:58 IST)

मराठा आरक्षण : संभाजीराजे छत्रपती नरेंद्र मोदींच्या विरोधात जात आहेत का?

स्वाती पाटील
सध्या मराठा आरक्षण हा राज्यातील ज्वलंत विषय आहे. सर्वोच्च न्यायालयात मराठा आरक्षणाचा निर्णय रद्द झाल्यानंतर मराठा समाज नव्यानं याआंदोलनाची रणनिती ठरवत आहे.
 
अशा परिस्थितीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मराठा आरक्षणाबाबतच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उभं राहिलय. त्याचं प्रमुख कारण म्हणजे खासदार संभाजीराजे यांना मराठा आरक्षणप्रश्नी मोदींची भेट न मिळणं हे आहे. पण यावरून मराठा आरक्षण प्रश्नी आता संभाजीराजे विरुद्ध भाजप असं चित्र निर्माण होताना दिसत आहे.
 
संभाजी राजे विरुद्ध भाजप असं चित्र का निर्माण झालं?
मराठा आरक्षणाबाबत आग्रही असलेल्या खासदार संभाजीराजेंनी वारंवार पत्र व्यवहार करूनही त्यांना मोदींना भेटता आलेलं नाही. याबाबत संभाजीराजे यांनी उघडपणे नाराजी व्यक्त केल्यानंतर आता या मुद्यावर राजकारण सुरू झाल्याचं दिसतंय.
 
27 ऑक्टोबर 2020 रोजी बीबीसी मराठीला दिलेल्या मुलाखतीतही नरेंद्र मोदी भेटीसाठी वेळ देत नसल्याचं संभाजीराजे यांनी सांगितलं होतं.
एकीकडे संभाजी राजे नाराजी व्यक्त करत आहेत तर दुसरीकडे भाजपकडून बाजू सावरण्याचा प्रयत्न होताना दिसत आहे.
 
मराठा आरक्षणाच्या प्रश्नी पंतप्रधानांकडे चार वेळा वेळ मागितली, ती मिळाली नाही. असं सांगत नाशिक इथं पत्रकार परिषदेत संभाजीराजे यांनी आक्रमक भूमिका घेतली. केंद्र आणि राज्य सरकारच्या मराठा आरक्षण विषयावर असलेल्या भूमिकेवर त्यांनी संताप व्यक्त केला.
तर यावर बोलताना मराठा आरक्षण हा विषयच माझा नाही. हा राज्याचा विषय आहे, असं मोदींना वाटतं त्यामुळे त्यांनी संभाजीराजेंना भेट दिली नाही, असं भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील म्हणाले.
 
याबाबत राज्याचे ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी केंद्र सरकारवर टीका केली. ते म्हणाले, "मोदींनी खासदार संभाजीराजे यांना भेट नाकारल्याने संभाजीराजे आक्रमक झाले आहेत."
या वादात आता कॉंग्रेसनेही उडी घेतलीय. चंद्रकांत पाटील यांच्या वक्तव्यावर कॉंग्रेसच्या सचिन सावंत यांनी टीका केलीय.
 
ते म्हणाले, "मोदींनी संभाजीराजेंना भेट नाकारणं याबद्दल दुःख वाटलं."
 
चंद्रकांत पाटील यांच्या वक्तव्याचा अर्थ काढताना सावंत म्हणाले की, "याचा अर्थ काय की मोदींना विषयाची समज नाही की मोदींना आरक्षण विषयात रस नाही. ते पुढे असंही म्हणाले की, छत्रपती या उपाधीचा वापर भाजपने केवळ राजकारणासाठी करावा असा उद्देश मोदींजीच्या मनामध्ये आहे. मोदीजी कंगना राणावत, प्रियांका चोप्रा अशा अभिनेत्रींना भेटीसाठी वेळ देतात. मात्र संभाजीराजेंना मराठा आरक्षण प्रश्नी भेट न देणं हा महाराष्ट्राचा अवमान आहे."
 
चंद्रकांत पाटील यांचं वक्तव्य हे मराठा आंदोलकांच्या जखमांवर मीठ चोळण्याचा प्रकार आहे, असंही सावंत म्हटले.
 
आरक्षणाचा निर्णय मोदींच्या हातात नाही हेच मुळात पटण्यासारखं नाही, असं सकाळचे संपादक श्रीराम पवार यांना वाटतं.
 
"जोवर हा विषय राज्य सरकारच्या अखत्यारित होता. तोवर मोदींची भेट घेऊन उपयोग नाही यात तथ्य होतं. पण राज्य सरकारने आपली भूमिका पार पाडल्यानंतर आता निर्णय केंद्र सरकारच्या हातात आहे. केंद्राच्या भूमिकेवर मराठा आरक्षणाचा निर्णय अवलंबून आहे. त्यामुळे आता संभाजीराजे यांनी मोदींकडे वेळ मागितला असेल आणि भेट होत नसेल तर मोदीचा या प्रश्नाशी संबंध नाही हे म्हणणं योग्य ठरणार नाही," असं श्रीराम पवार यांना वाटतं.
 
भाजपची भूमिका संभाजीराजेंच्या विरोधात की आरक्षणाला पाठिंबा?
सर्वोच्या न्यायालयात मराठा आरक्षण टिकलं नाही. त्यामुळं मराठा समाजाचा नव्याने लढा सुरू झाला आहे. हा लढा कसा असावा याबद्दल वेगवेगळी मतं दिसून येत आहेत. मराठा समाजाने आजवर मूक मोर्चे काढत शांततेत आंदोलनाचा मार्ग स्वीकारला होता.
 
पण आता आक्रमक आंदोलनाची वेळ आल्याचं अनेकांकडून बोललं जात आहे. याबाबत नाशिक इथं बोलताना संभाजीराजे यांनी 27 मे रोजी आपली भूमिका स्पष्ट करणार असल्याचं सांगितलं. तसंच मराठा समाजाला शांत राहण्याचं आवाहन केलं.
 
याउलट शिवसंग्राम संघटनेचे नेते विनायक मेटे यांनी आक्रमक भूमिका मांडली आहे. बीडमधून येत्या ५ जूनपासून मोर्चा काढणार असल्याचं मेटे यांनी पुणे इथं बोलताना सांगितलं. आता होणारा मोर्चा हा मूक नसून बोलका असणार, असं सांगायला ते विसरले नाहीत.
 
तर मराठा समाजाच्या हितासाठी कोणताही नेता किंवा संघटना आंदोलन करणार असेल तर भाजप त्यात पक्षाचा झेंडा, बॅनर ,बिल्ला काहीही न वापरता केवळ सामान्य नागरिक म्हणून सहभागी होईल, असं भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी सांगितलं. ते पुण्यात बोलत होते.
एकीकडे कोरोनाचा काळ असल्यानं संभाजीराजे आक्रमक आंदोलनाच्या मानसिकतेत नाहीत असं दिसंतय तर मेटेंच्या आंदोलनाला अप्रत्यक्षपणे पाठिंबा देत भाजप संभाजीराजेंच्या विरोधात भूमिका घेत आहे असं दिसतंय.
 
यावर "कोणत्याही पक्षाची भूमिका न घेता केवळ शिवाजी महाराजांच्या विचारांनी पुढे जाणारा नेता अशी छबी निर्माण करण्याचा संभाजीराजे यांचा प्रयत्न राहिला आहे,"असं पवार यांना वाटतं.
 
त्यामुळं छत्रपती घराण्याचा वारस या नात्याने मराठा समाजाच्या आंदोलनाचे नेतृत्व करणं त्यांनी पसंत केल्याचं दिसत आहे, असंही पवार यांना वाटतं.
 
खासदारकी संपत आली म्हणून?
संभाजीराजे यांची खासदारकी संपत आली आहे म्हणून ते सध्या आक्रमक होत आहेत, अशी चर्चा सध्या रंगली आहे. समाजमाध्यमांवरसुद्धा त्याबाबत बोललं जात आहे.
 
याबाबत बोलताना श्रीराम पवार सांगतात, "संभाजीराजे हे राष्ट्रपती नियुक्त खासदार आहेत. गेल्या पाच वर्षातील त्यांच्या भूमिका पाहिल्या तर ते भाजपच्या बाजुने किंवा भाजप विरोधात मत मांडताना दिसले नाहीत. संभाजीराजे यांची नियुक्ती भाजप सरकारने केली असली तरी आपण भाजपचा सदस्य नसल्याचं संधी मिळेल तिथे दाखवण्याचा प्रयत्न राजेंनी केल्याचे दिसतंय."
 
"मराठा आरक्षण प्रश्न सोडवण्याची जबाबदारी ही केंद्र आणि राज्य सरकारची आहे. मात्र त्यातही संभाजीराजे यांनी समतोल भूमिका घेतल्याचं पाहायला मिळतंय. रायगड शिवराज्याभिषेक सोहळा, गड किल्ल्याचं संवर्धन अशा गोष्टींमधून संभाजी राजे यांचं नेतृत्व समोर आलं. पुढे मराठा समाजाच्या आरक्षणाच्या मागणीसाठी सुरू असलेल्या लढ्यात त्यांनी पुढाकार घेतला.
 
"या सगळ्या परिस्थितीत संभाजीराजे आणि भाजप या दोघांनाही एकमेकांना पुरक किंवा विरोधी भूमिका घेणं कठीण जातंय असं दिसतंय. संभाजी राजे उघडपणे भाजपविरोधी बोलताना दिसत नाहीत. तर भाजपदेखील संभाजीराजेंना उघडपणे पाठिंबा किंवा विरोध करताना दिसत नाही. याचं उदाहरण म्हणून सध्या सुरू असलेल्या मराठा आरक्षण लढ्यातील भूमिकांकडे पाहता येऊ शकतं.
"इतिहास पाहता एखाद्याला राष्ट्रपती किंवा राज्यपाल कोट्यातलं सदस्यत्व बहुतेकवेळा एकदाच मिळालेलं आहे. त्यामुळे खासदारकीसाठी संभाजीराजे भाजपशी जवळीक करतील याची शक्यता कमी आहे. पण संभाजी राजे यांना भाजपने दुसऱ्यांदा संधी दिली तर ते अपवादत्मक असेल," असं दैनिक सकाळचे संपादक श्रीराम पवार यांना वाटतं.
 
संभाजीराजे हे राजघराण्यातील असल्याने आजवर राजकीय भूमिका घेताना त्यांनी सावधनता बाळगली असल्याचा इतिहास आहे. राज्यात राष्ट्रवादी कॉंग्रेसने त्यांना संधी दिली होती. पण त्यात त्यांना अपयश आलं. त्यानंतर भाजपने राज्यसभेवर संधी दिली. पण तरीही संभाजीराजे यांच्या आजवरच्या भूमिका पाहता त्यांनी कोणत्या एका पक्षाची बाजू घेतल्याचं निदर्शनास आलेलं नाही,असंही पवार यांनी सांगितलं.