शुक्रवार, 29 मार्च 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. मराठा आरक्षण
Written By
Last Modified: गुरूवार, 20 मे 2021 (15:28 IST)

पंतप्रधान मोदींकडे चार वेळा पत्र लिहून वेळ मागितली, अद्यापही उत्तर नाही; संभाजीराजे संतापले

मराठा आरक्षणासाठी राज्यभरात आंदोलन करण्यासाठी आग्रही असलेल्या भाजपवर संभाजीराजे छत्रपती संतापले आहेत. मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर तोडगा काढण्यासाठी मला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भेट हवी होती. त्यासाठी मी चारवेळेला पंतप्रधान मोदींना पत्रही दिले. मात्र, अद्याप त्यांनी मला भेटीसाठी वेळ दिलेली नाही, असे सांगत संभाजीराजे छत्रपती यांनी उघडपणे नाराजी व्यक्त केली. ते गुरुवारी नाशिकमध्ये प्रसारमाध्यमांशी बोलत होते. 
 
राज्यात भाजपने मराठा आरक्षणासंदर्भात त्यांची भूमिका घ्यावी. मी काही भाजपचा ठेका घेतलेला नाही. त्यांनी मराठा समाजाच्या भावनेशी खेळू नये, त्यावर मार्ग काढावा. आंदोलन काय असतं, हे कोणीही मला शिकवू नये. आक्रमक व्हायला दोन मिनिटं लागतात. आंदोलनाला काय लागतं, आता लगेच करु. पण त्यामध्ये कोणी मयत झाले तर त्याला जबाबदार कोण, शाहुंचा वंशज, असा सवाल संभाजीराजे यांनी उपस्थित केला.
 
माझ्याकडे अनुभव असला तरी मराठा आरक्षणाच्या प्रश्नावर माझ्यापेक्षा जास्त अभ्यास असलेले अनेकजण आहेत. त्यांच्याशी चर्चा करुन मी 27 तारखेला माझी भूमिका मांडणार आहे. एकदा मी पाय पुढे टाकला की मागे घेणार नाही. त्यावेळी मराठा आमदार आणि खासदारांनी माझं-तुझं केलं तर बघा, असा इशाराही संभाजीराजे छत्रपती यांनी दिला.