पुण्याचे विभागीय आयुक्त सौरभ राव यांना दुसऱ्यांदा कोरोना
दोन महिन्यांपासून कोरोना रुग्णांना सोयी-सुविधा पुरविण्यासाठी दिवसरात्र काम करणारे पुण्याचे विभागीय आयुक्त सौरभ राव यांना पुन्हा एकदा म्हणजे दुसऱ्यांदा कोरोनाची लागण झाली आहे. राव यानी कोरोना लसीकरणाचा दुसरा डोस घेतल्यानंतर त्रास सुरू झाल्याने कोरोना चाचणी केली. सोमवारी चाचणीचा अहवाल
पॉझिटिव्ह आला.
कोरोनाच्या पहिल्या लाटेत देखील सौरभ राव रस्त्यावर उतरून कोरोना रुग्णांच्या सेवा करत होते. एक वर्ष कोरोना रुग्णांची सेवा केल्यानंतर 16 मार्च 2021 रोजी सौरभ राव यांना कोरोनाची लागण झाली. कोरोना लसीकरणाचा पहिला डोस झाल्यानंतर राव यांना ही लागण झाली होती. त्यामुळे कोरोनाचा दुसरा डोस घेण्यास उशीर झाला. परंतु शुक्रवार उपमुख्यमंत्री तथा पालकमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली कोरोना आढावा बैठक झाल्यानंतर राव यांनी लसीचा दुसरा डोस घेतला. लसीकरण झाल्यानंतर राव यांना त्रास होण्यास सुरुवात झाली. लसीकरणामुळे त्रास होत असेल असे राव यांना वाटले. परंतु त्रास अधिकच होत असल्याने कोरोना चाचणी केली, यात राव यांचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला.